agriculture stories in marathi Chiplunkar 42, weed control to weed management | Agrowon

तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडे

प्र. र. चिपळूणकर
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

वास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी येत असला तरी कृषी कीटकशास्त्र व रोगशास्त्र या शाखांकडे जितके लक्ष दिले जाते, तितके तणविज्ञानाकडे दिले जात नाही. पुढेही जेव्हा तणाविषयी अभ्यास सुरू झाला तेव्हा तो तणांच्या नियंत्रणविषयक अधिक होता. अलीकडे मी तणनियंत्रणाकडून तण व्यवस्थापनाकडे वळलो आहे.

वास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी येत असला तरी कृषी कीटकशास्त्र व रोगशास्त्र या शाखांकडे जितके लक्ष दिले जाते, तितके तणविज्ञानाकडे दिले जात नाही. पुढेही जेव्हा तणाविषयी अभ्यास सुरू झाला तेव्हा तो तणांच्या नियंत्रणविषयक अधिक होता. अलीकडे मी तणनियंत्रणाकडून तण व्यवस्थापनाकडे वळलो आहे.

संशोधन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तण विज्ञान ही एक नवीन विज्ञानशाखा सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी विकसित झाली आणि वेगाने विकसित होत गेली. मी १९७० मध्ये कृषी पदवीधर झालो. त्या वेळी कृषी अभ्यासक्रमात कृषी वनस्पतिशास्त्र शाखेअंतर्गत तणांचे स्थानिक नाव, वनस्पतिशास्त्रीय नाव, त्यांचे शास्त्रीय वर्गीकरण असा अभ्यास चालायचा, तर कृषिविद्या शाखेंतर्गत तण नियंत्रणाच्या पद्धती, पूर्वमशागत, कोळपणी, निंदणी, हंगामी बहुवार्षिक तणांचे नियंत्रण असा अभ्यासक्रम होता. तणनाशकाचे रीतसर आगमन १९७० नंतर झाले. सुरवातीला २, ४-डी, नंतर ॲट्राझीन, पॅराक्वाट अशी सुरवात होती. मजूरबळ भरपूर उपलब्ध असल्याने तण नियंत्रणासाठी पैसे खर्च करून एखादे रसायन बाजारातून आणावे अशी शेतकऱ्यांची मानसिकताही नव्हती. त्या वेळी रासायनिक तणनाशकांचा शोध व संशोधने मुख्यतः खासगी क्षेत्रात सुरू होती. डॉ. राव यांच्या तणविज्ञान या पुस्तकामध्ये याचे उल्लेख आले आहेत. त्यांनुसार, कृषी अभ्यासक्रमातही तण विज्ञानाला दुय्यम स्थान होते. चार वर्षांतील आठ सत्रांपैकी एका सत्रात तण विज्ञानाचा अभ्यास शिकविला जाई. पदव्युत्तर व विद्यावाचस्पतीसाठी तण विज्ञान हा विषय क्वचितच दिला जाई. परिणामी या विषयातील विशेषज्ञ तयार होण्याबरोबरच तणविज्ञान ही स्वतंत्र विद्याशाखा म्हणून विकसनामध्ये अडचणी निर्माण झाल्या. आजही यात फार फरक पडलेला नाही.
वास्तविक तण विज्ञानाचा संबंध कृषिविद्या, वनस्पतिशास्त्र, मृदा विज्ञान, कृषी शरीरक्रियाशास्त्र, जैवरसायन, सेंद्रिय रसायन, रसायनांच्या अवशेषांचे शास्त्र, परिस्थितीकी व कृषी अभियांत्रिकी, कृषी अर्थशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र अशा अनेक शास्त्रशाखांशी येतो. मात्र, कृषी कीटकशास्त्र व रोगशास्त्र शाखेकडे जितके लक्ष दिले जाते, त्यामानाने तणविज्ञान दुर्लक्षितच राहिले आहे.

तण विज्ञानविषयक अभ्यासाचा इतिहास ः

  • १९५२ मध्ये ११ राज्यांत गहू, भात व ऊस या पिकांतील तण संशोधन करण्याविषयी प्रकल्पाचे काम सुरू झाले. नंतर अनेक राज्यांत कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. त्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट केला गेला.
  • १९७८ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद आणि अमेरिकन कृषी विभागाच्या सहकार्याने सहा कृषी विद्यापीठांत एकत्रित तण विज्ञानाच्या अभ्यासाला सुरवात झाली. या कामाचा कालावधी सहा वर्षांसाठी ठरला होता. या संशोधनाची उपयुक्तता लक्षात घेऊन दुसऱ्या फेरीत (१९८२-८३) व पुढे तिसऱ्या फेरीत (८५-८६) आणखी नऊ ठिकाणी संशोधनाचे काम वाढविण्यात आले. तणांचा अभ्यास, तणांमुळे होणारे नुकसान, त्यांच्या नियंत्रणाचे विविध मार्ग असे संशोधनाचे विषय होते.
  • विविध ठिकाणी चालणाऱ्या तणविषयक संशोधनावर मध्यवर्ती एक स्वतंत्र तण विज्ञान संस्थेमार्फत नियंत्रण राहावे यासाठी मध्य प्रदेशात जबलपूर येथे भारतीय तणविज्ञान अनुसंधान संस्था अशी एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचे १९८५ मध्ये ठरवले होते.
  • पुढे रीतसर १९८९ मध्ये ‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर वीड सायन्स’ (NRCWA) अशा नामकरणासह कामकाजाला सुरवात झाली. आता भारतातील सर्व कृषी विद्यापीठांतील तण विज्ञानविषयक संशोधनाचे कामकाज या मध्यवर्ती संस्थेच्या नियंत्रणाखाली चालते.

तण संशोधनाचे कामकाज खालील मुख्य मुद्द्यावर चालते.
१. वेगवेगळ्या भौगोलिक निकषांनुसार कार्यक्षम तण नियंत्रण पद्धती विकसित करणे.
२. तण विज्ञानासंबंधी वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या संशोधनांमध्ये समन्वय राखणे.
३. तण विज्ञानासंबंधी जास्तीत जास्त माहिती एकत्र करणे.
४. तण विज्ञानासंबंधित संशोधनाचे निष्कर्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.
५. तण विज्ञानासंबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या कामकाजाची माहिती संग्रहित करणे.

आता या मध्यवर्ती केंद्राबाबत माहिती मिळाल्यानंतर तेथील कामकाज जाणून घेण्याची इच्छा झाली. काही कारणाने जबलपूरपासून ६० किमीवरील एका गावात २-३ दिवस जाण्याचा योग आला. मात्र, केंद्राला भेट देणे जमले नाही. दरम्यान माझे तेथील तणविज्ञानविषयक कामकाजाविषयी माहिती मिळवणे सुरू झाले होते. एक दिवस नेरळ (रायगड) येथील श्री. चंद्रशेखर भडसावळे यांच्याकडून फोनवरून जबलपूर येथील तण विज्ञान केंद्राचे प्रमुख येणार असल्याविषयी समजले. मग धावतपळत तिथे गेलो. तिथे केंद्र प्रमुखासोबत २ दिवस भरपूर चर्चा झाली. त्यातून तण विज्ञानाविषयी सुरू असलेले प्रयोग, संशोधनाची दिशा कळली. मी कृषी पदवीधर असल्याने त्यातील अनेक बाबी ज्ञात होत्या.

‘तण खाई धन’ ते ‘तण देई धन’पर्यंतचा प्रवास ः

तणासंबंधी शेतकरी व शास्त्रज्ञांच्या मतांचा अभ्यास केल्यास एक स्पष्ट होते. ते म्हणजे तणे रानात पिकाबरोबर उगवतात. वर्षानुवर्षे रानात बी अजिबात पडू न देण्याची कितीही काळजी घेतली तरी तणे येण्याचे प्रमाण थोडे कमी- जास्त असेल, परंतु तणे अजिबात येणे बंद झालेले नाही. तणे उगवल्यानंतर जितक्‍या लवकर त्यांचा नायनाट करून पीक तणमुक्त ठेवता येईल तितके चांगले. थोडेसे दुर्लक्ष झाले तर तणांच्या वाढीचा वेग पिकाच्या वाढीच्या वेगापेक्षा कित्येक पटीने जास्त असतो. ती पिकाला झाकतात. सूर्यप्रकाशासाठी पिकांबरोबर होणारी तणांची स्पर्धा अधिक धोकादायक ठरू शकते. जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये आणि पाण्यासाठी पिकाबरोबर स्पर्धा होते. आज खतावरील खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. ती जास्तीत जास्त पिकाला मिळणे आवश्यक आहे. ती तणांनी वापरली तर त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे.
कृषी विभागाच्या मते, पहिले साठ दिवस रान तणमुक्त ठेवले तरच चांगले उत्पादन मिळेल. या काळात तणाशी स्पर्धा झाली तर २० ते ५० टक्केपर्यंत पिकाचे नुकसान होऊ शकते. पूर्वी शेतकरी मेळाव्यात लावलेल्या फलकांमध्ये ‘तण खाई धन’ ही म्हण हमखास असे. माझ्याही ५० वर्षांच्या शेतीकाळातील ४० वर्षे अशाच मानसिकतेत गेली. जमीन तणमुक्त ठेवण्याच्या कामात भरपूर पैसा, कष्ट व वेळ खर्च केला. रानात तण अजिबात दिसले नाही पाहिजे यासाठी मी सतर्क राहात असे. तणाचे बी रानात अजिबात पडू नये, यासाठी प्रयत्न करत असे. शेतामध्ये तण उगविणारच नाही, यासाठी प्रथम हातभांगलणी, नंतर पीक व तण उगविण्यापूर्वीची, पुढे उगविल्यानंतरची, अ निवडक अशा आवश्यक तणनाशकांचा वापर करत असे. पुढे गरजेप्रमाणे हातभांगलणी अशी यंत्रणा राबवूनही शेवटी तणमुक्त शेत करण्याच्या या प्रकल्पात तणापुढे मला सपशेल हार पत्करावी लागली. दरम्यान, सेंद्रिय शेती करणाऱ्या काहीजणांनी तणाबरोबर शत्रुत्व नको, मैत्री करा असा सल्ला दिला. तेव्हा अक्षरशः त्यांना वेड्यात काढून तणाबरोबर मैत्री म्हणजे सापाबरोबर मैत्री असा वादही केला होता. एका शासकीय प्रक्षेत्रावर ६० एकर ऊस पिकांमध्ये भेट देण्याचा योग आला असता त्यांनी रानात तणाचा मोड दाखवा व बक्षीस मिळवा असे आवाहन केले होते. आजही कोणत्याही कृषीविषयक लेखामध्ये रान तणमुक्त ठेवण्याची एक सूचना आवर्जून असतेच. मीही आपल्याप्रमाणेच एक शेतकरी असून, माझी आणि अन्य सर्व शेतकऱ्यांची तणांविषयीची मानसिकता स्पष्ट करण्याचा माझा हेतू होता. मात्र, २०११ पासून माझा तणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. माझा तणनिर्मूलनाचा ४० वर्षं जुना उपक्रम पूर्णपणे बंद केला. नियंत्रणाऐवजी मी तण व्यवस्थापनाकडे वळलो. माझे सारे पूर्वग्रह आता उलटेपालटे झाले. माझ्या मते शेतीमध्ये शेतकऱ्याला मदत करणारे तणासारखे दुसरे कोणतेच संसाधन नाही.


इतर ताज्या घडामोडी
वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढतेय...पठारी प्रदेशात वातावरणातील धुलिकणांची पातळी...
राज्याबरोबर केंद्राच्या मदतीची गरजः शरद...उमरगा, जि. उस्मानाबाद: नैसर्गिक आपत्तीच्या...
साताऱ्यात पावसाने बटाटा पीक गेले वाहूनविसापूर, जि. सातारा ः पुसेगावसह (ता. खटाव)...
परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर...परभणी ः यंदाच्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर...
दोन लाख रुपयांवरील थकबाकीदारांना...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः दोन लाख रुपयांपेक्षा...
पुणे जिल्ह्यात अठरा हजार हेक्टरवर...पुणे ः गेल्या तीन दिवसांपासून पावसाने काहीशी...
मदतीची घोषणा, की आश्वासनांनी बोळवण?...सोलापूर ः जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने...
नगरमध्ये रब्बी ज्वारीचे तीन हजार...नगर ः रब्बी ज्वारीचे सुधारित बियाणे पेरणी होऊन...
धानाला १००० रुपये बोनस द्या;...भंडारा : निविष्ठांच्या दरात झालेली वाढ, कीड...
राजारामबापू कारखाना उसाचे २५ लाख टन...इस्लामपूर, जि. सांगली : राज्याचे जलसंपदामंत्री,...
ऊस तोडणी हंगामात पावसाचा अडथळाकोल्हापूर : शासनाने गुरुवार (ता. १५) पासून ऊस...
नाशिक जिल्ह्यात हमीभावाने होणार बाजरी...येवला, जि. नाशिक : शासकीय भरड धान्य खरेदी...
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे ः डॉ....आळसंद, जि. सांगली :  शेतकऱ्यांनी आता...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
कृषी सल्ला (भात, आंबा, काजू, नारळ,...नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या...
बटाटा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास बटाटा...
आरोग्यदायी चंदनलेप लावण्यासाठी रक्तचंदन उगाळून वापरले जाते....
अकोला जिल्ह्यात सोयाबीनच्या सोंगणी,...अकोला ः परतीच्या पावसाने सोयाबीन हंगामाची...
यवतमाळ जिल्ह्यातील पांदण रस्ते पूर्ण...यवतमाळ  : ‘‘‘पालकमंत्री पांदणरस्ते’...
नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टर पिकांचे...नांदेड : ऑक्टोबर महिन्यात सलग आठ दिवस...