लोकसहभागातून ‘पिंपरखेड बुद्रुक’ने साधला विकास

प्रगतिशील गावांच्या धर्तीवर विकास मागील दहा ते पंधरा वर्षांपासून शासन व लोकसहभागातून गावांचा विकास करण्यात येत आहे. गावामध्ये महिला बचत गटांची चळवळ प्रभावी आहे. हिवरेबाजार, राळेगणसिद्धी यांसारख्या गावांच्या धर्तीवर गावाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संपर्कः सुनीता अशोक अघाव, (सरपंच) ः ९४२३४६०७४६
पिंपरखेड बुद्रुक (जि. जालना) नाला खोलीकरणांनतर साचलेले पाणी.
पिंपरखेड बुद्रुक (जि. जालना) नाला खोलीकरणांनतर साचलेले पाणी.

पिंपरखेड बुद्रुक (ता. घनसावंगी, जि. जालना) गावामध्ये जसा तीन नद्यांचा संगम होतो, त्याच पद्धतीने लोकसहभाग, शासन आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावाने विकासाची दिशा पकडली आहे. गावामध्ये महिला बचत गट आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

जालना जिल्ह्यातील पिंपरखेड बुद्रुक (ता. घनसावंगी) हे नरोळा नदीकाठी वसलेले गाव. गावाची लोकसंख्या सुमारे सहा हजार आहे. गावशिवारात खारी, नरोळा आणि बहिरवी या नद्यांचा संगमदेखील आहे. गावाजवळून जायकवाडीचा डावा कालवा जात असल्याने गावशिवारात सिंचनाची चांगली सोय आहे. या परिसरात बागायती पिकांबरोबर ऊस हे मुख्य पीक आहे. 

लोक सहभागातून जलसंधारणावर भर

 शासनाच्या योजनांची वाट न पाहता गावाने सन २०१५ पासून टप्प्याटप्याने लोकसहभागातून नदी खोलीकरणास सुरवात केली. दरवर्षी टप्प्याटप्प्याने खोलीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन किलोमीटर लांब खोलीकरण करण्यात आले. त्याचबरोबर नदीचे पुनरुजीवन करण्यात आले. तिन्ही नद्यांवरील जीर्ण झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची डागडुजी करण्यात आली. बंधाऱ्याला नव्याने दरवाजे बसविले. जलसंधारणाच्या उपक्रमासाठी आशा सायबेज, पुणे आणि समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई यांनी यंत्रणा उपलब्ध करून दिली. त्यामुळे गावामध्ये चांगल्या प्रकारे जलसंधारणाचे काम झाले आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत २५ लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून उभा करण्यात आला. गावातील टाकाऊ भंगार गोळा करून विकण्यात आले, त्यातूनही जलसंधारणासाठी निधी जमा करण्यात आला.

शेतीच्या पाणंद रस्त्याचा प्रश्‍न मार्गी  

गावात पुर्वी शेत रस्त्यांचे सतत वाद होत होते. परंतू तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी लोकसहभागातून शेतीच्या पाणंद रस्त्यांचे मुख्य रस्त्यात रूपांतर करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या वेळी गावातील चारही बाजूच्या सात रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले. या रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांच्यामधील अनेक वर्षांपासूनचे वाद संपुष्टात आले.

शैक्षणिक सुविधा  

पिंपरखेड बुद्रुक येथे प्राथमिक व खासगी शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा, वस्तीशाळा आणि दोन इंग्लिश स्कूल असल्यामुळे बालवाडी ते दहावीपर्यंत गावामध्ये शिक्षणाची सोय आहे. पुणे येथील पर्सिस्टंट आणि स्वरूपवर्धिनी संस्थेने जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, वस्तीशाळा तसेच मत्सोदरी संस्थेच्या माध्यमिक विद्यालयास सहा संगणक भेट दिले आहेत. याबरोबर लोकवर्गणीतून प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थांना संगणकांचे ज्ञान अवगत होण्यास मदत होत आहे. आज अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत आहेत. यातील काहींनी शेती, व्यवसायात चांगला जम बसविला आहे.                             गाव विकासाच्या योजना ग्रामीण तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेतून पांडुरंग मंदिर, जगदंबा मंदिर येथे सभामंडप, मंदिर परिसरात ब्लॉक, नरोळा नदीवर घाट, संरक्षक भिंत, स्मशानभूमी, सिरसपुरी संस्था मठाकडे जाण्यासाठी पायऱ्या व प्रवेशद्वार, खुले नाट्यगृह, संपूर्ण गावात सिमेंट रोड आणि नाल्याचे बांधकाम, १९ व्यापारी संकुलाचे बांधकाम यासह अनेक कामे शासनाच्या विविध योजनांतून मार्गी लावण्यात आली आहेत.

सामाजिक उपक्रमात अग्रेसर गावात विविध समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक जाती-धर्माचे सण गाव एकत्र साजरे करते. गावाला धार्मिक परंपरा असल्याने वर्षभर धार्मिक, प्रबोधनाचे कार्यक्रम होतात. वर्षानुवर्षे गावातील तंटे गावातच सोडविले जात असल्याने गावाला सन २००८ साली ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ हा पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. हा निधी गावांच्या विकासासाठी वापरण्यात आला. आजही तंटामुक्त समितीच्या माध्यमातून आपापसातील तंटे सोडविण्यात येतात. लोकवर्गणीतून पांडुरंग मंदिर, महारुद्र मंदिर, संत भगवान बाबा यांसह इतर मंदिरांंचे बांधकाम करण्यात आले. या गावात पांडुरंगाचे मंदिर असून, येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. त्यामुळे पंचक्रोशीत या गावाला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.  शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले नागरिक दिवाळीला गावी येतात, या वेळी स्नहेमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञ, अनुभवी मान्यवरांना बोलावून मार्गदर्शनपर कार्यक्रम होतो. गावातील तरुणांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन, शिबिराचे आयोजन केले जाते. गावामध्ये सार्वजनिक वाचनालय उभारलेले आहे. गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रम होतात. विद्यार्थांसाठी स्पर्धा आयोजित केली जाते. याचबरोबरीने गावामध्ये नेत्र तपासणी, आरोग्य तपासणीच्या शिबिरांचे आयोजन केले जाते.  

शेतकऱ्यांसाठी अभ्यास सहलींचे आयोजन  पावसाच्या पाण्याचे शेतशिवारात संधारण, कमी पाण्यात फळपिकांचे व्यवस्थापन, जलसंधारणाचे फायदे, आदर्श गाव संकल्पना याबाबत शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी हिवरेबाजार, औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा या गावी सहली नेण्यात आल्या. गावामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी, जनावरांसाठी गोठा, शौचालयाची कामे करण्यात येत आहेत.

पायाभूत सुविधांची उभारणी   ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन केली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने १९ व्यापारी दुकाने बांधलेली आहेत. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, खते, बियाणे, कीटकनाशके विक्रीची दुकाने तसेच इतर साहित्य विकणारी दुकाने या ठिकाणी आहेत. या दुकानातून मिळणारे भाडे गावाच्या विकास निधीमध्ये वापरले जाते. 

सहकार आणि बचत गटांची चळवळ  गावामध्ये महिलांचे पस्तीस बचत गट तर शेतकऱ्यांचे दहा बचत गट आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून संबंधितांना कर्ज मिळते. गावातील दोन स्वस्त धान्य दुकाने महिला बचत गटातर्फे चालविली जातात. गट पद्धतीने कांदा, तुती, ऊस शेती करण्यात येते. गावातील अनेक प्रश्नांबाबत महिला स्वतः अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. त्यातून मार्ग काढला जातो. गावामध्ये सन २००४ मध्ये भगवती पतसंस्था सुरू झाली. त्या वेळी भागभांडवल चाळीस हजार रुपये होते. आता हे भागभांडवल एक कोटी रुपयांपर्यंत पोचले आहे. सन २००५ पासून पंतसस्थेस अ वर्ग दर्जा मिळाला आहे. पतसंस्थेमुळे बेरोजगारांना छोटे उद्योग सुरू करण्यास मदत होते. पतसंस्थेतर्फे गावातील बेरोजगार तसेच नागरिकांनाच कर्जपुरवठा करण्यात येतो. गावामध्ये माउली दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. सहकारी संस्था, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. 

अनेक वर्षांची नाट्यपंरपरा गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे काम सुरू आहे. गावामध्ये संगीत, ऐतिहासिक, पौराणिक, तमाशाप्रधान, सामाजिक व कौटुंबिक नाट्य विविध कलावंत सादर करतात. पूर्वीच्या काळी टेंभे लावून दिव्याच्या प्रकाशात आणि पत्र्याचे शेड उभारून नाट्यप्रयोग केले जात असत. १९८० च्या नंतर अद्ययावत ध्वनियंत्रणेचा वापर सुरू झाला. या रंगभूमीचे वैशिष्ट्य असे आहे, की अशिक्षित कलावंत अभिनय करून नाट्यभूमीची सेवा करतात. या महोत्सवात रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा आणि हार्मोनियम, तबला, टाळ, झांज व साथसंगत ही परंपरेने आजही गावकरीच करतात. या महोत्सवाला या गावाबरोबरच पंचक्रोशीतील गावकरी हजेरी लावतात. आता गावातील मंडळाचे स्वतःचे मालकीचे भव्य नाट्यमंदिर आहे. तीर्थक्षेत्र ''क''मध्ये गावाचा समावेश झाल्यामुळे शासनाचे अनुदान प्राप्त होताच नवीन रंगमंचाचे अत्याधुनिक सोयीयुक्त बांधकाम होणार  आहे.      

गावामध्येच तंटे मिटवण्यावर भर  गावांत सर्व विकासकामे एकोप्याने राबविण्यात येतात. गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत नाहीत. गावकऱ्यांतील किरकोळ तंटे जागेवरच मिटविण्यात येतात. गावाला तंटामुक्त मोहिमेचा पुरस्कारही मिळाला आहे. - भगवंत आरडे, (पोलिस पाटील)  सहकारातून आर्थिक प्रगती   गावांत समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. गावामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. लोकसहभागातून जलसंधारण, रस्ते, सहकार, दूध संकलन, सार्वजनिक नाल्याची साफसफाई असे अनेक कार्यक्रम राबविल्याने गावात सुधारणा झाल्या आहेत. संपर्क ः    नारायण देवकाते ,  (अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा साेसायटी), ९४२१३२४०२४                                                                                                

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com