agriculture stories in marathi chiplunkar 39 - nozzles & droplet size for efficient chemical use | Agrowon

रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल, थेंबाचा आकार

प्र. र. चिपळूणकर
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

उत्तम तण नियंत्रणासोबतच पिकांवर कोणताही परिणाम न होण्यासाठी फवारणी करतेवेळी योग्य तंत्र वापरणे आवश्यक असते. त्यासाठी फवारणीची नळी, नोझल, ते वापण्याची पद्धत ही शेतकऱ्यांनी नेमकेपणाने जाणून घेणे आवश्यक आहे. या संदर्भात लेखक डॉ. व्ही. एस. राव यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकामध्ये उत्तम माहिती दिली आहे.

तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक शोधल्यानंतर पुढे त्याचे बाजारात विक्री योग्य स्वरुपात रूपांतर करावे लागते. त्यानंतर त्याची खरी कार्यक्षमता लक्षात घ्यावी लागते. यासाठी मूळ घटक घन रूपात असेल तर त्याचे चूर्ण करून अगर तो द्रवरूपात असेल तर त्याचे योग्य द्रवरूप अगर भुकटी स्वरुपातील एखाद्या माध्यमात मिसळले जाते. हे नवे स्वरूप शेतकऱ्यांना वापरण्यायोग्य असावे लागते. रुपांतरणांमध्ये तणनाश करण्याच्या मूळ गुणधर्मात बदल होऊन चालत नाही. मूळ गुणवत्ता कमी न होता त्यात सुधारणा होणे अपेक्षित असते. एखाद्या रूपांतरात यशस्वी झालेले सूत्र दुसऱ्या रूपांतरात तसेच यशस्वी ठरेल असे नसते. तणनाशक तयार झाल्यानंतर साठवणुकीत त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, हे पाहावे लागते.

तणनाशकातील क्रियाशील घटक घन, द्रव अगर वायुरुपात असू शकतो. तो अत्यंत शुद्ध स्वरुपात तयार केला असला तरी तसाच तणनाशक म्हणून वापरता येत नाही. त्यावर योग्य प्रक्रिया करून व्यापारी उत्पादन तयार होते. व्यापारी उत्पादनामध्ये क्रियाशील घटकाच्या कणांचा आकार परिणामकारकतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो.
बाजारी उत्पादने वेगवेगळ्या स्वरुपात उत्पादन केली जातात.
१. पाण्यात धुलनशील भुकटी (w.p.)
२. पाण्यात विरघळून जाणारे द्रव (EC)
३. दाणेदार स्वरूप
४. वायुरूपात.

अंतिम प्रत्यक्ष फवारणी करतेवेळी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, परिणामकारकता चांगली रहावी, या हेतूनेच अशा वेगवेगळ्या रूपात रसायनांची निर्मिती केली जाते. पुस्तकामध्ये याबाबतची तांत्रिक माहिती सविस्तर दिली आहे. ती शेतकऱ्यांसाठी फारशी गरजेची वाटत नाही.

पुढील प्रकरण पीक संरक्षणासाठीच्या विविध रसायनांसंबंधी आहे. ही माहिती शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे. पिकावर पीक संरक्षण रसायनांचा वापर आणि तणनाशकांचा वापर ही दोन वेगवेगळी कामे आहेत. म्हणून तणनाशकांच्या फवारणीसाठी यंत्रे, उपकरणे हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या दोन्ही फवारणीसाठी वेगवेगळी फवारणी यंत्रे वापरण्यासंबंधी शिफारस शास्त्र करते. मात्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक क्षमता कमी असल्यामुळे एकच पंप दोन्ही कामासाठी वापरला जातो. मात्र, कोणतीही फवारणी करण्यापूर्वी व केल्यानंतर पंप स्वच्छ धुवून घेणे आवश्यक आहे. पिकांवर कीडनाशकांचा वापर करण्यापूर्वी तोच पंप तणनाशकासाठी वापरला गेला असल्यास पिकाला बाधा होऊ शकते. अनेकवेळा रसायनांचे बारीक कण वाळल्यानंतर पिस्टन, नोझल मध्ये अडकून राहतात. काही धातुच्या भागाची झीज होऊ शकते, यासाठीही पंप स्वच्छ धुवून घेणे आवश्यक आहे.

बाजारात आता बॅटरीवर चालणारे फवारणी पंप आले असून, हातपंपापेक्षा सोयीस्कर असल्यामुळे त्याचा वापर वाढत आहे. नियंत्रित म्हणजेच पीक चुकवून फक्त तणावर फवारणी करण्यासाठी हात पंपाचा वापर करणे सर्वात उत्तम. बाजारातून पंप खरेदी करतेवेळी त्यासोबत कंपनीकडून मिळणारी पंपाच्या नळीची लांबी सुमारे ६० ते ७५ सें. मी. असते. तणनाशकाची संपूर्ण जमीन भिजवण्यासाठी ती चालू शकते. मात्र, नियंत्रित फवारणीसाठी ती योग्य नाही. पंप पाठीवर घेऊन उभे राहिल्यास कमरेत न वाकता पाईपचे (लान्स) खालचे टोक जमिनीला चिकटलेले ठेवता आले तरच नियंत्रित फवारणी योग्य पद्धतीने करता येते. बाजारात १ मीटर लांबीच्या नळ्या उपलब्ध असतात. तणनाशकाच्या फवारणीसाठी उपयुक्त ठरतात.

नोझल ः

पिकावर कीडनाशकांच्या फवारणीचे नोझल तण नाशकासाठी योग्य नाहीत. पिकावर फवारणीसाठी गोल आकारात रसायनांची फवारणी करणारे नोझल पंपाबरोबर मिळतात. तणनाशकासाठी बाजारात खास दोन प्रकारचे नोझल उपलब्ध आहेत.
१. फ्लॅट फॅन जेट
२. फ्लड जेट
प्लॅट फॅन जेट नोझलचा फवारा आडवा आयताकृती कमी रुंदीच्या पट्ट्यात पडतो. हा नोझल खाली तोंड करून फवारा उडवितो. नियंत्रित फवारणी करीत असता पंपाला आयताकृती हूड लावून, त्यास हा नोझल योगय दिशेने बसविला तर जवळ अंतरावरील दोन पिकाच्या ओळीतही पिकावर औषध न पाडता फवारणी करता येते. फ्लड जेट नोझलचा फवारा आडव्या रेघेत पडतो. हा नोझल जमिनीला समांतर ठेवून फवारणी करावयाची असते. (आकृती पहा) नोझल जमिनी लगत ठेवल्यास अत्यंत कमी रुंदीचा पट्टा भिजतो तर जमिनीपासून उंची वाढवत नेल्यास फवारणीची रुंदी वाढत जाते. नियंत्रित फवारणीसाठी हा उत्तम नोझल आहे. सराईत फवारणारा मुख्य पिकावर अजिबात न पाडताही पिकाजवळील तणही मारू शकतो.
फ्लड जेट पंपामध्ये कमी जास्त रसायन पडणारे नोझल बाजारात उपलब्ध आहेत. यात ६२, ४० व १४ असे क्रमांकाचे नोझल आहेत. पूर्ण जमीन भिजवायची असेल तर ६२ क्रमांकाचा जास्त रसायन फवारणी करणारा, तर मर्यादित फवारणीसाठी ४० क्रमांकाचा नोझल चांगला आहे. या प्रकारात पितळी व प्लॅस्टिक असे दोन प्रकार आहेत. नोझल पेचात आवळल्यानंतर पितळी नोझल योग्य दिशेने येईल याची खात्री नसते. प्लॅस्टिक नोझल योग्य दिशेने आणणे सोपे असते. या नोझलच्या प्रकारात नोझलच्या छिद्रातून रसायन बाहेर पडल्यानंतर पुढील तिरकस तोंडावरून घसरत जाऊन रसायनाला आडव्या रेघेची दिशा मिळते. वापरून हे तिरकस तोंड खराब झाल्यास दिशा योग्य मिळत नाही. असा नोझल बदलावा.

फवारणीच्या थेंबाचे आकारमान ः

फवारणीच्या थेंबाच्या आकारावर शास्त्रज्ञांनी भरपूर अभ्यास केला आहे. फवारणीची कार्यक्षमता या फवारणीच्या थेंबावर आकारमानावर अवलंबून असते. फवारणीतील सर्व थेंबाचे आकारमान सारखे नसते. काही मोठे तर काही लहान थेंब असतात. त्याचे आकारमान मोजण्याच्या परिणामाला इंग्रजीत ‘म्यू’ असे म्हणतात. (मायक्रॉन) थेंबांचे आकारमान वाढत जाईल, तसे मायक्रॉनची संख्या वाढत जाते. हाताने हापसण्याचे सामान्य पाठीवरील पंप मोठ्या आकाराच्या बिंदूत फवारणी करतात. अशा फवारणीसाठी द्रावण जास्त वापरावे लागते. त्याला कमी तीव्रतेच्या फवारा (हाय व्हॉल्युम स्प्रे) असे म्हणतात. जस जसे कमी कमी मायक्रॉनची फवारणी आपण करू लागतो, तसतसे द्रावणाचे एकूण माप कमी होते. पाणी कमी लागते. पण त्यातील रसायनांची तीव्रता त्या प्रमाणात वाढवावी लागते. याला कमी पाण्यातील फवारणी (लो व्हॉल्युम स्प्रे) असे म्हणतात. लहान बिंदूचा फवारा पानावर चिकटून बसतो. मोठा होईल, तसे ओघळून जाण्याचे प्रमाण वाढते. रसायनाची कार्यक्षमता कमी होते. यासाठी बाजारात आता लो ल्हॉल्युम, अल्ट्रा लो व्हॉल्युम अशा प्रकारची फवारणी यंत्रे उपलब्ध होत आहेत. त्यातून नेहमीच्या फवारणीच्या तुलनेत पाण्याचा वापर ६.८ पटीने कमी करता येतो. अशा फवारणी उपकरणाचा वापर अति उच्चतंत्रज्ञानावर आधारित शेतीत केला जातो. अलीकडे द्राक्ष बागेमध्ये यांचा वापर वाढला असला तरी अन्य शेतीमध्ये अद्याप फारसा वापर होत नाही. रसायनांची योग्य कार्यक्षमता मिळण्यासाठी बिंदूचा आकार कमीत कमी असावा. यासाठी साध्या पंपाचा फवारणीचा दाब योग्य पातळीवर ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पिस्टन व वायसर उत्तम असावा. पंप अजिबात गळके नसावे. कमी हापसून योग्य दाब निर्माण करता आला पाहिजे.


इतर कृषी सल्ला
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
..हे आहेत सुपीकता, उत्पादकतेवर परिणाम...पिके मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून नत्र आणि पालाश...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
कृषी सल्लावाल  फुलोरा अवस्था वाल पिकावरील शेंगा...
तुरीवरील शेंगमाशीचे नियंत्रणतूर हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे....
भविष्यासाठी नद्या जपण्याची गरजप्रत्यक्ष जीवनामध्ये हवामानाचे विविध बदल जाणवून...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...
अशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारीद्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे....
राज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील सह्याद्री पर्वतरांगांवर हवेचा दाब १०१४...
एल निनो म्हणजे नेमके काय ?हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या...
गारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजनामराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व...
असे करा आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रणलांबलेल्या पावसामुळे आंबा पिकातील पालवीचा कालावधी...
असे करा वाढीच्या अवस्थेनुसार गहू...गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य पाणी...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...