संपादकीय
संपादकीय

अर्थार्जन आणि अन्नसुरक्षेचा वेगळा प्रयोग

प्रक्रिया केलेले सूर्यफूल बीज अमेरिकेत २५०० रुपये किलो दराने विकते हे मी पाहिले. भोपळ्याचे, कलिंगडाचे बी ७०० रुपये किलोने खरेदी केले, ही शाश्‍वत शेती नव्हे काय? अशा व्यवसायातून आपण फक्त अर्थार्जन करत नसून, खरेदी करणाऱ्या व्यक्तीस अन्नसुरक्षासुद्धा देत असतो.

चार-पाच वर्षांपूर्वीची आठवण. माझ्या अमेरिका भेटीत न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मला सहा-सात तास थांबायची वेळ आली. परतीचे विमान मिळेपर्यंतचा वेळ कसा घालवायचा, याच विचारात मी असताना विमानतळावरील एका दुकानामधील लहानशा पाकिटाने माझे लक्ष वेधून घेतले. उत्सुकता म्हणून ते सूर्यफुलाचे चित्र असलेले पाकीट मी एक डॉलरला विकत घेतले आणि एके ठिकाणी शांत बसून आतील बिया बाहेर काढल्या. त्या सूर्यफुलाच्या बिया होत्या. परिपक्व बिया रात्रभर मीठाच्या पाण्यात भिजवून नंतर वाळूमध्ये भाजून, प्रक्रिया करून पाकिटात भरलेल्या होत्या. टरफल सहज काढून आतील बी खाण्यास चवदार लागत होते.  चार पाकिटे संपली. ज्याने ही निर्मिती केली होती त्या कंपनीचे मी मनापासून आभार मानले. सूर्यफुलाचे बी आणि त्याच्यापासून अन्नसुरक्षा आणि शाश्‍वत शेती यांची सांगड घालताना त्याचे पैशाचे गणित पाहून मी चकीत झालो. १०० ग्रॅमला मी चार डॉलर म्हणजे २४० रुपये मोजले होते. 

आपल्याकडे पूर्वी कितीतरी शेतकरी सूर्यफूल लावत. भाव मिळत नसल्याने आता हे पीक कापूस आणि सोयाबीनमध्ये कुठेतरी ठिगळासारखे दिसते. उत्कृष्ट प्रथिने आणि तेल असलेले हे  सूर्यफुल बीज अनेक जीवनसत्त्वे, खनिजे यांनी परिपूर्ण असते. म्हणूनच खाणाऱ्यांना मिळते खरी अन्नसुरक्षा.  काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका मोठ्या गुजराती दुकानात गेलो. समोरच्या तीन मोठ्या काचेच्या बरण्यांमध्ये असेच प्रक्रिया केलेल्या बिया होत्या. भोपळा, खरबूज आणि टरबूज म्हणजेच कलिंगड. या फळामध्ये बिया मुबलक असतात आणि त्या फेकून दिल्या जातात. यात बियांना एकत्र करून, स्वच्छ करून त्यामधील मगसदार भाग काढून त्यावर हलकीशी प्रक्रिया करून खाण्यासाठी वापरला तर केवढी तरी महत्त्वाची अन्नसुरक्षा मिळू शकते. यामध्ये अन्नामधील प्रथिने, कर्ब, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे हे मुबलक प्रमाणात असतात. आणि यांचा आहारामधील नियमित वापर बालकांना वाढत्या वयात खरी अन्नसुरक्षा देतो. 

भोपळा वर्गातील बीजांच्या अंकुरामध्ये झिंकचे प्रमाणही जास्त असते. झिंक हे मूलद्रव्य जीवनसत्त्व अ निर्मितीमध्ये आणि हगवणीवर प्रतिबंधक म्हणून काम करते. आदिवासी भागात हजारो बालमृत्यू हे दूषित पाणी आणि हगवणीमुळे होतात आणि यास मुख्य कारण म्हणजे बालकांच्या आहारात असलेली जीवनसत्त्व ‘अ’ आणि झिंकची कमतरता. दुर्दैवाने आज या दोन घटकांचे स्रोतसुद्धा उपलब्ध नाहीत. दऱ्या-खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या लहान मुलांची अवस्था कुपोषणामुळे प्रभावित झालेली आहे. अशा ठिकाणी असे नावीण्यपूर्ण प्रयोग झाले, तर किती तरी फायदा होऊ शकतो. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जाते. कलिंगडे खाल्ली जातात, विकली जातात. मात्र आतील बहुमोल बिया कचऱ्यात जातात. याच बियांच्या प्रक्रियेमधून कितीतरी बालमृत्यू थांबवता येऊ शकतात. उन्हाळा सुरू होत आहे, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर कितीतरी कलिंगडाची दुकाने लागतील. अशा ठिकाणी टाकून दिलेल्या या बीजांवर प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीने शाश्‍वत शेती करता येऊ शकते. असाच प्रयोग लाल भोपळा, खरबूज अशा फळांसाठी करता येऊ शकतो. प्रयोगशील शेतकऱ्यास मूळ उत्पादनापेक्षाही टाकाऊ बीजापासून जास्त उत्पादन मिळवणे सहज शक्‍य आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अशा शाश्‍वत शेतीसाठी प्रोत्साहित करून याच माध्यमातून कुपोषण व बालमृत्यू नियंत्रणात येऊ शकतात. 

माझ्या एका जवळच्या व्यावसायिक मित्राने बीज प्रक्रियेमध्ये एक पाऊल पुढे टाकून या बियांपासून चवदार चॉकलेट बनवली आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये कुठेही साखर, मीठ, रंग किंवा कृत्रिम स्वाद नाही. सहा वेगवेगळ्या पारंपरिक पिकांच्या बिया वापरून तयार केलेले हे स्वादिष्ट कॅंडी बीज बार परिपूर्ण आहाराबद्दल जागरूकता असणारे अनेकजण खरेदी करतात. परदेशांतसुद्धा त्यास चांगली मागणी आहे. परवाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंनी याचा उत्कृष्ट प्रथिने आणि ऊर्जास्रोत म्हणून उपयोग केला. विशेष म्हणजे या प्रक्रिया केंद्रात अनेक आदिवासी बांधवांना रोजगारसुद्धा मिळाला आहे.

साचेबद्ध कृषी उत्पादनांमधून थोडे हटके अशा प्रकारचा नावीण्यपूर्ण व्यवसाय केला, तर अन्नसुरक्षेबरोबर शाश्‍वत अर्थार्जनही होते. समाजातील अनेक लोक असे नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात; पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रक्रिया केलेले सूर्यफूल बीज अमेरिकेत २५०० रुपये किलो दराने विकते हे मी पाहिले. भोपळ्याचे, कलिंगडाचे बी ७०० रुपये किलोने खरेदी केले ही शाश्‍वत शेती नव्हे काय? यामधून आपण फक्त अर्थार्जन करत नसून, खरेदी करणाऱ्या व्यक्तीस अन्नसुरक्षासुद्धा देत असतो. पिवळीची भाकरी मधुमेहावर किती औषधी आहे, हे मी स्वतः अनुभवले आहे. मात्र आम्ही या ज्वारीचे उत्पादन जनावरास कडबा म्हणून घेतो. पिकाचे, धान्याचे मूल्य आपणास ओळखता येत नाही, म्हणूनच शेती नुकसानीमध्ये जाते. 

डॉ. नागेश टेकाळे  ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com