मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असू
टेक्नोवन
संपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने संपूर्ण स्वयंचलित हरितगृहासाठी अत्याधुनिक स्वयंचलित सिंचन यंत्रणा विकसित केली आहे. याला AuTomatoes एयू टोमॅटोज किंवा ॲटोमॅटोज असे नाव दिले आहे.
वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने संपूर्ण स्वयंचलित हरितगृहासाठी अत्याधुनिक स्वयंचलित सिंचन यंत्रणा विकसित केली आहे. याला AuTomatoes एयू टोमॅटोज किंवा ॲटोमॅटोज असे नाव दिले आहे. या यंत्रणेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्याने आवश्यकतेनुसार योग्य बदल आपोआप केले जातात. यामुळे पिकांच्या मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण होण्यासाठी आवश्यक ते संतुलन मिळवणे शक्य होणार आहे.
वनस्पती किंवा पिकाची वाढ ही प्राधान्याने बाह्य वातावरणातील अनेक घटकांवर अवलंबून असते. सातत्याने या घटकांची संतुलन राखण्यासाठी वनस्पतींची मोठी ऊर्जा खर्च होत असते. खर्च होणारी ऊर्जा जर केवळ उत्पादनाकडे वळवता आली तरी पिकांच्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होऊ शकते. या उद्देश सांगताना वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधक हूगेन्डूरम यांनी सांगितले, की वनस्पतीसाठी पाण्याचे संतुलन मिळवणे हे सोपे वाटत असले तरी त्यात सातत्य ठेवणे अवघड आहे. त्यासाठी अनेक स्वयंचलित सिंचन यंत्रणा उपलब्ध होत आहेत. मात्र, सिंचनाचे नेमके प्रमाण ठरवण्यासाठी माणसांवर अवलंबून राहावे लागते.
सिंचनाचे नेमके प्रमाण ठेवण्यामध्ये बाष्पीभवन वनस्पतींचे बाष्पोत्सर्जनापासून अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. त्यात बदलत्या वातावरणानुसार सातत्याने बदलही होत असतात. वनस्पतीमध्ये शोषले जाणारे पाणी, अंतर्गत चयापचयाच्या प्रक्रियेसाठी वापरले जाणारे पाणी आणि बाहेर टाकले जाणारे पाणी यामध्ये संतुलन असावे लागते. पानांद्वारे बाहेर टाकले जाणारे पाणी जितके अधिक असेल, तितकेच मुळांद्वारे पाण्याचे शोषण अधिक असेल. म्हणजेच पाण्यासोबत अन्नद्रव्यांचे शोषणही अधिक होते. मात्र, मुळे कार्यरत राहण्यासाठी जमिनीमध्ये किंवा माध्यमांमध्ये योग्य ओलावा, कोरडेपणा आणि खेळती हवा असणे आवश्यक असते. याला आपल्याकडे वापसा स्थिती म्हणतात. हे प्रत्येक घटक मोजण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणे, सेन्सर आता बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी विविध शास्त्रीय सूत्रांचा वापर करावा लागतो. त्यांचे एक विशिष्ट पॅटर्न ठरलेले असतात. हे माणसांद्वारे करणे अडचणीचे व अवघड ठरते. अशा वेळी कृत्रिम बुद्धीमत्ता उपयोगी ठरू शकते. हे लक्षात घेऊन एयू टोमॅटोज हे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालणारे स्वयंचलित तंत्र विकसित करण्यात आले आहे.