agriculture stories in marathi agrowon special article on water poverty index part 1 | Agrowon

जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीच
रमेश चिल्ले
गुरुवार, 23 मे 2019

सामान्य माणसे आणि राष्ट्र जलसुरक्षित आहे काय? हे तपासण्यासाठी कॅरोलिन सुलिव्हान व जेर्मी मेग यांनी ‘जलदारिद्र्य निर्देशांक’ ही संकल्पना मांडली. उपलब्ध जलसंपदा, पाण्यापर्यंतची पोच, पाणी खरेदी क्षमता, पाणीवापर कार्यक्षमता आणि पर्यावरण या पाच निकषांवरून त्या भागाचा जलनिर्देशांक ठरविला जातो. आपला देश या निर्देशांकातही खोलातच आहे.
 

एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार कसे? अब्जाधीशांच्या यादीवररून की सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी), दरडोई उत्पन्न या आकड्यावरून की सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यावरून? सकल राष्ट्रीय उत्पन्न पाहून देशातील माणसांची स्थिती लक्षात येत नाही. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण यांचा विचार करून विख्यात अर्थवेत्ते डॉ. महेबूब उलहक यांनी मनुष्य विकास निर्देशांक तयार केला. त्यावरून त्या देशातील साधारण माणसांच्या विकासाची स्पष्ट कल्पना येते. विकासाची अवस्था कळली की व्यवस्था कशी लावायची, हे लक्षात येऊ शकते.

झालं काय? मराठवाड्यात अन् त्यातल्या लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, अहमदनगर व औरंगाबद या जिल्ह्यांच्या काही तालुक्यांत मागच्या अठरा-एकोणीस वर्षांत चार वेळा तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागले. मधल्या काळात दर दोन वर्षाला एखादा हंगाम पावसाअभावी हातातून गेलेला. दर वर्षी किमान एप्रिल, मेमध्ये हमखास पाणी विकत घेण्याची पाळी आलेली. पाण्यासाठी दर वर्षी पाच-दहा हजार रुपये अन् त्यापेक्षा जास्त मनस्ताप सहन करूनही आम्ही सुधारलो नाही. टंचाई व दुष्काळ असताना पाण्याचं महत्त्व तीव्रतेनं पटतं, पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आम्ही मागचं सगळं विसरतो. छतावरच्या पावसाच्या पाण्याचे बोअरला पुनर्भरण करत नाही. डोळ्यांदेखत धो-धो पाणी रस्त्याने वाहत वाया जाते. नळाला पाणी नाही आले की नगरपालिका, महानगरपालिकेला शिव्यांची लाखोळी वाहतो. तास अर्ध्यातासापेक्षा जास्त वेळ पाणी नाही आलं, की नगरसेवकाला फोन करून पाणी पुन्हा सोडायला भाग पाडतो. जास्त वेळ पाणी आलं, तर अंगण, गाड्या धुतो, नालीला धो-धो पाणी वाहते, तेव्हा बघ्याची भूमिका घेतो. पाणी येण्याचा दिवस आला की आधाशासारखे साठवलेले पाणी ‘शिळे’ म्हणून अक्षरश: मोरीला सांडून देतो. अन् लोकांनी पाणी बचत करावी, पाण्याचे महत्त्व जाणावं, म्हणून चर्चेत हिरीरीने सहभागीही होतो. पण, स्वत:पासून कोणीही थेंबभर पाणी वाचवण्याचे कष्ट घेत नाही. धुणे, संडासचे फ्लश, दाढी, अंघोळ, हातपाय धुण्याला वारेमाप पाणी वापरतो. ‘असताना चंगळ अन् नसताना मंगळ’ अशी आमची जलदरिद्री सवय जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत कितीही पाणी येऊ द्या ते पुरणारच नाही.

जे घरच्या सांडपाण्याचे तेच शेतीच्या पाण्याचे. ठिबक, तुषारला खर्च येतो म्हणून पाटपाण्यावरची पिके घेतो. आमच्या बोअरला, विहिरीला या वर्षी भरपूर पाणी आहे, म्हणून वारेमाप पाणी पिकांना देतो. उसासारखी वर्षभर पाणी लागणारी खादाड पिकं घेतो, अशी आमची मानसिकता असल्यास कितीही पाणी असले, तरी त्याची उधळपट्टी जोपर्यंत आम्ही थांबवत नाही तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होणार नाही. उन्हाळा सोडून इतर वेळेस आमचं जलभान कुठं हरपलेलं असतं. मग हजार मिलिमीटर पाऊस पडो की चार हजार, कुणी थेंबभरसुद्धा साठवणार नाही. आमच्याकडे वैचारिक, आर्थिक दारिद्र्य कमी व्हावे म्हणून जसे प्रयत्न करतो तसे पाण्याचेही भान ठेवले, तरच आमच्या आजूबाजूला जलवैभव नांदेल.
जागतिक स्थरावर जलसाक्षरता आणि जलसुसंस्कृतता वाढत चालली तसतसा पाण्यासंबंधी खोलवर विचार होऊ लागला. एखाद्या देशाचे ‘पाणी जोखायचे कसे?’ सामान्य माणसे आणि राष्ट्र जलसुरक्षित आहे काय? हे तपासण्यासाठी कॅरोलिन सुलिव्हान व जेर्मी मेग यांनी ‘जलदारिद्र्य निर्देशांक’ (वाॅटर पावर्टी इंडेक्स) ही संकल्पना मांडली. उपलब्ध जलसंपदा, पाण्यापर्यंतची पोच, पाणी खरेदी क्षमता, पाणीवापर कार्यक्षमता आणि पर्यावरण या पाच निकषांवरून त्या भागाचा जलनिर्देशांक ठरविला जातो. जगातील जलसमृद्ध देश कोणता? याचा अंदाज भल्याभल्यांना लावता येणे शक्य नाही. १४७ देशांच्या यादीत फिनलँडने बाजी मारली. यात अमेरिका २३ व्या, चीन ४३ व्या, तर भारत ५३ व्या स्थानावर आहे. यावरून आपण पाण्याच्या बाबतीत किती खोलात आहोत, याची कल्पना यायला हवी.

आपल्या देशातील ८० टक्के ग्रामीण जनतेला पाणीपुरवठ्याची सोय स्वत: करावी लागते. कुठलीही यंत्रणा त्यांच्यापर्यंत शाश्वत पाणी घेऊन जात नाही. भारतामध्ये १९७० पर्यंत शेतीच्या सिंचनासाठी कालव्याच्या पाण्याचे प्रमाण अधिक होते. विहिरीच्या पाण्याचा वापर कमी होता. त्यानंतर कूपनलिकेने अवघा देश पादाक्रांत केला. आज देशभरात साडेतीन कोटी कूपनलिकामधून ३०० घन किलोमीटर पाणी हापसले जाते. कूपनलिकांच्या साम्राज्यात एक कोटीची भर केवळ दहा वर्षांत पडली आहे. या भूजलामुळे चार कोटी हेक्टर शेतीतून सात लाख कोटींचे उत्पन्न मिळते. भूजलतज्ज्ञ तुषार शहा यांनी या अवस्थेला ‘भूजलाचा उत्पादक विध्वंस’ असे म्हटले आहे.

विंधन विहिरीकेंद्री शेती अर्थव्यवस्थेमुळे आपण अनिश्चिततेच्या गर्तेत जात आहोत. येत्या दहा वर्षांतील अनागोंदीमुळे भारतातील अन्नधान्याचे उत्पादन पंचवीस टक्क्यांनी घटेल आणि त्याच वेळी प्रदूषित भूजलामुळे सार्वजनिक आरोग्याच्या समस्या आणखी बिकट होत जातील, असे भाकित शहा यांनी वर्तवले आहे.
‘इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (IWMI) व सर टाटा ट्रस्ट’ यांनी भारतातील भूजल परिस्थितीची काटेकोर पाहणी करण्यासाठी जलवैज्ञानिक, शेती संशोधक, समाजशास्त्रज्ञांना देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवून सर्वेक्षण केले. त्यावरून त्यांनी भूजलाच्या अनागोंदीवर भाष्य करणारा अहवाल तयार केला. पाण्यासाठी सर्वत्र कूपनलिकांनी पृथ्वीची अक्षरशः चाळणी करून टाकली. त्यामुळे पर्यावरण ऱ्हासाची जबर किंमत मोजावी लागणार आहे.

जलसाठे संपत चाललेत. अतिउपशामुळे पाण्यासाठी खोलखोल गेल्यावर फ्लोराईड, अर्सेनिक, नायट्रेट या विषारी रसायनांनी मिळसलेले पाणी पिण्याची वेळ येत आहे. दुष्काळासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी पाणी शिल्लक राहत नाही. उपसा अमाप, पण जमिनीत भरणा कमी असल्याने सगळ्या विंधन विहिरी उन्हाळ्यात अतिदक्षता विभागातील रुग्णासारख्या असतात. कधी दगावतील नेम नसतो. भूजलातील पाण्याचा बेसुमार उपसा करण्यात भारत सर्वांत आघाडीवर आहे. नैसर्गिक साधन संपदा उधळण्याच्या क्षेत्रात अमेरिका, चीन, रशिया आपल्या मागे आहेत. भारतातील निम्म्या जनतेचे आयुष्य भूजलावर अवलंबून आहे. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे पश्चिम भारताच्या ग्रामीण भागातील लोकांना फ्लोराइड मिश्रित पाणी प्यावे लागते. त्यामुळे हाडे ठिसूळ करणाऱ्या फ्लुरॉसिसच्या रुग्णांनी संख्या झपाट्याने वाढते आहे.
रमेश चिल्ले : ९४२२६१०७७५
(लेखक शेती आणि पर्यावरणाचे अभ्यासक आहे.)


इतर अॅग्रो विशेष
गैरकृत्यांवर नियंत्रण गरजेचेचनिवडणुकीच्या रणधुमाळीत काही विषय मागे पडतात. कारण...
प्रयोगशील, प्रगतिशील शेतीत रमलेले जाधव...नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे...
आर्थिक प्रगती युवकाने निवडला फूलशेतीचा...बी.कॉम, एमबीए पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या पाठी न...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
दूध पावडर अनुदानाचा प्रस्ताव फेटाळलापुणे : राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना...
विदर्भातून मॉन्सून परतला  पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गुरुवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारापुणे : राज्यात वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली...
राज्यातील कांदा उत्पादकांना ५५० कोटींचा...नाशिक ः दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांद्याला चांगला...
‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधारसोलापूर : चूल अन्‌ मूल या मर्यादेला बगल देत महिला...
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...