ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील शेती ठरली आधार 

ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील शेती ठरली आधार 
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील शेती ठरली आधार 

उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते चाळीस हजार रुपये अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यातील रुई (ता. हातकणगले) येथील महावीर हुल्ले व कपिल हुल्ले हे पिता-पुत्र करीत आहेत. दर्जेदार ऊस बियाण्यांमुळे परिसरामध्ये त्यांचे नियमित ग्राहक तयार झाले आहेत. सोबत जमिनी कराराने घेणे, भाकड जनावरांचे पालनपोषण आणि विक्री यातून अर्थार्जनाचा वेगळा मार्गही शोधला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील रुई (ता. हातकणंगले) येथे हुल्ले कुटुंबीयांची बारा एकर शेती आहे. या बारा एकर व्यतिरिक्त अन्य शेतकऱ्यांची शेतीही ते करार पद्धतीने करतात. हा सर्व ऊस उत्पादक पट्टा असल्याने त्यांच्याकडे प्रामुख्याने १० एकर क्षेत्रामध्ये ऊस हे पीक घेतले जाते. तर पिकांमध्ये फेरपालटासाठी केळी, हरभरा, सोयाबीन व भुईमूग यांचे उत्पादन घेतले जाते. या १० एकर क्षेत्रासाठी आवश्यक ते बियाणे सुरवातीला ते बाहेरून विकत घेत. हा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी त्यांनी प्रथम स्वतःसाठी बियाणे प्लॉट तयार करण्याचा निर्णय घेतला.  बियाणे प्लॉटचे व्यवस्थापन 

  •  बियाणे प्लॉटसाठी एक ते दीड एकराचे शेत प्रत्येक वर्षी राखीव ठेवले जाते. 
  •  बियाणे लागवडीसाठी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र व कोल्हापूर येथील प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राच्या प्लॉटमधून फाउंडेशन बियाण्यांची खरेदी केली जाते. वाहतुकीसह एक एकरसाठी सुमारे १० ते ११ हजार रुपये एवढा खर्च येतो. 
  •  या भागामध्ये मागणी असलेल्या उसाच्या कोएम ८६०३२ व को ०२६५ जातीच्या उसाची बियाण्यासाठी लागवड केली जाते. 
  •  लागवडीआधी विद्यापीठाने शिफारस केलेल्या बुरशीनाशक, किटकनाशक आणि जैविक खतांची प्रक्रिया केली जाते. 
  •  त्यानंतर साडेचार फुटी सरीत लागवड करतात.
  •  ठिबकमधून विद्राव्य खतांची मात्रा दिल्या जातात. त्यात चांगली वाढ व फुटींसाठी १२:६१:०, वजन आणि पेरांची लांबी वाढण्यासाठी ०ः ०ः ५० आदी खते ठिबकमधून देण्यात येतात. खते, कीडनाशके यांच्यासाठी सुमारे ३० हजार रुपये लागतात.
  •  हंगामानुसार पाण्याचे नियोजन बदलते. तरीही उन्हाळ्यात सरीतून पाणी दिले जाते, तर हिवाळा व पावसाळ्यात ठिबक सिंचनचा वापर करतात. 
  • योग्य वयाच्या उसाला प्राधान्य 
  •  साधारणपणे १५ सप्टेंबरला लागवड केली जाते. 
  •  सुमारे जून महिन्यामध्ये तोडणी सुरू होते.
  • साधारण नऊ महिन्यांपासून उसाची तोडणी बियाण्यासाठी सुरू होते.
  • एक महिना ते सव्वा महिने प्लॉट चालतो.
  • बियाण्यासाठी ऊस घेताना व्यवस्थापनातील काळजी

  •    बीजप्रक्रिया
  •    उसामध्ये आंतरपिके घेत नाही. 
  •    उसाचा पाला काढला जात नाही
  •    कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि आवश्यकतेनुसार फवारणींचे नियोजन केले जाते. 
  • योग्य वेळेवर तोडणी केली जाते. 
  • तोडणी व वाहतुकीदरम्यान उसाचे डोळे खराब होणार नाहीत, याची प्राधान्याने काळजी घेतली जाते. 
  • कीड किंवा रोगग्रस्त ऊस त्वरित प्लॉट बाहेर काढला जातो. 
  • परिसरातील शेतकरी हेच ग्राहक

  • गेल्या दहा वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांशी संपर्क
  • प्रत्येक वर्षी बियाणे नेणारे शेतकरी ठरलेले आहेत.
  • रुईबरोबर कबनूर, इंगळी, चंदूर भागांतील शेतकरीही त्यांच्याकडे बियाणे खरेदी करतात. 
  • दीड महिन्यात दीड एकर प्लॉटची तोडणी
  • साधारणत: आडसाली उस लागवडीसाठी बियाणे नेण्यास शेतकऱ्यांची पसंती.
  • असा मिळतो नफा

  • एक डोळ्याला साठ पैसे या प्रमाणे उसाची विक्री करतात.
  • डोळे मोजून त्याप्रमाणे ऊस किती होतात याचा हिशेब केला जातो. 
  • नऊ ते दहा महिन्यांत साडेतीन लाख रुपयांपर्यत उत्पन्न मिळते. एकरी साधारण ६० ते ६५ हजार रुपये खर्च वजा जाता २.५ लाख रुपयापर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते.  
  • बियाण्यांची तोडणी झाल्यानंतर आठवडाभरात शेतकऱ्यांकडून रक्कम जमा होते.
  •  सध्या बियाणे प्लॉटमधून एकरी ऐंशी टनांपर्यंत उत्पादन मिळते.
  • कारखान्याला दिलेल्या उसाच्या उत्पन्नाशी तुलना उसाचे एकरी ८० टन उत्पादन असून, कारखान्यांचा प्रति टन ऊस दर ३००० रुपये इतका आहे. त्यातून एकरी २.४ लाख रुपये उत्पन्न मिळते. मशागतीसह सर्व खर्च सुमारे ५० हजार रुपये येतो. निव्वळ उत्पन्न १.९ लाख रुपये मिळते. म्हणजेच बियाणे प्लॉटमधून अधिक फायदा राहतो. 

    भाडेतत्त्वावरील शेती फायदेशीर

  • हुल्ले हे १९६८ पासून शेती करतात. त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती होती. त्यांना तीन मुली व एक मुलगा. त्यांच्या पालनपोषणामध्ये त्यांना शेती हाच मुख्य आधार ठरला आहे. केवळ एकसुरी शेती करण्याऐवजी उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार केले, त्यामुळे कोणत्या कोणत्या मार्गातून त्यांच्याकडे ठराविक रक्कम येत राहिली. 
  •    हुल्ले यांनी अन्य शेतकऱ्यांची सुमारे चार एकर शेती कसायला घेतली आहे. त्यामध्ये ऊस लागवड करून प्रति वर्ष १२ टनाचे पैसे त्या शेतकऱ्याला दिले जातात. या शेतीसाठी मशागतीपासून सर्व खर्च हुल्ले करतात. 
  •    कराराच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये ठराविक कालावधीसाठी एक रक्कम शेतकऱ्याला दिली जाते. ती फिटेपर्यंतच्या काळामध्ये त्यांच्या ठरलेल्या शेतामध्ये पिके घेतली जाते. 
  •    स्वत: कष्ट करत असून, शेणखतासह सुपीकता जपत असल्याने अनेक शेतकरी शेती कसण्यासाठी त्यांच्याकडे देतात. 
  • शेतीतील रक्कम शेतीतच  वर्षाला यातून पाचशे ते साडेपाचशे टन ऊस निघतो. यातून चौदा लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. यातून खर्च वजा जाता सात लाखापर्यंतचा नफा त्यांना राहतो. ही रक्कम ते शेतीतच गुंतवतात. इतर शेतकऱ्यांकडून शेती भाडेतत्त्वावर घेणे, शेतावर पैसे देणे यासाठी ही रक्कम वापरली जाते. प्रत्येक वर्षी पैशाची ही उलाढाल सुरूच असते. यातून घरखर्च व मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी पेलला आहे. त्यांची एक मुलगी वकील, दुसरी इंजिनिअर तर तिसरी पदवीधर आहे. तर मुलगा कपिल हा त्यांना शेतीत मदत करतो.

     ः कपिल हुल्ले, ९९७०१४१७७५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com