agriculture stories in marathi Chiplunkar 45, farming techniques should be changed | Agrowon

शेतीतंत्रामध्ये योग्य बदल आवश्यक

प्र. र. चिपळूणकर
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कोणत्याही पिकाच्या उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांच्या खर्चामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत मंदी आल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. ज्या लोकांना अशा अडचणीची/संकटाची चाहूल थोडी आधी लागते, ते अन्य पिकांकडे वळायचे धाडस करतात. पीक बदलाबरोबरच शेतीतील कोणते खर्च कमी करता येतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करताना जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल, हे पाहिल्यास शेतकऱ्यांना तेजी- मंदीच्या चक्रामध्ये तगता येईल.

कोणत्याही पिकाच्या उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांच्या खर्चामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत मंदी आल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. ज्या लोकांना अशा अडचणीची/संकटाची चाहूल थोडी आधी लागते, ते अन्य पिकांकडे वळायचे धाडस करतात. पीक बदलाबरोबरच शेतीतील कोणते खर्च कमी करता येतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करताना जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल, हे पाहिल्यास शेतकऱ्यांना तेजी- मंदीच्या चक्रामध्ये तगता येईल.

रब्बी हंगामामध्ये ज्वारीची पेरणी सामान्यपणे तिफणीने केली जाते. अलीकडे ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राचाही वापर होत असला, तरी दोन ओळीतील अंतर ४५ सेमी ठेवण्याची प्रथा आहे. रब्बी ज्वारीसाठी मालदांडी हा सरळ व जुना वाणच सर्वांत लोकप्रिय असून, त्यासाठी सामान्यतः घरचेच बियाणे वापरले जाते. एकरी ३ किलो पेरण्याची शिफारस असली, तरी घरच्या बियाण्यांमुळे पेरणी दाट होण्याची शक्‍यता नेहमी असते. त्याच प्रमाणे उगवणीनंतर दोन वेळा विरळणी करून घाटांची योग्य संख्या राखण्याची महत्त्वाची शिफारस असूनही या कामाकडे शेतकरी दुर्लक्षच करतात. मुळात एकरी ३ किलो हे प्रमाण जास्त आहे. मात्र, नांगे पडू नयेत म्हणून पेरणी केल्यानंतर विरळणीची शिफारस आहे.

विरळणी का करायची, हे प्रथम समजून घेऊ

ज्वारी दाट झाल्यास सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वरच्या दिशेने वाढत जाते. यामुळे घाटांची शाकीय वाढ जास्त होऊन उंची वाढते. पानात तयार झालेल्या अन्नद्रव्यांपैकी बराच भाग हा उंची वाढण्यासाठी खर्ची पडल्याने कणसे अतिशय लहान पडतात. धाटाची जाडी कमी राहिल्याने कडब्याची प्रत चांगली मिळते. परंतु, दाण्याचे उत्पादन कमी मिळते. विरळणी व्यवस्थित झाल्यास धाटाला सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो. रानाची प्रत जिरायती, बागायत अशा परिस्थितीचा अभ्यास करून दोन ओळींतील व दोन धाटांतील योग्य अंतर ठेवावे.
गहू, भात, ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्य पिकांमध्ये बहुतेक वेळा फक्त वरच्या पानाचाच सूर्यप्रकाश पूर्णपणे मिळतो. खालच्या पानांना वरच्या पानातून गाळून येणारा मिळतो. सूर्यप्रकाश खालच्या पानांनाही मिळण्यासाठी पेरणीतील अंतर वाढविणे गरजेचे आहे का? असा प्रश्‍न मला नेहमीच पडत असे. शोधताना वनस्पतिशास्त्रामध्ये त्याचे उत्तर असे मिळाले. पानावर पडणाऱ्या एकूण सूर्यप्रकाशापैकी फक्त १५ ते २० टक्के वापरला जातो. बाकी खालील पानांवर गाळून प्रकाश गेला, तरी त्याच्या गरजेइतकी सूर्यशक्ती त्याला मिळते. यामुळे दोन ओळींतील अंतराचे गणित चालू आहे ते ठीक आहे. दोन रोपांतील अंतर किंवा संख्या विरळणीद्वारे योग्य केले पाहिजे. भात, गहू व बाजरी या पिकाला फुटवे येतात. पेरणी थोडी दाट झाल्यास फुटवे कमी, तर पातळ झाल्यास जास्त फुटवे येऊ शकतात. तरीही योग्य प्रमाणात बी पेरणीचे महत्त्व आहेच.

रब्बी कडधान्ये व तेलबिया ः

रब्बी हंगामात कोकणात भातानंतर वाल, देशावर हरभरा, वाटाणा (काळा, पिवळा) मसूर अशी कडधान्ये, तर करडई हे तेलबिया पिके घेतली जातात. या पिकांपैकी बहुतेक पिके कोरडवाहू आहेत. खरीप पीक कापणीनंतर तणांचे अवशेष असतील, तर तणनाशकाने मारून टाकावेत. १०-१२ दिवस तणे मरून गेल्यानंतर खरीप पीक व तणांच्या मुळाच्या पसाऱ्यातील पाणी कमी कमी होत जाते. ती प्रथम वाळू लागतात व पुढे कुजू लागतात. शक्‍यतो जमिनीची कोणतीही हलवाहलवी न करता टोकण करणे, अगर पेरणी यंत्राने पेरणी करणे शक्य होईल, असे नियोजन खरीप पीक पेरणीवेळीच अभ्यासाद्वारे ठरवावे. आपल्याकडे कडधान्याचे पिकाचे उत्पादन अत्यंत कमी आहे. कडधान्याच्या उत्पादन वाढीसाठी या पिकांना सेंद्रिय कर्बाची मोठ्या प्रमाणात गरज असते. नांगरून, कुळव अगर वखरपाळी मारून पेरल्याने मागील पिकाचे मुळाचे जाळे मोडले जाते. जमिनीच्या वरच्या थरातील ओलावा जलद कमी होतो. कडधान्याच्या काडीत धान्याच्या तुलनेत नत्राचे प्रमाण जास्त असते. कडधान्यातील प्रथिने या प्रमुख घटकांमध्ये नत्र हा एक प्रमुख घटक आहे. कडधान्याच्या मुळावरील गाठीतील जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून गरजेचा नत्र झाडाला पुरवतात. मात्र, हा नत्र मिळविण्यासाठी पानांद्वारे तयार झालेल्या अन्नद्रव्यांपैकी ३३ टक्के अन्नद्रव्ये या जिवाणूच्या कार्यासाठी वापरली जातात. यामुळे धान्याच्या तुलनेत कडधान्याचे उत्पादन कमी असते. बाकी गरजेची अन्नद्रव्ये जमिनीतून मिळविण्यासाठी पानात तयार झालेली अन्नद्रव्ये व जमिनीतून उपलब्ध असणाऱ्या सेंद्रिय कर्बातून ऊर्जा व अन्नपुरवठा होतो. त्यात जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची टक्केवारी कमी असल्यास उत्पादनात घट येते. इथे काही गोष्टीवर प्रकाशझोत टाकणे गरजेचे ठरते.

  • विनानांगरणीच्या शेतीत मागील पीक व तणांचे अवशेष कुजत राहून गरजेइतका सेंद्रिय कर्बाचा पुरवठा होतो.
  • मुळांचे अवशेष वाळत गेल्याने जमिनीत पोकळ्या निर्माण होऊन हवेचा पुरवठा होतो.
  • मुळांचा पसारा जागेला कुजत राहिल्याने तयार होणारी काही संजीवके पुढील पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.
  • मुळांचा पसारा कुजत असता काही प्रमाणात पाणीही बाहेर टाकले जाते. ते कोरडवाहूतील पिकाला उपयुक्त ठरते.
  • विनानांगरणीमुळे जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणावर टिकून राहतो.
  • सेंद्रिय कणामुळे जमिनीची जलधारणशक्ती वाढते. ती कोरडवाहूसाठी महत्त्वाची ठरते.
  • अनेक कोरडवाहू क्षेत्रात जमीन धारणा अधिक असल्याने शून्य अगर कमीत कमी मशागत तंत्रच शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरते.

ऊस ः

कापसानंतर ऊस हे दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक आहे. एके काळी ऊस पीक शेतकऱ्यांसाठी वरदान मानले जात असल्यामुळे बागायतीची सोय झाल्यानंतर तेथे ऊसशेती असे समीकरण ठरून गेले. सातत्याने २-३ वर्षे अतिरिक्त उत्पादन, साखरेला दर नाही, उठाव नाही, बांधीव कमाल दर देण्याचे दडपण अशा समस्यांना साखर, गूळ उद्योग अडचणीत असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी कमी पावसाच्या भागात अवर्षणामुळे, तर भरपूर पावसाच्या भागात अतिवृष्टीमुळे साखर उत्पादन ३५.४० टक्क्याने घटले. दुसऱ्या बाजूला ऊस पिकाला पर्याय नसल्याने सातत्याने तेच पीक घ्यावे लागणे, घटणारी जमीन सुपीकता, कमी होणारे उत्पादन यांसारख्या समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली, उत्पादन घटत चालले आहे. चालू वर्षी सर्वत्र पाऊसमान चांगले असल्याने पाण्याची उपलब्धता वाढली आहे. यामुळे पुढील हंगामात उसाखालील क्षेत्रात वाढ होईल. चालू वर्षी ऊस उपलब्धतेअभावी हंगाम ५० टक्केच चालणार आहे. मराठवाड्यात अनेक कारखान्यांची धुराडी पेटणार नाहीत. पुढील वर्षी गाळप संपविण्याचा आटापिटा कारखान्यांना करावा लागेल. म्हणजे ऊस पीक, साखर उद्योगासमोरील अडचणी संपणाऱ्या नाहीत. त्यातल्या त्यात बांधीव दर, हमीभाव, एफआरपी अशा संरक्षित दर शेतकऱ्यांना आकर्षित करतो. उत्पादनामध्ये समतोल कसा राहणार? त्यासाठी उसाप्रमाणेच बाकी पिकांनाही किमान काही प्रमाणात तरी शाश्वत दर देण्याची व्यवस्था कशा प्रकारे उभारता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. बाजारातील तेजी -मंदीच्या नैसर्गिक चक्राचा फायदा नेहमी व्यापाऱ्यांनाच होताना दिसतो, शेतकऱ्यांना नाही.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...