नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा विस्तार

काटकपणा, अवर्षणातही टिकाव धरण्याची क्षमता यामुळे २००८ मध्ये केवळ तीन एकरांवर असलेले शेवग्याखालील क्षेत्र पुढील दोन वर्षांत २०० एकरांवर गेले. आज जिल्ह्यात हे क्षेत्र चार हजार एकरांपेक्षा अधिक आहे.
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा विस्तार
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा विस्तार

नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील वाढलेले क्षेत्र तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावाने कमी करावे लागते. याला पर्यायी म्हणून पेरू, अंजीर, शेवगा असे प्रयोग झाले. मात्र, काटकपणा, अवर्षणातही टिकाव धरण्याची क्षमता यामुळे २००८ मध्ये केवळ तीन एकरांवर असलेले शेवग्याखालील क्षेत्र पुढील दोन वर्षांत २०० एकरांवर गेले. आज जिल्ह्यात हे क्षेत्र चार हजार एकरांपेक्षा अधिक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंबाला पर्याय म्हणून २००८ मध्ये मालेगाव तालुक्यात पहिला प्रयोग करण्यात आला. तीन एकर क्षेत्रात सघन पद्धतीने ५x५ अंतरावर लागवड झाली. त्यातून हे क्षेत्र हळूहळू विस्तारत गेले. डाळिंब, द्राक्ष बागांच्या नियोजनाचा अनुभव असलेल्या अभ्यासू शेतकऱ्यांनी नवे वाण व प्रयोग केले. पूर्वीच्या एक छाटणीऐवजी दुबार छाटणीमुळे उत्पादनात वाढ झाली. परिणामी पारंपरिक पद्धतीतील एकरी उत्पादन ६ ते ७ टनावरून १५ टनांपर्यंत घेण्यात अनेक शेतकरी यशस्वी झाले. सुधारित जातीची लागवड : सुरुवातीला तमिळनाडू कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित पीकेएम-१ (कोईमतूर-१), पीकेएम-२ (कोईमतूर-२) तसेच कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित भाग्या (के.डी.एम-०१) हे वाण लागवडीखाली होते. केवळ उन्हाळी बहाराचे ६ ते ७ टनांपर्यंत उत्पादन मर्यादित होते. पुढे 'ओडिसी' हे सुधारित वाण आले. त्यास वर्षातून दोनदा येणारा बहार, लागवडीनंतर अवघ्या ४ ते ५ महिन्यांत येणारा फुलोरा व सहा महिन्यांपासून हिरव्या रंगाच्या १.५ ते २ फूट लांबीच्या शेंगांची तोड सुरू होते. अधिक उत्पादकतेमुळे या वाणाला पसंती जास्त आहे. हंगामात शेवग्याला मागणी चांगली असल्याने दरही चांगला मिळतो. शेवगा जमिनीत नत्र स्थिर करतो. त्याचा पाला गळून जमिनीवर पडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. गुणवत्तापूर्ण उत्पादनातून मिळविली बाजारपेठ : सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेत विक्री. मात्र, उठाव कमी असल्याने अडचणी आल्या. २००९ पासून मुंबईत वाशी मार्केटला विक्री सुरू झाली. गुणवत्तेमुळे नाशिकच्या शेवग्याला व्यापारी मुंबईत स्थानिक व निर्यातीसाठी प्राधान्य देऊ लागले. यामुळे पुढे आखाती देश, मलेशिया, सिंगापूर येथे निर्यात होऊ लागला. आज येथून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी ७० टक्के वाटा नाशिक जिल्ह्याचा असल्याचे प्रयोगशील शेतकरी अभिमानाने सांगतात. आता थेट मराठवाड्यातून नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, बीड येथे व्यापारी खरेदीसाठी येतात. अन्य राज्यातील व्यापारीही थेट बांधावरून खरेदी करतात. जिल्ह्यातील शेवगा लागवडीखालील अंदाजे क्षेत्र (एकर)  मालेगाव (२५००), सटाणा (११००), देवळा (२५०), कळवण (१५०), चांदवड (१००), नांदगाव (२००), येवला (१००).

नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीतही बऱ्यापैकी स्थिर उत्पन्न देणारे पीक म्हणून आम्ही सुरुवातीला शेवगा पिकाकडे वळलो. जागतिक बाजारपेठेत मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे नवी संधी पाहत भविष्यामध्ये सेंद्रिय शेवगा शेतीकडे वळावे लागणार आहे. यात प्रक्रियेलाही मोठ्या संधी आहेत. - कृषिभूषण अरुण पवार, शेवगा उत्पादक, पवारवाडी, ता. मालेगाव शेवगा पीक कमी खर्चात, कमी पाण्यावर येणारे नगदी पीक ठरत आहे. पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये किफायतशीर ठरत आहे. आर्थिक अडचणीच्या काळात शेवग्याने उत्तम साथ दिली आहे. - मनोहर खैरनार, शेवगा उत्पादक, डोंगराळे, ता. मालेगाव नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात डाळिंब या फळपिकानंतर शेवग्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेवग्याचे आयुर्वेदातील महत्त्व लक्षात घेता भविष्यात प्रक्रिया उद्योगाला मोठ्या संधी आहेत. - दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com