एकात्मिक शेती पद्धतीतून मिळवली अार्थिक सक्षमता

आवळा लागवडीमध्ये वांग्याचे आंतरपीक घेतले अाहे. मंगळया कोकणी  पत्नी यशोदा सोबत.
आवळा लागवडीमध्ये वांग्याचे आंतरपीक घेतले अाहे. मंगळया कोकणी पत्नी यशोदा सोबत.

दुर्गम, ग्रामीण अाणि आदिवासी भाग असूनही नंदुरबार जिल्ह्यातील श्रावणी (ता. नवापूर) येथील मंगळ्या कोकणी या अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने अडीच एकरांतून प्रगती साधली अाहे. वर्षभरात एकात्मिक पीक पद्धतीने सुमारे सहा ते सात पिके कुशलतेने घेत आर्थिक उत्पन्नाची घडी त्यांनी सुस्थितीत नेली अाहे. नंदुरबारपासून २२ किमी अंतरावर खांडबारा हे बाजारपेठेच गाव. खांडबारा गावापासून अवघ्या ३ किमी अंतरावर श्रावणी हे १०० टक्के आदिवासी बहुल गाव आहे. गावाच्या बाहेर नंदुरबार-सुरत राज्य महामार्गावर मंगळ्या धेडया कोकणी यांची अडीच एकर बागायती शेती अाहे. क्षेत्र जरी कमी असले तरी मंगळ्या कोकणीची ही शेती परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी एक प्रशीक्षण केंद्रच बनले अाहे. त्यांनी फळपिके, भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य, बीजोत्पादन अाणि कुक्कुटपालन करीत एकात्मिक शेतीचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. त्यांचा हा प्रयोग परिसरातील अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून नियमित भाजीपाला लागवडीसाठी चालना देणारा ठरला अाहे. तसेच रोजगारासाठी गुजरातमध्ये स्थलांतर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.

शेतीला लागूनच मंगळ्या यांचे छोटे हॉटेल अाहे. या हॉटेलमध्ये चहा, भजी इ. पदार्थांसह त्यांच्या शेतातील ताजा भाजीपालाही विक्रीसाठी ठेवला जातो. मंगळ्या यांची दोन मुले महेंद्र व देविदास यांची त्यांना शेतीमध्ये मोलाची मदत होते. सदैव काबाडकष्ट करणारे मंगळ्या यांचे एकूण ८ जणांचे कुटुंब आहे. आंतरपीक पद्धतीचा अवलंब          मंगळ्या कोकणी पूर्वी भात, तूर, मका व थोडीफार घरी खाण्यापुरती भाजीपाल्याची लागवड करीत असत. परंतु गेल्या सात वर्षांपासून नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. हेडगेवार सेवा समितीचे त्यांना मार्गदर्शन मिळत अाहे. परंपरागत शेतीऐवजी मंगळ्या यांनी एक एकर क्षेत्रावर नाबार्ड पुरस्कृत फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, आवळा या फळपिकांची लागवड केली. या फळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून नियमितपणे भाजीपाल्याची लागवड करण्यास सुरवात केली. आता नियमितपणे दोन एकर क्षेत्रावर भाजीपाला घेतला जातो. तंत्रज्ञानाची अोळख मंगळ्या कोकणी पूर्वी परंपरागत पद्धतीने शेती करत असत. त्यामुळे केवळ शेतीतून कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड जात असत. यासाठी जोडधंदा म्हणून हॉटेल व्यवसायाला सुरवात केली. या ठिकाणीच नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांची ग्राहकाच्या रूपाने भेट झाली. शेतीतील तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीतून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत गेली. त्यामुळे त्यांना ठिबक सिंचन, फर्टिगेशन उंच गादीवाफा तंत्रज्ञानाचा अवलंबन करून विविध भाजीपाला पिके घेण्यास चालना मिळाली. पुढे भाजीपाल्याची विक्रीही या हॉटेलवर सुरू झाली. हॉटेलसोबत शेतीही आज मंगळ्या कोकणीसाठी प्रमुख उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. अडीच एकरांत वर्षभरात सात पिके मंगळ्या कोकणी यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर (जि. पुणे), आत्मा, आदिवासी उपयोजना, नाबार्ड या विविध संस्थांच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उभे केले अाहे. त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे अार. एम. पाटील अाणि डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विकास अधिकारी विकास गोडसे यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. अडीच एकर क्षेत्रावर वर्षभरात फेरपालट करून सात पिके घेतात. एक एकर क्षेत्रावर ३० अांब्यांची १० बाय १० फूट अंतरावर अाणि अाणि २० अावळ्याच्या झांडांची ६ बाय ६ फूट अंतरावर लागवड केली अाहे. या फळपिकांमध्येच भाजीपाल्याचे अांतरपीक घेतले जाते.

अडीच एकर क्षेत्रातील पिकाचे नियोजन

  • कांदा - ४० गुंठे     
  • वांगी - १० गुंठे     
  • हळद - ५ गुंठे     
  • मिरची - १० गुंठे     
  • फुलकोबी - ५ गुंठे     
  • मेथी, कोथिंबीर - १० गुंठे  
  • आळूची पाने - २ गुंठे
  • अर्धा एकर क्षेत्रावर भात, तूर, मका या पिकांचे उत्पादन घेतले जाते.
  • गेल्या वार्षापासून आंबा, आवळा या फळपिकाचे उत्पादन मिळत अाहे.  
  • गटाच्या माध्यमातून शेतकरी सुविधा केंद्राची स्थापना मंगळ्या यांचे मोठे चिरंजीव महेंद्र व सून अलका यांनी आपल्या संघटन कौशल्याद्वारे कृषी विज्ञान केंद्र अाणि राजगुरुनगर येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, यांच्या सहकार्याने पुरुषांचा साईकृपा शेतकरी गट अाणि महिलांचा देवमोगरा महिला शेतकरी गट स्थापन केला. साईकृपा शेतकरी गटाने उंच गादीवाफा तंत्रज्ञान, फर्टिगेशन, ठिबक सिंचन या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंबन करून एकात्मिक पद्धतीने रब्बी हंगामात कांद्याचे नियमितपणे सरासरी १२० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेण्यात यश मिळवले अाहे.

    या वर्षीही या गटाद्वारे लसूण व कांद्याचे बीजोत्पादन एकात्मिक पद्धतीने घेण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी देवमोगरा महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राद्वारे श्रावणी परिसरातील शेतकऱ्यांना श्रम कमी करणारी अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जातात. त्यासोबत छोट्या अवजारांची विक्रीही केली जाते. शेतीमध्ये कुटुंबीयांची मदत शेती असो किंवा हॉटेल मंगळ्या कोकणी यांना त्यांची दोन्ही मुले महेंद्र आणि देविदास यांची मोलाची मदत असते. संपूर्ण कुटुंब शेतीत राबते. नियोजनानुसार वेळेवर शेतीची कामे केली जातात. शेतीतील ठळक बाबी

  • कमी खर्चाच्या कांदा चाळीद्वारे दरवर्षी ५० क्विंटल कांदा साठविला जातो.
  • या वर्षीपासून कुक्कुटपालनाला सुरवात केली अाहे. यामध्ये ३५ कोंबड्यांचा समावेश अाहे. कडकनाथ, गिरिराज, ग्रामप्रिया अशा सुधारित जातीच्या कोंबड्याचे संगोपन केले जाते.  
  • अळूची लागवड कायम असते.
  • रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
  • वेगवेगळ्या हंगामांत पिके असल्याने प्रत्येक हंगामात ताजे उत्पादन मिळते राहते.
  • खर्च वजा जाता साधारणतः दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळते.
  • संपर्क :  ः महेंद्र कोकणी,  ९१४६००४९१०, संपर्क : ः आर. एम. पाटील ९८५०७६८८७६, (विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com