बियाणे खरेदी करताना दक्षता हवीच..

बियाण्याच्या उपलब्धता आणि बोगस बियाणे या संकटाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता रब्बी हंगामामध्ये होऊ शकते. अशा वेळी अत्यंत दक्षतेने बियाण्याची खरेदी करणे गरजेचे आहे.
बियाणे खरेदी करताना दक्षता हवीच..
बियाणे खरेदी करताना दक्षता हवीच..

खरीप हंगाम पेरणीवेळी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याच्या उपलब्धता आणि बोगस बियाणे संकटाला सामोरे जावे लागले. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता रब्बी हंगामामध्ये होऊ शकते. अशा वेळी अत्यंत दक्षतेने बियाण्याची खरेदी करणे गरजेचे आहे. बि याणे अधिनियमांतर्गत विविध राज्यामध्ये बियाणे प्रमाणीकरणासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी बिजोत्पादन क्षेत्र (सीड प्लॉटस) घेतले जातात, त्यांना बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे अधिकारी वेळोवेळी भेट देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या घेतल्यानंतर या यंत्रणेमार्फत बियाणे प्रमाणीकरण केले जाते. बियाणे उत्पादक कंपनी ती अधिसूचित व अधिसूचित नसलेल्या वाणांचे बिजोत्पादन करू शकते. अधिसूचित नसलेल्या वाणाबाबतीत बियाण्याच्या पिशवीवर सत्यदर्शक लेबल लावून त्याची विक्री केली जाते. या बियाण्याच्या दर्जाबाबत स्वतः बियाणे उत्पादक खात्री देत असतो. बियाण्याबाबतीत बाजारात प्रमाणित बियाणे व सत्यतादर्शक बियाणे विक्रीस येते.  बियाणे खरेदी करण्यापूर्वी...

  • परवानाधारक विक्रेत्याकडूनच रब्बी हंगामातील बियाण्याची खरेदी करावी. 
  • प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.
  • बियाणे खरेदीची विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी. त्यावर शेतकऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता, पिकाचे नाव, प्रकार, जात, प्लॉट नंबर याबरोबरच उत्पादकाचे नाव, विक्रीची किंमत असावी. 
  • पावतीवर विक्रेत्याची व शेतकऱ्याची सही वा अंगठा असल्याशिवाय कच्ची पावती स्वीकारू नये.
  • बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवरील पिकाचे नाव व त्यात, पिकाची उगवण शक्ती, भौतिक व आनुवंशिक शुद्धता टक्केवारी, बियाणे चाचणीची तारीख, महिना व वर्ष, वजन, बीज प्रक्रियेसाठी वापरलेले रसायन, आदी गोष्टीचा उल्लेख तपासावा. सर्व माहिती करून घ्यावी.
  • बियाणे पिशवीवर असलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये. पॅकिंगवर किंमत छापणे कायद्याने बंधनकारक आहे. बियाणे पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा विक्रेता पिशवी वरील किंमतीपेक्षा जास्त किमतीची मागणी करीत असेल तर ही बाब जिल्हा वजनमापे निरीक्षकाच्या निदर्शनास आणून द्यावी. या विभागाचे अधिकारी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असतात.
  • बियाणे खरेदी पावतीवर छापील पावती क्रमांक असल्याची खात्री करावी. बियाणे पिशवी ही तिन्ही  बाजूनी शिवलेली असावी. वरील बाजूही प्रमाणपत्रासह शिवलेली असावी. 
  • पेरणीसाठी पिशवी फोडताना ती खालील बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीस असलेले लेबल व बीजप्रमाणीकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहील. सोबतच हे लेबल, टॅग जपून ठेवावे.
  • मुदतबाह्य  झालेले, तसेच पॅकिंग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करू नये.
  • बियाण्याविषयी काही तक्रार असेल तर तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा जि.प. कृषी विभागाकडे लेखी तक्रार द्यावी.
  • सत्यतादर्शक बियाण्यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेचे प्रमाणपत्र वगळता अन्य सर्व बाबी वरीलप्रमाणे असतात.
  • बियाण्यांचे प्रकार

  •   पैदासकार बियाणे (Breeder seed) - टॅगचा रंग पिवळा
  •   पायाभूत बियाणे (Foundation seed) - टॅगचा रंग पांढरा
  •   प्रमाणित बियाणे (Certified seed) - टॅगचा रंग निळा
  •   सत्यप्रत बियाणे (Truthful seed) - टॅगचा रंग हिरवा
  • त्यापैकी पायाभूत, प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या वापरासाठी आहेत.
  • कृषी निविष्ठा किंवा परवानाधारक विक्रेत्यांनी बियाणे विक्रीबाबत घ्यावयाची दक्षता :

  • बियाणे भावफलक दर्शनी भागात लावून त्यावर कंपनीनिहाय, जातीनिहाय बियाणे साठा व दर नमुद करावेत.
  • सत्यतादर्शक बियाण्याच्या पिशवीवर एकच लेबल असल्याची खात्री करावी. लेबलवर दिशाभूल करणारा कोणताही मजकूर नसावा.
  • बियाण्याची विक्री परवाना घेऊनच करावी. बियाणे खरेदीची पक्की पावती द्यावी. त्यावर वरील प्रमाणे सर्व मजकूर द्यावा. 
  • बियाणे, खरेदी विक्रीचा मासिक अहवाल गटविकास अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांना नियमित सादर करावा.
  • परवाना दिलेल्या ठिकाणीच बियाण्याची विक्री किंवा साठा करावा. बियाणे परवाना शेतकऱ्यास दिसेल अशा ठिकाणी लावावा.
  • शेतकऱ्यांची निविष्ठाबाबत फसवणूक होवू नये म्हणून अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ या कायद्यातंर्गत बी बियाणे अधिनियम १९६८, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ हे कायदे तयार करण्यात आले आहेत. 
  •   : हरिष फरकाडे, ८९२८३६३६३८ (सहायक प्राध्यापक -वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती. महाराष्ट्र)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com