फवारणीकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाची

फवारणीकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाची
फवारणीकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाची

अवजारांची निगा, फवारणी करीत असता घ्यावयाची काळजी व तणनाशकाचा पीक उत्पादन व पर्यावरणावर परिणाम, फवारणी यंत्राची योग्य देखभाल, फवारणीकर्त्यांची सुरक्षितता याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. आपल्या उष्ण कटिबंधाचा विचार करून मजुरांनी सोईस्कर ठरतील, असे योग्य पोशाख, मास्क, हातमोजे, बूट याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. सध्या विविध प्रकारची फवारणी यंत्रे उपलब्ध होत आहेत. मात्र, सामान्यपणे पाठीवरील हाताने चालवण्याचा (नॅपसॅक) पंप शेतकऱ्यांकडे असतो. अलीकडे बॅटरीवर चालणारे फवारणी पंप उपलब्ध झाले आहेत. वेगवेगळी परिस्थिती व रसायनाच्या प्रकारानुसार फवारणीच्या गरजा भागवणारी यंत्रेही किंवा सुधारणा झाल्या आहेत. यामध्ये १) मायक्रॉन हर्बी स्प्रेअर, २) रिसर्क्‍युलेटिंग स्प्रेअर, ३) रोप विक ॲप्लीकेटर, ४) रोलर ॲप्लीकेटर, ५) इलेक्‍ट्रो डायनॅमिक स्प्रेअर, ६) दाणेदार रसायने फवारणी यंत्र असे अनेक प्रकार विकसित झाले आहेत. यापैकी एक व पाच हे भारतात पहावयास मिळतात. मायक्रॉन हर्बी स्प्रेअरने आपण ७ ते १५ लिटर पाण्यात एक हेक्‍टर क्षेत्र फवारू शकतो. थेंबाचा आकार खूप लहान असल्याने रसायनांची कार्यक्षमता वाढते. मी चांगली बागायती सोय असणाऱ्या भागातील असल्याने फवारणीसाठी कमी पाणी वापरासंबंधी विचारच केला नव्हता. सोलापूर जिल्ह्यात एका गावात फिरत्यावेळी पाण्याची सोय आसपास नसल्यामुळे रसायनांच्या फवारणीसाठीही पाणी रानात न्यावे लागत असल्याचे आढळले. तिथे बोलताना कमी पाण्यामध्ये फवारणी करण्यायोग्य यंत्राची माहिती दिली असता दुसऱ्या दिवशी त्यांनी तसा पंपच खरेदी केला. - इलेक्‍ट्रो डायनॅमिक पंपातून उडालेल्या द्रावणांच्या थेंबाचा आकार खूप लहान असतो. याव्यतिरिक्त तो विद्युत भारित केला जातो. रसायनाचा घनभार पानाचा ऋणभार यामुळे थेंब पानाकडे आकर्षित होतात व धरून ठेवले जातात. यासाठीच्या नोझलच्या तंत्रामध्ये आता खूप सुधारणा झाली आहे. वनस्पतीच्या पृष्ठभागावर एक थेंब पडलेल्या जागी दुसरा थेंब पडणार नाही म्हणजेच ओघळून खाली पडून रसायनाचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे फवारणी आणि चालण्याचा वेग असा नियंत्रित केला जातो. रसायनाची कार्यक्षमता वाढते. असे लहान ट्रॅक्‍टरवर बसविलेले पंप द्राक्षासारख्या नगदी पिके किंवा उच्च तंत्रज्ञानयुक्त शेतीमध्ये पिकावरील फवारणीसाठी वापरले जातात. फवारणी करतेवेळीची सुरक्षितता महत्त्वाची ः

  • रसायनांची फवारणी करणाऱ्या व्यक्तीने पायात बूट, हात मोजे, नाक तोंड चेहरा झाकणारा मास्क किंवा उपकरण व संपूर्ण शरीर झाकणारे खास औषध फवारणीसाठी तयार केलेले पोषाख वापरणे गरजेचे आहे.
  • कापूस, तूर, फळबागा अशा माणसाच्या उंचीपेक्षा जास्त असणाऱ्या पिकात रसायनांच्या फवारणीसाठी असे पोशाख अत्यंत गरजेचे आहेत. या पिकांची एकत्र क्षेत्रे मोठी व मजुरांच्या टोळीला एका पंपावर मजुरी कंत्राटी पद्धतीने ठरवून दिली जाते. यामुळे मजूर गडबडीने जास्तीत जास्त पंप व क्षेत्र संपविण्यात स्वतःच्या सुरक्षिततेकडे योग्य लक्ष देत नाहीत.
  • कोकणात आंबा बागेमध्ये फवारणी करण्यासाठी झाडावर चढून या फांदीवरून त्या फांदीवर अशी फवारणी केली जाते. अशा वेळी मजुरांची फवारणी द्रावणाची अंघोळ होते.
  • विदर्भात फवारणी करीत असताना विषबाधा होऊन मजुराच्या मृत्यूच्या बातम्या अनेक वेळा ऐकू येतात. शेतमालक किंवा फवारणीसाठीच्या मुकादमाने उत्तम पंप, रसायनासोबतच मजुराच्या सुरक्षिततेची व संरक्षणाची उत्तम साधने देणे अत्यंत गरजेचे आहे. या विभागामधील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू आहे. मात्र, द्राक्षे, कापूस, तूर, भाजीपाला, केळी अशा तुलनेने अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांमध्येही फवारणीचे पोषाख वापरले जातात का, याची मी चौकशी केली. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी असा पोशाख वापरला जात नसल्याचेच सांगितले. जळगाव येथील एका शेतकऱ्याने अशा पोशाखाबाबत त्याचा अनुभव सांगितला. त्याने खूप शोधल्यानंतर असा फवारणीचा एक पोशाख मिळाला. परंतु, हा एक प्रकारे रेनकोटप्रमाणेच आहे. हा अंगावर घालून फवारणी करू लागल्यास आत गरम होऊन गुदमरल्यासारखे होत असल्यामुळे अलीकडे वापरणे बंद केल्याचे त्याने मला सांगितले. सर्वसामान्यांमध्ये रसायनांच्या दुकानामध्ये असे पोशाख मिळतानाही दिसत नाहीत, यामागे हेच कारण असावे. फवारणी करणाऱ्याने स्वतःला विषबाधा होऊ नये, यासाठी किमान काही काळजी घेणे आवश्यक आहे. किमान नाक व तोंड झाकण्याची व फवारणीनंतर भरपूर पाण्याने स्वच्छ अंघोळ करण्याची काळजी घ्यावी. फवारणी करतेवेळी तंबाखू, पान, धुम्रपान करू नये. फवारणीचे द्रावण व वारा तोंडावर येणार नाही इतपत काळजी घ्यावी. डोक्‍यापेक्षा अधिक उंचीवरील रसायनांच्या फवारणीवेळी त्वचेवर पडणार नाही असे पाहावे. फवारणीनंतर कपडे बदलावेत. भारतीय हवामानात चालतील असे पोशाख तयार करण्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
  • फवारणीच्या उपकरणांची योग्य देखभाल करावी. हलक्या भागांमध्ये योग्य जागी वंगणतेल टाकावे. फवारणी यंत्र काम झाल्यानंतर स्वच्छ धुणे आवश्‍यक आहे. रसायनांच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्यांची विल्हेवाट पर्यावरणपूरक पद्धतीने लावावी. यानंतरचे प्रकरण रासायनिक तण नियंत्रणाचा शेती व पर्यावरणावर होणारा परिणाम असे आहे. आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा प्रकरणामध्ये तण नियंत्रणाचे शेतीतील फायदे सांगितले आहेत. (१९७४) १) पिकाच्या उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर. २) कार्यक्षम पीक उत्पादन पद्धत. ३) इंधन व मजूर खर्चात बचत. ४) उत्पन्नात वाढ. ५) विषारी अगर त्रासदायक तणांचे नियंत्रण. १) पिकांच्या उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर ः जर मुख्य पिकाबरोबर तणांची स्पर्धा झाली तर उत्पादनात घट येते. यांत्रिक अगर मानवी हात भांगलणीने पूर्ण तणनियंत्रण करणे अवघड आहे. यासाठी तणनाशके अगर त्याला यांत्रिक व हात भांगलणीची जोड दिल्यास तण नियंत्रण करणे सोपे जाते. कोलंबियातील एका प्रयोगात (लांगे १९७३) असे निष्कर्ष आहेत की हात भांगलणीपेक्षा तणनाशकाने तणनियंत्रण केल्याने बार्ली पिकात १५.६ टक्के, घेवड्यात २४.१ टक्के, मका पिकात २१.३० टक्के, कापूस १२.८ टक्के, बटाटा २०.१ टक्के, भात २४.४ टक्के, गहू १६.९ टक्के इतकी पिकाच्या उत्पादकतेमध्ये वाढ होत होत असल्याचे दिसून आले. २) कार्यक्षम पीक उत्पादन पद्धत ः तणनाशकाच्या वापराचा वेगवेगळ्या पीक पद्धतीत कसा परिणाम होऊ शकतो, हे अभ्यासण्यासारखे आहे. यामध्ये शून्य अगर कमीत कमी मशागत (संवर्धित) शेतीसंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. कोणत्याही पिकाच्या उत्पादन खर्चापैकी अंदाजे १६ टक्के खर्च हा पूर्वमशागतीसाठी होतो. तणनाशकाने तणनियंत्रण केल्याने हा संपूर्ण अगर मोठ्या प्रमाणात वाचविता येतो. १९८४ मधील आकडेवारीनुसार अमेरिकेत ३३ टक्के शेती या पद्धतीने केली जात होती. तेथील निष्कर्ष असे सांगतात की जर तणनाशकाने तणनियंत्रण केले तर पूर्वमशागतीचा पिकाला कोणताही फायदा होत नाही. पुस्तकात संवर्धित शेती तंत्राचे खालीलप्रमाणे फायदे दिले आहेत. १) या तंत्राने जमिनीमध्ये जलसंवर्धन होते. हे अवर्षण प्रवण व कोरडवाहू शेतीसाठी महत्त्वाचे आहे. २) यामुळे जमिनीची धूप थांबविली जाते. ३) जमिनीची कणरचना सुधारते. यामुळे जमिनीची जलधारण शक्ती सुधारते. ४) एक पिकाच्या कापणीनंतर जलद पुढील पिकाची पेरणी करता येते. याचे अनेक फायदे आहेत. ५) तणनियंत्रण जास्त चांगल्या प्रकारे करता येते. पिकाच्या प्राथमिक काळात जमिनी तणमुक्त राहतात. ६) पूर्वमशागतीसाठीचा वेळ, कष्ट व खर्च वाचतो. (वरील सर्व फायदे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.) या पद्धतीच्या काही मर्यादाही दिल्या आहेत. १) बहुवार्षिक तणांचे नियंत्रण होत नाही (ही मर्यादा दरम्यानच्या संशोधनामुळे आता संपली आहे.) २) रोग किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो (असा अनुभव मला गेल्या १३ वर्षात आला नाही. उलट कीड रोगाचे प्रमाण कमीच झाल्याचा माझा अनुभव आहे.) ३) जमिनीखाली कठीण थर तयार होतो. (असा माझा अनुभव नाही.) ४) पाणथळ कमी निचऱ्याच्या जमिनीसाठी ही पद्धत उपयुक्त नाही. (प्रचलित पद्धतीसाठीही ही मर्यादा आहेच.) ५) शेतकऱ्याने या तंत्राचे शास्त्र अवगत करून घ्यावे लागते. तंत्र यशस्वीपणे वापरण्यासाठी महत्त्वाच्या बाबी ः १) योग्य परिस्थितीसाठी योग्य तणनाशकाची निवड हे एक कुशल काम आहे. २) योग्य पिकाचा फेरपालट निश्‍चित केला पाहिजे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com