अन्नासह विविध कारणांसाठी शेवाळ शेती

शेवाळांची पाण्यामध्ये कमी प्रकाशातही अन्ननिर्मितीची क्षमता मानवी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या लेखात शेवाळांचे महत्त्व आणि उपयोग यांची माहिती घेऊ.
 अन्नासह विविध कारणांसाठी शेवाळ शेती
अन्नासह विविध कारणांसाठी शेवाळ शेती

शेवाळ म्हणजेच सुक्ष्म आकारापासून विविध आकारामध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्नाची निर्मिती करणाऱ्या वनस्पती. या वनस्पती वेगवेगळ्या तापमानात, वेगवेगळ्या प्रकाशात, अगदी सांडपाण्यातही जिवंत राहू शकतात. या समुद्र, नदी, साठलेले पाणी या बरोबरच वाळवंटातील कमी ओलावा उपलब्ध असतानाही जिवंत राहतात. शेवाळ एकटे किंवा दुसऱ्या वनस्पतीसोबत सहजीवनातही राहतात. 

  • शेवाळाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.  सुक्ष्म शेवाळ मोठे शेवाळ
  • सूक्ष्म शेवाळाच्या अनेक प्रजाती आढळतात. उदा. लाल शेवाळ, तपकिरी शेवाळ, हरित शेवाळ इ.
  •   निळे-हिरवे शेवाळ :  त्यांना सायनोबॅक्टेरिया म्हणूनही ओळखले जाते. ते हिरव्या- निळ्या रंगात दिसतात. त्यात क्लोरोफिल ए, बी आणि फायकोबीली प्रोटीन असतात.
  •   हिरवे शेवाळ : त्यात क्लोरोफिल ए, बी, कॅरोटिनॉईडस आणि झॅंत्तोफील्स असतात. हे बहुधा गोड्या पाण्यात आढळतात.
  •   लाल शेवाळ : त्यात क्लोरोफिल ए, डी, कॅरोटिनॉईड्‌स, झॅंत्तोफील्स आणि  फायकोबीली प्रोटीन असतात. ते दुधाच्या उत्पादनामध्ये स्थिरिकारक (स्टॅबिलाइझर) म्हणून वापरले जातात.
  •   तपकिरी शेवाळ : हे फायकॉफिसी या वर्गातील आहेत. त्यात क्लोरोफिल ए आणि फायकोझँथीन हे रंगद्रव्य आढळते. त्यांचा वापर विविध खाद्य उत्पादनांमध्ये केला जातो.
  • शेवाळाचे आर्थिक महत्त्व

  • शेवाळ हे जागतिक बाजारपेठेत आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. शेवाळाचे विविध उपयोग पुढील प्रमाणे.
  • अन्न : शेवाळ वर्गीय एकपेशीय वनस्पती मानवी शरिरासाठी महत्त्वाची असलेली कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे अ, ब, क आणि ई तसेच लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, मॅंगेनिज आणि झिंक भरपूर प्रमाणात आढळतात. म्हणूनच जपान, चीन, जर्मनी, अमेरिका, स्कॉटलंड, आयलँड यांसारख्या देशात लोक अन्न म्हणून वापरतात.
  • चारा : शेवाळ हे चारा म्हणूनही मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी आणि कोंबड्यांना वापरले जाते. 
  • मत्स्यपालन : मत्स्य शेतीत शेवाळ हे अत्यंत महत्त्वाचे असून, मत्स्य उत्पादन प्रक्रियेस मदत करते. शेवाळ नैसर्गिकरित्या पाण्यातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण वाढवण्यास मदत करते. या प्रकारे सागरी पर्यावरणातील आरोग्य राखण्यास मदत करते.
  • खत : शेवाळांमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. त्यांचा वापर द्रव खत म्हणूनही केला जातो. त्यांच्या वापरातून जमिनीत असलेल्या नायट्रोजनच्या पातळीत वाढ होते. 
  •   जमिनीची पीएच पातळी कमी करतात.
  •   मृदा संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
  •   युग्लेना आणि क्लोरेला यांसारख्या शेवाळाच्या मदतीने जलप्रदूषण तपासले जाते.
  • सूक्ष्म शेवाळापासून जैवइंधन   सुक्ष्म शेवाळ हे प्रकाशाच्या मदतीने व वेगाने वाढणारे आहेत. अगदी कमी प्रमाणात (९-१० टक्के) सूर्यप्रकाशाचा वापर करूनही साधारणपणे ७७ ग्रॅम जैव उत्पादन प्रति वर्गमीटर प्रति दिवस या प्रमाणे उत्पादन मिळू शकते. म्हणजेच प्रति वर्ष एका हेक्टरवर २४० टन इतके उत्पादन मिळू शकेत. सुक्ष्म शेवाळाच्या अनेक प्रजाती जैवइंधन तयार करण्यास उपयुक्त आहेत. कारण त्यांच्यामध्ये ५० ते ७०  टक्के मेद (फॅट्स) असतात. यापासून निर्मित जैवइंधनाचा उपयोग वाहनांमध्ये केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ बायोइथेनॉल, बायोडिझेल.  शेवाळ जर शेततळ्यांमध्ये उगवले तर माशांचीही जास्त वाढ होते तसेच शेवाळाची ही वाढ होते. अशा शेवाळाचा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ औषधी गोळ्या, पावडर, खत, इत्यादी. शेवाळाचा उपयोग 

  • वाढत्या लोकसंख्येबरोबर ऊर्जेची आणि ऊर्जा स्रोत यांची गरज वाढतच चालली आहे. नैसर्गिक स्रोतांना आता पर्यायी गरज आहे. त्यासाठीच शेवाळाचा वापर विविध प्रकारे केल्या जाऊ शकतो.
  •   कर्बग्रहण ः शेवाळ हे पृथ्वीवरील साधारणतः अर्ध्या प्रमाणात कार्बन डायॉक्साईडचे ग्रहण करतात. थोडक्यात,  वनस्पतीप्रमाणे कार्बनचा वापर करून अन्न तयार करतात.
  •   अन्न ः शेवाळ हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज यांचा उत्तम स्रोत असून, त्यांचा सरळ अन्न म्हणून किंवा अन्नात मिसळून खाण्यासाठी उपयोगी ठरतात. उदा. क्लोरेला (प्रथिने आणि लिपीड). जपानी लोक उलवा नावाचे शेवाळ सॅलड म्हणून खातात.
  •   चारा ः ग्लिलारिया ही शेवाळ वनस्पती कोंबड्यांना चारा म्हणून खाऊ घातल्यास त्या अधिक अंडी देतात. समुद्रात मासे ही शेवाळावरच जगत असतात. लामिनारीयाचा वापर गुरांना चारा म्हणून होतो. स्पिरुलिना हे शेवाळ मासे, कोंबड्या, जनावरांच्या आहारात दिल्यानंतर त्यांची उत्पादनक्षमता वाढते. समुद्रात वाढणारे प्लॅंकटन हे ओमेगा ३ मेदाम्लांचे (फॅटी ॲसिड) नैसर्गिक स्रोत आहेत. हा घटक शेवाळाशिवाय फक्त माशांमध्येच आढळतो.
  •   जैविक खत : टोलीपोथ्रिक या शेवाळ मातीमध्ये मिसळल्यास शेतीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता वाढविते. स्पिरुलिना हेही खत म्हणून वापरता येते. नोस्टोक, ॲनाबायेना या शेवाळाचा जमिनीचा पोत सुधारण्यासह नत्र स्थिरीकरणासाठी उपयोग होतो. 
  •   व्यावसायिक वापर : फुकूस या शेवाळातून अल्गिण मिळवले जाते. त्याचा उपयोग औषध निर्मिती उद्योगामध्ये केला जातो. लामिनारीया या शेवाळाचा उपयोग कापड निर्मिती, प्लॅस्टिक निर्मिती, रंग म्हणून, सर्जिकल कपड्यांमध्ये, साबणांमध्ये आणि सॉसेसमध्ये केला जातो. 
  •   अगार अगार :  शेवाळामध्ये सापडणाऱ्या अगार-अगार या घटकाचा उपयोग शेवाळ (अलगी), बुरशी आणि जिवाणू यांना वाढवण्यासाठी माध्यम म्हणून केला जातो. प्रतिजैविकांच्या गोळ्यांवरील आवरणांच्या निर्मितीसाठी शेवाळाचा वापर करतात.
  •   कॅरार्गीनिन हे जेलिंग घटक शेवाळापासून वेगळे करतात. त्याचा उपयोग कापड उद्योग, लेदर, सौंदर्यप्रसाधने यामध्ये केला जातो. 
  •   प्रतिजैविक, औषधे : क्लोरेलापासून मिळणारे क्लोरेलीन हे अनेक रोगकारक जिवाणूंवर गुणकारी आहे. अगार अगार हे पोटाच्या आजारांवर उपयोगी आहे. लॅमिनारिया हे गर्भपाताशी संबंधित 
  • आहे.  शेवाळ हे  गोल ब्लडर,  पॅन्क्रियाज,  युटेरस आणि थायरॉईड च्या आजारांवर वापरले जाते. ॲन्टी इन्फल्मेट्री आणि ॲन्टी कॅन्सर म्हणून वापर केला जातो.
  •   सांडपाणी निर्मूलन : सांडपाण्यातील जिवाणू मारण्यासाठी आणि ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी शेवाळ मदत करतात. उदा. युग्लीना, सेनेडेस्मस हे शेवाळ पाणी स्वच्छ करतात. ते खत म्हणून उपयुक्त असून, ते पाणी शेतीला वापरता येते.
  •   जमिनीची अल्कलक्षमता वाढविण्यासाठी : निलहरित शेवाळ (ब्ल्यू ग्रीन अलगी) हे सॉइल रिक्लेमेशन आणि अल्कलाइन सॉईलसाठी वापरले जातात.
  • शेवाळाची शेती हेच ठरेल भविष्य 

  • भविष्यामध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक खाद्यान्नाची निर्मिती केवळ जमिनीवरील शेतीतून होऊ शकणार नाही. पृथ्वीवर असलेल्या दोन-तृतीअंश पाण्यातही शेती करावी लागणार आहे. अशा पाण्यामध्ये वाढणाऱ्या व खाद्ययोग्य अशा विविध शेवाळ प्रजातींवर जागतिक पातळीवर संशोधन होत आहे. सुरवातीला संशोधकांचा जैवइंधन निर्मिती आणि कार्बन डायऑक्साईड ग्रहण याच उद्देशाने काम करत होते. मात्र, दरम्यान शेवाळ हेच अन्नाचे उत्तम स्रोत होऊ शकतात, हे लक्षात आले. 
  • उदा. शेवाळ शेतीच्या ७ हजार एकरांवरील प्रकल्पातून तेवढ्याच क्षेत्रातील सोयाबीन उत्पादनातून मिळणारी प्रथिने (प्रोटिन्स) मिळू शकतात. शेवाळापासून १७ दशलक्ष किलो वॉट विद्युत ऊर्जा मिळेल. ३० हजार टन कार्बन प्रतिवर्ष वापरला जाईल. 
  • शेवाळ शेतीमध्ये नांगरणी, सिंचन आणि खत यांची आवश्यकता नसते. केवळ बियाणे टाकल्यानंतर त्याची शुद्धता राखावी लागते. सुमारे ४५ दिवसांनंतर उत्पादन मिळते. कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळू शकते. १०० ग्रॅम शेवाळात एक किलो भाजीइतकेच पोषण मूल्य असते. शेवाळ शेतीमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या स्पिरुलिना या शेवाळामध्ये प्रथिनांचे प्रमाण आणि औषधी गुणधर्म यामुळे मोठे महत्त्व आहे.. त्याची भुकटी किंवा टॅबलेट स्वरूपामध्ये उत्पादन व विक्री केली जाते. मत्स्य शेतीमध्येही शेवाळ निर्मिती करून माशांची वाढ करणेही फायदेशीर ठरते आहे. यामुळे मत्स्यखाद्यामध्ये बचत करणे शक्य आहे.  
  • डॉ. श्‍याम गरुड,  ९४८१७३४५६९ डॉ. अर्चना लामदांडे,  ६३६४५४५६९३ (श्री. इंगळे आणि डॉ. गरुड हे कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे तर डॉ. लामदांडे या  अन्न तंत्रज्ञान विभाग, समुदाय विज्ञान महाविद्यालय, कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com