मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना

मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना

शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी. गटांमार्फत राज्यात यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हाव्यात यावर राज्यशासनाचा भर आहे. यासाठी पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या वतीने राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. पुणे येथील सिमॅसिस लर्निंग एलएलपी यांच्याद्वारे या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. गटाची नोंदणी होऊन कामकाज सुरू झाल्यानंतर गटशेतीत सभासदामधून व्यवस्थापन समिती स्थापन करणे गरजेचे आहे. लहान गट असेल तर व्यवस्थापन सुलभ असते. मात्र, मोठ्या गटासाठी व्यवस्थापन तुलनेने गुंतागुंतीचे होत जाते. अशा वेळी दहा-अकरा सदस्यांची व्यवस्थापन समिती सर्वानुमते नियुक्त करणे उपयुक्त ठरते. यातून गटशेतीच्या कामकाजाचे निर्णय वेगाने घेणे व अंमलबजावणी करणे सुलभ होते. 

  • व्यवस्थापन समितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव व पाच ते सहा सदस्य अशी रचना असावी. 
  • सचिव म्हणून गटसमन्वयकाने काम करावे. 
  • गरजेनुसार गटसमितीच्या बैठका घेऊन कामकाज व कार्यक्रम अंमलबजावणीविषयी निर्णय घ्यावा. 
  • गटामध्ये काही विशिष्ट कामे करण्यासाठी उपसमिती स्थापन करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी. उदा. निविष्ठा खरेदी उपसमिती, शेतमाल विक्री समिती इ. 
  • ज्ञानाची देवाणघेवाण  गटशेती करत असताना अनेक पैलूंचे ज्ञान सदस्यांना असणे आवश्यक आहे. विशेषतः नवीन तंत्रज्ञानाचा वापर, नवीन संशोधन व पीक व्यवस्थापन या संदर्भात मशागतीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान व माहिती असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने  एखाद्या विषयाचे ज्ञान असलेल्या सदस्याकडून गटांच्या बैठकीदरम्यान इतर सदस्यांबरोबर त्या ज्ञानाची देवाणघेवाण करावी. यातून  हळूहळू सर्व सदस्यांना नवीन ज्ञान, तंत्रज्ञान याविषयी माहिती होत जाते. त्याचा गटशेतीसाठी नियोजन व अंमलबजावणी करताना फायदा होतो.   समन्वयातून सामंजस्य  गटशेतीमध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठी असताना गटात समन्वय राखण्यासाठी सदस्यांमध्ये नियमित औपचारिक किंवा अनौपचारिक संवाद असावा. या संवादातून गटशेतीत येणारे प्रश्न सहजपणे सोडवता येतात. उदा. एखाद्या शेतात प्राथमिक अवस्थेत किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याविषयी इतर शेतकऱ्यांबरोबर त्वरित संवाद साधल्यास त्यावर वेळीच उपाययोजना केली जाऊ शकते. पुढील मोठे नुकसान टाळता येते. यासाठी दर आठवड्याला, पंधरवडा किंवा महिन्याला गटातील सभासदांनी एकमेकांशी संवाद होईल असे पाहावे. नियमित संवादामुळे आपापसातील सामंजस्य भाव वाढतो. त्याचा गटशेतीला फायदा होतो. प्रगतीला बाधक ते दूर ठेवणे. सर्व सदस्यांमध्ये सामोपचार व एकमेकांविषयी आदर असल्यास गटशेती फायद्याकडे वाटचाल करते. गटांमध्ये विरोधी कार्य करणारे काही सदस्य असतील व गटाच्या प्रगतीसाठी ते बाधक ठरत असतील तर अशा सदस्यांना बैठकीमध्ये बहुमताने गटाबाहेर करण्याचा निर्णय गटाच्या अंतिम हिताकरिता घ्यावा लागतो. त्यासाठी गटशेतीचे नेमके उद्दिष्ट व प्रमुख ध्येय हे गटातील सर्व सदस्यांची सामाजिक व आर्थिक प्रगती करणे हेच असले पाहिजे. 

    सांघिक व सकारात्मक दृष्टिकोन  गटशेतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन व्यवस्थापकीय निर्णय घ्यावे लागतात. वेगवेगळी पार्श्वभमी असलेले शेतकरी एकत्रित येऊन समूह शेतीला सुरवात करतात, तेव्हा वैयक्तिक मतभेदाला गौण स्थान असते. सर्व विचार हा गटशेतीच्या हितासाठी काम करणे हाच असावा. गटाचे संख्याबळ वाढवून गट मोठा करणे व स्वयंपूर्ण करणे हेच गटाचे ध्येय असावे. यामुळे गटाच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. गटशेतीद्वारे सर्वांचाच विकास होतो.   गटशेती यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणा व सांघिक भावना अत्यंत महत्त्वाची असते. सांघिक भावना म्हणजे गटशेती ही माझी आहे. गटशेतीच्या प्रगतीसाठी माझे योगदान महत्त्वाचे असून गटातील इतर शेतकरीसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत ही भावना होय. गटशेतीमध्ये सभासद संख्या वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज असते. मात्र, नवीन सदस्य गटामध्ये सामील करून घेताना त्याचा प्रामाणिकपणा व सांघिकभावना याची खात्री करून घ्यावी. गटातील प्रत्येक सदस्य गटाच्या कामकाजासाठी एकनिष्ठ राहण्याची गरज असते. वैयक्तिक स्वार्थाला इथे स्थान नाही.  प्रगतीसाठी प्रशिक्षण   गटशेती ही नव्या तंत्रज्ञानासोबत प्रशिक्षणाने परिपक्व होत जाते. गटामधील शेतकऱ्यांनी नवीन ज्ञान-तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. शेती करताना अनेक आव्हाने पेलावी लागतात. त्यात हवामान बदल, बदलते पाऊसमान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, काटेकोर शेतीकामे, निविष्ठांची शास्त्रीय माहिती, काढणीपश्चात तंत्रज्ञान व बाजार व्यवस्था इ. आव्हाने शेतीसमोर आहेत. गटशेती करत असताना वरील आव्हाने पेलण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत वरील विषयांतील अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान पोचले पाहिजे. यासाठी आवश्यक ती प्रशिक्षण देत त्यांची क्षमता वाढविणे गटशेतीच्या हिताचे आहे. आपल्या परिसरातील अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची यादी तयार करावी. तिथे प्रशिक्षणासाठी नियमितपणे सदस्यांना पाठवत राहावे. यातून गटशेती प्रगतिशील होते.  अन्य गटशेतींना भेटी  महाराष्ट्रात मागील काही वर्षांत गटशेतीचा प्रसार होत आहे. काही ठिकाणी अत्यंत यशस्वीरित्या गटशेती चालवली जाते. अशा यशस्वी गटशेतीला भेट द्यावी. त्यातून गटशेती करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय शोधण्यास मदत होते. गटशेतीतील शेतकऱ्यांनी सुरवातीच्या काळात व नंतरही नियमितपणे अशा गटशेतींना भेटी द्याव्यात. यामुळे सर्वांचे ज्ञानवर्धन होऊन प्रेरणा मिळते. तसेच सध्याच्या किंवा संभाव्य अडचणीसुद्धा कळतात. त्यासाठी गटाची तयारी करत राहता येते. उदा. जालना जिल्ह्यात `अॅग्रो इंडिया शेतकरी गट` मागील दहा वर्षांपासून गटशेतीचा यशस्वी प्रयोग करत आहे. त्यांना गटशेतीद्वारे दरवर्षी कापसाचे भरघोस उत्पादन मिळत आहे. या यशस्वी गटशेतीमध्ये चर्चेतून योग्य पीक व वाणांची निवड, जैविक बीजप्रक्रिया त्यात अॅझोटोबॅक्टर, रायझोबिअम, पीएसबीचा वापर करून  खताची बचत व शिफारसीनुसार रोपांची संख्या, बीबीएफ यंत्राचा वापर, मृद व जलसंधारणासाठी रूंद-वरंबा सरी पद्धतीचा अवलंब, सेंद्रिय आच्छादन, समतल मशागत व पेरणी, आंतरपीक पद्धती इ. तंत्रज्ञानाचा वापर या गटशेतीमध्ये यशस्वीपणे होत आहे.  गट शेतीमुळे काही पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या. त्यात शेततळे, सूक्ष्म सिंचन वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञान जसे पिकांची फेरपालट, अन्नद्रव्य व्यवस्थापन, माती परीक्षण, संजीवकाचा  वापर व बाह्य खताचा कमी वापर, छाटणी, वळण देणे हे तंत्रज्ञान वापरात आणणे शक्य झाले. अॅग्रो इंडिया गटशेतीमुळे वेगवेगळ्या पिकांमध्ये ४०% पाणी बचत, २५% खतांची बचत, २०-५० टक्के मजुरांची बचत, २०% मशागत खर्चात बचत व उत्पन्नात २५ ते ५० टक्के वाढ झाल्याचा दावा गटशेती समन्वयकांनी केला आहे.  गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबत उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले. सामाजिक व आर्थिक विकास होऊन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. महाराष्ट्रामध्ये  संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करणे अपरिहार्य आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com