तणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास 

तणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास 
तणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास 

माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य वनस्पती वेगाने वाढून लावलेली रोपे वाढत नसल्याचे जाणवले असेल. त्या वेळी ही अन्य वनस्पती काढून टाकून तणनिर्मूलनाला प्रारंभ झाला. हाताने तण उपटून टाकणे पासून सुरू झालेला हा प्रवास आज तणनाशकांच्या अपरिमित वापरापर्यंत येऊन पोचला आहे. लेखक डॉ. व्ही. एस. राव यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकातील महत्त्वाच्या बाबी आपण पाहत आहोत.  तणांचा प्रसार सर्वत्र म्हणजे रस्त्यांच्या कडा, पडीक जमिनी या बरोबरच प्रामुख्याने शेतीमध्ये होत असतो. अन्य ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पतींपेक्षा पिकामध्य वाढणाऱ्या तणांचा मानवाला सर्वात जास्त त्रास होतो. लेखकाने पिकांच्या विविध कारणांनी होणाऱ्या नुकसानीचे सर्वेक्षण मांडले असून, त्यात तणामुळे सर्वाधिक ४५ टक्के नुकसान होते. त्यानंतर कीडीमुळे ३० टक्के, रोगांमुळे २० टक्के व अन्य कारणांमुळे ५ टक्के असे नुकसान होते. म्हणजेच शेतीतील उत्पादन वाढवायचे असेल, तर तण विनाशाला जास्त महत्त्व आहे. हरित क्रांती पूर्वीचे हे सर्वेक्षण आहे. (आज तणांच्या तुलनेत रोगकिडीमुळे होणारे नुकसान जास्त असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तण विज्ञान मागे पडत गेले असावे. शास्त्रीय जगतामध्ये वनस्पती विकृतीशास्त्र आणि कीटकशास्त्राला सर्वाधिक महत्त्व आले असावे.) तणे ही पिकाच्या तुलनेमध्ये अधिक काटक असतात. अवर्षणात ती जास्त काळ तग धरू शकतात. तसेच पिकाच्या तुलनेमध्ये अधिक अन्न फस्त करू शकतात. तणे पिकाबरोबर अन्नद्रव्ये, पाणी व सूर्यप्रकाश याबाबत स्पर्धा करतात. मुक्तपणे वाढू दिल्यास पिकाच्या वर वाढून पिकाचा सूर्यप्रकाश अडवू शकतात. यामुळे पिकाला फुटवे येणे, फांद्याची वाढ होणे यावर परिणाम होतो. तणामुळे होणारे पिकाचे नुकसान हे तणांच्या प्रजाती, तण वाढीचा कालावधी व अनुकूल प्रतिकूल हवामान इत्यादी घटकामुळे कमी जास्त होते. 

  • तणामुळे अगदी १० ते १५ टक्के पिकांचे नुकसान होते, असे गृहित धरले तरी भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे रुपये ३ हजार कोटीपर्यंत नुकसान होऊ शकते. जागतिक पातळीवर पिकाच्या नुकसानींचा अंदाज २८७, ५००,०० मेट्रिक टन इतका वर्तविला जातो. हे नुकसान एकूण उत्पादनाच्या ११.५ टक्केपर्यंत भरते. भौगोलिक परिस्थितीनुसार विचार केल्यास जास्त नुकसान उष्ण कटिबंधात होते. 
  • नुकसानीचे अनेक प्रकार या पुस्तकात नोंद केले आहेत. 
  • १. तणाने भरलेल्या जमिनीची किंमत कमी होते.  २. तणांशी स्पर्धा करू शकणारे पिकाचे वाण कमी.  ३. पीक उत्पादनाची प्रतवारी घसरते.  ४. मजुरांची कार्यक्षमता घटते.  ५. काही तणांची माणसाला ॲलर्जी.  तणनिर्मूलनाच्या पद्धतीचे कालमापन ः 

  • तणे आणि तणांचा पिकातील प्रादुर्भाव यांची समस्या मानवाच्या शेतीला सुरवात झाल्यानंतर काही काळातच लक्षात येत गेली असावी. कारण तण नियंत्रणाचे काम शेती सुरू झाल्यावर लगेच अंदाजे इसवीसन पूर्व १०,००० वर्षांपासून सुरू झाले असावे. तणशास्त्रज्ञ हे यांनी तण नियंत्रणातील उत्क्रांतीचा इतिहास मांडला आहे. 
  • इसवीसन पूर्व १०,००० वर्षे तणे हाताने काढणे. 
  • इसवीसन पूर्व ६००० वर्षे हातांनी चालविण्यायोग्य अवजारांचा वापर. 
  • इसवीसन पूर्व १००० वर्षे प्राण्यांद्वारे चालणारी अवजारे वापरण्यास सुरवात. 
  • सन १९२० यांत्रिक अवजारांचा वापर. 
  • सन १९३० जैविक नियंत्रण पद्धतीचा वापर सुरू. 
  • सन १९४७ रासायनिक तणनाशकाने (कार्बनी - ऑर्गनिक) 
  • कार्बनी तणनाशके वापरण्यास सुरवात होण्यापूर्वी १८९६ ते १९३० या काळात अनेक अकार्बनी (इनऑर्गनिक) तण नाशकांचा वापर केला जात होता. याचा अर्थ तणनाशकाची माहिती १९ व्या शतकाच्या अखेरीस युरोप अमेरिकेत झाली असावी. लेखक म्हणतो, मोरचुदाचा वापर तणनाशक म्हणून करण्याची प्रथा तिकडे अनेक वर्षे होती. याच्या वापरामुळे राष्ट्रीय उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्या काळातील शेतीत झालेले सर्वात फायदेशीर संशोधन अशी या शोधाची गणना केली जात होती. आज अकार्बनी तणनाशकाचा वापर पूर्णपणे बंद आहे. 
  • २, ४-डी चा वापर ः 

  • सुरवातीला २, ४-डी च्या शोधाला क्रांतिकारक घटना म्हणून मानले गेले. हे एकदल पिकासाठी निवडक तणनाशक असून, त्याचे कृषी उत्पादनावर दूरगामी परिणाम झाले. २, ४ - डी मुळे गव्हाचे उत्पादन हेक्‍टरी ६०० ते ९०० किलो वाढल्याची नोंद आहे. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. सारे जग अन्नधान्याच्या टंचाईने होरपळत असताना या संकटावर मात करण्यास या तणनाशकाची मोठी मदत झाली. विकसनशील देशामध्ये तणनाशकाच्या वापराची पुसट कल्पनाही नव्हती. औद्योगिकरण सुरू झाले नव्हते, त्यामुळे मुबलक मजूर बळाची उपलब्धता हे कदाचित एक कारण असावे. 
  • चॅंडकर (१९६९) हे शास्त्रज्ञ भारतातील माहिती पुरवतात. तणनाशकाने तण नियंत्रण केलेल्या रानातील भाताचे उत्पादन हाताने निंदणी केलेल्या रानाच्या तुलनेत जास्त आहे. तणनाशकाच्या वापरामुळे भाताचे उत्पादन २४ टक्के जास्त तर कापसाचे १३ टक्के जास्त मिळाले. तण नाशकामुळे मोठ्या प्रमाणात खर्चात बचत होते व शेती फायदेशीर होते. यामुळे पुढे भारतातही तणनाशकांचा वापर वाढत गेला. या बदलाबाबत लेखक लिहितो, हातात कोळपे घेऊन जाणारा शेतकरी आता पाठीवर पंप घेऊन जाताना दिसू लागला. 
  • १९४७ सालच्या २-४ डीच्या शोधानंतर तणनाशकांच्या शोधाला प्रचंड वेग आला. पुढील ३०-३५ वर्षांत २५० नवीन तणनाशकांच्या शोधाची नोंद केली गेली. पुढील १० वर्षांत वापरातील सुलभता लक्षात आल्याने तणनाशकांचा वापर वाढत गेला व शेतीशी संबंधित एक नवीन उद्योगाला सुरवात झाली. 
  • भारतातील स्थिती ः  भारतात चहा उद्योगात तणनाशकांनी प्रथम प्रवेश केला. लेखकाने वर नमूद केलेली परिस्थिती कदाचित तिकडे असावी. मी १९७० साली शेती करण्यास प्रारंभ केला, त्या वेळी मला तणनाशकासंबंधी काहीही माहिती नव्हती. बहुतेक शेतकऱ्यांकडे रसायने फवारणीची साधने नव्हती. ७०-७५ काळात मी क्वचित २-४ डी चा वापर केला असेल. १९८० च्या सुमारास अट्राझीन हे निवडक तणनाशक ऊस शेतीसाठी भारतीय बाजारात आले. तणे व पीक उगवण्यापूर्वी हे तणनाशक मारल्याने रानात फक्त उसाचीच उगवण होई. बाकी काहीच उगवत नसे. त्याकाळी हे एक आश्‍चर्य मानण्यासारखे होते. असे झाले तर भांगलणीचे काम बंद होऊन शेतमजुरावर उपासमारीची वेळ येईल असे वाटत होते. केवळ मजुरावर अवलंबून असणारे शेतकरीच याचा वापर करतील. घरचे मजूर असणारे शेतकरी यावर पैसा खर्च करणार नाहीत असे सुरवातीला वाटे. काही काळानंतर साखर कारखान्यांनी ५० टक्के सवलतीच्या दरात तणनाशके उपलब्ध करून दिल्यानंतर तणनाशकांच्या वापराने प्रचंड वेग घेतला. २-४ वर्षांनंतर संपूर्ण तणांचे नियंत्रण होईना. काही तणांचे नियंत्रण झाले. परंतु, काही नव्या तणांची वाढ वेगाने होऊ लागली. आता तणनाशकांचा वापरही होत राहिला. भांगलणीचे कामही सुरू राहिले. असे असले तरीही तणनाशकाचे महत्त्व पुढे वाढतच गेले. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com