कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञान

 कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञान
कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञान

कृषिक्षेत्र हे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्याच प्रमाण सर्व अर्थव्यवस्थांसाठीही त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कृषी यांत्रिकीकरणामुळे मानवी कष्टामध्ये मोठी बचत झाली आहे. सुरुवातीच्या काळात मशागतीसाठी हाताने खोदणी, नंतर बैलचलित नांगरणी केली जाई. त्याला सध्या पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टरचलित मशागतीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पिकाच्या वाढीसाठी नैसर्गिक खताला रासायनिक खतांचा पर्याय उभा राहिला आहे. मोठमोठ्या यंत्रासोबत ड्रोन आणि पिकांच्या अंतर्गत आवश्यक ते बदल घडवणारे जैवतंत्रज्ञान आता रोजच्या जीवनाचा भाग बनत आहे. त्यातून कृषी उद्योगामध्ये क्रांतिकारक वाढ होताना दिसत आहे. मात्र, भारतामध्ये अद्यापही कृषिक्षेत्राला आर्थिक, पर्यावरणीय आणि भौतिक पातळीवर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातून शेतकरी शेती क्षेत्रापासून दूर होत आहेत. तरुण त्याकडे करियरचा पर्याय म्हणून पाहताना दिसत नाहीत. दिल्ली येथील सेंटर फॉर दी स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या केंद्राने २०१८ मध्ये मांडलेल्या अहवालानुसार, ७६ टक्के भारतीय शेतकऱ्यांनी त्यांना योग्य पर्याय मिळाल्यास शेती सोडून दुसऱ्या व्यवसायामध्ये वळण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र, शिक्षणाचा अभाव आणि ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती यामुळे त्यांची गरिबीपासून सुटका होत नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांची या साऱ्या समस्यातून मुक्तता करण्यासाठी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी हे चांगले उत्तर ठरू शकते. कृषिक्षेत्राच्या उत्थानासाठी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी ही नवीन मिती देणारे आधुनिक तंत्रज्ञान ठरू शकते. यातून डिजिटल ओळख, पारंपरिक व स्वामीत्व हक्क आणि व्यवस्थापन पद्धतीतील चांगला समन्यवय साधणे शक्य होणार आहे. त्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. नव्या पिढीने हे तंत्रज्ञान स्वीकारल्यास कृषी क्षेत्राची उत्पादकता सुधारण्यासोबतच वाढत्या लोकसंख्येच्या गरजांचा पूर्तता करणे शक्य होईल. भारत सरकारने या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी पुढाकार घेतला असून, त्याला इंडियाचेन असे नाव दिले आहे. अर्थात, हे तंत्रज्ञान भारतामध्ये अद्याप शिशु अवस्थेमध्ये आहे. काही खासगी कंपन्यांनी (उदा. बॅकक्यू - BanQu) कृषी उद्योगामध्ये या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यासोबत शेतकऱ्यांना जोडणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक डिजिटल ओळख तयार करण्याची संधी असून, त्याद्वारे त्याच्याकडे येणाऱ्या व खर्चल्या जाणाऱ्या आर्थिक बाबींचा सर्व इतिहास नोंदवला जाऊ शकतो. त्यातून त्याला आवश्यक तर कमी अधिक प्रमाणात कर्जाची उभारणी करणेही शक्य होऊ शकते. जागतिकीकरणामुळे भारतासारख्या अनेक देशांमध्ये विविध क्षेत्रातील लोकांच्या संपत्तीच्या वाटपामध्ये मोठी दरी निर्माण केली आहे. अशा प्रकारच्या समाजाच्या दृष्टीने अयोग्य ठरू पाहणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. शेतकरी, व्यापारी आणि अन्य सर्व घटकांना विस्तृत क्षेत्रावरील संपर्क, समन्वयाबरोबरच नव्या खरेदीदारांपर्यंत पोचणे शक्य होईल. या तंत्रज्ञानामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याची डिजिटल ओळख मिळणार असून, त्याच्या शेतीमालाविषयीचे हक्क सुरक्षितता साधता येईल. यातून आर्थिक पारदर्शकता साध्य होणार असून, त्याचा नव्या पिढीला नक्कीच फायदा होईल. काय आहे ब्लॉक चेन तंत्रज्ञान ब्लॉक चेन तंत्रज्ञान हे एखाद्या सर्वांना वितरीत नोंदवहीप्रमाणे कार्य करते. त्याला इंग्रजीमध्ये डिस्ट्रिब्युटेड लिजर टेक्नॉलॉजी (DLT) असे म्हणतात. यामध्ये कार्यरत सर्व घटक एकमेंकाशी जोडलेले असून, त्यांचे व्यहवार पाहत येतात. यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता निर्माण होते. जेव्हा एखाद्या व्यवहाराची नोंद त्यामध्ये होते, त्यावर ब्लॉकचेनमध्ये शिक्कामोर्तब होते, त्या वेळी ती त्या नोंदवहीचा एक भाग होते. त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. सध्या या तंत्रज्ञानासाठी आभासी माहिती (व्हर्च्युअल डेटा) साठवण्याचा दर थोडा अधिक असला तरी भविष्यामध्ये त्याचा देखभाल खर्च कमी होण्याची शक्यता आहे. सध्या अॅमेझॉन आणि गुगल सारख्या कंपन्या माहितीच्या साठ्यासाठी दर ठराविक काळासाठी काही रक्कम आकारतात. भविष्यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरकर्त्यांना एकदाच साठवण फी भरावी लागू शकेल. उदा. एक गीगाबाईट (जीबी) माहिती साठ्यासाठी अॅमेझॉनकडून एक वर्षासाठी सध्या १६०० रुपये (२१.६० डॉलर) घेतले जातात. मात्र, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने काही डाटाची साठवण आयुष्यभरासाठी करण्याची शाश्वती देण्यासाठी केवळ अंदाजे ७५०० रुपये (१०० डॉलर) इतका खर्च येईल. पुढे हाच साठवलेला माहिती साठा वेगवेगळ्या जाळ्यांमधून (नेटवर्क) प्रसारीत होईल. त्यामुळे माहिती साठा नष्ट होणे किंवा संगणक अधिगृहित (हॅकींग) करण्याचे प्रकार टाळता येतील. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे व्यवहारातील मध्यस्थांची गरज कमी होईल. प्रत्येकाची माहिती सर्वांना उपलब्ध आणि एकदा भरल्यानंतर न बदलता येणारी असल्याने अधिक पारदर्शक असेल. एकदा तयार झालेल्या व न बदलता येणाऱ्या वापरकर्त्याच्या डिजिटल ओळखीद्वारे त्याला अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामध्ये विविध आर्थिक सेवा, सामाजिक फायदे, आरोग्याच्या सुविधा, शिक्षण, राजकीय आणि कायदेशीर हक्क, लिंग समानता इ. बाबींचा समावेश असेल. आजवर महिला किंवा गरिबांना अनेक हक्काबाबत वंचित ठेवले जात असे. त्यांच्या नावावर कोणत्याही देवघेवीचे व्यहवार होत नसल्याने त्यांना कर्ज किंवा अन्य आर्थिक मदत मिळण्यामध्ये अनेक अडचणी येत. नव्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचा नावाची एकदा ओळख निर्माण झाली की त्यांची देवघेव कोणी नाकारू शकणार नाही. त्याचा महिला किंवा आजवर कोणताही फायदा न मिळवू शकलेल्या गटांना नक्कीच फायदा होईल. गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने पुढाकार घेतल्यामुळे सर्वसामान्यांचे बॅंक खाती (जनधन खाते) उघडण्यात आली आहेत. त्यातील अनेक लोक आता मोबाईलही वापरत असून, त्यांना आपले मोबाईल बॅंक खात्यांशी जोडलेले आहेत. ही बाब अगदी ग्रामीण पातळीवर पोचली असल्यामुळे शेतकऱ्यांनाही ब्लॉकचेन तंत्रज्ञान स्वीकारण्यामध्ये फारशी अडचणी येतील असे वाटत नाही. सध्या बॅनक्यू (BanQu) ही ब्लॉकचेन संगणक आज्ञावली निर्माती कंपनी भारतामध्ये या विषयावर काम करत आहे. त्यांना भारतातील हजारो शेतकऱ्यांना डिजिटल ओळख दिली आहे. त्यांनी हे तंत्रज्ञान १० कोटी लोकांपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यातून आत्यंतिक गरिबापासून कोणत्याही शेतकऱ्याला खरेदीदाराशी संपर्क करणे सोपे होईल. त्यातून त्याच्यासाठी त्वरित भांडवलाची उभारणी शक्य होईल. कृषी क्षेत्रामध्ये ब्लॉकचेनचा प्रत्यक्ष वापर ः कृषिक्षेत्रामध्ये अन्न सुरक्षा- अन्न पुरवठा साखळी, कृषी निविष्ठा- वितरण आणि कृषी अनुदानाचे पारदर्शक वाटप, जमिनीचे अधिकार यासारख्या अनेक टप्प्यावर ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरणे शक्य आहे. कृषिक्षेत्रामध्ये महिला महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतात. मात्र, अद्याप त्यांना आर्थिकदृष्ट्या पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला जात नसल्याने कोणत्याही आर्थिक सेवा सुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. असंख्य महिलांचे अद्याप साधे बॅंक खातेही खोलण्यात आलेले नाही. तसेच त्यांचे शेती किंवा घरासारख्या स्थावर मालमत्तेमध्ये नावही असत नाही. त्यामुळे त्यांना कोणतेही कर्ज सध्या उपलब्ध होण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. बॅंकाना महिलांच्या कर्ज परतफेडीच्या आर्थिक क्षमतेबाबत कोणताही अंदाज येत नाही. परिणामी आजवर महिला बॅंका किंवा खरेदीदारापासून दूर राहत आल्या आहेत. भविष्यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानांतर्गत त्यांचा प्रत्येक शेती आणि शेतीमालासंबंधित व्यवहार हा डिजिटल स्वरुपामध्ये नोंदवला जाणार असल्याने या अडचणी नक्कीच कमी होतील. मध्यस्थांची मुजोरी किंवा अडवणूक कमी होईल. जर भारत सरकार आपल्या वेगवेगळ्या संबंधित संस्था, घटकांसह या तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण ताकदीने उतरल्यास कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी नवी अर्थव्यवस्था उभी राहील. पहिल्या कृषी क्रांतीनंतर नव्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने शेतकऱ्यांचे नक्कीच भले होईल, असा विश्वास वाटतो. - वाणी एन. ०९४८०८३६८०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com