भाजीपाला रोपवाटिका करताना घ्यावयाची काळजी

भाजीपाला पिकांची रोपवाटिका ही अत्यंत महत्त्वाची अवस्था असून, या अवस्थेमध्ये योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे पुनर्लागवडीनंतर उभ्या राहणाऱ्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.
भाजीपाला रोपवाटिका करताना घ्यावयाची काळजी
भाजीपाला रोपवाटिका करताना घ्यावयाची काळजी

भाजीपाला पिकांची रोपवाटिका ही अत्यंत महत्त्वाची अवस्था असून, या अवस्थेमध्ये योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे पुनर्लागवडीनंतर उभ्या राहणाऱ्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. रोपवाटिकेमध्ये बियाणे प्रक्रिया, कीड व रोगांना प्रतिबंध याला प्राधान्य द्यावे. कांदा, टोमॅटो, मिरची इ. भाजीपाला पिके रोपे तयार केली जातात. खरीप हंगामासाठी जून- जुलै मध्ये कांदा, टोमॅटो, मिरची अशा भाजीपाला पिकांची रोपवाटिका करावी. रोपवाटिकेसाठी जमिनीची निवड ः

  • जमीन मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.
  • जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा.
  • रोपवाटिकेसाठी जमिनीला पाणी साठून राहू नये म्हणून, किंचित उतार असावा.
  • चिकण मातीचे प्रमाण जास्त नसल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा होणे सोपे होते.
  • रोपवाटिका तयार करण्यासाठी जमीन आडवी उभी नांगरणी करून चांगली भुसभुशीत करावी. त्यात कुजलेले शेणखत (हेक्टरी १० ते १५ टन) चांगले मिसळावे.
  • रान बांधणी

  • रोपनिर्मितीसाठी गादी वाफे तयार करावेत. त्याची लांबी २-३ मी., रुंदी १-१.५ मी. आणि उंची १५ ते २० सेंमी असावी.
  • गादीवाफा बनवताना चांगले कुजलेले शेणखत ८ ते १० किलो, १९:१९:१९ हे मिश्रखत १५० ग्रॅम व कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० ग्रॅम मातीत मिसळावे.
  • लागवडीपूर्वी मानमोडी (डंपिंग ऑफ) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ३० ते ४० ग्रॅम या प्रमाणात गांडूळखत किंवा शेणखतामध्ये मिसळून द्यावे.
  • बियाणे मात्रा ः

  • एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पीक लागवड करण्यासाठी रोपनिर्मितीसाठी ८-१० किलो बियाणे वापरणे गरजेचे असते.
  • साधारणतः १ हेक्टर कांदा लागवड करण्यासाठी ५ - ७ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करणे अपेक्षित असते.
  • संकरित टोमॅटोसाठी १२५ ते १५० ग्रॅम बियाणांची तर सुधारित वाणासाठी ४०० ते ५०० ग्रॅम बियाणांची आवश्यकता असते. - वांग्यासाठीही साधारणपणे वरीलप्रमाणे बियाणांची आवश्यक असते.
  • मिरचीसाठी हेक्टरी १ ते १.५ किलो बियाणांची आवश्यकता असते. मात्र, खाजगी कंपन्यांचे संकरित बियाणे अनेक शेतकरी वापरतात. साधारणतः ८- १२ पॅकेट्स (८०-१२० ग्रॅम) प्रती एकर क्षेत्र लागवडीसाठी पुरेसे ठरू शकते.
  • बीजप्रक्रिया ः

  • खासगी कंपन्या व कृषी विद्यापीठांनी तयार केलेल्या बियाणांवर पॅकिंग करतेवेळी बीजप्रक्रिया केलेली असते. त्याविषयीची माहिती लेबलवर दिलेली असते, ती पाहून घ्यावी.
  • जर बियाणांवर प्रक्रिया केलेली नसल्यास पेरणीपूर्वी बियाणांस कार्बेन्डाझिम किंवा मॅन्कोझेब किंवा कॅप्टन २.५ ते ३ ग्रॅम प्रती किलो किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बियाणे प्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे किमान ८ तास सावलीमध्ये सुकू द्यावे. - त्याचप्रमाणे स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) २५ ग्रॅम प्रती किलो प्रमाणात बियाणांस चोळल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढण्यास मदत होते. जैविक घटकांची प्रक्रिया ही नेहमी रासायनिक घटकांच्या नंतर करावी.
  • बियाणे लागवड ः गादीवाफ्यावर सुमारे ८ ते १० सेंमी अंतरावर रुंदीशी समांतर रेषा पाडून त्यात बियाणे टोकत जावे. ते बियाणे हलक्या हाताने मातीने झाकून टाकावे व झारीने पाणी द्यावे. रोपवाटिका व्यवस्थापन ः

  • बियाणांच्या पेरणीनंतर ६० ते १०० मेश नायलॉनची कीडरोधक जाळी
  • वाफ्यावर लावावी. त्यामुळे किडीचा रोपावस्थेतील प्रादुर्भाव रोखला जाऊन कीडमुक्त रोपे मिळतील.
  • रोपवाटिकेमध्ये मानमोडी (डंपिंग ऑफ) या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ते २.५ ग्रॅम प्रती लीटर याप्रमाणे आळवणी करावी.
  • रोपवाटिकेमध्ये रसशोषक कीड व बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी, (फवारणी प्रमाण -प्रती लीटर पाणी)
  • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. व अॅझोक्सिस्ट्रोबीन १ मिली किंवा हेक्झाकोनेझोल १.५ मिली किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली.
  • रोगाची लक्षणे दिसताच १०-१५ दिवसांच्या अंतराने आलटून -पालटून ३-४ फवारण्या कराव्यात.
  • रोपांची पुनर्लागवड ः

  • खरीप हंगामासाठी कांदा पिकांची लागवड करण्यासाठी ४५-६० दिवसांची रोपे १५ x १० सें.मी. अंतरावर लावावीत.
  • टोमॅटो पिकांची पुनर्लागवड करण्यासाठी २४-४० दिवसांची रोपे पुनर्लागवडीसाठी निवडावी. बुटक्या - मध्यम वाढणाऱ्या टोमॅटो वाणांसाठी ७५-९० सें. मी x ३०-४० सें. मी अंतरावर लागवड करावी. उंच वाढणाऱ्या वाणांसाठी ९० सें. मी x ३० सें. मी अंतरावर लागवड करावी. - मिरचीची ४०-४५ दिवसांची रोपे ६० सें. मी x ४५ सें. मी अंतरावर लागवड करावी. रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस आधी पाणी हळूहळू कमी करावे. लागवडीच्या आधी एक दिवस पाणी द्यावे, त्यामुळे रोपांच्या मुळे निघणे सुलभ होते.
  • रोपांवर प्रक्रिया करताना रोपांची मुळे कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ते २.५ ग्रॅम प्रती लीटर अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिली प्रती लीटर या द्रावणामध्ये १५ मिनिटे बुडवून ठेवावीत.
  • रोपाच्या पुनर्लागवडीनंतर त्वरित पाणी द्यावे.
  • रोपांची पुनर्लागवड करताना रोपांच्या खोडावर जोर देऊ नये, अन्यथा नाजूक खोडे पिचकतील. अशी रोपे मरतात.
  • भाजीपाला पिकांच्या रोपाची लागवड सकाळी किंवा सायंकाळी करावी. दुसऱ्या दिवशी आंबवणी पाणी द्यावे. पुनर्लागवडीनंतर १० दिवसाच्या आत जी रोपे दगावली असतील, त्या ठिकाणी नांगे भरून घ्यावेत.
  • लागवडीनंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन ः कांदा, टोमॅटो, मिरची ई. भाजीपाला पिकांच्या अधिक उत्पादनासाठी लागवडीपूर्वी प्रती हेक्टरसाठी २०-२५ टन शेणखत व २ क्विंटल निंबोळी पेंड मातीत मिसळून द्यावी. प्रती हेक्टरसाठी ५ किलो ट्रायकोडर्मा, ५ किलो अॅझोटोबॅक्टर, ५ किलो पी. एस. बी व ५ किलो के. एस. बी हे शेणखतातून किंवा गांडूळ खतातून (१ टन) मिसळून द्यावे. कांदा अपेक्षित उत्पादनासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रति हेक्टर द्यावे. अर्धे नत्र (५० किलो म्हणजे युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित (नत्र ५० किलो म्हणजे युरिया १०९ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने समान हप्त्याने द्यावे. टोमॅटो टोमॅटो सरळ जातीसाठी नत्र २०० किलो, स्फुरद १०० किलो आणि पालाश १०० किलो प्रति हेक्टर द्यावे. संकरित वाणांसाठी नत्र ३०० किलो, स्फुरद १५० किलो आणि पालाश १५० किलो प्रति हेक्टर द्यावे. अर्धे नत्र, पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे व उर्वरित नत्राच्या ३ समान मात्रा २० दिवसांच्या अंतराने द्याव्यात. मिरची नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो आणि पालाश ५० किलो प्रती हेक्टर द्यावे. अर्धे नत्र, पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे व उर्वरित नत्र पुनर्लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने समान हप्त्याने द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांशिवाय भाजीपाला पिकांना हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २५ किलो मँगनीज सल्फेट, २५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट आणि ५ किलो बोरॉन लागवडी नंतर ७, ३०, ६० आणि ९० दिवसांनी समान हप्त्याने द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे दिसताच तज्ज्ञांच्या सल्ल्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीदेखील करता येते. डॉ. साबळे पी. ए. , ८४०८०३५७७२ (सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के. व्ही. के, सरदारकृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, खेडब्राह्मा, गुजरात.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com