शेतीत फुलताहेत उद्यमशीलतेची बेटं

गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांची एक पिढी शेतीत उतरलीय. हे युवक थेट माल पिकवत नाहीत; तर व्यापार आणि प्राथमिक प्रक्रिया करताहेत. ही उद्यमशीलतेची बेटं आता मागे राहिलेल्यांना प्रकाश दाखवत आहेत.
संपादकीय
संपादकीय
गेल्या वर्षी ''महाएफपीसी'' आणि शेतकरी कंपन्यांनी सुमारे ३३ हजार टन तुरीची यशस्वी खरेदी केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच शेतकरी कंपन्यांनी व्यापाराचा पूर्वानुभव किंवा तज्ज्ञता नसताना अशा प्रकारची कामगिरी बजावली. अत्यंत पारदर्शकपणे, गैरव्यवहाराला थारा न देता थेट खरेदी ते पेमेंटची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. तुरीच्या अनुभवानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काही शेतकरी कंपन्यांनी खासगी क्षेत्राकडे काम मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मुक्ताईनगर येथील ''स्वावलंबन'', सुलतानपूर येथील ''स्वरूप'', करमाळा येथील ''सर्वोद्य'' आणि ''कमलाभवानी'' या शेतकऱ्यांच्या कंपन्यांनी पोल्ट्री उद्योगाला थेट मका पुरवठ्याचा उपक्रम यशस्वीपणे सुरू केला आहे. या कामामुळे मका उत्पादकांना गावातच मार्केट उपलब्ध झालेय. शिवाय, क्लीनिंग, ग्रेडिंग, वाहतूक आदी बाबतीत नवा रोजगार उपलब्ध झालाय. हिंगोली येथील ''गोदावरी व्हॅली'' शेतकरी कंपनीने सोयाबीन खरेदी आणि पोच करण्याचे चांगले मॉडेल विकसित केले आहे. ही कंपनी सोयाबीन प्रोसेसर्सला थेट पुरवठा करते. केवळ क्लीनिंग, ग्रेडिंगमुळे प्रतिक्विंटल ५० रुपये अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळतो. या व्यापारात होणारा नफा आर्थिक वर्षाकाठी शेतकऱ्यांना वितरित केला जातोय. हळदीत अशाच प्रकारचे काम कंपनीकडून उभे केले जात असून, इतरांसाठी ते मार्गदर्शक आहे. सर्वांनीच केवळ माल पिकवू नये, तर काहींनी आता व्यापारी बनावे, हे समान सूत्र वरील तीन उदाहरणांत दिसते. हे सूत्र पुढे घेऊन जाण्याचे काम आणखी काही युवक करताहेत. ते ''श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी''च्या माध्यमातून. या कंपनीने पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना अनंत अडथळ्यांना तोंड देत यशस्वीपणे राबवली आहे. ग्राहकांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळत असून, शेतीमालाचा वेगाने निपटारा करण्यासाठी आणि टंचाईप्रसंगी उपलब्धता वाढवण्यासाठी हे आठवडे बाजार उपयुक्त ठरत आहेत. पुण्या-मुंबईसारखी महानगरे वाढली, पण त्यात लहान-लहान मंडईसाठी जागा सोडल्या गेल्या नाहीत. मूळचे शेतकरी असलेले स्थलांतरित विक्रते कुठेतरी रस्त्याच्या कडेला, रहदारीत व धुळीत जीव मुठीत घेऊन शेतीमाल विकतात. रस्ता रुंदीकरणामध्ये आता त्या जागाही जाताहेत. मोठा व ताजा भाजीपाला वाजवी दरात केवळ मंडईतच मिळू शकतो आणि अशा मंडई उपलब्ध नसल्याने एकूण शेतीमालाचा खप रोडावत असल्याची निरीक्षणे आहेत. या समस्येवर शेतकरी आठवडे बाजार हा एक चांगला पर्याय आहे. महागाई नियंत्रण आणि शेतकऱ्याला किफायती भाव ही दोन्ही उद्दिष्टे साधण्याची क्षमता शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेत आहे. वरील सामूहिक प्रयत्नांबरोबरच व्यक्तिगत पातळीवरील उद्यमशील प्रयत्न-पुढाकारही लक्षवेधी ठरले आहेत. पुण्यात बाटलीबंद सेंद्रिय दूध विकण्याचा उपक्रम जयवंत पाटील या आयटी अभियंता शेतकऱ्याने यशस्वीपणे राबवला आहे. दुधाची गुणवत्ता आणि वितरण यात अत्यंत उच्च मानकं प्रस्थापित करून पाटील यांनी प्रीमियम दर देणारा नवा ग्राहक आपल्याकडे खेचला आहे. आणखी एक लक्षणीय उपक्रम राबवताहेत मांजरी येथील दादा कुंजीर हे शेतकरी उद्योजक. त्यांनी दुधापासून ३४ पदार्थ तयार करून स्थानिक पातळीवरच विकण्याचा एक चांगला पॅटर्न विकसित केला आहे. जर तुम्ही गावातले काही दूध कच्च्या स्वरूपात डेअरीत न घालता, ते प्रक्रिया करून विकले तर गावातच मोठी बाजारपेठ निर्माण होते. गावागावात आज दूध उत्पादित होतेय, पण दुग्धजन्य प्रक्रिया उत्पादनांचा खप अत्यंत कमी आहे. गावातच एखाद्याने हा पुढाकार घेतला तर त्यास कसे यश मिळू शकते, याचे उदाहरण कुंजीर यांच्या उद्यमशील पुढाकारातून दिसते. डेअरीप्रमाणेच पोल्ट्री उद्योगातही लक्षणीय प्रयोग होत आहेत. स्व. अप्पासाहेब पवार यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या बारामती अॅग्रोने थेट चिकन विक्रीचा अनुकरणीय पॅटर्न विकसित केला आहे. ‘चिकन-विकन’ या ब्रॅंडअंतर्गत प्राथमिक प्रक्रिया करून फ्रेश चिल्ड् या प्रकारातील चिकन उपलब्ध करून दिले आहे. या दुकांनामध्ये कुठेही जिवंत कोंबडी, माशा व अस्वच्छता नाही. स्वच्छता आणि गुणवत्तेचे सर्व निकष पाळून चिकनची विविध उत्पादने विकली जाताहेत. सर्व कोंबड्या मोठ्या शहरात वाहून नेत तेथे कचरा निर्माण करण्यापेक्षा बांधावरच शेतकऱ्यांनाही करता येईल अशा प्राथमिक प्रक्रियेचे हे आदर्श उदाहरण होय. याशिवाय, पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रीडर्स असोसिएशनने थेट चिकन विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती येथे अशी थेट विक्रीची बेंचमार्क दुकाने कार्यरत आहेत. यामुळे कोंबडीच्या फार्म लिफ्टिंग दरानुसारच ग्राहकांना चिकन उपलब्ध होते. मंदीत चिकनचा खप वाढून ग्राहकाचा फायदा होतो. खपवाढीमुळे मंदी लवकर आटोक्यात येऊन बाजार सुस्थिर होतो. सारांश, पुरवठा साखळीतील डायरेक्ट पर्चेस, क्लीनिंग, ग्रेडिंग, वेअर हाउसिंग, डिलिव्हरी आणि प्राथमिक प्रक्रिया यात कशा संधी आहेत आणि रोजगार कसा निर्माण होऊ शकतो, याची ही चालतीबोलती उदाहरणे होत. पूर्वार्धात उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने दिलेल्या यशस्वी ''रोडमॅप''वर आता अनेक पावलं पडत आहेत. यात सह्याद्री शेतकरी समूह हा प्रेरक आणि मार्गदर्शकाचीही भूमिका निभावत आहे, हे विशेष. - दीपक चव्हाण (लेखक शेती क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com