चारसूत्री भात लागवडीने उत्पादनात मिळाली भरघोस वाढ 

चारसूत्री भात लागवडीने उत्पादनात मिळाली भरघोस वाढ 
चारसूत्री भात लागवडीने उत्पादनात मिळाली भरघोस वाढ 

भात उत्पादक शेतकरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागले असून, त्याचे फायदे त्यांना दिसू लागले आहेत. वीस वर्षापूर्वी मावळ तालुक्यातील कुसगाव (जि. पुणे) येथील बाळासाहेब लक्ष्मण गायकवाड यांनी पारंपरिक भात लागवडीऐवजी चारसूत्री पद्धतीचा अवलंब केला. सुधारीत जाती व लागवड तंत्रज्ञानाची सातत्यपूर्ण कास धरल्यामुळे भाताचे उत्पादन हेक्टरी १५-२० क्विंटलपासून वाढून सुमार ११५ ते १२० क्विंटलपर्यंत पोचले आहे.  पुणे आणि मुंबई या मोठ्या शहरांदरम्यान असलेल्या मावळ तालुक्यामध्ये शेतजमिनीला प्रचंड महत्त्व आले आहे. अशा वेळी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न कुसगाव येथील गायकवाड कुटुंबीय करत आहेत. गावात बाळासाहेब, अशोक, हनुमंत गायकवाड या तिघा बंधूंचे एकूण ३० जणांचे कुटुंब असून, त्यांच्याकडे एकूण दहा एकर शेती आहे.  सन २००० मध्ये गायकवाड कुटुंबीयांकडे ऊस, भात, ज्वारी, बाजरी, फूलशेती, भुईमूग, सोयाबीन अशी पिके पारंपरिक पद्धतीने घेतली जात. मात्र, उत्पादकता बेताचीच होती. त्या वेळी बाळासाहेबांना दूरदर्शनवरील कार्यक्रमामध्ये डॉ. नारायण सावंत यांची चारसूत्री भात लागवडीची माहिती मिळाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अधिक माहिती घेतली. दोऱ्यांवर खुणा करून तिथे केवळ एकच भात रोप लावायचे म्हटल्यावर गावकऱ्यांनी चेष्टा सुरू केली. बाळासाहेबांना स्वतःलाही भीती वाटत होती. मात्र, कृषी सहायक विकास भोर, नवीनचंद्र बोऱ्हाडे, विकास गोसावी त्याचप्रमाणे कृषी पर्यवेक्षक मोरेश्वर मेंढे, नंदकुमार साबळे तालुका कृषी अधिकारी कोथिंबिरे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे अशा अधिकाऱ्यांच्या सतत होणाऱ्या मार्गदर्शनामुळे प्रेरणा मिळत गेली. पहिल्या वर्षी चांगले उत्पादन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही.  चारसूत्री पद्धतीचा अवलंब ः  १) रोपवाटिका ः दरवर्षी चारसूत्री पद्धतीने तीन ते चार एकरावर भात लागवडीचे नियोजन असते. त्यासाठी मशागतीनंतर गादीवाफे तयार करतात. या गादीवाफ्यावर भाताचे तूस जाळून त्यापासून मिळालेली राख टाकली जाते. त्यामुळे भात रोपांना सल्फरचा पुरवठा होतो. एकरी बारा किलो याप्रमाणे घरगुती जोपासलेल्या इंद्रायणी जातींचे बियाणे टाकून चार गुंठे क्षेत्रात रोपे तयार करतात. या पद्धतीमुळे रोपवाटिकेतील तणांचे नियंत्रण व काढणी उत्तमपणे करता येते. साधारणपणे २५ दिवसानंतर रोपे लागवडीसाठी तयार होतात.  २) हिरवळीची खतपिके ः या दरम्यान भात शेतात ताग, धैंचा हिरवळीची पिके लावली जातात. २५ दिवसामध्ये वाढलेल्या ताग, धैंचा जमिनीमध्ये गाडून टाकत चिखलणी केली जाते. परिणामी सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.  ३) नियंत्रित लागवड ः नियंत्रित लागवडीसाठी पूर्वी २५ बाय १५ सेंमी अंतरावर खुणा असलेली दोरीद्वारे लागवड करत असे. मात्र, गेल्या काही वर्षापासून अनुभवाने त्यात बदल करून ते अंतर २० बाय ३० सेंटिमीटर असे बदलले आहे. प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन रोपे लावली जातात. या पद्धतीने रोग, किडीचे प्रमाण कमी झाले असून, फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात.  ४) युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर ः हल्ली चिखलणीवेळी ग्रेड वन मायक्रोन्यूट्रियंट हेक्टरी पंचवीस किलो वापरत आहे. लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी युरिया डिएपी ब्रिकेट चार रोपांच्या मध्ये एक गोळी टोकली जाते. परिणामी रोपांना सावकाश खतांची उपलब्धता होत राहते. याचा उत्पादनवाढीसाठी चांगला परिणाम दिसून आला आहे.  पाण्याचा योग्य वापर ः  भाताला अधिक पाणी लागते, असा शेतकऱ्यांचा समज आहे. मात्र, भातामध्ये कमी पाणी ठेवून ते प्रवाही पाणी ठेवतात. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. काढणीअगोदर पिकांमध्ये पाणी टप्प्याटप्प्याने कमी केले जाते. भात लागवडीनंतर साधारणपणे चार महिन्यांनी मजुरांद्वारे भाताची काढणी केली जाते. त्यानंतर भाताची बांधणी करून मशिनद्वारे मळणी करतात. पूर्वी हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटलचे भाताचे उत्पादन होत होते. मात्र चारसूत्रीचा अवलंब केल्यानंतर उत्पादनात वाढ होत गेली. सध्या भाताचे प्रति हेक्टरी ११५ ते १२० क्विंटल उत्पादन घेतात.  यांत्रिकीकरणाचा अवलंब ः  पूर्वी संपूर्ण शेतीसाठी बैलचलित अवजारांचा वापर करत असते. बैलाने नांगरणी, वखरणी, चिखलणी अशी कामे करत. मात्र, आता ट्रॅक्टर, पॉवर टिलरचा वापर करतात. त्यासोबतच मळणी यंत्रही स्वतःचे घेतले आहे.  घरगुती बियाण्यांचा वापर ः  दरवर्षी ते प्राधान्याने इंद्रायणी या भाताची लागवड करतात. त्यासाठी शुद्ध बियाण्यांची जोपासना करतात. दरवर्षी बुरशीनाशक चोळून बियाणे व्यवस्थित जपून ठेवले जाते. परिणामी बियाण्यांवरील खर्चात बचत होते.  फूलशेतीसह अन्य पिकांतूनही चांगले उत्पादन ः  गायकवाड कुटुंबीयांकडे तिन्ही हंगामांमध्ये सुमारे एक ते दीड एकर क्षेत्रात झेंडू आणि बिजलीचे उत्पादन घेतले जाते. फुलांची विक्री पुणे येथील गुलटेकडी बाजारात करतात. झेंडू, बिजलीला सरासरी ४० ते ५० रुपये प्रति किलो दर मिळतो. फुलांतून वर्षभर खेळता पैसा हाती राहत असल्याचे त्यांनी सांगितले. खर्च वजा जाता एकरी एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.  ऊस, सोयाबीन, ज्वारी, गहू, भुईमूग या पिकांचेही हंगामनिहाय उत्पादन घेतले जाते.  दुग्ध व्यवसायातून जमिनीच्या सुपीकतेसह मिळते उत्पन्न ः  गायकवाड यांच्याकडे १२ म्हशी, दोन बैल, एक गाय, सहा वासरे अशी एकूण २५ जनावरे आहेत. त्यांच्यासाठी शेतामध्ये मका, ज्वारी, बीएचएन ६ गवत, लसूणघास अशा चारापिकाची सुमारे दोन एकरवर लागवड केली जाते. प्रति दिन सुमारे ७० ते ८० लिटर दूध उत्पादन होते. पिंपरी चिंचवड व वाकड येथील सुमारे २० ते २५ ग्राहकांना थेट रतीबाद्वारे प्रति लिटर ५५ रुपये प्रमाणे विक्री करतात. प्रति माह खर्च वजा जाता सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या शेणखतांमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहत असल्याचे बाळासाहेब यांनी सांगितले.  बाळासाहेब लक्ष्मण गायकवाड, ९८५०१२९५९०, ९७६५१३८३४४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com