तणविज्ञानाची तत्त्वे 

तणविज्ञानाची तत्त्वे 
तणविज्ञानाची तत्त्वे 

अनेक वाचकांना सूक्ष्मजीवशास्त्राच्या तणविज्ञानावरील पुस्तक कसे, असा प्रश्‍न पडेल. भू-सूक्ष्मजीवशास्त्राचा शेतीतील प्रत्येक विज्ञानशाखेशी संबंध आहे, तसा तो तण विज्ञानाशी थोडा जास्तच जवळचा आहे. कृषिशास्त्रात तणाची व्याख्या ‘नको असलेली, नको त्या जागेला उगविलेली वनस्पती,’ अशी केली आहे. अशा तणांचा अभ्यास करणारी शास्त्रशाखा असेल यावर अनेकांचा विश्‍वास बसणार नाही. या शास्त्रशाखेवरील पुस्तकाचे लेखक डॉ. राव यांनी आपली विद्यावाचस्पती पदवी अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठात पूर्ण केली आहे.  पुस्तकाचे नाव ः प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स  लेखक ः डॉ. व्ही. एस. राव  प्रकाशक ः ऑक्‍सफर्ड अँड आय.बी.एच. पब्लिशिंग कं., नवी दिल्ली.  प्रकाशन वर्ष ः १९८३  पृष्ठे - ५३९  १९६२ मध्ये लेखक तण विज्ञान शाखेच्या अभ्यासाकडे वळले. पुस्तकाचा विषय प्रामुख्याने रासायनिक तण नियंत्रण हा आहे. त्याकाळात भारतात कीटक, रोगनाशकाच्या तुलनेत तणनाशकांची विक्री नगण्य होती. आज कीटक-रोगनाशकाच्या तुलनेत तणनाशकांची विक्री कित्येक पटीने जास्त असून, तणनाशकांचा वापर बेसुमार होत आहे. मजूरटंचाईमुळे तो दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. वापर जास्त असला तरी त्यांच्या शास्त्रशुद्ध वापराचा विचार करता उत्तर नकारार्थीच येईल.  तणनाशकाच्या किमती भरपूर आहेत. तसेच, त्याचे जमिनीवर व पर्यावरणावर परिणाम होऊ शकतात. यामुळे तणनाशकांचा अधिक शास्त्रशुद्ध आणि काटेकोर वापर होण्यासाठी अशा पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे.  लेखक लिहितो, पूर्वी मानवी व यंत्रांकडून तणनियंत्रण केले जात असे. त्यात आता रासायनिक व जैविक नियंत्रणाची भर पडली आहे. रासायनिक तण नियंत्रण कमी खर्चात व वेळेत होत असले तरीही १००% त्याकडे न जाता एकात्मिक तण नियंत्रणच केले पाहिजे.  रासायनिक तण नियंत्रणाचा उदय १९४७ मध्ये २-४ डी या पहिल्या तणनाशकाच्या व्यापारी उत्पादनाने झाला. मी १९७० मध्ये शेतीत सुरवात केली, त्या वेळी आम्हाला तणनाशकाची तोंडओळखही नव्हती. एखादे रसायन फवारणी करून तणनियंत्रण करता येते, यावर विश्‍वास न बसण्यासारखी परिस्थिती होती. भारतात १९६० मध्ये सर्वप्रथम चहा शेतीत प्रायोगिक स्वरूपात तणनाशकाच्या वापराला सुरवात झाली. परंतु, अन्य पीक क्षेत्रांत वापर होण्यास पुढे एक तपाचा कालावधी लोटला. भारतात केवळ दोन-तीन तणनाशकांचा वापर होत असताना त्या वेळी अमेरिकन बाजारपेठेत २५० तणनाशकांची विक्री सुरू होती. इतक्‍या तणनाशकांचा शोध गेल्या ३५ वर्षांत शास्त्रज्ञांनी लावला होता. आज त्यात कित्येक शेकड्यांची भर पडली असेल. आज तणनाशकाचा वापर हा शेतीतील अविभाज्य भाग बनत आहे. गेली ३०-४० वर्षे आपण तणनाशकांचा वापर करीत आहोत. आजही आपल्याला एखाद्या पिकाला कोणते तणनाशक किती प्रमाणात पाण्यात मिसळून वापरायचे, याविषयी फारशी माहिती नाही. अधिक शास्त्रयुक्त अभ्यासाच्या अभावामुळे तणनाशक वापराबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. या पुस्तकातून त्याचे थोडेफार निराकरण होईल अशी अपेक्षा.  या पुस्तकात सुमारे २२ प्रकरणे आहेत. त्यांची नावे ः १) तणविषयक सर्वसामान्य माहिती, २) तणे आणि परिस्थितीकी, ३) तण नियंत्रणाचे प्रकार, ४) तणनाशकाची कार्यपद्धती, ५) तणनाशकांचे वर्गीकरण, ६) तणनाशकांचे शोषण व तणांचे अंगात भिनणे, ७) तणनाशक तणाला नेमके कसे मारते, ८) तणनाशक तणाच्या अंगात भिनण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, ९) तणनाशकाचे अंश जमिनीत टिकून राहण्याचा अभ्यास, १०) पिकाच्या जातीनुसार होणारा तणनाशकाचा वेगवेगळा परिणाम, ११) सूक्ष्मप्रमाणात तणनाशक फवारणीचा परिणाम, १२) तणनाशकाचे मिश्रण, फेरपालट आणि आंतरसंबंध, १३) तणनाशके तयार करण्याचे शास्त्र, १४) तणनाशके फवारणीचे तंत्र, १५) काही मुख्य तणे व ते नियंत्रणाचे उपाय, १६) हंगामी व बहुवार्षिक पिकांतील तणनियंत्रण, १७) पाणवनस्पती व त्याचे नियंत्रण, १८) जंगले व पडिक जागेतील तणनियंत्रण, १९) तणासंबंधित संशोधन करण्याच्या पद्धती व शेतातील प्रयोग, २०) तणनियंत्रणाचे शेती व पर्यावरणावर होणारे परिणाम, २१) भारतातील तणविज्ञान पूर्वीचे, आताचे व भविष्यातील  मनुष्यबळ टंचाईमुळे बहुतांश शेतकरी तणनाशकांचा वापर करतात. अन्य कीटक, रोग याप्रमाणे तणनाशके ही रसायनेच आहेत. रसायने वापरल्याने तयार होणारी उत्पादने विषमय होऊन, ती सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या उद्‍भवणार असा एका बाजूने तणनाशकासंबंधीही प्रचाराचा धडाका सुरू आहे. दुसऱ्या बाजूला तणनाशकांच्या विक्रीचा आलेख वर्षानुवर्षे वाढत आहे. बदलत्या परिस्थितीत तणनाशकांचा वापर अपरिहार्य झाला आहे. मात्र, उगीच तण उगवले, मानवी भांगलणी शक्‍य नाही, की मारा तणनाशक, असे धोरण नसावे. तण आणि तणनाशकांविषयी नेमकेपणाने जाणून त्यांचा वापर केला पाहिजे. तणनाशकांचा किती वेगवेगळ्या बाजूने अभ्यास सुरू आहे, हे पुस्तकातील प्रकरणाच्या सूचीवरूनच कळू शकेल. हे १९८३ चे प्रकाशन आहे. त्यानंतर ३०-३५ वर्षे झाल्यानंतर यात अनेक तणनाशकांची भर पडलेली आहे.  मी तणविज्ञानाला भू-सूक्ष्मजीवशास्त्राची जोड देऊन त्याचा उपयोग आणखी चांगला करण्यासाठी शेतात सतत प्रयोग करत असतो. त्याचाही आढावा आपण नंतर घेऊ. पण सामान्यतः आपण केवळ तणनियंत्रणाकडे लक्ष देतो. देवाने शेतीत तणांचे नियोजन करून शेतकऱ्यांना अडचणीत व खर्चात टाकले आहे. रानात तणे नसती तर किती बरे झाले असते, शेती खूप सुखाची झाली असती, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची धारणा आहे. सुरवातीची ३०-३५ वर्षे तणमुक्त शेतीच्या ध्यासापोटी शारीरिक, यांत्रिक व आर्थिकदृष्ट्या मीही राब-राब राबलो. आता मी म्हणतो, ‘‘तणांचे नियोजन विधात्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केले आहे, करून घेतला तर त्यांचा शेतीत प्रचंड उपयोग होऊ शकतो. तण हे शेतीतील सर्वांत मुख्य संसाधन होऊ शकते.’’  विज्ञानातील कोणताही शोध हे दुधारी अस्त्र असते. वापरणाऱ्याने त्याचा कसा उपयोग केला, यावर त्याची उपयुक्तता ठरते. तणनाशकेही त्याला अपवाद नाहीत. काळ बदलेल तशा शेती करण्याच्या पद्धती बदलत जाणार आहेत. त्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतील. जुने ते सोने या म्हणीला चिकटून राहण्याऐवजी नवीन सुधारणांचा स्वीकार करावा लागेल. या पुस्तकातील शेतकरी उपयोगी भाग निवडून शेतकऱ्यांपुढे ठेवणार आहे. आता तणनियंत्रण, निर्मूलन नाही, तर तण व्यवस्थापन करावयाचे. तणाकडून पैसे मिळवायला शिकायचे! 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com