देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...

देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...
देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...

सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर वाढला आहे. हे संच योग्य पद्धतीने दीर्घकाळ चालण्यासाठी त्यांचे व्यवस्थापन आणि दुरूस्ती योग्य वेळेत करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन यंत्रणा ः ठिबक संचातून पाण्याच्या बरोबरीने विद्राव्य खते योग्य त्या प्रमाणात पाहिजे त्या वेळी परिणामकारकरीत्या देता येतात. खतांच्या मात्रेत बचत होते. यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा योग्य पद्धतीने सुरू असणे गरजेचे आहे. दररोजची देखभाल ः

  • पिकास पाणी देण्यास सुरवात करण्यापूर्वी पंप सुरू करून फिल्टर पाच मिनिटे बॅकवॉश करावा.
  • स्क्रिन फिल्टरच्या झाकणीवरील ड्रेन व्हॉल्व्ह उघडून जाळीमध्ये अडकलेली घाण काढून टाकावी.
  • ड्रिपर्स व्यवस्थित चालतात किंवा नाही याची पाहणी करावी.
  • पाण्याचा दाब, जमिनीवर पसरणारा ओलावा, संचातून होणारी पाण्याची गळती इत्यादी बाबींचे निरीक्षण करून योग्य दुरुस्ती करावी.
  • दर आठ दिवसांनी :

  • सँड फिल्टरचे झाकण उघडून आतून हात घालून वाळू साफ करावी. बॅकवॉश करावे. सँड फिल्टरमध्ये कधीही नाल्यामधील किंवा नदीची वाळू टाकू नये. सँड फिल्टरमध्ये नेहमी ३/४ भाग इतकी वाळू असायला पाहिजे. वाळूची पातळी कमी झाल्यास नवीन वाळू टाकून घ्यावी.
  • स्क्रीन फिल्टरचे झाकण उघडून आतील जाळीचा फिल्टर साफ करावी.
  • नियमितपणे आणि गरजेनुसार मेन, सबमेन स्वच्छ कराव्यात.
  • लॅटरलचा बंद प्लग काढून लॅटरलमध्ये नेहमीपेक्षा जास्त दाबाने पाणी सोडावे. त्या स्वच्छ करून घ्याव्यात.
  • रासायनिक प्रक्रिया : ठिबक सिंचन प्रणाली चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी दर १० किंवा १५ दिवसांनी आम्लप्रक्रिया, क्लोरिन प्रक्रिया गरजेनुसार करावी. आम्लप्रक्रियेमुळे ठिबक लॅटरलमधील कार्बोनेट व लोह यांचा साठा धुऊन काढला जातो. क्लोरीन प्रक्रियेमुळे पाण्यातील सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते. नियंत्रण मिळविले जाते. ठिबक संचासाठी खते निवडताना ः

  • खते पाण्यात लवकर विरघळणारी असावीत.
  • खतांची विरघळण्याची क्षमता अधिक असावी.
  • पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होता कामा नये.
  • खतांचा ठिबक सिंचन संचाच्या घटकावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही अशी खते निवडावी.
  • खतांची पाण्यात असणाऱ्या क्षारांबरोबर कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • एकाच वेळी एकापेक्षा जास्त खते एकत्र द्यावयाची असल्यास त्याची आपापसात कोणतीही रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशी खते द्यावीत.
  • तुषार सिंचन संचाची देखभाल : अवर्षणसदृश परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर आहे. प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणे आवश्यक असते, तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नाही. पिकाला लागणारे नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणे तुषारसिंचन पद्धतीत शक्य आहे. तुषार सिंचनाचा वापर गहू, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, मका, ऊस, लसूण, टोमॅटो, कोबीवर्गीय पिके, रोपवाटिकेमध्ये करता येतो.

  • प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून होणारा पाण्याचा अपव्यय ३० ते ४० टक्क्यांपर्यंत होतो. तुषार सिंचन पद्धतीत हा अपव्यय टाळता येतो.
  • ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे, अशा जमिनीत तुषार सिंचन फायदेशीर आहे.
  • सरी, वरंबा, चाऱ्या इत्यादीसाठी लागवड योग्य जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास १६ टक्के जास्तीचे क्षेत्र लागवडीसाठी वापरता येते.
  • तुषार सिंचन पद्धतीत नेमके पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही. जमिनीची धूप होत नाही. पाणी वापरात सरासरी ५० टक्क्यांपर्यंत बचत होते. पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.
  • जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने तसेच मुळाभोवतीची जमीन संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो.
  • तणांचे प्रमाण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे शक्य असते.
  • तुषार सिंचनाची देखभाल ः

  • तुषार पाइपलाइन, फिटिंग, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखावी.
  • कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस, वंगण तोट्यांना लावू नये.
  • तुषार तोटीतील वायसर झिजले असल्यास बदलावेत.
  • तुषार तोटीच्या वायसर स्पिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटी फिरण्याचा वेग कमी होतो.
  • सर्व फिटिंग्जचे नट व बोल्ट घट्ट करावेत.
  • तुषार पाइप, टी, बेंड, आर.क्यू.आर.सी.मधील रबर रिंग काढून साफ करावी. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलावी.
  • तुषार सिंचनाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग काढून थंड व अंधाऱ्या जागेत ठेवाव्यात. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या कराव्यात.
  • संपर्क ः वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४ (कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com