agriculture stories in Marathi aware of fish farming frauds | Agrowon

मत्स्यशेतीतील फसवणुकीचे नवनवीन फंडे

डॉ. विजय जोशी
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने नव्या मत्स्यशेती करणाऱ्यांची फसवणूक केली जाते. कोणत्याही व्यवसायामध्ये उत्तम नियोजन, व्यवस्थापनाबरोबरच अशी फसवणूक टाळता आली पाहिजे. त्यासाठी खरेतर शास्त्रीय माहिती असणे गरजेचे ठरते.

सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने नव्या मत्स्यशेती करणाऱ्यांची फसवणूक केली जाते. कोणत्याही व्यवसायामध्ये उत्तम नियोजन, व्यवस्थापनाबरोबरच अशी फसवणूक टाळता आली पाहिजे. त्यासाठी खरेतर शास्त्रीय माहिती असणे गरजेचे ठरते.

तलावातील किंवा शेततळ्यातील मत्स्यशेतीमध्ये शास्त्रीय माहिती नसल्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढते. अनेक वेळा खोटी माहिती देत फसवणूक केली जाते. फसवणुकीचे प्रकार जाणून घेत टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतः टाळण्यासोबत अन्य शेतकऱ्यांनाही सावध केले पाहिजे.

खाद्यातील फसवणूक :
मत्स्यशेतीदरम्यान एकंदर आवर्ती खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च हा माशांच्या खाद्यावर होतो. खाद्यामध्ये केली जाणारे फसवणुकीचे प्रकार साधारणपणे पुढील प्रमाणे आहेत.

अ) ओल्या खाद्यातील फसवणूक : कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस, चंदेरा या प्रकारच्या मत्स्यशेतीमध्ये भुईमुगाची पेंड (यांत साधारण ४०% प्रथिने असतात), आणि भाताचा भुस्सा (यांत कर्बोदकाचे प्रमाण भरपूर असते) खाद्य म्हणून वापरतात. भुईमुगाच्या पेंडीमध्ये बऱ्याचवेळा मुद्दामहून भुईमुगाची टरलो मोठ्या प्रमाणावर मिसळली जातात. यामुळे पेंडीचे वजन वाढले तरी त्यातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते. तसेच काही वेळेस भाताच्या भुश्शांमध्ये लाकडाचा भुश्श्याची भेसळ केली जाते. यामुळे भाताच्या भुश्शाचे वजन वाढते, पण कर्बोदकाचे प्रमाण कमी होते. शेतकऱ्याने या दोन्ही गोष्टी विकत घेताना नीट पारखून घ्याव्यात.

ब) कृत्रिम खाद्यात (कांडी खाद्य) फसवणूक : प्रथमच मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गळी माशांच्या वाढीसाठी कांडी खाद्यच कसे आवश्यक आहे, ते उतरवले जाते. गरजेपेक्षा अधिक कांडी खाद्य त्याच्या माथी मारले जाते. अर्थात माशांची चांगली वाढ होण्याकरिता ओले खाद्य (भुईमूग पेंड, भाताची भुस्सा, मक्याचा भरडा इ.) बरोबरच कांडी खाद्यही देणे गरजेचेच आहे. मात्र, ते विशिष्ट प्रमाणात द्यायला हवे. अर्धवट ज्ञानाने पिवळे झालेले मत्स्य सल्लागार माशांना भरपूर कांडी खाद्य देण्याचा सल्ला देतात. कांडी खाद्यामुळे १० ग्रॅम वजनाचा मासा सहा महिन्यात १ किलो वजनाचा मासा होईल. तो विकता येईल,अशी अवास्तव स्वप्ने दाखवतात. वास्तविक हे अतिशय चुकीचे आहे. आयएमसी प्रकारातला कुठलाही मासा सहा महिन्यात १० ग्रॅम पासून एक किलो वजनाचा होत नाही. उलट गरजेपेक्षा जास्त कांडी खाद्य तळ्यात टाकले, तर मासे हे खात नाहीत. असे खाद्य उरते, कुजते. त्याचे रूपांतर विषारी अशा अमोनिया वायूमध्ये होते. तळ्यातील वाढलेल्या अमोनिया वायूच्या प्रमाणामुळे, माशांवर ताण येतो. वाढलेल्या ताणामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. मासे आजारी व रोगग्रस्त होतात. त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण वाढते. म्हणजे अतिरिक्त खाद्य विकत घेणे आणि वापरण्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते. उदा. एका शेतकऱ्याचे १० गुंठ्याचे शेततळे आहे. त्यात त्याने १५०० आयएमसी बोटुकली सोडली आहे. दहा महिने संवर्धन कालावधीनंतर त्याला माशाचे अपेक्षित उत्पादन आहे १००० किलो. त्याकरिता साधारण १२०० किलो एकूण कांडी खाद्य माशांना द्यावे लागणार आहे. बिचाऱ्याला कुणीतरी चुकीचा सल्ला देतो. त्या प्रमाणे तो १५०० किलो खाद्य देतो. म्हणजेच ३०० किलो खाद्य गरज नसताना दिले. खाद्याची सरासरी किंमत ४० रुपये प्रति किलो धरली तरी १२००० रुपये वाया गेले. या अतिरिक्त खाद्याच्या वापरामुळे पाण्यातील अमोनिया वाढतो. ते अमोनियाचे प्रमाण कमी करण्याकरिता जी विविध रसायने विकत घेऊन वापरावी लागतात ती वेगळीच! बरे, कोणतेही उपाययोजना न कराव्यात, तर माशांची मरतुक वाढू शकते.
माशांची उत्पादन घेताना तळ्यात नैसर्गिक खाद्य (प्लवंग) किती आहे, हे पाहून कांडी खाद्याचे प्रमाण ठरवावे. प्लवंग भरपूर प्रमाणात असल्यास कांडी खाद्य कमी दिले तरी चालते. चंद्रपूर, भंडारा, रायगड या भागातील तलावांची नैसर्गिक उत्पादकता जास्त आहे. येथील तलावांमध्ये प्लवंग भरपूर असते. येथे कांडी खाद्य कमी दिले तरी चालते. याशिवाय कांडी खाद्याच्या जोडीला ओले खाद्य दिल्यास शेतकऱ्यांचा खाद्यावरचा खर्च कमी होऊ शकतो. त्यांच्या नफ्याचे प्रमाण वाढू शकते.

२. चुकीच्या सल्ल्यामुळे होणारी फसवणूक : आपल्याकडे मत्स्यशेती तुलनेने नवी असल्याने थोड्याफार ज्ञानावर काहीजण मत्स्य सल्लागार वावरताना दिसतात. अशा लोकांच्या अर्धवट किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होते. सल्लागाराने योग्य आणि शास्त्रीय सल्ला दिला पाहिजे. आवश्यक गोष्टी आग्रहाने करायला लावले पाहिजे, अनावश्यक खर्च टाळण्यास मदत केली पाहिजे.

अ) खतावणी ः तळ्यात मत्स्यबीज सोडण्यापूर्वी खतावणी करणे
आवश्यकच आहे. त्यामुळे तलावात माशांचे नैसर्गिक खाद्य म्हणजे प्लवंग तयार होते. मग कांडी खाद्य कमी प्रमाणात लागते. म्हणजेच शेतकऱ्याचा खाद्यावरील खर्च कमी होऊ शकतो. मात्र, खतावणी करण्याची बाब मत्स्य सल्लागाराकडून सांगितली जात नाही. परिणामी मत्स्य शेतकऱ्याचा खाद्यावरील खर्च अनाठायी वाढतो. फायद्याचे प्रमाण घटते.

ब) अतिरिक्त मत्स्यबीज ः आवश्यकतेपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट बीज तळ्यात सोडण्याचा चुकीचा सल्ला शेतकऱ्याला दिला जातो. शेतकऱ्याचा खर्च अनाठायी वाढतो. शिवाय क्षमतेपेक्षा जास्त मासे सोडल्यामुळे माशांची वाढही होत नाही. म्हणजे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान होते.

क) अनावश्यक प्रतिजैविके, रसायने वापर ः बऱ्याच वेळी मासे निरोगी राहण्यासाठी व झपाट्याने वाढण्यासाठी प्रतिजैविके वापरण्याचा सल्ला दिला जातो. प्रति किलो ५०० ते ६०० रुपये असलेल्या प्रजिजैविकांचा वापर एक किलो प्रति एकर प्रमाणे दर १५ दिवसाने वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यांच्या मतानुसार ६ महिने प्रतिजैविके वापरली तरी ६००० ते ७२०० रुपये एवढा अनाठायी खर्च शेतकऱ्याचा होतो. वास्तविक तलावात चांगल्या प्रमाणात प्लवंग असेल, पाण्यात अमोनिया नसेल व माशांची वाढ योग्यपणे होत असेल तर प्रतिजैविके वापरण्याची काहीही गरज नाही. याचप्रमाणे, तळ्यात अमोनिया नाही, तळ्याच्या पाण्याचा सामू (पीएच) योग्य असतानाही डोलोमाईट व झिओमाईट वापरण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक त्याची काही गरज नसते.

३. जबाबदारी टाळणे ः बीज पुरवठादार बहुतेक वेळेला गरजेपेक्षा जास्त बीज तलावात सोडण्याचा आग्रह धरतात. अनेकवेळेला बीज दर्जेदार असेलच याची काहीच शाश्वती नसते. कांडी खाद्य विक्रेताही अनेक वेळा माशाची जात न पाहता बरेचदा तिलापीया व पंकज माशासाठी खाद्य आयएमसी माशांना देतो. माशांची वाढ नीट न झाल्यास बीज पुरवठादार खाद्य चांगले नसल्याचे सांगतो, तर खाद्य विक्रेता बीजच चांगले नसल्याचे सांगतो. कोणीच जबाबदारी घेत नसल्याने सगळा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी बसतो.

४. विक्रीवेळी होणारी फसवणूक : शेततळ्यातील मासे विक्रीच्या वेळी व्यापारी अडवणूक करून माशांना कमी दर देतात. शेतकऱ्याकडे मासे पकडण्याकरीता योग्य जाळी व मनुष्यबळ नसते. म्हणून त्याला व्यापारी म्हणेल त्या भावाने मासे विकण्याशिवाय पर्याय राहत नाही.

५. सामाजिक माध्यमांवरील माहितीपासून सावध रहा : हल्ली मत्स्यशेतीसंबंधात सामाजिक माध्यमावर किंवा यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ येत राहतात. फारच थोड्या व्हिडिओमध्ये शास्त्रीय व योग्य माहिती दिली जाते. मात्र, बहुतांश माहिती अतिरंजित असते, वास्तवाला धरुन नसते. उदा. ७० मी. लांब व १२ मी. रुंद तलावातून ६ लाख रुपयांचे माशांचे उत्पन्न मिळावे वगैरे. वास्तविक हे शक्य नाही. शेतकऱ्यांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. स्वतः विचार करून, गणित मांडून बघावे.

अशी टाळा फसवणूक
१. मत्स्यशेतीबाबत सखोल माहिती करून घ्या. या क्षेत्रातील खरोखरच तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. योग्य सल्लागार निवडण्याचा नीरक्षीरविवेक शेतकऱ्याला स्वतःलाच हवा.
२. मत्स्यशेतीबाबत शास्त्रीय पुस्तकांचे वाचन करा, मनन करा. त्यातील माहितीचा वापर मत्स्यशेतीदरम्यान करा.
३. मत्स्यशेतीबाबत केंद्र शासन, राज्य शासन आयोजित प्रशिक्षणाचा लाभ घ्या.
४. पैशाचा अति लोभ टाळा. मत्स्यशेतीतून एकाच वर्षात ५ ते १० लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा ठेवू नका. विशेषतः शेततळ्यातील मत्स्यशेतीला मर्यादा आहेत, हे लक्षात घ्या. शेततळ्याचा मुख्य उद्देश हा शेतीसाठी संरक्षित सिंचन हाच आहे. मत्स्यशेती हा दुय्यम उद्देश आहे.
५. मत्स्यशेती सुरू करण्यापूर्वीच अंदाजे खर्च आणि उत्पन्न यांचा ताळेबंद मांडा. यासाठी तज्ज्ञाची मदत घ्या. ताळेबंदानंतर आपल्याला फायदेशीर वाटले तरच पुढील पाऊल टाका.
६. आपल्या भागात कुठल्या माशाला जास्त मागणी व दर आहे, याचा अभ्यास करावा. त्याच माशाचे संवर्धन करावे.
८. गटशेती करणे : मत्स्यशेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करणे, हा फसवणूक टाळण्याचा उत्तम उपाय आहे. यामुळे बीज, खाद्य, प्रतिजैविके, रसायने, जाळे, इ. ची खरेदी एकत्र करता येईल. गटामध्ये एकच मासे पकडण्याचे जाळे विकत घेता येईल. विविध खर्च कमी होतील. मासे व्यापाऱ्यांशी एकत्रित बोलणी करून चांगला दर मिळविता येईल.

डॉ. विजय पां. जोशी, ९४२३२९१४३४
(माजी प्राचार्य, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी.)


इतर ताज्या घडामोडी
नाशिकच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश...नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात एक लाख १७ हजार टन...परभणी ः ‘‘जिल्ह्याला यंदाच्या (२०२१) खरीप...
मोहोळमध्ये खरेदी, विक्रीदारांना कोरोना...मोहोळ, जि. सोलापूर ः ‘‘मोहोळ येथील दुय्यम निबंधक...
अडीच लाख क्विंटल चंद्रपुरात धान खरेदीचंद्रपूर : शासनाने या वर्षी हमीभावा सोबतच सातशे...
‘पोकरा’चे सुमारे १४ कोटींचे अनुदान...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील वसमत तालुक्यात...
नाशिकमध्ये लोकसहभागातून 'कोरोनामुक्त...नाशिक : ‘‘कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला...
दर्जेदार शिवभोजन थाळीचे वितरण करा : ...मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्या...
भंडाऱ्यातील ६३ प्रकल्प गाठत आहेत तळभंडारा : सरासरी बरसलेला मॉन्सून, त्यानंतर अवकाळी...
खापणेवाडी-गुरववाडी बंधाऱ्यास गळतीबाजारभोगाव, जि. कोल्हापूर : जांभळी नदीवरील...
शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला प्रतिसाद...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत...बुलडाणा ः कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी...
पुणे विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच...
सातबारासह कागदपत्रे घेऊन तलाठी...पातुर्डा, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळवण्यासाठी...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
कृषी विभागात कोरोनामुळे आत्तापर्यंत २८...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या काही...
‘पंदेकृवि’ने दीक्षान्त सोहळा पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने...
कुर्जा खरेदी केंद्रावर धान मोजणीविना...भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक...
कापूस पिकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ः...अकोला ः देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख...
कृषी विभागातील पाच पुरस्कार्थींचे कौतुक पुणे : राज्याच्या कृषी खात्यात उल्लेखनीय कामे...
विमा उतरवा, अन्यथा बाजार समित्या बंद...पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व...