भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-कक्ष’

भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-कक्ष’
भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-कक्ष’

काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी, साठवणीच्या सुविधांचा अभाव यामुळे दरवर्षी २५ ते ३५ टक्के उत्पादने खराब होतात. यासाठी शून्य ऊर्जा शीत कक्ष उपयोगी ठरू शकतो. शेतीमाल त्यातही फळे आणि भाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण ६० ते ९० टक्क्यांपर्यंत असल्याने लवकर खराब होतात. काढणीनंतर जास्त तापमानामुळे बाष्पीभवनाद्वारे भाज्यामधील १० ते १५ टक्के पाणी उडून जाते. परिणामी त्या सुकून, ताजेपणा आणि आकर्षकपणा कमी होतो. फळे व भाज्यांच्या वजनात घट होते. त्यामधील पोषक घटकांचे प्रमाण कमी होऊ लागते. अधिक चांगल्याप्रकारे साठवणूक केल्यास त्यांचे आयुष्यमान वाढू शकते. १. काढणीनंतरही फळे आणि भाज्यांमध्ये काही अंतर्गत जैविक आणि रासायनिक क्रिया अखंडपणे चालू असतात. या क्रियांमध्ये पिकण्याची क्रिया, बाष्पीभवनाची क्रिया यांचा समावेश होतो. या क्रियांचा वेग हा साठवणुकीच्या तापमानावर अवलंबून असतो. कमी तापमानाला या क्रियांचा वेग कमी राहतो. २. सूक्ष्मजिवाणू किंवा जंतूच्या प्रादुर्भावामुळे शेतीमाल खराब होतो. असे सूक्ष्मजीव ठरावीक शीत तापमान आणि सापेक्ष आर्द्रतेला अकार्यक्षम होतात. असे वातावरण तयार करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता भासते. शीतगृहाची उभारणी ही अत्यंत महागडी ठरत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शक्य होत नाही. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर चालणार शीतकक्ष उभारणे फायद्याचे ठरू शकते. या शून्य ऊर्जा शीतकरण कक्षासाठी यांत्रिक, रासायनिक आणि विद्युत ऊर्जेची आवश्यकता नसते. हा शीतकक्ष बांधायला अत्यंत सोपा, स्वस्त आहे. ३. शून्य ऊर्जा शीतकरण कक्षामध्ये भेंडी ६ दिवस, गाजर १२ दिवस, बटाटे ९७ दिवस, पुदिना ३ दिवस, वाटाणे १० दिवस, कोबी १२ दिवस, केळी २० दिवस, चिकू १४ दिवस, निंबू २५ दिवस, मेथी १० दिवस, पडवळ ७ दिवस, टोमॅटो १५ दिवस चांगले राहू शकतात. उभारणीसाठी आवश्यक घटक ः ग्रामीण पातळीवर उपलब्ध विटा, लाकूड, कोरडे गवत, सुतळी, वाळू, पोती अशा वस्तूपासून शीतकक्षाची उभारणी करता येते. शीतकरण कक्षाची रचना एका हौदासारखी असून, दोन विटांच्या भिंतीमधील जागा वाळूने भरली जाते. स्वच्छ व अखंड विटासह स्वच्छ वाळूचा वापर करावा. विटा आणि वाळूमध्ये सातत्याने ओलावा ठेवला जातो. शीतकरण कक्ष उत्तम सावली असलेल्या भागात करावा. ते शक्य नसल्यास सावलीसाठी शेड बांधणे आवश्यक असते. शीतकरण कक्षात फळे व भाजीपाला सच्छिद्र क्रेटमध्ये ठेवावेत. फळे व भाज्या थंड व दमट हवेच्या संपर्कात राहिल्याने त्यांचा दर्जा व गुणवत्ता टिकून राहते. कक्षातील तापमान बाह्य तापमानापेक्षा सुमारे १० ते १५ अंश सेल्सिअसने कमी राहते. कोरड्या व उष्ण ऋतूत त्याचा जास्त उपयोग होतो. वाळू व विटा पाण्यात पूर्णपणे भिजवाव्यात. कक्ष बांधणीसाठी २ ते ३ हजार रुपये खर्च येतो. शून्य ऊर्जा शीतकरण कक्षाची बांधणी

  • कक्षाची उभारणी पाणी जवळ असलेल्या उंचावरील जमीन निवडावी.
  • विटांचा एक ते दोन थर देऊन कक्षाचा तळाचा १६५ सेंमी.ग ११५ सेंमी आकाराचा पृष्ठभाग तयार करा.
  • विटांची ६७.५ सेंमी च्या दोन भिंत रचून, त्यामध्ये ७.५ सेंमी अंतर (पोकळी) ठेवावी. कक्ष पाण्याने पूर्णपणे ओला करून घ्या.
  • नदीपात्रातून बारीक व स्वच्छ वाळू आणून पाण्याने भिजवा. भिंतीमधील ७.५ सेंमीच्या पोकळीत वाळू भरावी. अशा पद्धतीने विटा व वाळूच्या साहाय्याने हौद तयार करून घ्यावा.
  • तयार झालेल्या विटा व वाळूच्या हौदावर (कक्षावर) बांबूचे व कोरड्या गवताचे (१६५ सेंमी बाय ११५ सेंमी) छप्पर बनवावे. त्याने शीतकक्ष झाकून घ्यावा. त्यामुळे थेट सूर्यप्रकाश किंवा पावसापासून कक्षाचे संरक्षण होते.
  • कक्ष बांधल्यानंतर घ्यायची काळजी

  • वाळू, विटा व वरचे छप्पर सतत ओले ठेवा. विशिष्ट तापमान व दमटपणा टिकविण्यासाठी दररोज शीतकक्षावर २५ ते ५० लीटर पाणी वापरावे लागते.
  • दिवसातून दोन वेळा पाणी मारावे किंवा शक्य असल्यास पाण्याच्या टाकीला जोडलेली ठिबक सिंचन नळी जोडून ठेवावी.
  • सच्छिद्र प्लॅस्टिक क्रेट, ट्रेमध्ये फळे व भाजीपाला शीतकक्षात ठेवावा. हे क्रेट्स पातळ पॉलिथिनच्या शीटने झाका. शीतकरण कक्षाच्या अवतीभोवती पाणी साठू देऊ नये.
  • शीतकरण कक्षामध्ये थेट सूर्यप्रकाश आत जाऊ नये याची काळजी घ्यावी.
  • बांबू, कागद, लाकूड यांपासून बनवलेल्या खोकी, टोपल्या इ. शीतकक्षात वापरू नये.
  • साठवलेल्या मालापाशी पाण्याच्या थेंबाचाही थेट संपर्क होऊ देऊ नये.
  • शीतकरण कक्ष नेहमी स्वच्छ ठेवा.
  • ठरावीक काळाने योग्य घटकांच्या साह्याने शीतकक्षाचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
  • उपयोग  १. ताजी फळे, भाजी, फुले, इ. काही काळापर्यंत साठविण्यासाठी. २. केळी व टोमॅटो पिकविण्यासाठी. ३. व्हाईट बटण मशरूम वाढविण्यासाठी. ४. रोपटी बनविण्यासाठी. फायदे  १. फळे व भाजीपाला जास्त काळ ताजा राहतो. चांगल्या दर्जामुळे अधिक दर मिळू शकतो. २. शीतकक्षामुळे पोषणमूल्ये टिकून राहण्यास मदत होते. ३. यासाठी कुठल्याही प्रकारची ऊर्जा लागत नाही. प्रदूषण होत नाहीत. शेतावरही उभारणी शक्य. ४. खर्च कमी लागतो. सचिन शेळके, ८८८८९९२५२२ सचिन शिंदे, ८९९९६६०७०४. (अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com