आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा आत्मविश्‍वास

आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा आत्मविश्‍वास
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा आत्मविश्‍वास

पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील फ्लॅट संस्कृती आणि कॉन्व्हेंटच्या शिक्षणात रमलेल्या प्रियंका व त्यांच्या मुलांनी दुग्ध उत्पादन, डेअरी व्यवसायाच्या निमित्ताने खेडेगावाची निवड केली. दीड कोटीच्या गुंतवणुकीनंतर रोजची ३५ हजार रुपयांची उलाढाल ही एकच बाब पालखी डेअरीचे व्यवस्थापन त्यांनी किती उत्तमपणे सांभाळले आहे, याची साक्ष देणारी आहे. सौ. प्रियंका काकडे यांनी उभारलेला १०० गायींचा अत्याधुनिक गोठा आणि डेअरी खऱ्या अर्थाने डेअरीचे अर्थशास्त्र समजावणारी आहे. प्रियंका काकडे यांच्या सासूबाई सौ. सुलभाताईंनी निंबुत छप्री (जि. पुणे) या नीरा-बारामती मार्गावरील गाव त्याकाळी १८ एकर टेकडी खरेदी केली होती. त्यावर शेतीसह दहा एचएफ गायींची गोठा सांभाळून आपल्या गौतम आणि गौरव या दोन मुलांचे शिक्षण केले. दोघेही उत्तम व्यावसायिक आहेत. लहाणपणापासून घरच्या गायीमध्ये रमलेल्या गौरव यांनी आधुनिक डेअरीचे स्वप्न पाहिले. त्याला पत्नी प्रियंका यांची भक्कम साथ मिळाली. आधी आत्मविश्‍वास नव्हता... प्रियंकाताई सांगतात, “बारामती हा तसा दूधदुभत्याचा परिसर. प्रख्यात डायनामिक्स डेअरी येथे आहे. निंबूत गावाशेजारीही ५०० पेक्षा जास्त गायींची एक डेअरी यशस्वीपणे चाललताना पती गौरव यांनी पाहिली होती. त्यांनी डेअरी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. पण माझी साथ असेल, तर पुढे जावू असा त्यांचा आग्रह होता. मात्र मी पुण्याच्या शहरी वातावरणात रमले होते. मुलेही कॉन्व्हेंटमध्ये शिकत शिकत होती. मुलांच्या करियरच्या दृष्टीने पुणे उत्तम असताना गावी जाऊन गोठा सांभाळणे, मला सुरुवातीला पटत नव्हते. खरे सांगायचे तर व्यवसायासाठी लागणारा आत्मविश्‍वास माझ्याकडे अजिबात नव्हता. मात्र गौरव यांनी मला सातत्याने समजावत आत्मविश्‍वास दिला.” डेअरीसाठी शहर सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही दोन्ही मुलांचे दाखले कॉन्व्हेंटमधून काढले. अनेकांनी ‘लोक मुलांसाठी शहरात येत असताना तुम्ही उलटे कुठे चाललात,’ असा प्रश्‍न विचारला. अगदी शाळेच्या प्राचार्यांनीही दाखले काढण्यापूर्वी व्यवस्थित विचार करण्याचा सल्ला दिला. मात्र मुलगा वीर आणि मुलगी पालखी यांनीही चार दिवसांतच येथील शाळा आपलीशी केली. मुले आता शेतात, डेअरीवर उत्तम रमली आहेत. प्रियंकाताई म्हणतात, “केवळ इंग्रजी शिक्षण म्हणजे सर्व काही मानण्यापेक्षा आजी-आजोबांची माया, हिरवे शिवार त्यांना मिळाले आहे. त्यांना आम्ही एकच सांगतो- उत्तम करियरसाठी तुमचा नियमित अभ्यास व जिद्द कामाला येते.” ...आयुष्याची पुंजी डेअरीत लावली “आजवर फारसे आर्थिक निर्णय न घेणारी मी आता आर्थिक निर्णयामध्ये बोलू लागले, विचार करू लागले. पहिलाच निर्णय होता तो स्वपुंजीतून उभारणी की बॅंकेतून कर्ज घ्यायचे. मात्र मंजुरीसाठीची धावपळ, व्याज व पुढे कर्ज फेडीची चिंता याऐवजी आयुष्याची जमवलेली पुंजी आम्ही या प्रकल्पात लावली. कर्जफेडीच्या तणावाशिवाय डेअरीवर २४ तास लक्ष देणे शक्य झाले. तसे असले तरी आर्थिक तणाव असतातच. त्यात आम्ही पती-पत्नी एकमेकांना आधार देत असतो. ठामपणे निर्णय घेऊन मार्ग काढतो,” असे प्रियंकाताई सांगतात. आधुनिक डेअरीची उभारणी... फेब्रुवारी २०१९ मध्ये १८ एकरपैकी ३ एकर क्षेत्रामध्ये शेड व डेअरी उभारली. पहिल्या टप्प्यात बंगळूरहून साधारण चौथ्या, पाचव्या वेताच्या ३५ गायी आणल्या. पंधरा दिवसांच्या फरकाने आणखी ५० गायी आणल्या. दूध काढणीसह डेअरीसाठी ६० लाख रुपये खर्च, अत्याधुनिक उपकरणे, यंत्रे बसवली. या मिल्क पार्लरमुळे एका वेळी सहा गायींची धार दहा मिनिटांत काढता येते. दूध साठवणीसाठी पाच हजार लिटर्स क्षमतेचा बल्क मिल्क कूलर बसविला. आणखी दहा लाखांचा खर्च करून गोठ्याशेजारीच डेअरी मॉनिटर रूम उभारली. कमीत कमी हाताळणीमुळे स्वच्छ दूध उत्पादन सुरू झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायामुळे विखुरलेली माणसं एकत्र आली. घरच्याच कालवडी वाढवत डेअरीमध्ये १०० गाई आहेत. रोज ११०० लिटर दूध हाताळले जाते. प्रत्येक गायीच्या दूध उत्पादकतेवर लक्ष ठेवले जाते. पहिल्या लॅक्टेशनमध्ये किमान १४ ते १५ लिटर दूध मिळाले पाहिजे, हे ध्येय असते. त्यासाठी कालवडीचे संगोपन काळजीने केले जाते. पुढे सहा लॅक्टेशनपर्यंत हे प्रत्येकवेळी ३ लिटरने वाढते. त्यानंतर ते प्रत्येक लॅक्टेशनला एक लिटरने कमी होते. गायींचे सरासरी दूध सध्या १८ लिटर आहे, ते वाढवत २५ लिटरपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी ‘नो टुरिझम-नो फंक्शन’ असे धोरण असून, एक दिवस निर्भेळ, शुद्ध दुधाचा माझा ब्रॅन्ड सर्वत्र दिसेल, असा आत्मविश्वाश्‍वास प्रियंकाताई व्यक्त करतात. डेअरी व्यवसायात पती माझे गुरू... “मी शेतकऱ्याची मुलगी असले तरी १०० गायींच्या डेअरीची मालकीण होईन, असं वाटलं नव्हतं. शहाजीराव व सौ. सुलभाताईसारखे आईवडिलाप्रमाणे वागणारे सासूसासरे मिळाले. प्रोत्साहन देणारे गौरव यांच्यासारखे पती, नव्हे गुरू मिळाल्याने मला आत्मविश्‍वास मिळाला. प्रत्येक निर्णय घेताना ते ‘तुला काय वाटतं?’ ‘हे काम कसं करायला हवं?’ ‘अमूक एक निर्णय घेणे योग्य राहील कां,’ असे विचारत मला त्यात सामील करून घेतात. कधी वेगळे मत मांडले तरी न चिडता चर्चा करत समजावतात. दोघांच्या विचारांतूनच डेअरीचे अर्थशास्त्र उत्तम राहण्यास मदत होते.” अशी भावना प्रियंकाताई व्यक्त करतात. पालखी डेअरी फार्मचे अर्थशास्त्र

  • प्रकल्प उभारणीचा भांडवली खर्च- दीड कोटी रुपये
  • आतापर्यंत खर्चाची झालेली वसुली- ३६ लाख ५० हजार रुपये
  • खर्च वसूल होण्याचा अंदाजे कालावधी- २०२४ पर्यंत
  • गायींची संख्या -१००
  • त्यातील दुधावरच्या गायी- ६५
  • रोज संकलित होणारे दूध- ११५० लिटर
  • सरासरी एका गायीचे मिळणारे दूध- १७.६९ लिटर
  • दुधाला मिळणारा सध्याचा भाव- ३० रुपये लिटर
  • दुधातून रोज होणारी उलाढाल- ३४,५०० रुपये
  • रोजचा खर्च सुमारे - १५,००० ते २०,००० रुपये
  • रोजचा नफा- १०,००० ते १४,५०० रुपये
  • मनुष्यबळ व रोजचा खर्च - सात कामगारांसाठी अंदाजे १७५० रुपये.
  • डेअरीचे अर्थशास्त्र टिकवण्यासाठी...

  • शुद्ध वंशाच्या गायींची निवड.
  • सरासरी दूध प्रति गाय २५ लिटरपर्यंत असावे.
  • गोठा मुक्त हवा. भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा महत्त्वाची
  • गायीला गाभण काळात (सात ते नऊ महिने) आराम, उत्तम आहार देतो.
  • व्याल्यानंतर २१ दिवस गायीची खूप काळजी आवश्यक.
  • लसीकरण - एफएमडी लस वर्षातून तीन वेळा, थायरॅलिसिस वर्षातून एकदा, डीवर्मिंग वर्षातून तीन वेळा, ब्रोसिलिसिसची लस एकदा अत्यावश्यक.
  • आजारपणात औषधांमध्ये प्रतिजैविकांचा वापर करावा लागल्यास त्या गायीचे दूध सात दिवस विकत नाही.
  • स्वच्छ पाणी व रोजचे प्रतिगाय ३० किलो खाद्य द्यावे. त्यात ताजा हिरवा चारा, चांगला सुका चारा व गोळीपेंड हवेच.
  • बुरशी असलेल्या चाऱ्याचा वापर करत नाही. कारण त्यातून दुधात अफ्लॉटॉक्झिन विषारी घटक उतरू शकतो.
  • गाय गाभण राहिली की नाही, ओळखण्यासाठी गळ्यात सेन्सर बसवला आहे.
  • दुधाची शुद्धता व स्वच्छता टिकवण्यासाठी कमीत कमी हाताळणी.
  • मजुरांना वेळेवर पगार आणि आपुलकीची वागणूक.
  • डेअरी मधील नवे तंत्र, नवे प्रयोग जाणून घेणे.
  • उच्च दूध उत्पादनासाठी गोठ्यात ९ कक्ष शेडमध्ये हाय मिल्किंग यील्ड कक्ष, मिड मिल्किंग आणि लो मिल्किंग कक्ष हवा. सातव्या महिन्यानंतर आटवलेल्या गायींसाठी ड्राय सेल स्वतंत्र आहे. मिल्क पार्लर, कॉम्प्रेसर रूम, मिल्क स्टोअर रुम, डेअरी मॉनिटर रुम, फॉडर रूम असे एकूण नऊ कक्ष उभारले आहेत. संपर्क - सौ. प्रियंका गौरव काकडे, ९७६४८९९०९६ (वेळ ः सकाळी १० ते १)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com