केळीच्या जैवविविधतेत तमिळनाडूची श्रीमंती

केळीच्या जैवविविधतेत तमिळनाडूची श्रीमंती
केळीच्या जैवविविधतेत तमिळनाडूची श्रीमंती

ऑगस्ट महिन्यात तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथील एका कृषी प्रदर्शनास भेट देण्याचा योग आला. या प्रदर्शनामध्ये तामिळनाडू राज्यात पिकवल्या जाणाऱ्या केळीच्या विविध जाती पाहण्यात आल्या. तिथे जपलेली केळीची जैविक विविधता अनुभवता आली. अगदी बाजारपेठेमध्येही हिरव्या, पिवळ्या, जांभळट, लाल रंगाच्या व विविध आकाराच्या केळीच्या अनेक जाती ट्रक भरभरून विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. या मार्केटमध्ये दररोज ५०-६० ट्रक केळी विक्रीला येत असतात. तमिळनाडू राज्यामध्ये केळीच्या सुमारे १८-२० जातींची लागवड केली जाते. या राज्यामध्ये केळीच्या विविध जातीखाली मोठे क्षेत्र आहे. मात्र, देशातील केळीतील सर्वात जास्त विविधता केरळ राज्यात दिसून येते. महाराष्ट्रामध्ये टिश्यूकल्चर निर्मित ग्रॅन्ड नैन ही जात आल्यापासून राज्यातील केळीमधील जैवविविधता कमी होत गेली आहे. दक्षिण भारतात केळीला धार्मिक महत्त्व असून, लाल वेलची, कर्पुरावल्ली, रस्थाली, नेय पूवन सारख्या केळींची निर्यात आखाती देशात अनेक वर्षांपासून केली जाते. तमिळनाडू राज्य केळी उत्पादनात देशात प्रथम असून, दक्षिण भारतात देशाच्या एकूण केळी उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन होते. केवळ उत्पादनच नव्हे, तर जातींच्या बाबतीतही मोठी विविधता तिथे आहे. तमिळनाडूमध्ये घेतला जाणाऱ्या केळी – तमिळनाडूमध्ये सुमारे ९० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केळी पीक असून, इरोड, तुतीकोरीन, कोईंबतूर, त्रिची व तिरुचिन्नापल्ली या जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. लाल केळी ः आकर्षक लाल जांभळट रंग, खाताना आनंद देणारी, जाडजूड आकाराचे फळ, चवीस गोड व विशिष्ट गंध, नारींगी पिवळसर गर, औषधी गुणधर्म ही या केळीची वैशिष्ट्ये. या केळीस येथे सर्वाधिक भाव मिळतो. २०० ते ३०० ग्रँम वजनाच्या केळीस येथे रु. १० ते १२ आकारले जातात. केळीचा आकार थोडा वक्राकार असतो. या केळीचा घड २० ते २५ किली वजनाचा असून, त्यात १०० पेक्षा जास्त फळे असतात. या केळीत कमी कॅलरीज व जास्त फायबर असतात. घडाचा दांडा, पानाचे देठ व झाडाचा बुंधापण लालसर रंगाचा असतो. पीक येण्यासाठी १८ महिने लागतात. नेंद्रन ः या जातीचे क्षेत्र केरळामध्ये अधिक असून, अलीकडे तमिळनाडूमध्येही वाढत आहे. दक्षिण भारतात या केळीपासून चिप्स बनवले जातात. तसेच केळी पिकवूनही खाल्ली जाते. ती चवीला मध्यम गोडीची असते. या केळीत स्टार्चचे प्रमाण जास्त असून, पिठाळ लागते. फळावर ठळक दिसणाऱ्या रेषा, साल सोलायला अवघड, गर घट्ट, टिकवणक्षमता चांगली असते. मात्र, या केळीचा खोडवा घेता येत नाही. ११ ते १२ महिन्यांचे पीक, फळ पिकल्यावर फिकट पिवळा रंग, घडाचे वजन १२-१५ किलो ही या केळीची वैशिष्ट्ये होत. पुवन ः दक्षिण भारतातील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची प्रमुख जात असून, तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त लागवड होते. एकदा लागवडीनंतर अनेक वर्षे आणि वर्षभर फळे देणारी जात आहे. विशिष्ट हवामानात व हलक्या जमिनीवर तिची लागवड होते. पानांसाठीही तिचे उत्पादन घेतले जाते. फळास विशिष्ट अशी खारवट गोड चव, साल पातळ, गर मऊ, रसाळ व पिवळ्या रंगाचा, फळास आकर्षक सोनेरी पिवळा रंग, एका घडाचे वजन २५ किलो असून, त्यामध्ये २०० पेक्षा जास्त केळी असतात. १२ ते १४ महिन्यांचे पीक हे या जातीची वैशिष्ट्ये आहेत. विरुपाक्षी किंवा डोंगरी केळी ः या जातीची लागवड तमिळनाडूतील दिडींगुल जिल्ह्यातील पलानी पर्वतांमध्ये केली जाते. पारंपरिक वारसा लाभलेली, भौगोलीक चिन्हांकन घेतलेली केळीची जात आहे. एकदा लागवड केली की ती सहा वर्षे उत्पादन देते. एकल लागवडीबरोबरच सुरवातीच्या काळात कॉफीला सावली देण्यासाठीपण कॉफीमध्ये ती लावली जाते. सपाट प्रदेशात तिची लागवड यशस्वी होत नाही. या केळीची लागवड कोरडवाहू पद्धतीने केली जाते. ही केळी जास्त उंचीची (४ - ४.५ मीटर), कमी उत्पादन देणारी, घडाचा आकार लहान (८-१२ किलो), एका घडात ८०-९० फळे, फळ लहान, फळावर रेषा, साल जाड, गर पांढरा किंवा फिक्कट पिवळा, १५-१८ महिन्यांत फळ देणारी ही या केळीची वैशिष्ट्ये आहेत. उंच ठिकाणी लागवड होत असल्याने गरास विशिष्ट असा गंध मिळतो. या केळीची चव व टिकावूपणामुळे प्रसिद्ध आहे. पलानी हिल्समध्ये असलेल्या प्रसिद्ध कार्तिकेयन (मुरूगन) मंदिरात देवाला प्रसाद म्हणून पंचामृतात या केळीचाच वापर होतो. मोन्थन ः प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीसाठी ही औषधी केळी वापरली जातात. उंच, काटक, दुष्काळास काही प्रमाणात प्रतिकारक असलेल्या या केळीचे नारळामध्ये आंतरपीक घेतले जाते. त्रिची व तंजापूरमध्ये या केळीच्या पानाचेही उत्पादन घेतले जाते. घडाचा आकार मध्यम (१८-२० किलो) व त्यात ६० फळे, फळे टणक, हिरवट पिवळे, फळावर ठळक दिसणाऱ्या रेषा, फळ थोडेसे वक्राकार, साल जाड, गर क्रीम रंगाचा, गराची चव पिठाळ व १२-१४ महिन्यांत काढणी ही या केळीचे वैशिष्ट्ये आहेत. कर्पुरावल्ली ः भारतीय केळीमधील ही सर्वात जास्त गोड केळी आहे. मध्य व दक्षिण तमिळनाडूच्या मध्यम सुपीक जमिनीत लागवड केली जाते. झाडाची उंची जास्त व पानाचा आकार मोठा, त्यामुळे पानाचेही उत्पादन घेतले जाते. एक घडात १००-१२० फळे, फळे मध्यम आकाराची. १२-१४ महिन्यांत पीक उत्पादन मिळते. अल्कधर्मीय मातीमध्येही तिची लागवड होते. नेय पूवम ः फळ सोनेरी पिवळे व टिकवणक्षमता अधिक, साल जाड, फळे लहान ते मध्यम आकाराची, गराला कमी गोडी, पण चविष्ट, गर रवाळ, घट्ट, किंचित सुगंधित असतो. १२ महिन्यांत ती काढणीस येते. केरळात ती परस बागेत लावली जाते. रस्थाली ः व्यापारी पद्धतीने तमिळनाडूतील इरोड व त्रिचीनापल्ली जिल्ह्यात या केळीची लागवड होते. झाडाची उंची ४-४.५ मीटर, घड १५-२० किलो (६०-८० फळे), फळाचा आकार मध्यम, चव गोड, फळाची अद्वितीय प्रत, फळांचा गर अत्यंत चविष्ट व विशिष्ट गंधयुक्त, परंतु पिकाचा कालावधी जास्त (१४-१५ महिने). पंचानदन ः हलक्या जमिनीवरील जात, नारळ व सुपारीमध्ये प्रामुख्याने आंतरपीक म्हणून किंवा उष्ण प्रदेशात थंडावा निर्माण करण्यासाठीही तिची लागवड करतात. नेंद्रन जातीच्या लागवडीतील पडलेले खाडे भरून काढण्यासाठी या जातीचा उपयोग केला जातो. ती नेंद्रनबरोबरच काढणीस तयार होते. चक्करा केळी ः तमिळनाडूतील तंजावुर व कुलीतलाई जिल्ह्यात प्रामुख्याने लागवड होते. फळ मध्यम आकाराचे, फळावर ठळक रेषा, घडाचे वजन १० किलो, गर पिवळा गर्द, रसदार व चविष्ट, गर खूप गोड पण टिकाव क्षमता कमी. येलक्की केळी ः फळाच्या छोट्या आकारामुळे या केळीला इलायची केळीपण म्हटले जाते. सामान्य केळीपेक्षा ही जास्त गोड व महाग असते. या केळीची तमिळनाडू व कर्नाटकामध्ये व्यापारी पद्धतीने लागवड होते. फळ निमुळते, फळास चांगला गंध, फळाचा रंग सोनेरी पिवळा असतो. सिरुमल्लाई केळी ः या केळीची लागवड तमिळनाडूतील दिडींगुल जिल्ह्याच्या तिरुमलाई टेकड्यावरच घेतली जाते. भौगोलिक चिन्हांकन मिळालेली ही केळी आहे. विरुपाक्षी केळीप्रमाणेच या केळीसपण हवामान लागते. मात्र, तिचा गर विरुपाक्षीएवढा सुका नसतो. चव गोड व गंधप्रचूर असतो. डोंगराळ भागातील केळी (हिल बनाना) म्हणून ओळख आहे. जागतिकीकरणाचा धोका ः जागतिक पातळीवर कॅव्हेन्डीश या उपगटातील केळीची व्यापारी पद्धतीने सर्वात जास्त लागवड होते. डॉर्फ कॅव्हेनिश व विशेषतः ग्रॅन्ड नैन या जातीखाली क्षेत्र वाढत चालले असून, पारंपरिक वाण मागे पडत चालले आहे. हीच स्थितीही महाराष्ट्रामध्ये आहे. कृषिशास्त्रानुसार कोणत्याही एकाच जातीखाली सतत मोठे क्षेत्र राहिल्यास कीड, रोगांचा प्रसार वाढत जातो. रोगकिडीची तीव्रता वाढल्यास संपूर्ण क्षेत्रातील पीक धोक्यात येऊ शकते. पूर्वी जागतिक पातळीवर ग्रॉस मायकेल या केळी जातीचे अधिराज्य होते. १९५० च्या दशकात फ्युजारियम विल्ट (पनामा विल्ट) या रोगामुळे या केळी खालील क्षेत्र घटले. या रोगास प्रतिकारक अशा कॅव्हेन्डीश जातीचा शोध लागला. तिचेही क्षेत्र जगभर वाढले तरी १९९० च्या दशकात परत फ्युजारीयम विल्टमुळे तिचे क्षेत्र घटले. आता जगभर ग्रॅन्ड नैन जातीचा बोलबाला आहे. मध्यम उंचीमुळे वादळाला तोंड देण्याची क्षमता चांगली व फळ तोडणी सोपी, अधिक उत्पादन (सरासरी २५ किलोचा घड), आकर्षक पिवळा रंग, लांबलचक फळ ही या जातीचे वैशिष्ट्ये आहे. दक्षिण भारतातील सपाट प्रदेशात या जातीचे क्षेत्र वाढत असून, पारंपरिक केळीच्या जातीचे क्षेत्र कमी होत आहे. तमिळनाडूमध्येही ग्रॅण्ड नैन जातीखाली सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. कोयम्बेदू बाजारातील केळीचे ऑगस्टमधील सरासरी घाऊक दर (रु. प्रति क्विंटल) कॅव्हेन्डिश - १२५० नेंद्रन - ३८०० पूवन - ३७५० लालकेळी - ३२०० मोन्थन - २००० चेन्नई बाजारातील केळीचे ऑगस्टमधील किरकोळ दर

हिल बनाना २ केळी रु.१५
इलायची १ केळी रु.१०
कर्पुरावल्ली २ केळी रु.१५
कॅव्हेनिश १ केळी रु १२
नेंद्रन १ केळी रु.२०
पुवन २ केळी रु.१०

तमिळनाडूतील केळीच्या विवध जाती खालील क्षेत्र – कॅव्हन्डीश - ४४% पूवन - १९% नेंद्रन - ७% सावली खाली येणाऱ्या जाती - ७% अपल बनाना - ६% रस्थाली - ४% इतर - १३% डॉ. टी. एस. मोटे, ९४२२७५१६०० (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com