राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
ताज्या घडामोडी
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन
लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी (पावसाळ्यात) जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहारास मृग बहार आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये हस्त नक्षत्रात येणाऱ्या बहारास हस्त बहार तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे थंडी संपतेवेळी येणाऱ्या बहरास आंबे बहार म्हणतात. यातील आंबिया बहार नैसर्गिकरित्या येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा आंबिया बहार घेण्याकडे असतो.
लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी (पावसाळ्यात) जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहारास मृग बहार आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये हस्त नक्षत्रात येणाऱ्या बहारास हस्त बहार तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे थंडी संपतेवेळी येणाऱ्या बहरास आंबे बहार म्हणतात. यातील आंबिया बहार नैसर्गिकरित्या येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा आंबिया बहार घेण्याकडे असतो. सध्यस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, आर्द्रता, कमी तापमान व शेतातील जमीन संपृक्त झाल्याने आंबिया बहारच्या फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पाने काळी पडणे, पानगळ होणे व फळांवर तपकिरी डाग पडणे अशा विकृती दिसून येत आहेत.
पानावरील चट्टे
लक्षणे :
पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना ह्या बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो. यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी व मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन चुरा केल्यास त्यांची घडी होते, मात्र पाने फाटत नाहीत. टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर होऊन पाने तपकीरी काळे होतात. नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित खराट्याप्रमाणे दिसतात. परिणामी अकाली फळगळ होते. पानावरील चट्टे संक्रमण रोपवाटिकेमधील कलम तसेच नुकतेच लागवड केलेल्या कलमांवरसुद्धा दिसून येतात.
फळावरील तपकिरी रॉट किंवां फळावरील कूज
लक्षणे :
पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी किंवा रडया डागांची सुरवात होते. फळे एकाबाजूने करपण्यास सुरवात होते. फळाच्या हिरव्या सालीवर संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगाचे होते. अशी फळे सडून गळतात. या फळ सडीच्या अवस्थेस 'ब्राऊन रॉट' किवां तपकिरी कुज असे म्हणतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. तोडणीवेळी करड्या रंगाची फळे निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे पण सडतात.
प्रसारासाठी अनुकूल हवामान :
- या बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीद्वारे होतो.
- रोपवाटिकेतील रोगग्रस्त रोपांद्वारे हा रोग बागेत येण्यास प्राथमिक प्रसार असे म्हणतात.
- बागेत रोगग्रस्त झाडाबरोबर आलेली बुरशी वाढून, निरोगी झाडांना प्रादुर्भावीत करते, त्यास दुय्यम प्रसार असे म्हणतात. हा प्रसार पावसाच्या किंवा ओलिताच्या पाण्याबरोबर प्रवाहीत होतो. पावसाच्या थेंबामुळे उडणाऱ्या मातीच्या कणातून फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीजवळच्या फांद्या, पाने व फळे यांना होतो.
- अधिक आर्द्रता, कमी तापमान, अपुरा सूर्यप्रकाश व पावसाची झड या कारणांमुळे हा रोग अधिक प्रमाणात फोफावतो.
व्यवस्थापन :
- सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी. ती शेतात तशीच राहू दिल्यास रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होते.
- वाफा स्वच्छ ठेवावा.
- बागेत उताराच्या दिशेने शेतातील पाणी बाहेर काढावे. बागेमध्ये पाणी साठून राहिल्यास त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो.
- संशोधनामध्संये पूर्ण झाडावर फोसेटील ए.एल.* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम किंवा कॅप्टन (७५ डब्लूपी) २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी व फवारणीनंतर १५ दिवसाने ट्रायकोडर्मा हार्जियानम* १०० ग्रॅम अधिक सुडोमोनास फ्ल्यूरोसन्स* १०० ग्रॅम १ किलो शेणखतात मिसळून प्रती झाड या प्रमाणे झाडाच्या परिघात जमिनीद्वारे दिल्यास चांगले नियंत्रण मिळत असल्याचे दिसून आले.
डॉ. दिनेश ह. पैठणकर, ९८८१०२१२२२
(अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)
- 1 of 579
- ››