कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा वापर

एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे अंग आहे. ‘जिवो जीवश्‍च जीवनम’ हे निसर्गाचे अटळ चक्र आहे. या नैसर्गिक तंत्राचा वापर करून विविध किडींचे व्यवस्थापन करणे शक्य आहे.
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा वापर
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा वापर

एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे अंग आहे. ‘जिवो जीवश्‍च जीवनम’ हे निसर्गाचे अटळ चक्र आहे. या नैसर्गिक तंत्राचा वापर करून विविध किडींचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. कोणत्याही पिकांवरील एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा सर्वात शेवटी आणि किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच करायचा असतो. मात्र, भारतात १९६६ नंतर संकरित बियाणे, रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशके यांची उपलब्धता वाढली. ही रसायने शेतकऱ्यांपर्यंत सहजतेने पोचू लागली. परिणामी अन्य कोणत्याही उपाययोजनांऐवजी कीटकनाशकांचा वापर करण्याला शेतकरी प्राधान्य देताना दिसतात. हे अत्यंत चुकीचे आहे. सातत्याने रासायनिक कीटकनाशक वापरामुळे जाणवणारे दुष्परिणाम ः

  • किडीची प्रतिकारक्षमता वाढली. पर्यायाने कीड नियंत्रणावर जास्त खर्च होऊनही नियंत्रण मिळण्यामध्ये अडचणी येत आहे. खर्च वाढल्याने शेतीतील नफा कमी झाला.
  • परागीभवन करणारे मधमाशीसारखे उपयुक्त कीटक उदा. किडींची संख्या कमी करणारे परोपजीवी व परभक्षी मित्रकीटक यांची संख्या कमी झाले.
  • कीडनाशकाच्या विषबाधांमुळे मानवहानीच्या घटना घडत आहेत.
  • त्याच प्रमाणे फळे व भाजीपाला यातील विषारी अवशेष आहारात येत चालल्याने विविध आजारांचे प्रमाण वाढले. याला पर्यायी पद्धत जैविक कीडनियंत्रण आहे.
  • जैविक कीड व्यवस्थापन – जैविक कीड व्यवस्थापनामध्ये पिकातील किडीवर उपजीविका करणारे, किडीचे नैसर्गिक शत्रू (परोपजीवी व परभक्षी कीटक), रोगजंतू (जिवाणू, विषाणू, बुरशी) व सूत्रकृमी अशा घटकांचा कीड नियंत्रणासाठी वापर केला जातो. हे घटक नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक असल्याने सेंद्रिय शेतीमध्येही वापरता येतात. पर्यावरणाचा समतोल राखला जातो. १. महत्त्वाचे मित्रकीटक अ) परोपजीवी किटक : हे नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. परोपजीवी किटकांचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी एकच यजमान पुरेसा असतो उदा. पतंगवर्गीय किडींच्या अंड्यावर उपजीविका करून त्यांना मारणारा ट्रायकोग्रामा हा मित्रकीटक.

    किडी प्रजाती अंडी प्रति हेक्टर सोडण्याचे प्रमाण
    भेंडी, टोमॅटो व मिरची फळ पोखरणारी अळी कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग ट्रायकोग्रामा चिलोनिस १,५०,००० ०६ वेळा
    मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी, टोमॅटो फळ पोखरणारी अळी ट्रायकोग्रामा प्रिटिऑसम १,२५,००० ०३
    उसावरील खोडकिडा, ज्वारीवरील खोडकिडा  ट्रायकोग्रामा चिलोनिस ५०,००० ०६

    ब) परभक्षी कीटक : हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व संयुक्त असतात. ते त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त किडींना भक्ष्य बनवतात. उदा. रस शोषक किडींसाठी – लेडी बर्ड बीटल व क्रायसोपा

    किडी प्रजाती (प्रमाण प्रति हेक्टर)
    मावा, फुलकिडे व लहान अळ्या सिरफीड माशी २५०० अळ्या
    मावा, तुडतुडे, पांढरी माशी व पतंगवर्गीय किडींची अंडी व अळी क्रायसोपर्ला ५००० अंडी
    उसावरील लोकरी मावा कोनोबाथ्रा अॅफिडीव्होरा १००० अळ्या
    उसावरील लोकरी मावा मायक्रोमस इगोरोटास २५०० अळ्या

    २. जैविक कीटकनाशके : निसर्गात काही बुरशी व जिवाणू हे किडींना रोगग्रस्त करतात. यामुळे किडी मरतात. या बुरशी किंवा जिवाणूंच्या साह्याने किडींचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करता येते.

    किडी जिवाणूजन्य कीटकनाशक (प्रमाण प्रति लिटर पाणी)
    भेंडी, टोमॅटो व मिरची फळ पोखरणारी अळी बॅसिलस थूरिंजीएन्सिस २ ग्रॅम
    किडी बुरशीजन्य  कीटकनाशक  ( प्रमाण / लिटर पाणी)
    हरभऱ्यावरील घाटे अळी, भेंडी फळ पोखरणारी अळी, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग बिव्हेरीया बॅसियाना (१ डब्लू.पी ) ६ ग्रॅम
    कांद्यावरील फूलकिडे  व्हर्टीसिलिअम लेकॅनी ( ३ ए.एस.) ४ ग्रॅम
    रब्बी ज्वारी, मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी मेटारायझिम अॅनीसोप्ली ५ ग्रॅम किंवा न्युमोरीया रिले ५ ग्रॅम

    ३. वनस्पतिजन्य कीटकनाशके ः विविध वनस्पतींचा वापर किडींच्या व्यवस्थापनासाठी करणे शक्य आहे. अशा वनस्पतिजन्य किटकनाशकांमुळे किडींना पिकापासून दूर ठेवणे, त्यांची वाढ रोखणे इ. बाबी शक्य होतात.

    किडी वनस्पतिजन्य कीटकनाशक (प्रमाण प्रति लिटर पाणी)
    हरभऱ्यावरील घाटेअळी, कोबीवरील मावा,चौकोनी ठिपक्याचा पतंग व भेंडीवरील फळ पोखरणारी अळी   ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मि.ली.
    अमेरिकन लष्करी अळी कडुनिंब अर्क - ॲझाडिरॅक्टिन (१५०० पीपीएम) २.५ मि.ली
    वांगीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी कडुनिंब अर्क - ॲझाडिरॅक्टिन (१०००० पीपीएम) २ मि.ली.

    ४. परोपजीवी विषाणू – निसर्गातील काही विषाणूंमुळे किडी रोगग्रस्त होतात. त्यात त्यांचा अंत होतो. अशा पर्यावरण आणि मानवी समूह किंवा पाळीव प्राण्यांसाठीही अजिबात हानिकारक नसलेल्या विषाणूंचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी करता येतो. अशा विषाणूला परोपजीवी विषाणू व त्यापासून तयार केलेल्या किटकनाशकांना विषाणूजन्य कीटकनाशके म्हणतात. उदा. विषाणूजन्य कीटकनाशकांची सायंकाळी फवारणी केल्यास तंबाखुवरील पाने खाणारी अळी व घाटेअळीच्या प्रथम व द्वितीय अवस्थेतील लहान अळ्यांचे प्रभावीरीत्या नियंत्रण करता येते. ५. परोपजीवी सुत्रकृमी – मातीमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या हेट्रोरॅबडीटीस इंडिका, स्टेनरनेमा कार्पोकॅप्सीसारख्या काही परोपजीवी सूत्रकृमी या किडींच्या मातीतील अवस्थांवर आपली उपजीविका करतात. या सूत्रकृमींचा वापर हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी करता येतो. ५. झायगोग्रामा/ मेक्सिकन भुंगे - सर्वत्र त्रासदायक ठरणाऱ्या गाजर गवतासारख्या तणांचा फडशा पाडण्यात झायकोग्रामा भुंगे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ५०० भुंगे प्रति हेक्टरी या शेतात सोडल्यास भुंगे स्थिर होऊन गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण करतात. एकदा शेतात सोडले की पुन्हा भुंगे सोडण्याची आवश्यकता राहत नाही. पुढील वर्षी जुलैमध्ये सुप्तावस्थेतून बाहेर निघून गाजर गवताचा फडशा पाडत राहतात. हळूहळू गाजरगवतांचे नैसर्गिकरित्या संपूर्ण निर्मूलन शक्य होते. डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२००० डॉ. श्रद्धा धुरगुडे (सहाय्यक परोपजीवी कीटकशास्त्रज्ञ), ८८३०७७६०७४ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com