नारळावरील काळ्या डोक्याच्या अळींचे जैविक पद्धतीने केले निर्मूलन 

नारळावरील काळ्या डोक्याच्या अळींचे जैविक पद्धतीने केले निर्मूलन 
नारळावरील काळ्या डोक्याच्या अळींचे जैविक पद्धतीने केले निर्मूलन 

मत्स्य तलावाच्या परिसरामध्ये असलेल्या नारळांच्या झाडांवर पाने खाणाऱ्या काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात दिसून आला होता. या ठिकाणी रासायनिक नियंत्रण वापरणे धोक्याच होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी अंबाजीपेटा येथील फळबाग संशोधन केंद्राच्या मदतीने मित्रकीटकांचे प्रसारण केले. केवळ सहा महिन्यांमध्ये या किडीचे संपूर्ण निर्मूलन झाल्याचे स्पष्ट झाले. अन्य उपायांच्या तुलनेमध्ये कीडनियंत्रणाची जैविक पद्धती ही पर्यावरणपूरक आणि स्वस्त ठरली.  आंध्र प्रदेशातील किनाऱ्यावरील भागामध्ये नारळावर काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. विशेषतः पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये ही पाने खाणारी अळी (शास्त्रीय नाव ः Opisina arenosella) नारळावरील महत्त्वाची कीड समजली जाते. ही अळी पानाखालील हिरवा भाग खाऊन चोथा बाहेर टाकते. त्या ठिकाणी केवळ चोथ्याची नक्षी झालेली दिसून येते. पानांवरील हिरवेपणा नष्ट झाल्यामुळे अन्ननिर्मितीची प्रक्रिया थंडावते आणि झाड अशक्त आणि आजारी दिसू लागते. अळीच्या तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण कमी राहते, नारळांची अपक्व अवस्थेतच गळ होते, झाडाची वाढ खुंटते.  सन २०१८-१९ या काळात ऑक्टोबर ते एप्रिलमध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये मत्स्यतलावांच्या आसपास असलेल्या नारळ झाडांवर ३८.६४ ते ५९.६२ टक्के इतक्या प्रमाणात काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता ही मध्यम स्वरूपाची म्हणजेच दोन ते तीन डहाळ्या वाळणे इतपत होती. हे नुकसान कोना सिमा प्रांतातील उप्पलगुप्थम मंडल येथील एस. एन्नम गावामध्ये अंदाजे १०० एकर इतक्या क्षेत्रात पसरलेले होते.  ही बहुंताश झाडे मत्स्यतलावांच्या आसपास असल्यामुळे रासायनिक कीडनाशकांची फवारणी करणे धोक्याचे वाटत होते. या गावातील शेतकऱ्यांनी अंबाजीपेटा येथील फळबाग संशोधन केंद्राशी संपर्क केला. हे केंद्र आंध्र प्रदेशच्या फळबाग विभाग आणि डॉ. वाय. एस. आर. फळबागशास्त्र विद्यापीठ अंतर्गत चालवले जाते. या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कीड, तिच्या अवस्था आणि नुकसानीचे स्वरूप आणि जैविक कीडनियंत्रणासाठी परोपजीवी सोडण्याची पद्धत याविषयी प्रशिक्षणे घेण्यात आली.  परोपजीवीचे प्रसारण ः  एस. एन्नम या गावातील शेतकऱ्यांना गोनिओझस नेफॅण्टीडीस ८४ हजार आणि ब्रॅकॉन हिबेटर १.३२ लाख इतक्या संख्येमध्ये पुरवण्यात आले. साधारणपणे मध्यम प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये किडीच्या अवस्थेनुसार ८ ते १० प्रसारणे करण्यात आली. त्यात प्रतिमाड २० जी. नेफॅण्टीडीस सोडले. जिथे एक टक्का प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी ३० ब्रॅकॉन हिबेटर प्रतिमाड या प्रमाणात सोडण्यात आले.  परोपजीवी स्थिर होणे आणि किडीचे नियंत्रण ः 

  • एस. एन्नम येथील एक शेतकरी वंटेड्डू वेंकटेश्वरा राव यांच्याकडील सुमारे ४० एकर क्षेत्र प्रादुर्भावित होते. तिथे परोपजीवीच्या अवस्थांनुसार एकूण चार वेळा याप्रमाणे एकूण बी. हिबेटर २८,८०० आणि जी. नेफॅण्टीडीस १९,२०० इतक्या संख्येने प्रसारित करण्यात आले. या प्रक्रियेमुळे किडींची संख्या वेगाने कमी होत गेली. 
  • प्रसारणाच्या तीन महिन्यांनंतर काळ्या डोक्याच्या अळ्यांची संख्या ३९.१३ ते ७८.३८ टक्क्यांपर्यंत कमी झाली, तर सहा महिन्यांनंतर ९८.५७ ते १०० टक्क्यांपर्यंत किडीचे नियंत्रण मिळाले. 
  • प्रसारणाच्या तीन महिन्यांनंतर कोषांची संख्या ३३.३३ ते ८७.५० टक्के कमी झाली. पुढे सहा महिन्यांनंतर कोषांची संख्या १०० टक्के नियंत्रणात आली. 
  • परोपजीवींच्या प्रसारणानंतर सहा महिन्यांनी किडींचे दृश्य स्वरूपामध्ये नियंत्रण झाल्याचे स्पष्ट झाले. गोनिओझस नेफॅण्टीडीस आणि ब्रॅकॉन हिबेटरचे कोष अनेक ठिकाणी दिसत असले तरी पानांवर नव्याने होणारा किडींचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबला. 
  • रसायनांची कोणतीही फवारणी टाळल्यामुळे विविध किडींचे नैसर्गिक शत्रू कार्डीअस्टेथस एक्झिग्युएस हे अंड्यावरील परोपजीवीही शेतामध्ये आढळू लागले. 
  • परिणामी एस. एन्नम गावातील काळ्या डोक्याच्या अळीचे निर्मूलन होण्यास मदत झाली. 
  • जैविक नियंत्रणाची पद्धत ः 

  • किडीच्या जैविक नियंत्रण पद्धतीने किडीचे नियंत्रण करणे हे पर्यावरणपूरक आहे. रासायनिक पद्धती किंवा यांत्रिक पद्धतीच्या तुलनेमध्ये हे स्वस्त पडते. 
  • मित्रकीटकांच्या प्रसारणानंतर कोणत्याही रसायनांच्या वापराशिवाय दीर्घकाळापर्यंत किडीपासून नियंत्रण मिळवणे शक्य झाले. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com