नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
यशोगाथा
मिश्र पीक पद्धतीतून सावरले बरडे कुटुंबीय
कर्जफेडीसाठी दहा एकर शेती विकावी लागली असतानाही स्वतः सावरून आपल्या कुटुंबालाही सावरणाऱ्या देऊळगाव (ता. पातूर, जि.अकोला) येथील बरडे कुटुंबीयांची ही कथा.
जेव्हा यश येते, तेव्हा सर्वजण आपल्या आनंदात सामील होण्यासाठी येतात. मात्र, अपयशाच्या वेळी माणूस एकाकी पडतो. एक हतबलतेची, हरलेपणाची आणि नामुष्की झाल्याची भावना घर करून राहते. मात्र, कर्जफेडीसाठी दहा एकर शेती विकावी लागली असतानाही स्वतः सावरून आपल्या कुटुंबालाही सावरणाऱ्या देऊळगाव (ता. पातूर, जि.अकोला) येथील बरडे कुटुंबीयांची ही कथा. मिश्रशेतीच्या प्रयोगातून ते नव्या दिशा धुंडाळत आहेत.
काही वर्षांपूर्वी विदर्भातील शेतकऱ्यांना डाळिंब पिकाने भुरळ घातली होती. दरवर्षी लागवड क्षेत्रात वाढ होत होती. पातूर तालुक्यातील देऊळगाव हे प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथील बरडे कुटुंबीयांची २९ एकर शेती आहे. त्यातील थोरले कै. आनंदराव यांची गणेश, गजेंद्र आणि अंकुश ही तीन मुले, घनश्याम आणि दामोदर हे कुटुंबाचे मुख्य सदस्य. एक विचारातून त्यांनी २०१० मध्ये १७ एकरात डाळिंब लागवडीचे धाडस केले. मात्र, नवीन पीक रुळेपर्यंत या पिकातून फायदा कमी आणि नुकसानच अधिक होत चालले. कर्जाचे प्रमाण वाढले. तरिही काही चांगले घडेल, या आशेने २०१८ पर्यंत हे पीक जोपासले. कर्जफेडीसाठी दहा एकर शेत विकावे लागले. हा प्रचंड मोठा आघात होता. या निराशेच्या मनःस्थितीतही त्यांनी हिंमत हारली नाही. केवळ एका पिकावर अवलंबून राहण्याऐवजी मिश्र पीक पद्धतीला प्राधान्य देत दामोदर यांनी शेतीत प्रयोग सुरु केले. आपल्या कुटुंबीयांसाठी चांगले आणण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड, हिंमत आणि सकारात्मकता सर्वांसाठी अनुकरणीय आहे.
कुटुंब सावरण्यासाठी प्रयत्न
डाळिंब पीक न साधल्याने ओढवलेला कर्जबाजारीपणा शेती विकून दूर केला. मेहनतीने कमावलेली शेती विकावी लागल्याची खंत आजही त्यांची मनात आहे. मात्र, हार न मानता पुन्हा त्यांनी शेतीत विविध प्रयोग सुरु केले. कुटुंबाने कापूस, सोयाबीन, तूर, या पारंपारिक पिकांसोबतच आले, हळद, मिरची, फुलकोबी, टरबूज, खरबूज या पिकांवर लक्ष केंद्रित केले. आता प्रत्येक पिकाची लागवड, व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासोबतच विक्रीची वेळ साधण्याचाही विचार करू लागले. एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी बहुपीक पद्धती जोपासल्याने नफ्याचे सूत्र जुळून येऊ लागले. यातून कुटुंबाची विस्कळित झालेली घडी पुन्हा बसविण्यात यश येऊ लागल्याचे दामोदर आवर्जून सांगतात.
जबाबदारी वाटून घेतली
सध्या गजेंद्र हे हॉटेल व्यवसायाकडे लक्ष देतात. तर गणेश हे घरी असलेल्या सहा म्हशी व दूध व्यवसाय करतात. पुतणे अंकूश यांच्यासह घनश्याम आणि दामोदर हे बंधू शेतीची संपूर्ण जबाबदारी पाहतात.
फुलकोबीने उत्साह वाढवला
बरडे दरवर्षी भाजीपालावर्गीय पिकांची लागवड करतात. यंदा त्यांनी पातूर येथील प्रयोगशील शेतकरी उमेश फुलारी यांच्या मार्गदर्शनात १६ जुलैला दोन एकरामध्ये फुलकोबीची लागवड केली. योग्य व्यवस्थापनातून एकरी ७० क्विंटल प्रमाणे दोन एकरातून १४० क्विंटल फुलकोबीचे उत्पादन काढले. व्यवस्थापनासाठी एक लाख १० हजार रुपये खर्च झाला. योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन केले. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय, जैविक घटकांचा अधिक वापर केला. पर्यायाने खर्च आवाक्यात राहिला. अकोला ही नजीकची बाजारपेठ असतानाही, त्याऐवजी वाशीम, मालेगाव, डोणगाव, मेहकर अशा छोट्या-मोठ्या बाजारात विक्री केल्याने अधिक दर मिळवला. बाजारात दर ६० ते १२० रुपयांदरम्यान मिळाले. सरासरी दर ७० रुपये प्रमाणे या पिकातून ९.८ लाख रुपये मिळाले.
मिरची लागवड फायदेशीर
दरवर्षी विविध प्रकारचा भाजीपाला लागवड बरडे करतात. यंदा त्यांनी दोन एकरात मल्चिंगवर मिरची लागवड केली. या मिरचीचा तोडा सुरू झाला. त्यांना पहिला तोडा १७ क्विंटल निघाला. त्याला सरासरी ५५ रुपये प्रति किलो या प्रमाणे दर मिळाला. लागवड, व्यवस्थापनासाठी ९५ हजार रुपये खर्च आला. मिरची पिकाचे गणितही चांगल्या पद्धतीने जुळून आल्याने धीर आला.
हळद, आले पिकात सातत्य
बरडे कुटुंबीय मागील अनेक आठ ते दहा वर्षांपासून हळद लागवड करतात. दरवर्षी त्यांना १५ ते २० क्विंटल प्रति एकर दरम्यान उत्पादन येते. गेल्या वर्षी त्यांना ५६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यंदा त्यांची दहा एकरात लागवड असून, उत्पादन खर्च एकरी ६० हजार रुपये झाला. गेल्या हंगामात बेणे बदलल्यामुळे अधिक उत्पादन मिळेल, अशी आशा आहे.
-मागील हंगामापासून त्यांनी आल्याचीही लागवड सुरू केली आहे. एकरी १.३० लाख रुपये खर्च आला. पहिल्याच वर्षात त्यांना एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळाले. आल्याला पाच हजार रुपये दर मिळाला. घरच्या बेण्याचा वापर करून यंदा तीन एकरात आल्याची लागवड केली आहे.
कलिंगड शेती
मागील हंगामात बरडे यांनी दोन एकरामध्ये कलिंगड लागवड केली होती. लागवडीसाठी १.२० लाख रुपये खर्चा झाला. मात्र, त्यातून उत्कृष्ट दर्जाचा ४० टन माल निघाला. काही प्रमाणात दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाचा माल मिळाला. कोरोना टाळेबंदीच्या काळात बांधावरून १० रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री केली. कलिंगडाला रासायनिक खतमात्रा टाळत त्यांनी सेंद्रिय व जैविक घटकच अधिक दिले. यामुळे फळाला चकाकी तर आलीच शिवाय त्यातील गोडवाही अधिक होता. यामुळे ग्राहकांनीही कलिंगडाला चांगला प्रतिसाद दिल्याचे दामोदर सांगतात. या हंगामात नुकतीच दोन एकर कलिंगड आणि दोन एकर खरबूज मल्चिंगवर लागवड केली आहे.
बरडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
- कोणत्याही एका पिकावर अवलंबून राहण्याऐवजी बहूपीक पद्धतीचा अवलंब.
- पारंपारिक पिकांसोबतच हळद, आल्याची शेती.
- मल्चिंगसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला.
- रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर कमी करून जैविक, सेंद्रिय घटकांवर भर दिला.
- संपूर्ण शेती बागायती असली तरी कमी पाण्यात अधिक उत्पादन काढण्याचा प्रयत्न.
- मोठ्याऐवजी छोट्या बाजारपेठांमध्ये शेतीमालाची विक्री ठरते फायदेशीर.
दामोदर बरडे, ८८४७७९५०४५
फोटो गॅलरी
- 1 of 92
- ››