agriculture stories in marathi ARTHKATHA TURNOVER OF SAIPRAVARA FARMER PRODUCER CO. REACHES TO HO 3 CRORE | Agrowon

साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली तीन कोटींवर

सूर्यकांत नेटके 
सोमवार, 9 डिसेंबर 2019

नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील दहा गावांतील शेतकरी गटांनी एकत्र येऊन साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. सध्या या शेतकरी कंपनीची दोन खते-बियाणे विक्री केंद्रे सुरू असून दीड कोटीची वार्षिक उलाढाल होते. शेतीसाठी निविष्ठांची स्वस्तामध्ये उपलब्धता, पीककर्जासाठी मदत आणि पुढे उत्पादित धान्यांची खरेदी अशा तिन्ही टप्प्यावर पाचशे सभासद शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक आधार दिला आहे. शेतकऱ्यांसोबतच कंपनीचीही वाढ होत असून, पहिल्या वर्षी पाच लाख असलेली आर्थिक उलाढाल आता तीन कोटीपर्यंत पोचली आहे.

नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील दहा गावांतील शेतकरी गटांनी एकत्र येऊन साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. सध्या या शेतकरी कंपनीची दोन खते-बियाणे विक्री केंद्रे सुरू असून दीड कोटीची वार्षिक उलाढाल होते. शेतीसाठी निविष्ठांची स्वस्तामध्ये उपलब्धता, पीककर्जासाठी मदत आणि पुढे उत्पादित धान्यांची खरेदी अशा तिन्ही टप्प्यावर पाचशे सभासद शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक आधार दिला आहे. शेतकऱ्यांसोबतच कंपनीचीही वाढ होत असून, पहिल्या वर्षी पाच लाख असलेली आर्थिक उलाढाल आता तीन कोटीपर्यंत पोचली आहे. शेतकरी कंपनीच्या उत्तम आर्थिक नियोजनातून सभासदांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आहे.

नगर- संगमनेर राज्यमार्गावरील चिंचोली गावचा शिवार सधन. येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत २०१४ मध्ये साईप्रवरा शेतकरी गटाची स्थापना केली. परिसरातील गावांमध्येही असेच शेतकरी गट होते. येथून जवळ असलेल्या बाभळेश्‍वर कृषी विज्ञान केंद्रात विविध कार्यक्रमानिमित्त शेतकरी एकत्र येत. अशाच एका कार्यक्रमात तत्कालीन आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या पुढाकाराने परिसरातील अकरा गावांतील शेतकऱ्यांनी साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. हळूहळू शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आता पाचशेपेक्षा अधिक शेतकरी कंपनीशी जोडले गेले आहेत.

भागभांडवलाची उभारणी

कंपनीच्या स्थापनेनंतर दहा गावांतील साधारण तीनशे शेतकऱ्यांनी प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे तीन लाखाचे भागभांडवल उभे केले. त्याचवर्षी कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून विविध यंत्रांच्या खरेदीसाठी १८ लाखांचे साहित्य मंजूर झाले. त्यातील तेरा लाख अनुदान मिळाले असून, उर्वरित ५ लाखांचा शेतकरी वाटा कंपनीने भरला. त्यासाठी आवश्यक रक्कम काही शेतकरी व संचालक मंडळाने स्वतःच्या ऐपतीनुसार जमा केली. सर्व शेतकऱ्यांनी जबाबदारी उचलत आर्थिक हातभार लावल्यामुळे कंपनीला विविध यंत्रणा खरेदी करता आली.

खेळत्या भांडवलासाठी नाबार्डकडून कर्ज

साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीने २०१६ पासून शेतकऱ्यांकडून धान्याची खरेदी सुरू केली. बाजारात व्यापाऱ्यांकडून धान्य विक्रीसाठी रोख पैसे मिळतात. परिणामी कंपनीकडून शेतकऱ्यांची रोखीची अपेक्षा होती. त्यासाठी सुरुवातीला संचालक मंडळाने साधारण ३० लाखाचे भांडवल स्वतः उभे केले. तसेच नाबार्डकडून दीड वर्षाच्या हमीवर ३० लाखाचे कर्ज घेतले. दीड वर्षानंतर परतफेड करून पुन्हा आता ३५ लाखांचे कर्ज घेतले आहे. भांडवलाची उपलब्धता ही बाब अत्यंत महत्त्वाची होती. त्यात संचालक मंडळ, शेतकरी आणि नाबार्ड संस्थेची मदत झाली. साईप्रवरा कंपनीचा नुकताच दोन पुरस्काराने गौरव झाला आहे.

शेतकऱ्यांना मिळतो थेट आर्थिक फायदा

 • साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीने २०१६ पासून शेतकऱ्यांच्या मदतीने मका उत्पादन सुरू केले. त्यात त्यांना घोडेगाव (ता. नेवासा) येथे पशुखाद्य निर्मित्या परदेशी कंपनीचा आधार मिळाला. या कंपनीकडून मका बियाणे खरेदी केले. मात्र, बाजारातील दरापेक्षा अडीच रुपये कमी दराने शेतकऱ्यांना दिले. त्यात कंपनीला प्रती किलो ५० रुपये नफा मिळाला.
 • - २०१६ मध्ये ३५० एकरमध्ये मका उत्पादन घेतले. मका उत्पादन कंपनीला विकण्यात आली. त्यात बाजारभावापेक्षा दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिक्विंटल अधिक दर मिळाला. साईप्रवराला साधारण पन्नास रुपये प्रती क्विंटल नफा मिळाला.
 • दुसऱ्या वर्षीही सुमारे ६५० टन मका खरेदी केली. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने मका खरेदी झाली नाही. यंदा मक्‍याचा तुटवडा असल्याने आवक कमी आहे. यंदा १८०० रुपये प्रती क्विंटल दराने मका खरेदी केली जात आहे. सध्याही शेतकऱ्यांना बाजारापेक्षा दीडशे ते दोनशे रुपये प्रतिक्विंटल थेट आर्थिक फायदा होत आहे.
 • शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी करून त्याची विक्री परराज्यात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिकिलो दोन ते तीन रुपये अधिक मिळाले.
 • कंपनीसोबत राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होत असल्याने सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. या शेतकऱ्यांना बियाणे, खते व अन्य निविष्ठांची पूर्तता करण्यासाठी साईप्रवराने २०१७ मध्ये दोन दुकाने सुरू केली. केवळ पाच टक्के नफ्यावर कंपनीतील सभासदांना खते, बियाण्याची विक्री केली जाते. आता या दुकानातून कंपनीची सुमारे दीड कोटीची वार्षिक उलाढाल होते.
 • खते बियाण्याच्या खरेदीमध्ये बचत आणि कंपनीकडून धान्यांची खरेदी यामुळे सभासद शेतकऱ्यांना एकरी पंधरा ते वीस हजारांचा फायदा होत आहे.
 • कंपनीने शेतीमाल खरेदी व नंतर साठवणीसाठी दोन गोदाम उभे केले आहेत.

पतसंस्थेचा कर्जरूपी आधार

हंगामामध्ये शेतकऱ्यांना पेरणी आणि लागवडीसाठी भांडवलाची गरज लागते. ती भागवण्यासाठी साईप्रवराच्या सभासदांना राहुरीतील अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेद्वारे कर्ज उपलब्ध केले जाते. कंपनीने दिलेल्या सभासद ओळखपत्रावर खते, बियाणे व कीडनाशकांच्या खरेदीसाठी साधारण तीस हजार रुपयापर्यंतचे पीककर्ज त्वरित उपलब्ध होते. ती रक्कम साईप्रवराच्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. हंगामानंतर संबंधित शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी झाल्यानंतर पतसंस्थेचे कर्ज फेडले जाते. या कर्जासाठी सहा महिन्यांची मुदत असते. निविष्ठांची उपलब्धता, खरेदीसाठी कर्ज आणि उत्पादित शेतीमालाची पुन्हा खरेदी अशा तिन्ही टप्प्यावर शेतकऱ्यांना मदत करणारी नगर जिल्ह्यामधील एकमेव शेतकरी उत्पादक कंपनी असल्याचे असे राहुरी येथील आत्माचे तालुका व्यवस्थापक धीरज कदम यांनी सांगितले.

प्रत्येक गावाला प्रतिनिधित्व ः

चिचोंलीसह परिसरातील गंगापुर, संक्रापूर, पिंपळगाव, डवणगाव, आंबी, केसापूर, तांभेरे, तांदूळनेर व कोल्हापखुर्द या गावांतील शेतकरी गट एकत्र येत साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. संचालक मंडळातही प्रत्येक गावाला प्रतिनिधित्व देत एका शेतकऱ्याचा समावेश केला जातो. सध्या अशोक गागरे (अध्यक्ष), सोपान सिरसाठ (उपाध्यक्ष), दादासाहेब मेहेत्रे (सचीव) असून, संचालक मंडळात संभाजी नन्नोर, नंदकिशोर मुसमाडे, संजय जगताप, रायभान जाधव, राजेंद्र वडितके, कुंडलिक खपके, बेबीताई गागरे यांचा समावेश आहे. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी सुनील साबळे हे व्यवस्थापक नियुक्त केले आहेत.

साईप्रवरा कंपनीची उद्दिष्टे

 • शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करत कर्जमुक्त करण्याचे नियोजन.
 • अल्प नफ्यावर निविष्ठा उपलब्धता.
 • पेरणी, लागवड पश्‍चात तंत्रज्ञानाचा अधिक वापरातून उत्पन्नामध्ये वाढ.
 • शेतकऱ्याकडून बाजारभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीन, मका, कांदा खरेदी करण्याचा प्रयत्न.
 • शेतकऱ्यांची बाजारात अधिक पत निर्माण करण्यासाठी चोख व्यवहार करणे.
 • व्यवसाय वृद्धीसाठी कंपनीच्या नफ्यातूनच भागभांडवलात वाढ करणे.
 • मागणीनुसार शेतकऱ्यांना अल्प नफ्यामध्ये पशुखाद्य तयार करून देणे.

आगामी नियोजन

 • कांद्याची सर्व सुविधायुक्त बाजारपेठेची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 • दूध व्यवसाय वाढ, दुग्ध प्रक्रिया उद्योग, फळपिकांसाठी शीतगृह, कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांना सुधारीत चाळी उपलब्ध करून देणे.
 • कंपनीच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांत निविष्ठा विक्रीसाठी शेतकरी सुविधा केंद्र सुरू करणे.
 • सोयाबीन, कांदा, कापूस, मका, गहू, हरभरा यासाठी करारात वाढ करून आर्थिक व्यवसाय वृद्धी करणे.

स्वस्तामध्ये निविष्ठा उपलब्धता, उत्पादनाची बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदीसाठी प्रयत्न यातून गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा विश्वास तयार होत आहे. कंपनीचा, पर्यायाने सभासद शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचाही विचार प्राधान्याने केला जात असल्याने
साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांची संख्या वाढत आहे. या शेतकऱ्यांची बाजारात पत निर्माण करण्यात यश मिळत असल्याने कंपनीचा उद्देश सफल होत आहे. शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने कंपनी स्थापनेचे समाधान आहे.
-अशोक विश्‍वनाथ गागरे, ९९२२२९४१४९
(अध्यक्ष, साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनी, चिंचोली ता. राहुरी जि. नगर)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
बदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत...
बोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बागढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी...
यांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...
हिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...
तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...
खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...
शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू,...अस्मानी, सुलतानी संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत...
सिंचनाची गंगा अवतरली बांधावरयवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये...
मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी...मोसंबी हे पीक मराठवाडा, विदर्भ व नगर जिल्ह्यात...
सुशिक्षित तरुणाने शोधला मधमाशीपालनातून...बीएससी. मायक्रोबायोलॉजीपर्यंत शिक्षण झालेल्या...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडएखादा पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर...
मिरची पिकात प्रमोद पाटील यांनी तयार...सावळदा (ता. जि. नंदुरबार) येथील प्रमोद हिरालाल...