एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपयुक्त मित्रकीटक

कपाशी पिकामध्ये येणाऱ्या विविध किडीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या परोपजीवी, भक्षक कीटकांची माहिती घेऊ.
एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपयुक्त मित्रकीटक
एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपयुक्त मित्रकीटक

१. ट्रायकोग्रामा : ट्रायकोग्रामाची माशी अतिसूक्ष्म असून, पतंगवर्गीय किडींच्या अंड्यामध्ये आपली अंडी घालते. अंडी अवस्थेतच या किडींचा नायनाट होतो. ट्रायकोग्रामाची सुमारे ४० हजार अंडी असलेले एक कार्ड (ट्रायकोकार्ड) एका एकरसाठी पुरेसे होते. या कार्डवर दिलेल्या खुणानुसार त्याच्या पट्ट्या तयार करून पानांच्या खाली लावाव्यात. कपाशीच्या शेतात बोंडअळ्याची अंडी दिसू लागल्यावर या पट्ट्या लावल्यास त्यातून ७ ते ९ दिवसात ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात. ते बोंडअळ्यांच्या अंड्याचा शोध घेऊन त्यात आपली अंडी घालतो. त्यातून बाहेर येणारी अळी त्या अंड्यावर जगते. परिणामी अंडी निकामी होते. २. क्रायसोपा : क्रायसोपाची अळी मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच बोंडअळ्यांची अंडी व त्याच्या लहान अळया यांचे भक्षण करते. क्रायसोपाचा पतंग पोपटी, हिरव्या व निळसर झाक असलेला असतो. मादी पतंग कपाशीच्या पानावर किंवा देठावर एकेकटी अंडी घालते. अंडे हिरव्या रंगाचे असून पांढऱ्या तंतूच्या टोकावर राहते. या अंड्यातून ४८ तासांत अळी बाहेर पडते. ती भक्ष्याच्या शोधात फिरते. अळी अवस्था १५ ते २७ दिवसाची असते. हेक्टरी १० हजार या प्रमाणात क्रायसोपाची अंडी कपाशीचे शेतात एकसारख्या प्रमाणात, पीक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यानंतर ३० दिवसाच्या अंतराने दोन वेळा सोडावीत. ३. लेडीबर्ड बिटल : लेडीबर्ड बिटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडींवर जगतात. लेडीबर्ड बिटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून, समुहामध्ये पण उभी घातलेली असतात. याची अळी ६ ते ७ मि.मी. लांब असून, रंगाने करडी व त्यावर पांढुरके ठिपके असतात. प्रौढ तुरीच्या दाण्यासारखे, पण खालून चपटे व वरुन फुगीर असतात. प्रौढ रंगाने पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात. काही प्रजातीमध्ये ते नसतात. अळी प्रती दिवशी २५ मावा, तर प्रौढ भुंगा ५६ मावा खाऊ शकतो. पिकावर मावा किडीसोबत लेडीबर्ड बिटल जास्त आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. ४. सिरफीड माशी : ही मावा किडींचा महत्वाची भक्षक आहे. सिरफीड माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडचा भाग टोकदार असतो. अळीला पाय नसतात. एक अळी दिवसभरात साधारणपणे १०० मावा खाऊ शकते. या कीटकाची माशी घरात आढळणाऱ्या माशी सारखी असून तिच्या पाठीवर लाल पिवळे व काळे पट्टे असतात. माशीचे डोके लालसर रंगाचे असते. ५. ढेकूण : अ) पेंट्याटोमिड ढेकूण ः हे ढालीच्या आकाराचे, काळपट तपकिरी रंगाचे असून, कापूस पिकावर सर्वत्र पाहायला मिळतात. हे ढेकूण आपली सोंड अमेरिकन बोंडअळी, उंट अळी व अन्य अळ्यांच्या शरीरात खुपसून शरीरातील द्रव शोषतात. परिणामी अळी मरते. ब) ओरीअस ढेकूण ः हे छोटे काळपट रंगाचे असून त्यांना सोंड असते. हे ढेकूण फुले तसेच पानांच्या बेचक्यात लपून बसतात. पिल्ले चकचकीत पिवळसर रंगाची असतात. प्रौढ व पिल्ले मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी किंडीची अंडी, तसेच लहान अळ्या यामध्ये आपली सोंड खुपसून आतील द्रव शोषण करतात, त्यामुळे किडी मरतात. ६. कातीन : कातीन हा कोळी वर्गातील असून, त्याला आठ पाय असतात. कपाशीच्या पिकामध्ये जाळे करून राहणाऱ्या व जाळे न करणाऱ्या शिकारी कातीन या दोन्ही प्रकारच्या कातीन आढळतात. या दोन्ही प्रकारच्या कातीन आपापल्या आकारमानाप्रमाणे विविध किडींना खातात. त्यामुळे कातीनही शेतकऱ्यांचा मित्र मानली जाते. डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ - किटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com