बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थ

आवळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कॅण्डी, मुरंबा, आवळाकाठी, त्रिफळा चूर्ण, तेल, ज्यूस, चटणी, गोळ्या, चकल्या, पापड, सरबत, गुलकंद, बर्फी असे पदार्थ तयार करता येतात. त्यातून मूल्यवर्धन साधते.
बहुगुणी आवळ्याचे  मूल्यवर्धित पदार्थ
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थ

आवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे औषधी फळ आहे. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. आवळा फळ सुकवले, शिजवले तरी त्यातील उपयुक्त जीवनसत्वे किंवा औषधी गुणधर्म कमी होत नाही. आवळा फळाची चव अधिक तुरट असल्यामुळे ताजी फळे कमी खाल्ली जातात. आवळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कॅण्डी, मुरंबा, आवळाकाठी, त्रिफळा चूर्ण, तेल, ज्यूस, चटणी, गोळ्या, चकल्या, पापड, सरबत, गुलकंद, बर्फी असे पदार्थ तयार करता येतात. त्यातून मूल्यवर्धन साधते.

      आवळ्यातील औषधी गुणधर्म   आवळा फळाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य गरात ६०० मि.ग्रॅ.पर्यंत ‘क’ जीवनसत्वे व इतर खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.  आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे अधिक प्रमाण असते. (संत्रा फळापेक्षा दहा टक्के अधिक).   आवळा हा पाचक, ज्वर नाशक, स्नायू व वीर्यवर्धक, दात मजबुतीसाठी उपयुक्त आहे. केसाच्या आरोग्यासाठीही गुणकारी  आहे.   आवळ्यातील औषधी गुणधर्म हृदयातील बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात, त्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते.  मधुमेह - आवळ्यातील क्रोमियम तत्त्व शरीरातील इन्शुलिन पेशी मजबूत करतात. परिणामी साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते.   पचनक्रिया - गॅस, अॅसिडिटी, आंबट ढेकर यासारख्या समस्या दूर करते. आवळ्याचे लोणचे, ज्यूस, चूर्ण यासारख्या पदार्थाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.  हाडे मजबुती - यातील कॅल्शिअममुळे अर्थराईटीस आणि हाडांच्या आजारांमध्ये आराम मिळतो.  डोळ्यासाठी गुणकारी -आवळ्याच्या रसाच्या सेवनाने डोळ्याच्या विविध समस्या उदा. मोतीबिंदू पासून दूर राहता येते.  वजन कमी करणे - शरीरातील चयापचयाच्या प्रक्रियेला मजबुती देतो. परिणामी वजन नियंत्रणास राहण्यास मदत होते. आवळ्याची साठवण   पक्व आवळे सामान्य तापमानाला ७ ते ८ दिवस राहू शकतात.   आवळ्याची साठवण ५ ते ६ अंश तापमानाला केल्यास २ महिन्यांपर्यंत चांगले राहतात.  १५ टक्के ब्राईन सोल्यूशन (१ लिटर पाण्यामध्ये १५० ग्रॅम मीठ) या द्रावणामध्ये सामान्य तापमानाला त्यांची साठवण ७० ते ८० दिवसांपर्यंत करता येते.

आवळा जॅम  १ किलो आवळा स्वच्छ धुवून २० ते ३० अंश तापमानाला १० ते १२ मिनिटे वाफवून घ्यावेत.  त्यानंतर आवळ्याच्या बिया काढून गराचा मिक्सरमध्ये लगदा तयार करावा.  पातेल्यात आवळ्याचा लगदा व ७५० ग्रॅम साखर एकत्र मिसळून मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे.  मिश्रण शिजवताना त्याचा टी.एस.एस. ६८५ ब्रिक्स आल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्यावे.  तयार झालेल्या जॅमला निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटलीत भरावे. थंड जागी त्याची साठवणूक करावी. आवळा गर  स्वच्छ आवळा घेऊन त्याच्या बी काढून तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे १५ ते २० मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यावेत.  त्यानंतर मिक्सरमध्ये १ किलो आवळ्यामध्ये १ लिटर पाणी टाकून बारीक करून घेणे.  तयार झालेल्या गराला एका स्टीलच्या पातेल्यात ७८ अंश तापमानाला गरम करून घेणे.  तयार झालेल्या गरामध्ये १० मिली पाण्यामध्ये १.५ ग्रॅम प्रति किलो सोडिअम मेटाबायसल्फेट मिसळून गरामध्ये टाकावे. तयार झालेला गर हा हवाबंद बाटलीमध्ये भरून थंड ठिकाणी साठवणूक करावी.     आवळा सरबत  १ किलो आवळे वाफवून घ्यावेत. बिया काढून गर काढावा. त्यामध्ये ५०० ग्रॅम साखर, ५ ग्रॅम मीठ, ५ ग्रॅम मीरपूड व २ ग्रॅम आले घालून एकत्र गर बनवावा.  तयार झालेल्या रसामध्ये लिंबाचा रस ५ मिली आणि ८०० मिली पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. तयार झालेले सरबत गाळणीने गाळून घ्यावे. काचेच्या बाटलीमध्ये भरून सील करून ठेवावे.     आवळा लोणचे   १ किलो आवळ्याचे तुकडे घेऊन ते १५० ग्रॅम मिठात मिसळून २२ ते २४ तासासाठी भिजत ठेवावे.   आवळ्याचे तुकडे द्रावणाच्या बाहेर काढून ३० ग्रॅम मेथी बिया, ४०० मिली मोहरीचे तेल घालून मिसळून घ्यावे.(मसाला गरम करून मग आवळ्याच्या तुकड्यांमध्ये मिसळावा.)  तयार झालेल्या मिश्रणात २ टक्के हिंग मिसळावा. त्यानंतर दोन दिवसांनी २५ ग्रॅम मीठ मिसळावे. तयार झालेले लोणचे आकर्षक बाटलीत भरून ठेवावे.     आवळा सुपारी   स्वच्छ पाण्याने धुतलेले १ किलो आवळ्याचे तुकडे करावेत. ते १०० अंश सेल्सिअस तापमानाला ६ ते ७ मिनिटे शिजवून घ्यावेत. या पद्धतीमुळे आवळा सुपारीची टिकवण क्षमता वाढते. त्यानंतर आवळ्याचे तुकडे गरम पाण्यातून काढून थंड करून घ्यावेत.  १ किलो आवळ्याच्या फोडींमध्ये ५० ग्रॅम मीठ मिसळून, त्यामध्ये ३ ग्रॅम काळे मीठ, ५ ग्रॅम आमचूर पावडर मिसळून घ्यावी.  हे मिश्रण ड्रायरमध्ये ६० ते ७०अंश सेल्सिअस तापमानाला ५ ते ६ तासासाठी वाळवावे.  त्यानंतर तयार झालेल्या आवळा सुपारीला थंड करून घ्यावे. पॉलिथिन पाऊचमध्ये पॅक करून घेणे. तयार झालेली आवळा सुपारीही ३ महिने खराब होत नाहीत.   आवळा चूर्ण   १ किलो आवळ्याच्या फोडी घेऊन त्यांना १० ते १५ मिनिटे वाफवून घ्याव्यात. त्यानंतर त्या फोडी थंड करून घ्याव्यात.  त्यानंतर त्या फोडी ३ ते ४ दिवस उन्हात वाळवून घ्यावेत.  आवळ्याच्या फोडी चांगल्या वाळल्यानंतर मिक्सरमध्ये त्याला बारीक करून चूर्ण तयार करून घ्यावे. तयार झालेले चूर्ण हे निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरून साठवून ठेवावे.     आवळा मुरांबा   १ किलो ताजे आवळे निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर चाकू किंवा टोच्याने सर्व बाजूने टोचून घ्यावे. त्यानंतर १०० अंश तापमानाला १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावेत.  त्यानंतर ही फळे २.५ टक्के पेक्टिन एन्झाइमच्या द्रावणात साधारणपणे ३ ते ५ तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर फळे द्रावणातून बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत.  धुतलेली फळे साखरेच्या (३५अंश ब्रिक्स) द्रावणात २२ ते २४ तास बुडवून ठेवावीत. अशा प्रकारे दररोज साखरेच्या पाकाचा १० अंश ब्रिक्स वाढवण्यासाठी लागणारी साखर त्या पाकात मिसळावी.  अशा प्रकारे साखरेच्या पाकाचा ब्रिक्स ७२ ते ७५ अंश इतका आणावा. मुरंबा तयार झाल्यानंतर बाटलीत हवाबंद करून ठेवावा.     आवळा कॅण्डी -  आवळा कॅण्डी तयार करताना मोठ्या आकाराची पक्व फळे निवडून प्रथम पाण्याने धुवून घ्यावीत. त्यानंतर उकळत्या पाण्यात टाकून त्वरित बाहेर काढावीत. (या प्रक्रियेला ब्लांचिंग असे म्हणतात.)  फळे काढून ती थंड होऊ द्यावीत. त्यातील बी वेगळे करून त्यांच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. त्यानंतर आवळ्याच्या १ः०७ असे साखरेचे प्रमाण घेऊन झाकण बंद पातेल्यात ठेवून २४ तास ठेवावे.  त्यामध्ये थोडी थोडी साखर टाकून त्याचा ७२ अंश ब्रिक्स वाढवावा. त्यानंतर कॅण्डी काढून उन्हामध्ये तीन ते चार दिवस वाळवावी. तयार झालेली कॅण्डी पॉलिथिन बॅगमध्ये भरून साठवणूक करून ठेवावे.      आवळा गोळ्या   १ किलो ग्रॅम आवळा गर शिजवून त्यामध्ये ३० ग्रॅम जिरे, १० ग्रॅम आले किस, १० ग्रॅम काळे मीठ, २० ग्रॅम मसाला घालून शिजवून घ्याव्यात.  हे मिश्रण थंड करून घ्यावे. त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून २ दिवस सूर्यप्रकाशात वाळवाव्यात.  तयार झालेल्या गोळ्या एका निर्जंतूक केलेल्या डब्यात साठवाव्यात. या गोळ्या पाचक, चविष्ट, व जीवनसत्त्वयुक्त असतात.      आवळा चटणी   सुरवातीला १ किलो आवळा फोडून शिजवून घ्याव्यात. त्यानंतर २० ग्रॅम लाल तिखट, १० ग्रॅम जिरे, २० ग्रॅम मसाला व ३० ग्रॅम तीळ घालून त्या मिश्रणाला शिजवून एकजीव करून घेणे.  तयार झालेल्या मिश्रणाला थंड करून जाडसर वाटून घ्यावे. त्यामध्ये १० ग्रॅम लसूण घालून मिसळून घ्यावे. त्यानंतर तयार झालेली चटणी आपण रोजच्या आहारात वापरू शकतो. ग्रामीण भागात या चटणीचा जास्त वापर होतो.   : सचिन शेळके,  ८८८८९९२५२२,  (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि  तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्निनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com