सूक्ष्मजीवांचे पीक पोषक, रसायनांवरील परिणाम

सूक्ष्मजीवांचे पीक पोषक, रसायनांवरील परिणाम
सूक्ष्मजीवांचे पीक पोषक, रसायनांवरील परिणाम

गेल्या काही भागांपासून आपण मार्टिन ॲलेक्झांडर यांच्या पुस्तकांच्या आधारे भू-सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख करून घेत आहोत. मागील भागामध्ये आपण सूक्ष्मजीवांसाठी परिस्थितीकी, कर्बचक्र आणि हायड्रोकार्बन हा भाग पाहिला. या वेळी नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती घेऊ.

सर्वसाधारपणे एखाद्या पुस्तकाचे परीक्षण थोडक्यात अर्ध्या ते पाव पानामध्ये केले जाते. मात्र, मार्टिन ॲलेक्झांडर यांच्या सूक्ष्मजीवशास्त्राची तोंडओळख या पुस्तकाचेही असेच परीक्षण देता आले असते. मात्र, इंग्रजीतील ही उपयुक्त माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने देत आहोत. अनेकांना हा विषय अवघड वाटला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवून त्यातील भावार्थ जाणून घ्यावा.  कर्बचक्र व नत्रचक्र या मुख्य अन्नद्रव्याबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर पुढील भागात स्फुरद, गंधक, पालाश, लोह, मॅंगनीज, सेलेनियम, अर्सेनिक, झिंक अशा काही दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या जमिनीखालील हालचालींची माहिती दिली आहे. त्याचा भावार्थ असा ः निसर्गात सर्वसाधारण वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव या सर्वांची अन्नद्रव्यांची गरज वरील सर्व घटकांद्वारे भागवली जाते. जाती प्रजातीनुसार प्रत्येक अन्नद्रव्याची गरज कमी-जास्त होऊ शकते. अन्नघटक चक्रिय स्वरूपात या तीनही सजीवात फिरत असतात. यामुळे प्रत्येकाचे अस्तित्व एकमेकासाठी पूरक असते. यातील एखाद्या घटकाच्या कमी-जास्तपणाचा बाकीच्या घटकावर परिणाम होऊ शकतो. अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीवांचा सहभाग मोठा असतो. सर्वच अन्नद्रव्यांची जमिनीतील वाटचाल स्थिरीकरण व उपलब्धीकरणाच्या माध्यमातून सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीने होते. यासाठी पिकाचे चांगले उत्पादन काढण्यासाठी सूक्ष्मजीवांच्या गरजा भागविणे हे काम करणे हेच शेतकऱ्यांचे कर्तव्य ठरते. पुढील दोन शेवटची प्रकरणे ही वनस्पतींना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्मजीवांचे कार्य (रायझोस्फिअर) व कीडनाशक व तणनाशकांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. हा भाग पीक पोषण व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.  पिकाचे पोषण 

  • पीक पोषणासंबंधित जिवाणू पिकाच्या केशमुळाभोवती गोळा झालेले असतात. जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा प्रथम पाण्यात न विरघळणाऱ्या म्हणजे पिकाला उपलब्ध नसणाऱ्या अवस्थेत केला जातो. जाती, प्रजाती व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या गरजा बदलत जातात. पीक आपल्या मुळातून असा काही स्राव सोडते की त्याला गरज असणारी अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंना त्यातून संदेश जातो. ते पिकाच्या गरजेनुसार आपली संख्या वाढवितात. गरजेइतकी अन्नद्रव्ये स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात उपलब्ध करून देतात. यातून पिकाचे पोषण होते. इथे गरजेप्रमाणे सूक्ष्मजीवांच्या प्रजातींची संख्या कमी-जास्त होत असते. काम संपताच सूक्ष्मजीव फेर सुप्तावस्थेत जातात. असे होत असले तरी यावर काही भौतिक रासायनिक घटकांचा संबंधही येत असतो. तापमान, आर्द्रता, जमिनीचा सामू, क्षारता, सर्वात महत्त्वाचा म्हणजे या सूक्ष्मजीवांच्या कामकाजासाठी गरज असणाऱ्या सूक्ष्मजीवांची अन्नद्रव्यांची व ऊर्जेची गरज भागविणारा भाग म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब होय. अपवाद वगळता हे सर्व जीवाणू हवेच्या सान्निध्यात काम करतात. यासाठी हवेचे व्यवस्थापन हे घटक जास्तीत जास्त अनुकूल ठेवल्यास पिकाचे उत्पादन चांगले मिळते. 
  • पिकाला अन्नद्रव्ये पुरविणारे सर्व सूक्ष्मजीवांचे गट हे मित्र या गटात मोडतात. जमिनीमध्ये पिकाला रोगकारक असेही काही सूक्ष्मजीव असतात. मित्र सूक्ष्मजीवाच्या वाढण्यास चांगली परिस्थिती ठेवल्यास शत्रू सूक्ष्मजीवांचे आपोआप नियंत्रण होते.
  • रसायनांचे जमीन, पीक आणि सूक्ष्मजीवांवरील परिणाम 

  • या पुढील शेवटचे प्रकरण पीक संरक्षणविषयक रसायनांच्या वापरासंबंधी आहे. ही माहिती सर्वसाधारणपणे इतरत्र मिळत नाही. या विषारी रसायनांच्या वापराचे पिकावर, जमिनीवर, पर्यावरणावर, पीक उत्पादनावर व ते खाणाऱ्या मानव अगर प्राण्यांच्या आरोग्यावर कसा व काय परिणाम होतो यासंबंधी आहे. आज या विषयामध्ये अनेक गैरसमज आहेत. पुस्तक १९६१ साली प्रकाशित झालेले असून, हरितक्रांतीपूर्वी लिहिलेले आहे. हरितक्रांतीच्या उत्तर काळात रसायनांच्या अतिरेकाचे दुःष्परिणाम झाकणे व रसायने निर्मित्या कंपन्यांचे हितसंबंध जोपासणे असा उद्देश असायलाही इथे वाव नाही. पुस्तकात वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या अन्नद्रव्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रसायनांचा वापर करावा लागण्याची अपरिहार्यता व्यक्त केली आहे. मात्र, रसायनांचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम यावर चर्चा व अधिक संशोघन होण्याची आवश्यकताही व्यक्त केली आहे. 
  • काही रसायने थेट जमिनीत टाकली जातात, तर काही पानावर फवारणीनंतर अवशेष जमिनीवर पडल्यानंतर जमिनीकडेच येतात. काही वेळा जमिनीतील पाणी निचऱ्याद्वारे नदी-सरोवराकडे जाते. त्यातून रसायने पाण्याच्या साठ्याचे प्रदूषण करतात. काही रसायनांची वाफ होते. त्याचे अवशेष हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होते. अशा प्रत्येक परिसंस्थेचे प्रदूषण जिवाणूकडून विघटन करून संपविले जाते. ही प्रक्रिया अनेक प्रकाराने अनेक जीवाणूंकडून पार पाडली जाते. ही प्रक्रिया बहुतांशी रासायनिक सूत्रांच्या साह्याने येत असल्याने सर्वसामान्यांना समजण्यास अवघड ठरू शकते. मात्र, त्याचा मतितार्थ जाणून घेतला तरी फायद्याचे राहील. रसायने जमिनीत मिसळल्यानंतर त्याचे मातीत अत्यंत सौम्य द्रावण तयार होते. इतकी सौम्य तीव्रता मोजण्याची उपकरणे विकसित झाल्यानंतरच त्यावरील संशोधनास सुरवात झाली. विकसित देशात यावर संशोधन चालू होते. ते सर्व भू-सूक्ष्मजीवशास्त्रांतर्गत चालू होते. 
  • कृषी शिक्षण संस्था व कृषी खात्याने अशा संशोधनाची फारशी दखल घेतली नसावी. परिणामी हरितक्रांती व त्यानंतर जगभर रसायनांचा मुबलक वापर सुरू झाला. सुरवातीच्या मिळणाऱ्या उत्पादनांच्या वाढ आणि यशामुळे अन्य परिणामांकडे लक्ष देण्याची गरज कोणालाही वाटली नाही. ८०-८५ सालात या पुस्तकाने भूसूक्ष्मजीवशास्त्राची तोंडओळख मला करून दिली. आज मी गरजेपुरता सर्व रसायनांचा वापर करतो. त्यानंतर त्याचे विषारी परिणाम संपविणाऱ्या या तंत्राचा अवलंब करतो. त्यामुळे उत्पादनही चांगले व दर्जाही उत्तम मिळतो. 
  • तिकडे रसायनांच्या दुष्परिणामाची धास्ती घेऊन सेंद्रिय शेतीचा उदय झाला. त्याला आता २८ वर्षे उलटून गेली तरी जितक्या वेगाने वाढ होणे अपेक्षित होते, तितकी दिसत नाही. याचे कारण सेंद्रिय शेतीचा अभ्यास भू-सूक्ष्मजीवशास्त्र केंद्रस्थानी ठेवून झालेला नाही. माझ्या मते हे शास्त्रच शेतीला तारू शकेल.  
  •   ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,  (लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com