उत्तम शेतीसोबत पूरक उद्योगातून वाढवले उत्पन्नाचे स्रोत

उत्तम शेतीसोबत पूरक उद्योगातून वाढवले उत्पन्नाचे स्रोत
उत्तम शेतीसोबत पूरक उद्योगातून वाढवले उत्पन्नाचे स्रोत

लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रगा गावातील रावसाहेब रोंगे यांच्यासह तीन मुलांच्या एकत्रित कुटुंबाने केवळ शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा मिनी डाळ मिल सुरू केली. त्यानुसार शेतीचे योग्य नियोजन करत डाळवर्गीय पिकांना प्राधान्य दिले. त्याला दुग्धव्यवसाय, कुक्‍कुटपालन, गांडूळ खतनिर्मिती अशी पूरक उद्योगांची जोड देत उत्पन्नाचे स्रोत वाढवले. रोंगे कुटुंबाने आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोंगे कुटुंबाने शाश्वत शेती व आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भोईसमुद्रगा (ता.जि. लातूर) येथील रावसाहेब व्यंकट रोंगे यांच्याकडे वडिलोपार्जित ९ एकर शेती आहे. कुटुंबात पत्नी शीलाताईंसह तीन विवाहित मुले चंद्रकांत, संदीपान व धनंजय यांच्यासोबत लहान- मोठे बारा सदस्य आहेत. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने एकेकाळी खर्च आणि उत्पन्नाची सांगड घालण्यामध्ये अडचणी येत. पूर्वी ऊस, त्यानंतर सोयाबीन हे प्रमुख पीक असलेल्या या कुटुंबाने आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांचा शोध सुरू केला. चंद्रकांत हे पदवीधर असल्याने त्यांचा संपर्क लातूर येथील मांजरा कृषी विज्ञान केंद्राशी आला. तेथील तज्ज्ञांकडून शेतीपूरक प्रक्रिया व्यवसायाची माहिती मिळाली. त्यातून चंद्रकांत रोंगे यांनी मिनी डाळ मिल उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये कृषी विज्ञान केंद्राकडून प्रशिक्षण घेतले. आवश्‍यक प्रक्रियेचे योग्य ते ज्ञान झाल्यानंतर एप्रिल २०१४ मध्ये त्यांची मिनी डाळ मिल प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. डाळ मिलला पूरक पिकांची शेती केवळ सोयाबीनवर भर देण्याऐवजी रोंगे कुटुंबीयांनी मग कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेतीपिकात बदल केले. सोयाबीन पिकाचे क्षेत्र ४ एकर इतकेच ठेवत उर्वरित क्षेत्रामध्ये खरिपात मूग, उडीद प्रत्येकी एक एकर, तूर दोन एकर, तर रब्बीत हरभरा ५ ते ६ एकर अशी पिके घेणे सुरू केले. परिणामी घरच्याच शेतीतून प्रक्रियेसाठी आवश्‍यक धान्य मिळू लागले. असे होते विविध डाळींचे उत्पादन रोंगे कुटुंबात मिनी डाळ मिलची जबाबदारी चंद्रकांत रोंगे स्वतः सांभाळतात. साधारणतः दहा क्‍विंटलपर्यंत मूग डाळ आजवर त्यांनी वर्षाला निर्माण केली आहे. आपल्या शेतातील उत्पादित तूर, उडीद, मूग, हरभरा यांची थेट बाजारात विक्री बंद केली आहे. उत्पादित झालेले धान्य थेट विकण्याऐवजी डाळी करूनच ते विकतात, त्यामुळे अधिक फायदा हाती पडतो. उदा. तूर विकल्यास प्रतिक्विंटल ५४०० रुपये मिळाले असते, त्याऐवजी प्रक्रियेनंतर डाळ विकल्यास त्याला ९००० रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. दरवर्षी उडीद, मूग प्रत्येकी ७ ते ८ क्विंटल उत्पादन होते, तर हरभऱ्याचे ३० क्विंटल उत्पादन होते. उत्पादित हरभरा विकला असता त्याला प्रतिक्विंटल ४५०० ते ५००० रु. असा दर मिळाला असता; पण डाळ करून विकल्याने ७००० रुपयांपर्यंत दर मिळतो. डाळ मिलमुळे उत्पन्नामध्ये अशीही भर पडली आहे. त्यांच्याकडे घरच्या उत्पादित मालापेक्षा जास्त डाळीची मागणी आल्यास त्यासाठी आवश्‍यक माल ते शेतकरी वा बाजारातून विकत घेतात. मागणीनुसार डाळीचे उत्पादन व विक्री असे साधे तंत्र ते अवलंबतात. जवळपास पाच खाणावळींना लागणाऱ्या डाळीचा पुरवठा ते करतात. याशिवाय परिसरातील सहा-सात गावांतील शेतकरीही त्यांच्याकडून आवश्‍यक डाळी तयार करून घेतात. डाळ तयार करण्याचा दर ७५० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत असतो. दुग्धव्यवसायाची दिली जोड पूरक उद्योगातून कुटुंबाला हातभार लागत असला तरी केवळ एकाच पूरक उद्योगावर अवलंबून राहणे योग्य नाही. हे ओळखून रोंगे बंधूंनी २०१५ मध्ये दोन म्हशी व एक संकरित गाय घेत दुग्धव्यवसायाला सुरुवात केली. सरासरी दररोज पंधरा लिटर दूध सुरू झाले. गाईचे दूध २५ रुपये आणि म्हशीचे ३५ रुपये याप्रमाणे गावातील दूध विक्रेत्याकडेच विक्री होते. वर्षाकाठी खर्च २० हजार रुपये वजा जाता किमान ६० ते ८० हजार रुपये उत्पन्न दुग्धव्यवसायातून मिळत आहे. परसातील कुक्‍कुटपालन कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातूनच रोंगे कुटुंबाने परसबागेतील कुक्‍कुटपालनाला सुरुवात केली. २० पक्ष्यांपासून सुरू केलेले कुक्‍कुटपालन आता ४० देशी पक्ष्यांपर्यंत पोचले. अंडी व मांसल कोंबड्यांच्या विक्रीतून त्यांना अर्थार्जन सुरू झाले. प्रतिमाह सुमारे ३०० अंडी प्रतिअंडे दहा रुपये याप्रमाणे विक्री होत असल्याचे चंद्रकांत रोंगे सांगतात. पेरणीद्वारे अर्थार्जन स्वतःच्या ९ एकर शेतीची पेरणी आटोपल्यानंतर आपल्या मालकीच्या दोन बैलांनी इतरांचीही पेरणी रोंगे कुटुंबीय करून देतात. एकरी तीन हजार रुपये दराने दरवर्षी अन्य शेतकऱ्यांचे साधारणतः २० एकरपर्यंत शेत ते पेरून देतात. या कामातूनही कुटुंबातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले असून, अर्थार्जनाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. तीन वर्षांपासून केवळ गांडूळ खताचा वापर रोंगे कुटुंबाने २०१४-१५ मध्येच गांडूळ खताचे युनिट कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणानंतर सुरू केले. त्यातून गांडूळ खताची उपलब्धता झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून हळूहळू गांडूळ खताचा वापर वाढवत नेला. आता त्यांनी शेतात रासायनिक खतांचा वापर थांबवला आहे. पेरणीवेळी एकरी ५० किलो गांडूळ खत पेरून देण्याचे तंत्र रोंगे कुटुंबीयांनी अवलंबले आहे. वर्षाकाठी रासायनिक खतांवरील सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च वाचल्याचे चंद्रकांत रोंगे सांगतात. मागणीनुसार अन्य शेतकऱ्यांनाही शिल्लक गांडूळ खताची १२०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे विक्री केली जाते, त्यातून वर्षाकाठी किमान दहा हजार रुपये मिळतात. सारे कुटुंब राबते शेतात आई- वडिलांपासून सारेच कुटुंबीय शेतीकामात असतात. गेल्या अनेक वर्षांपासून शेत, प्रक्रिया व पूरक उद्योगात मजूर लावण्याची वेळ रोंगे कुटुंबीयांवर आली नाही. परिणामी उत्पादन खर्च मर्यादित ठेवण्यामध्ये यश आल्याचे चंद्रकांत रोंगे सांगतात.

केव्हीकेअंतर्गत संपर्क गाव भोईसमुद्रगा येथील रोंगे कुटुंब म्हणजे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शच म्हणावे लागेल. प्रशिक्षण घेतल्यानंतर मिनी डाळ मिल सुरू केली. कुटुंबातील महिलांनाही स्वयंरोजगार निर्माण करून दिला. शेतीपिकात परिणामकारक बदल करत डाळीची थेट विक्री केल्याने एकूण उत्पन्नामध्ये वाढ झाली. रोंगे कुटुंबाने शाश्वत शेती व आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. - अंजली गुंजाळ (विषय विशेषज्ञ - गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, मांजरा)

  • असे आहेत उत्पन्नाचे स्रोत
  • मिनी डाळ मिलमधून वर्षाकाठी किमान तीन ते साडेतीन लाख.
  • शेतीपिकांतून वर्षाकाठी किमान तीन ते साडेतीन लाख.
  • कुक्‍कुटपालनातून वर्षाकाठी किमान ५० हजार.
  • दुग्धव्यवसायातून वर्षाकाठी किमान ५० ते ६० हजार.
  • प्रत्येकाकडे वेगळी जबाबदारी

  • चंद्रकांत - मिनी डाळ मिल
  • संदीपान - दुग्धव्यवसाय
  • धनंजय - शेतीची सर्व जबाबदारी
  • वडील - सर्वांना मार्गदर्शन
  • शेतीमध्ये काय?

  • पूर्वीच्या ऊस, सोयाबीन पिकाऐवजी आता सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा अशा डाळवर्गीय पिकांवर भर ठेवला आहे.
  • बाजरी, राजगिरा व तिळाचीही करतात पेरणी.
  • २० गुंठ्यांवर कुटुंबाला लागणाऱ्या भाजीपाल्याचे उत्पादन.
  • बांधावर शेवगा, डाळिंब, पपई, आवळा आदी झाडांची लागवड.
  • गांडूळ खत, शेतखतांचा वापर शेतीमध्ये वाढवला. रासायनिक खतांचा वापर थांबवल्याने खर्चात बचत साधली.
  • स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांसह किमान चार कुटुंबांना वर्षभर रोजगार.
  • संपर्क ः चंद्रकांत रोंगे, ८८८८६३४२४९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com