उच्चशिक्षित बनवताहेत मुढेवाडीला ‘ड्रीम व्हिलेज`

मुढेवाडी (जि. सांगली ) : तरुणांनी एकत्र येत गाव प्रवेशद्वाराचे बनविलेले संकल्पचित्र.
मुढेवाडी (जि. सांगली ) : तरुणांनी एकत्र येत गाव प्रवेशद्वाराचे बनविलेले संकल्पचित्र.

 गावातील तरुण उच्चशिक्षित बनून पैसे मिळवून समाधानी नाहीत. एकमेकांच्या ओळखीतून एकत्र आलेल्या राज्यभरातील तरुणांनी स्वतः आर्थिक भार उचलत ग्राम विकास आणि समाज परिवर्तनाचे काम सांगली जिल्ह्यातील मुढेवाडीत दीड वर्षापासून सुरू केले. देश, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या ऊर्जेतून मुढेवाडीत ‘ड्रीम व्हीलेज’ प्रकल्प साकारत आहे.   खेडेगावातील अनेक तरुण शिक्षण घेऊन सांगलीपासून पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकता या शहरात नोकरी,व्यवसायायानिमित्त स्थायिक झाले आहेत. याचबरोबरीने काही जण अमेरिका, दुबई आदी देशात कार्यरत आहेत.  हे सर्व जण सोशल मीडियाच्या माध्यमातून गाव विकासाच्या ओढीने मित्र बनले. गावच्या ऋणातून मुक्‍त होण्यासाठी विचारमंथन सुरू झाले. उच्चपदस्थ, आय.ए.एस. अधिकारी, शासकीय अधिकारी, उद्योगपती, व्यावसायिक, अभिनेते, अभियंते, डॉक्‍टर, वकील, समाजसेवकांची मोट बांधली. कॉन्सफरन्सवर या तरुणांनी चर्चा केली. त्यातून ३ एप्रिल, २०१७ मध्ये ‘ड्रीम व्हीलेज फाउंडेशन’चा जन्म झाला. या समूहात दोन, चार नव्हे तर तब्बल पाचशेवर उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग आहे. त्यांच्या कष्टाच्या पैशातून मुढेवाडीला आदर्श बनवण्याचे प्रत्यक्ष कामही सुरू झाले. युवकांनी लोकसहभागातून गावाचा आराखडा तयार केला. पहिल्या टप्प्यात सुविधा व गरजा, दुसऱ्या टप्प्यात सौंदर्य आणि सुशोभीकरण; आणि त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर ग्राम विकासामध्ये केला जाणार आहे. सध्या सुरक्षा रक्षक केबिनसह गावाच्या स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी देखणी कमान राज्यात क्‍वचित पहायला         मिळेल.

सध्याचे उपक्रम 

  • गावाचे सर्व्हेक्षण करून प्रकल्प तयार.
  • प्रबोधन आणि जागृतीपर बैठका.
  • तज्ज्ञ आणि सल्लागारांच्या भेटी.
  • गावांतर्गत छोटे रस्ते पूर्ण.
  • गाव परिसरात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम.
  • सुरक्षा रक्षकासह केबिन स्वागत कमान अंतिम टप्प्यात. 
  • नियोजित उपक्रम 

  • शेतकऱ्यांना सुधारित शेती, पूरक उद्योगाचे प्रशिक्षण.
  • पाणी आडवा-पाणी जिरवा उपक्रम.
  • सौरऊर्जा प्रकल्प.
  • अत्याधुनिक ग्रामसचिवालय.
  • भुमिगत गटार योजना. 
  • व्यायामशाळा आणि क्रीडांगण.
  •  सुसज्य ग्रंथालय, पार्किंग व्यवस्था.
  • बॅंक, एटीएम, सीसीटीव्ही, वाय-फाय सुविधा.
  •     लोकसहभागातून विकासाचे सूत्र   ड्रीम व्हीलेज फाउंडेशनचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले की, मुढेवाडीतील ग्रामस्थांशी आम्ही पहिल्यांदा चर्चा केली. लोकसहभागाची तयारी दाखविल्यानंतर आम्ही विविध विकासाच्या कामांना लोकसहभागातून सुरवात केली. लोकांच्या प्रतिसादानुसार कामाची आखणी केली आहे. पहिल्या तीन महिन्यांत तीसवर उपक्रम राबवले. ग्राम विकासाच्यादृष्टीने आराखड्यानुसार सव्वाशे प्रकारची कामे होणार आहेत. येत्या चार वर्षांत ही लोक सहभागातून काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामात गावातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थांचा चांगला सहभाग आहे. आम्ही संकेतस्थळही तयार केले आहे.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com