अर्थकारण सुधारणारी तरुणाची एकात्मिक शेती पद्धती

स्वप्नील यांना आई-वडिलांचे शेतीत मार्गदर्शन लाभते.
स्वप्नील यांना आई-वडिलांचे शेतीत मार्गदर्शन लाभते.

एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील तरुण शेतकरी स्वप्नील पोपट जाधव यांना शेतीचे अर्थकारण सुधारणे शक्य झाले आहे. डाळिंब हे त्यांचे जुने पीक असून, त्यास केळी व द्राक्षाची नव्याने जोड दिली आहे. त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कोंबडीपालन अशा विविध पूरक व्यवसायांतही जाधव कार्यरत असून, त्याद्वारे उत्पन्नाचा स्रोत त्यांनी वाढवला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका ऊस तसेच फळपिकांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील सराफवाडी येथील स्वप्नील जाधव नव्या विचारांच्या साह्याने शेती करतात.भाऊ व वडिलांची त्यांना साथ मिळते. एकत्रित कुटुंब पद्धतीत नऊ सदस्य राहतात. जाधव यांची एकूण ४० एकर शेती आहे. पैकी ३० एकर क्षेत्र सराफवाडी येथे आहे, तर तेथून सुमारे २५ किलोमीटरवर असलेल्या गलांडवाडी येथे १० एकर क्षेत्र आहे.

एकात्मिक शेती पद्धतीची रचना

डाळिंब पीक

इंदापूर तालुका डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. जाधव यांचेदेखील डाळिंब हे काही वर्षांपासून जोपासलेले पीक आहे. सद्यःस्थितीत पंधरा एकरात डाळिंबाच्या भगवा वाणाची बाग उभी आहे. जाधव कुटुंबाने २०११ मध्ये सहा एकरांपासून या पिकाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन, एक एकर या पद्धतीने लागवडीचा विस्तार केला. नऊ बाय चार फूट असे लागवडीचे अंतर आहे.

डाळिंबाचे जुन्या बागेतून एकरी उत्पादन ९ ते १० टन घेतले जाते. अलीकडील काळात दर घसरल्याने नफ्यावर मात्र निश्चित परिणाम झाला आहे. सुमारे १२ एकरांवर ऊस आहे. त्यात को- ८६०३२ वाण आहे. एकरी ७० ते ७५ टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते.

चारा पिके दुग्ध व्यवसाय असल्याने चारा पिकांसाठी दोन एकर क्षेत्रावर आफ्रिकन टाॅल वाणाच्या मक्याची लागवड केली आहे. मूरघास बनविण्यासाठी पाच एकरांवर अन्य वाणाचा मका आहे.

नवी फळपिके

  • दीड एकरात द्राक्षाच्या जंबो नाना पर्पल या वाणाची ८ बाय ४ फुटांवर लागवड केली आहे. यंदाच्या हंगामात पहिले उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात स्वप्नील आहेत.
  • केळीचाही प्रयोग केला आहे. यात ग्रॅंडनाइन जातीचे पहिले उत्पादन घेतले जाईल.
  • शेतीतील सुधारणा

  • स्वप्नील यांनी शेतीत अनेक सुधारणा केल्या आहेत. छोट्या व मोठ्या कामांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या एचपी क्षमतेचे दोन ट्रॅक्‍टर्स त्यांच्याकडे आहेत. द्राक्ष व डाळिंबाच्या बागेत अाधुनिक फवारणी यंत्रांचा वापर होतो.
  • सर्व क्षेत्रांमध्ये जैविक खतांचा अधिक तर थोड्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो.
  • जैविक निविष्ठांमध्ये ट्रायकोडर्मा, पीएसबी, पॅसिलोमायसिस, स्युडोमोनास आदींचा वापर होतो.
  • डाळिंबासाठी जीवामृत स्लरीचा वापर होतो. डाळिंब पिकात उन्हाळ्यात बाष्पीभवन टाळण्यासाठी अाच्छादन म्हणून पाचटाचा वापर केला आहे.
  • पाण्याचा काटेकोर वापर व्हावा, यासाठी ४० एकरांवर ठिबक सिंचन केले आहे.
  • उत्कृष्ट मधमाशीपालक म्हणून सन २०१६ मध्ये केव्हीके, बारामती यांच्यातर्फे पुरस्कार देऊन स्वप्नील यांना गौरवण्यात आले आहे.
  • गांडूळखत प्रकल्पही कार्यान्वित केला आहे. त्याच्या जोडीला व्हर्मीवॉशही वापरले जाते.
  • पूरक व्यवसाय

  • शेततळ्यात मत्स्यपालन - अलीकडील काळात पाणीटंचाई वाढू लागली आहे. शेतीसाठी संरक्षित पाण्याचे नियोजन म्हणून सुमारे दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे सुमारे ६२ गुंठ्यांमध्ये बांधले आहे. त्यामध्ये जोड व्यवसाय म्हणून मत्स्यपालन केले अाहे. यात रोहू, कटला या माशांची पैदास केली आहे. शेततळ्यांसोबत पाच विहिरी व पाच बोअर्सचे पाणी शेतीसाठी वापरले जातात.
  • मधमाशीपालन - बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मधमाशीपालन प्रकल्पात स्वप्नीलदेखील सहभागी झाले होते. त्यांनी परागीभवनासाठी डाळिंब बागेत चार ते पाच पेट्या ठेवल्या होत्या. उत्पादनवाढीसाठी त्याचा फायदा झाल्याचे ते म्हणाले. मका पिकातही पेट्यांचा वापर त्यांनी केला आहे.
  • जोड व्यवसाय म्हणून दुभती जनावरे, शेळ्या, कोंबड्या असून, मुक्तसंचार गोठाही बांधला आहे. सुमारे २० जनावरे आहेत. त्यात खिलार गायी, म्हशी (मुऱ्हा व पंढरपुरी) तसेच होल्स्टिन फ्रिजियन गायी व पाच कालवडी आदींचा समावेश आहे. जनावरांसाठी मुक्तसंचार पद्धतीचा गोठा तयार केला अाहे. जनावरांचे संगोपन अाधुनिक पद्धतीने केले जाते. गोठा सुमारे ५० बाय ५० फूट आकाराचा बांधला आहे. दररोजचे एकूण १५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. खासगी डेअरीला सध्या लिटरला २० ते २१ रुपये दराने विक्री केली जात आहे. यापूर्वी दुधाचे दर सध्यापेक्षा बरे असल्याने व्यवसाय किफायतशीर व्हायचा; मात्र आता उत्पन्न व खर्चाची केवळ हातमिळवणी होत असल्याचे स्वप्नील यांनी सांगितले.
  • सुमारे १५ उस्मानाबादी शेळ्या व पाच बोकड आहेत.
  • वनराज जातीच्या सुमारे ५०, तर अन्य गावरान कोंबड्या पाळल्या आहेत. तीनशे रुपये प्रतिनग याप्रमाणे गावरान कोंबड्यांची विक्री केली जाते.
  • जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न सतत भेडसावतो. त्यावर उपाय म्हणून मुरघास प्रकल्प राबवला आहे. त्यासाठी १५ बाय ३० बाय पाच फूट उंच क्षेत्रफळाचा टँक बनविला आहे. त्यामध्ये सुमारे चार एकर मका साठवून ठेवता येऊ शकतो. त्याची क्षमता सुमारे ७० टनांपर्यंत आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे चार महिने जनावरांना चारा पुरवता येतो. मुरघासामुळे जनावरांचे आरोग्यही चांगले राहते. दूध उत्पादनवाढीवरही त्याचा अनुकूल परिणाम झाला आहे. या अनुषंगाने जाधव कुटुंबीय अजून एक मुरघास टँक बनविण्याच्या प्रयत्नात आहेत.
  • संपर्क : स्वप्नील जाधव, ७७७५९९८५५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com