नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन

१२ जुलै २०१९ च्या ‘ॲग्रोवन’मध्ये डॉ. विश्वास साखरेंचा ‘तिलापिया माशांचा घातक शिरकाव’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि अनेकांची विचारणा चालू झाली की खरेच हा तिलापिया इतका त्रासदायक आहे? मी तिलापियाचे संगोपन मागील तीन वर्षांपासून करीत असून, स्थानिक माशांच्या जातीपेक्षा तिलापिया संगोपन शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरणारे आहे. तिलापियाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठीच हा लेखप्रपंच.
संपादकीय
संपादकीय

तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण जगात चांगली मागणी आहे. अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशातही या माशाची लोकप्रियता वाढत आहे. जगभरातील विविध नामांकित मत्स्यसंशोधन केंद्रांमध्ये तिलापियावर संशोधन चालू आहे. भविष्यात शेतकऱ्यांना मत्स्यशेतीस फायदेशीर, सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा व अन्नसुरक्षेतील महत्त्वाचा घटक ठरू पाहणाऱ्या या प्रजातीतील माशांकडे इतक्या पूर्वग्रहदूषित नजरेने न पाहता आपल्याकडे होऊ घातलेल्या नीलक्रांतीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहणे गरजेचे आहे. 

इतर जनावरे किंवा पक्ष्यांसारखा मासा स्वतःहून स्थलांतर करीत नाही, तर त्याला आपणच स्थलांतरित करतो. १९५२ मध्ये जेव्हा तिलापियाच्या Oreochromis mossambicus या जातीला भारतात आणले गेले तेव्हाही सरकारचा काही उदात्त हेतूच होता. पण, त्यानंतरची त्यांच्या संवर्धन व संगोपनाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली गेली; केवळ त्यांच्याच चुकीमुळे या जातीचा प्रसार इतका वाढला, की शेवटी १९५८ मध्ये सरकारनेच या जातींवर बंदी आणली. म्हणजेच काय, तर तिलापिया भारतात अपघाताने किंवा चोरट्या पद्धतीने नाही आला, तर त्याला रीतसर पद्धतीने आणले गेले. परंतु, मानवी चुकांमुळे व त्या विभागातील शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे आज याचा भयावह प्रसार झाला आणि ज्याचे नियंत्रण आता कोणाच्याच हातात राहिलेले नाही. हे झाले तिलापियाच्या एका जातीबाबत. पण, यातीलच Oreochromis niloticus ही प्रजाती, त्याची वंशवृद्धी रोखण्यासाठी आलेले एकलिंगीय तंत्र, त्याहीपुढे अधिक संशोधनांती आलेले GIFT (Genetically Improved Farmed Tilapia) सारखे तंत्र व बाह्यजगातील मत्स्य उत्पादक शेतकरी घेत असलेले फायदेशीर उत्पादन याचा विचार आपण कधी करीतच नाही. असेही काही प्रगत तंत्रज्ञान आहे, याची आपल्याला माहितीच नाही. याच अज्ञानातून सर्वच तिलापिया जातींना बदनाम केले जातेय. पण, साप म्हणून भूई धोपटण्यात काय अर्थ आहे? 

एकेकाळी अमेरिकेतील डुकरांचे खाद्य म्हणून वापरले जाणारे ‘मिलो’ धान्य आणून खात असणारा आपला देश आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. एवढेच नव्हे, तर आपण काही धान्यांची निर्यातही करतोय. हे त्या वेळी घेणात आलेल्या हरितक्रांतीच्या निर्णयामुळे शक्य झाले. तेच घडले दुधाबाबत एकवेळ डेन्मार्क, नेदरलँड येथून आपण दुधाची पावडर आयात करून त्यापासून दूध बनवून आपल्या देशाची गरज भागवत होतो. पण, आज श्वेतक्रांतीमुळे दुधाचे उत्पादन इतके वाढले, की आपल्यालाच दुधाची पावडर बनवून ठेवणे भाग पडले. हे श्वेतक्रांतीसाठी घेतलेल्या संकरित गायींच्या जाती भारतात आणण्याने शक्य झाले आहे. पोल्ट्रीबाबतही तेच घडले आहे. जेव्हा यात ब्रॉयलरसारख्या जाती आल्या तेव्हाच सर्वसामान्यांना चिकन खाणे परवडू लागले. आता मत्स्योत्पादन वाढीसाठी येऊ घातलेली ‘नीलक्रांती’ जर यशस्वी करायची असेल तर तिलापियासारख्या कमी कालावधी, कमी जागेत, कमी खाद्यामध्ये जास्त उत्पादकता मिळेल अशा नवनवीन जाती प्रसारित कराव्याच लागणार आहेत. रोहू, कटला या स्थानिक माशांच्या जाती खूप चांगल्या आहेत. पण, त्यांची प्रतिएकर कमी उत्पादन क्षमता, त्यांना लागणारे जास्त खाद्य, वाढीसाठी लागणारा मोठा कालावधी, कधीही न मिळणारी एकसारखी वाढ, त्यात असणारे काट्यांचे प्रमाण, बाहेर काढल्यानंतरचा अतिशय कमी असणारा त्यांचा विघटनकाळ, त्यामुळे त्याला खाण्यायोग्य ठेवण्यासाठी लागणारा बर्फ किंवा शीतकक्ष व इतके करूनही बाजारात त्याला मिळणारी कमी किंमत, खात्रीशीर बीजांचा अभाव, जे काही बीज मिळते तेही बहुतांश वेळेला मिक्स आणि मग शेतकऱ्याला जर त्याचा उत्पादनखर्चही अशा जाती पाळून परत मिळणार नसेल, तर कशाला शेतकरी अशा बेभरवशाच्या व्यवसायाकडे वळेल? कशी होईल मग नीलक्रांती? कसे वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न?

मला नेहमी एक प्रश्न भेडसावतो. उत्पन्नवाढीसाठी शेतकरी वापरत असणाऱ्या नवनवीन वाणांवर किंवा तंत्रावर बंधन का? ही परिसंस्था टिकवायचा मक्ता फक्त शेतकऱ्यांच्याच माथी का? जिथे एखादा रासायनिक उद्योग हजारो एकर जमीन नापीक करतोय. अनेक नद्यांची त्यांनी विषयुक्त सांडपाण्याची गटारे करून टाकली आहेत. बकाल झालेल्या शहरांनी चांगल्या पाण्याच्या स्रोतांची वाट लावलीय. त्यात वाढणारे अनेक जलचर कायमचेच नामशेष करून टाकलेत. त्याकडे आपण कधी लक्ष देणार आहोत? 

आज शासकीय पातळीवर तिलापियाच्या शाश्वत उत्पादनवाढीसाठी काही मानके घालून दिली आहेत. जो शेतकरी ती पूर्ण करेल, त्यालाच या जातीच्या पालनाचा परवाना मिळेल. अशा परवानाधारकालाच शासनाने विहित केलेल्या बीजकेंद्रातून बीज मिळेल, अशी तरतूद केली आहे. पण, यात असणाऱ्या काही जाचक अटींचा फेरविचार करणे गरजेचे आहे. तिलापिया पालनाचा परवाना मिळविण्यासाठी कमीत कमी क्षेत्राची अट, आता एक एकराची आहे. ती दहा गुंठ्यांपर्यंत खाली आणणे गरजेचे आहे. आपल्याकडे तयार असणारी अनेक शेततळी ही दहा गुंठ्यांचीच आहेत. आपल्याकडे प्रतिशेतकरी क्षेत्रधारणा खूप कमी आहे. जर ही क्षेत्रधारणेची अट काढली, तर अनेक शेतकरी हा परवाना मिळवून तिलापिया संगोपन करू शकतील. 

दुसरी अडचण म्हणजे हा परवाना देण्याचा अधिकार सद्यःस्थितीत राज्याच्या मुख्य मत्स्यव्यवसाय आयुक्तांनाच आहे. त्याचे विकेंद्रीकरण होऊन तो अधिकार जिल्हा किंवा विभागीय आयुक्तांना मिळाला, तर हा परवाना मिळविण्यासाठी वेळ कमी लागेल, शेतकरी ही प्रक्रिया झटपट पूर्ण करू शकतील. तिलापिया शेतीचे यश खात्रीशीर बीजावर अवलंबून आहे व हे तेव्हाच शक्य होईल ज्या वेळी परवाना पद्धत सुटसुटीत करून त्यांना सरकारी नोंदणीकृत बीजोत्पादन केंद्राकडून बीज देण्याची व्यवस्था केली जाईल. आता गरज आहे काटेकोर शास्‍त्रशुद्ध तिलापिया संगोपन करून चांगले उत्पन्न मिळविण्याची! चला तर मग आपण सर्वजण मिळून तिलापिया संगोपनाला चळवळीते रूप देवूया. कोणत्याही अनधिकृत एजंटाकडून तिलापियाचे फसवे बीज घेऊन तोट्यात जाण्यापेक्षा योग्य त्या शासकीय यंत्रणेतूनच बीज मिळवून तिलापियाचे संगोपन करूया; अन्यथा १९५८ ची पुनरावृत्ती होऊन चांगल्या उत्पादनक्षम जातीला आपल्याला कायमचे मुकावे लागेल. पंडीत चव्हाण   : ९८६०८१२८०० (लेखक मत्स्यशेती करतात.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com