agriculture stories in marathi cattle feed management in in deficient situation | Agrowon

चारा टंचाईच्या काळातील पशुआहार व्यवस्थापन

डॉ. गणेश गादेगावकर, डॉ. भूषण रामटेके, डॉ. संजय कदम
मंगळवार, 2 जून 2020

उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला यावेळी कोरोना व लॉकडाऊनच्या स्थितीचा फटका बसत आहे. पशुधनाला पशुखाद्याच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी उपलब्ध खाद्य घटकांचा वापर करून पशूंची अन्न घटकांची गरज भागवता येईल.

उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला यावेळी कोरोना व लॉकडाऊनच्या स्थितीचा फटका बसत आहे. पशुधनाला पशुखाद्याच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी उपलब्ध खाद्य घटकांचा वापर करून पशूंची अन्न घटकांची गरज भागवता येईल.

१. हिरवा व सुका चारा कुट्टी करून देणे
हिरवा चारा संपूर्ण स्वरूपात दिल्यास जनावरे मुळाकडील भाग खात नाहीत. परिणामी चारा मोठ्या प्रमाणात वाया जातो. हे टाळण्यासाठी उपलब्ध असलेला हिरवा चारा चाफ कटर/ कुट्टी यंत्राच्या साहाय्याने कुट्टी करून पशूंना द्यावा. सुका चारा तसाच दिल्यास त्याचा ३० टक्के नाश होतो. त्याची कुट्टी करून दिल्यास नुकसानीचे प्रमाण ५ टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते.

२. निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रकिया करावी
उपलब्ध असलेल्या चाऱ्याची प्रत वाढवण्याकरिता निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रकिया करावी.
युरिया प्रकियेची पद्धत : प्रथम एका ड्रममध्ये ५० लीटर पाणी घ्यावे. त्या मध्ये ४ किलो युरिया, ४ किलो गूळ, १ किलो खनिज मिश्रण, १ किलो मीठ एकजीव विरघळून घ्यावे. प्लॅस्टिक कागद किंवा चादर पसरावी. त्यावर २० किलो चाऱ्याचा थर पसरावा. त्यावर १० लीटर युरिया द्रावण एकजीव मिसळावे. पुन्हा एकदा २० किलो चाऱ्याचा थर पसरावा. त्यावर १० लीटर युरिया द्रावण एकजीव मिसळावे. अशा प्रकारे १०० किलो चाऱ्यावर ५० लीटर युरिया द्रावण एकजीव मिसळावे. युरिया मिश्रित चारा २१ दिवसांकरिता प्लॅस्टिक चादरीने झाकून ठेवावा. एकवीस दिवसानंतर जनावरांच्या आवश्यकतेप्रमाणे हा चारा खावयास द्यावा. जनावरास हा चारा देण्यापूर्वी प्लॅस्टिक चादरीतून काढल्यानंतर २ ते ३ तास उघडा करून ठेवावा. त्यातील अमोनिया वायू निघून जाईल. त्यानंतर तो खायला द्यावा.
महत्त्वाचे :

  • ही प्रक्रिया पहिले काही दिवस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
  • सहा महिन्याखालील जनावरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा देऊ नये.
  • प्रक्रिया करिताना वापरण्यात येणारे घटकांचे वजन तंतोतंत घ्यावे.
  • जनावरांना भरपूर स्वच्छ, ताजे पाणी पिण्यास द्यावे.

३. घरगुती पद्धतीने तयार करा पशू खाद्य
संतुलित आहारामध्ये पशुखाद्य (खुराक किंवा अंबोण) यांना अतिशय महत्त्व असते. ते अधिक पौष्टिक असून त्याद्वारे जनावरांसाठी पोषक घटकांची पूर्तता करता येते. पशुखाद्यासाठी योग्य त्या खाद्य घटकांचा १०० किलो तत्त्वावर नमुना तयार करावा.
जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता पशुखाद्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, ओट, तांदूळ यासारख्या तृणधान्यांचा भरडा वापरण्यात येतो. प्रथिनांचे स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, जवस, खोबरे, सोयाबीन ह्यापासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. त्याचप्रमाणे तृणधान्य किंवा कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ उदा. भाताचा किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, कडधान्यापासून डाळी बनवताना मिळणारी तूर, उडीद, मूग चुणी यांचा समावेश होतो. खुराकात एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टक्के मीठ यांचा देखील समावेश केला जातो.
पशुखाद्य  तयार करण्याची पद्धत :
प्रथम ऊर्जा स्रोत व प्रथिने असणारे खाद्य घटक वेगवेगळे भरडून घ्यावेत. प्लॅस्टिकची चादर अंथरावी. त्यावर अंबोण नमुन्यातील धान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ व चुणी, तृणधान्य व पेंडीचे थरावर थर करावेत. शेवटी खनिज मिश्रण व मीठ टाकावे. हे सर्व घटक फावड्याचा साहाय्याने एकजीव मिसळावेत. हे पशुखाद्य जनावरांच्या आवश्यकतेनुसार खायला द्यावे.

४. संपूर्ण खाद्य पद्धतीचा अवलंब
पारंपरिक पद्धतीमध्ये खुराक, हिरवा चारा व सुका चारा जनावरांना वेगवेगळ्या वेळी स्वतंत्रपणे दिला जातो. परंतु संपूर्ण खाद्य पद्धतीमध्ये जनावरांना दिवसभरात लागणारा खुराक, हिरवा चारा व सुका चारा एकत्रित मिसळून दिले जातात. त्यामुळे सुक्या चाऱ्याची उपयुक्तता वाढते. मजुरांवरील खर्च कमी होतो. इतर वेळी जनावरे चवीमुळे खात नसलेल्या अपारंपरिक अन्न घटकांचा काही प्रमाणात मिश्रणामध्ये वापर करता येतो. संपूर्ण खाद्यात सर्व खाद्य घटक एकत्र मिसळल्याने चवीचा फरक जाणवत नाही.

५. अपारंपरिक खाद्यांचा आहारात वापर करावा
भाजी मंडई मधील वाया गेलेली भाजी, कोबी व फ्लॉवरची पाने, पाले भाज्यांचा अवलंब पशूआहारात ठरावीक प्रमाणात करावा. फळातील रस काढून झाल्यानंतर उरणारा चोथा, फळांच्या साली, त्याच प्रमाणे विविध झाडांची पाने उदा. आंबा, चिंच, वड, पिंपळ यांचा देखील आहारात अवलंब करता येतो.

पशुपालकांनी कोविड-१९ संक्रमण टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी:

  • पशुपालकांनी प्रक्षेत्रावर काम करताना मास्क व हात मोजाचा वापर करावा. आवश्यकतेनुसार सॅनीटायझरचा देखील वापर करावा.
  • प्रक्षेत्रावर परिधान करण्यासाठी वेगळे कपडे ठेवावेत. अंगठ्या, घड्याळे व पाकीट, कमरेवरील पट्टा यासारख्या वस्तू टाळाव्यात. गोठ्यामध्ये काम करताना गमबुट घालावेत.
  • गोठा स्वच्छ, कोरडा ठेवावा तसेच मधूनमधून निर्जंतुकीकरण करू घ्यावा.
  • गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्तीस येण्यास मज्जाव करावा.
  • दूध दोहन करताना गाईंचे आचळ निर्जंतुक करून घ्यावे. स्वच्छ दूध उत्पादनास मदत होते. जनावरे हाताळल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत.

डॉ. गणेश गादेगावकर, ९९३०९०७८०६
(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई.)


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...