जपानी तंत्राच्या ‘राइस मिल’द्वारे काळभैरव ब्रॅंड तांदळाची निर्मिती

प्रकाश मोरे यांनी उभारलेला आधुनिक भात प्रक्रिया प्रकल्प.
प्रकाश मोरे यांनी उभारलेला आधुनिक भात प्रक्रिया प्रकल्प.

तंत्रज्ञानाचा आविष्कार घडविणे तेव्हाच शक्य होते, ज्या वेळी तुमच्याकडे तशी दूरदृष्टी व उद्योजक होण्याचे गुण अंगी भिनलेले असतील. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रकाश मोरे यांनी हेच गुण जपत अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा आधार घेत राइस मिल उभारली. काळभैरव ब्रॅंडच्या उत्तम चवीच्या, स्वादाच्या या तांदळाला त्यांनी हुकमी बाजारपेठ मिळवली आहे. वर्षाला तीस कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मोरे यांनी मजल मारली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा गडहिंग्लज, आजरा हा भातासाठी अगदी प्रसिद्ध. या भागात काही प्रमाणात ‘राइस मिल’देखील आहेत. पारंपरिक पद्धतीने त्यातून तांदूळ तयार करून मिळतो. याच गडहिंग्लजमधील प्रकाश मोरे यांनी भात प्रक्रिया उद्योजक म्हणून आपले ठळक नाव तयार केले आहे. मोरे यांचा हा व्यवसाय काही नवा नाही. पूर्वी पोहे चुरमुरे उत्पादनाचा त्यांचा व्यवसाय होता. मात्र काळाची गरज अोळखून ते भात प्रक्रिया उद्योगाकडे वळले. 

‘राइस मिल’ उभारण्यामागील कल्पना मोरे एकदा भात कांडून घेण्यासाठी ‘राइस मिल’ व्यावसायिकांकडे गेले. थोडाच भात असल्याने व्यावसायिकाने विलंब लावला. शिवाय तयार तांदूळही कमी प्रतीचा होता. ही बाब काही मोरे यांना पटली नाही. आपणच चांगल्या दर्जाचा तांदूळ तयार का करू नये? तसे झाल्यास आपल्यालाही उत्पन्नाचे साधन मिळेलच, शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, असे त्यांना वाटले.

  उद्योगाची सुरवात  मिनी राइस मिल 

  • ठिकाण गडहिंग्लजः अल्पभूधारक शेतकरी डोळ्यासमोर ठेऊन १९९८ मध्ये मिनी राइस मिल उभारली.
  • व्यवसायाचे स्वरूपः शेतकऱ्यांनी आणलेल्या भाताचा तांदूळ तयार करून देणे  
  • यात चांगला जम बसल्यावर २००१ मध्ये आजरा ‘एमआयडीसी’ येथे ताशी दोन टन क्षमतेची राइस मिल सुरू केली. 
  • भात उत्पादकांकडून चांगला प्रतिसाद मिळत राहिला.
  • सुधारित व त्यानंतर अत्याधुनिक राइस मिल  उद्योगात स्थिरता येत गेली तशी २००६ मध्ये ‘मिलटेक’ नावाने गडहिंग्लज ‘एमआयडीसी’त थोड्या सुधारीत पद्धतीची ‘राइस मिल’ सुरू केली. ‘अद्ययावत तंत्रज्ञान’ हे ध्येय समोरे होतेच. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा जपानमधून आयात करून जानेवारी २०१६ मध्ये उच्च क्षमतेची राइस मिल सुरू केली. 

    विक्रीसाठी तयार तांदूळ  सर्व टप्प्यांमधून पार पडलेला तांदूळ १० व २५ किलोच्या बॅगेत पॅक केला जातो. मोरे यांचे ग्राहक मुख्यत्वे मोठे किराणा व्यापारी आहेत. 

    गुंतवणूक, उलाढाल मोरे यांची २००६ च्या दरम्यान या उद्योगातील उलाढाल होती साधारण ५० लाख रुपयांची. आज ती तब्बल ३० कोटींपर्यंत पोचली आहे. राइस मिल उभारणीसाठी १२ कोटींची गुंतवणूक करावी लागली. त्यासाठी सहा कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून पाच टक्के व्याज अनुदान या उद्योगाला मिळाले आहे.  

    रोजगार निर्मिती उत्पादन, अकाउंटंसी, विक्री-खरेदी आदी विभागांसाठी तीन व्यवस्थापक, पाच कुशल कामगार व अन्य २५ कामगार अशी रोजगार निर्मिती मोरे यांनी केली आहे. 

    मोरे यांचा उद्योग दृष्टिक्षेपात 

  •  दीड एकरात प्रक्रिया उद्योग 
  •  सध्याची भात प्रक्रिया क्षमता- ८ टन प्रति तास 
  •   शेतकरी व व्यापारी यांच्याकडून भात खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून स्वब्रॅंडने विक्री 
  •  काळभैरव नावाचा ब्रॅँड
  •  सुमारे ८० टक्के तांदूळ इंद्रायणी जातीचा. अन्य जातींमध्ये एचएमटी, सोना मसुरी आदी आठ जातींचा समावेश. 
  • आधुनिक तंत्राचा वापर असल्याने प्रक्रिया झालेल्या तांदळाची चव, स्वाद, त्यातील पोषणमूल्ये जशीच्या तशी राहतात.  
  •  अख्खा तांदूळ आणि तुकडा असे दोन प्रकार  
  • दररोज सुमारे ६० टन भातावर होते प्रक्रिया 
  • मालाची खरेदी व प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे  

  • स्थानिक भागातून भात खरेदी केल्यानंतर गोदामात साठवण
  • जातीनिहाय प्रक्रियेसाठी घेतला जातो. 
  • प्री क्लिनिंग, फाईन क्लिनिंग
  •  त्यानंतर ग्रॅव्हीटी सेपरेशन तंत्रानुसार भातातील काडीकचरा, खडे, वेगळे केले जातात. 
  •  रबर रोल असलेल्या पॅडी हस्करमधून भातावरील कवच वा तूस वेगळे केले जाते.
  •  पॅडी सेपरेटरमध्ये ब्राऊन राइस आणि भातकुडा वेगळा होतो.
  •  इथं पॉलिश होताना पाच वेळा विभागून काम केलं जातं. यामुळं तांदळाचे वरचे ‘लेअर’ निघून न जाता त्याची प्रत टिकून राहण्यास मदत होते. 
  •  शेवटच्या टप्प्यात तांदळाच्या दाण्यांची प्रतवारी होते. यात मानवी डोळ्यांप्रमाणे कार्य करणाऱ्या कलर सॉर्टर यंत्राची मदत घेतली जाते.    
  •  मोरे यांच्या उद्यमशीलतेची काही वैशिष्ट्ये 

  • सातत्याने नव्या तंत्रज्ञानाचा शोध. त्यासाठी अनेक ठिकाणी भ्रमंती. त्यातून राइस मिलसाठी जपानी तंत्राचा शोध लागला. संबंधित मशिनरी आयात केली. संपूर्ण भागात अशा प्रकारचे तंत्रज्ञान आमच्याच प्रकल्पात असावे असे मोरे यांचा कयास 
  •  स्वच्छ, नेटका व तंत्राने परिपूर्ण प्रकल्प
  •  भात खरेदीसाठी मोरे स्वतः गडहिंग्लज, आजरा, चंदगड यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात जातात. शेतकऱ्यांकडील भाताची प्रत तपासून जागेवर खरेदी करतात.
  •  बाजारपेठेतील दरांपेक्षा अधिक दराने शेतकऱ्यांकडून खरेदी. उदा. भाताचा बाजारातील क्विंटलचा दर २५०० रुपये असला तर मोरे शेतकऱ्यांना २७५० रुपये दर देतात. 
  •  शेतकऱ्यांना वेळेत पेमेंटही केले जाते. 
  •  अशा व्यवहारामुळेच त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी हितसंबंध जोडले आहेत. 
  •  :

    संपर्क - प्रकाश मोरे,  ०२३२७-२२२८१७,  ८२७५५३८४३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com