कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट निर्मिती फायदेशीर

कापूस पऱ्हाट्यापासून ब्रिकेट, पेलेट निर्मिती
कापूस पऱ्हाट्यापासून ब्रिकेट, पेलेट निर्मिती

पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्वाचे आहे. या पिकाच्या शिल्लक पऱ्हाट्यापासून ब्रिकेट आणि पेलेट निर्मितीचा व्यवसाय अत्यंत फायदेशीर होऊ शकतो. 

भारतात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक असून, सुमारे १०.५ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रामध्‍ये घेतले जाते. जागतिक पातळीवर कापूस उत्‍पादनात सुमारे ३७० लक्ष गाठी उत्पादनासह भारत प्रथम क्रमांकावर आहे. भारतातील नऊ पेक्षा जास्‍त राज्‍यातील ५० लाखांहून अधिक शेतकरी कपाशी शेतीत गुंतलेले आहेत. कपाशी पीक प्रामुख्‍याने रुई व सरकीसाठी पिकविले जाते.मात्र, या दोन्हीसोबत कपाशीपासून मिळणारी पऱ्हाटीही उपयुक्त आहे. कापूस पऱ्हाटी म्हणजे कापूस वेचणीनंतर शेतामध्ये शिल्लक उरणारे वनस्पतीजन्‍य जैविक पदार्थ होय. बागायती कपाशीमध्ये प्रति हेक्‍टर ३ टन, तर जिरायतीमध्ये १.५ टन पर्यंत पऱ्हाट्या उत्‍पादन होते. आपल्‍या देशात सुमारे २५ दशलक्ष टन कोरड्या पऱ्हाट्या (१० टक्के आर्द्रतेसह) दरवर्षी उपलब्‍ध होतात. त्यातील केवळ ५-६ टक्के पऱ्हाट्यांचा व्यावसायिक उपयोग होतो. शेतकऱ्यांकडून १५ ते २० टक्के पऱ्हाट्या इंधन म्‍हणून वापरल्या जातात, तर उर्वरीत शेतात जाळल्या किंवा गाडल्‍या जातात. पऱ्हाट्या अधिक काळ शेतात साठवल्यास वाळवी लागते, किंवा किडी-रोगांना आश्रय मिळतो. 

कापूस पऱ्हाटीतील रासायनिक गुणधर्म व उपयोग

  • कडक लाकडाप्रमाणे कापूस पऱ्हाटीचे रासायनिक गुणधर्म आहेत. पऱ्हाटीमध्ये ६० टक्के हॅलो सेल्‍युलोज, २७ टक्के लिग्‍निन आणि ६ टक्के राख असते. कापूस पऱ्हाट्यांचे उष्‍मांक मूल्‍य ४००० किलोकॅलरी प्रति किलो इतके असते. 
  •   सेल्‍युलोज आणि लिग्‍निनचे प्रमाण चांगले असल्‍यामुळे त्यापासून उत्‍तम प्रतीचे पार्टीकल बोर्ड बनवता येतात. 
  •   उष्‍मांक मूल्‍य असल्‍यामुळे ब्रिकेट् किंवा पॅलेट (इंधन गोळ्या) बनविण्‍यासाठी किंवा वीज निर्मितीसाठी उपयोग होतो. ब्रिकेटसचा उपयोग साखर कारखाने, पेपर उद्योग, रासायनिक कारखाने, अन्‍न प्रक्रिया उद्योगांतील बॉयलरमध्‍ये इंधन म्‍हणून केला जातो. तसेच ब्रिकेटचा वापर फोर्जिंगसाठी, वीट भटट्यांमध्‍ये आणि फरनेसमध्‍ये केला जातो. तर पेलेटचा उपयोग व्‍यावसायिक किवा घरगुती स्‍टोव्‍हमध्‍ये इंधन म्हणून करतात. 
  •   पऱ्हाटीपासून उत्‍तम प्रतिचे कंपोस्‍ट खत बनवता येते. यावर अळिंबीचे उत्‍पादन घेता येते. 
  • पुरवठा साखळी आवश्‍यक ः  सध्या केवळ ५ ते ६% पऱ्हाट्यांचा वापर औद्योगिक किंवा व्‍यावसयिक उपयोगासाठी होतो. कारण कापूस पऱ्हाटी पुरवठा साखळीचा अभाव. यासाठी सिरकॉट संस्‍थेने शेतकऱ्यांकडून योग्य मोबदल्यात कापूस पऱ्हाटी उचलण्यापासून ब्रिकेट किवा पेलेट निर्मिती करून कारखान्यापर्यंत पोचवणे यासाठीची साखळी सुचवली आहे. या साखळीमध्‍ये कपास पऱ्हाटी उखडणे, गोळा  करणे, यंत्राने चिपिंग करून ४-५ सें.मी. चे लहान लहान तुकडे करणे आणि साधारण ५० कि.मी. अंतरावरील कारखान्यांपर्यंत पोचविणे यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना ३,००० रु. प्रति हेक्‍टरी किंवा १५०० रु. प्रतिटन इतका फायदा होऊ शकतो. पऱ्हाट्यापासून ब्रिकेटनिर्मिती ः  सर्वप्रथम चिपिंग मशीनच्‍या सहायाने लहान लहान तुकडे (४-५ सें.मी.) करावेत. नंतर त्‍यांना स्‍क्रू कन्व्हेअर सहाय्याने ब्रिकेटींग मशीनमध्‍ये टाकले जाते. ब्रिकेट मशीन मधील प्रेसच्‍या माध्‍यमातून उच्‍चदाबामुळे आणि एक्‍स्‍टूजन प्रक्रियेने ब्रिकेट तयार होतात. त्‍यांची गोलाई आकार साधारणपणे ९० मिमी असते आणि लांबी सुमारे १५-२० सेंमी इतकी असते. २० टन प्रतिदिन ब्रिकेट बनविणारा कारखाना उभारण्‍यासाठी साधारणपणे २५ लाख रुपये भांडवल मशिनरी लागते. यासाठी लागणार कच्‍चा माल हा साधारणपणे २४०० रुपये प्रतिटन पर्यंत मिळतो. बाजारामध्‍ये ब्रिकेटचा दर हा ४००० रु. प्रतिटन इतका असतो. एक टनामागे ब्रिकेट फॅक्‍टरी मालकाला रु. ४०० पर्यंत फायदा होतो.  ब्रिकेटचा उपयोग साखर, कागद, रबर, रासायनिक आणि खाद्य प्रक्रिया उद्योगात बॉयलरमध्ये केला जातो.   त्याच प्रमाणे हिंदू दहन प्रक्रियेमध्ये लाकडाला पर्याय म्हणून ब्रिकेट वापरता येतात. महाराष्ट्रात  नागपूर महापालिकेच्या सौजन्याने अंबाझरी घाट येथे संस्थेने हरित शवदाहिनी (ग्रीन क्रिमेटोरियम) बसवली आहे. यामुळे प्रत्येक शवदहनामागे खर्चात सुमारे ५५% बचत होते. लाकडांसाठी झाडे कापणे वाचून पर्यावरणासाठी फायदेशीर राहील.  ब्रिकेट निर्मितीच्या कारखान्यातून ४० टक्के परतावा मिळतो. वर्षभर कारखाना चालल्यास २० ते २५ महिन्‍यांमध्‍ये गुंतविलेले भांडवल परत मिळू शकते.  ब्रिकेट उद्योगाचे अर्थकारण  १. भांडवली गुंतवणूक अ) (जमीन २ एकर, यंत्रासाठी इमारत १५० वर्गमी. , कच्चा माल साठवूक क्षेत्र : १००० वर्गमी., कार्यालय : ५० वर्गमी. ) ः १५ लाख रुपये        ब) यंत्रसामग्री ः  २५ लाख रुपये        क) चिपर आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री ः ५ लाख रुपये  एकूण भांडवली गुतवणूक : ४५ लाख रु.     २.चालू खर्च अ) कच्चामाल (एका वर्षासाठी २० टन प्रति दिन प्रमाणे ३०० दिवसांसाठी २८०० रुपये प्रति टना प्रमाणे) ः १६८ लाख रुपये        ब) कामकाजाचा खर्च (रु. ६००/टन) : एक वर्षासाठीः  ३६ लाख रु. ३. एकूण वार्षिक उत्पन्न  (रु. ४०००/टन) ः २४० लाख रु. ४. निव्‍वळ वार्षिक उत्पन्न (रु. ४००/टन)ः २४ लाख रु.        ५. परतफेड कालावधी ः २३ महिने        ६. गुंतवणुकीवर परतावा ः ४०% पेलेटनिर्मिती व अर्थकारण ः   पऱ्हाट्याचे स्रेडर किवा चिपर यंत्राने ४-५ से.मी.चे लहान तुकडे करावेत. ते ८% आर्द्रतेपर्यंत सुकवून घ्यावेत. त्‍यानंतर हॅमर मिलमध्ये टाकून बारीक पावडर करावी. त्‍यांचा आकार ३ मी.मी. इतका होईल. त्‍यामध्‍ये रेझिन मिसळून पेलेटिंग मशिनच्या साह्याने पेलेट तयार करता येतात. त्‍या पेलेटची गोलाई साधारणपणे ६ ते १० मी.मी., तर लांबी ५० ते ६० मि.मी. इतकी असते. बाजारामध्ये पेलेटला  ७ ते ८ रु. किलो प्रमाणे दर मिळतो.  साधारणपणे ३ टन प्रतिदिन क्षमतेच्या कारखान्यासाठी यंत्र सामग्रीची किंमत १० ते १२ रु. लाख इतकी आहे. कारखाना उभारल्‍यास त्‍याचा परतावा २५-३०% मिळून परतफेड कालावधी तीन वर्ष राहतो.   कापूस पऱ्हाटीवर आधारित साधारणपणे १० टन ते २० टन प्रतिदिन क्षमतेचे ब्रिकेटिंग आणि पेलेटिंग उद्योग राज्यातील विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वणी येथे सुमारे ४० ते ५० कारखाने उभारले आहेत.  कापूस पऱ्हाट्या मर्यादीत कालावधीमध्ये उपलब्‍ध होतात.  अन्य कृषी अवशेष, सॉ डस्‍ट, वूड चिप्‍स, बगॅस यांचा वापर केल्यास वर्षभर कारखाना चालू शकेल.     पेलेट वापरासाठी उपयुक्त शेगडी विशेषत: रस्त्याच्या कडेला ढाबा आणि रेस्टॉरंट्स इत्यादी मध्ये चूल आणि शेगडीसाठी इंधन म्हणून पेलेट वापरता येतात. त्यासाठी उपलब्ध असलेल्या शेगडीमध्ये सिरकॉटने सुचवलेल्या जुजबी तांत्रिक सुधारणा कराव्या लागतात. अशा शेगडीमुळे पऱ्हाटी पेलेट वापरल्याने इंधनाच्या खर्चात ५०% बचत शक्य होते.  संपर्क : ०२२-२४१२७२७६  Email :  director.circot@icar.gov.in (लेखक केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था,  मुंबई येथे कार्यरत आहेत.)   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com