...कोणता कृषिपूरक व्यवसाय करू?

कोणता कृषिपूरक व्यवसाय करू?
कोणता कृषिपूरक व्यवसाय करू?

व्यवसाय, उद्योगाच्या उभारणीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भांडवल. भांडवलाच्या उपलब्धतेसाठी विविध कार्यकारी सोसायटी, बॅंक यांची मदत घेतली जाते. मात्र, त्यासाठी एक प्रकल्प अहवाल बनवून त्यांच्याकडे द्यावा लागतो. या प्रकल्प अहवालातून त्या व्यवसायाचा संपूर्ण आराखडा देणे अपेक्षित असते. प्रकल्प अहवालाशी संबंधित बाबी, अडीअडचणी, समस्या याविषयी आपण माहिती घेऊ. राहुल हा गावातील होतकरू तरुण. वर्षापूर्वीच डी.एड. पूर्ण झाले असले, तरी नोकरीची शक्यता नाही. गावामध्ये मुलांच्या शिकवण्या सुरू करीत शेतीमध्ये लक्ष घालू लागला. त्याचे वडील प्रगतिशील शेतकरी. केवळ शेतीतून सर्व मुलांची शिक्षणे, सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असल्याने त्यांच्या दृष्टीने कायम शेती महत्त्वाची. राहुलनेही वडिलांच्याच पायावर पाय ठेवत शेतीतून चांगले उत्पादन काढणे सुरू केले. मात्र, वाढत्या महागाईमध्ये केवळ शेतीमधून भागणे अवघड, हे तर राहुलसह आई-वडिलांनाही जाणवत होते. शेतीला जोडून एखादा व्यवसाय करावा, असे मनात येत होते. पण नेमके करायचे काय? राहुलपेक्षा चार-पाच वर्षे मोठा, पण मित्रासारखाच असलेला सदाशिव. कृषी उच्च पदवीनंतर स्पर्धा परीक्षांचा तयारी करणारा. त्याच्याशी बोलताना आपली अडचण मांडली. बाजूच्या गावामध्ये पोल्ट्री मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याप्रमाणे पोल्ट्री करू की दुधासाठी गाई, म्हशी घेऊ, असा त्याचा प्रश्न होता. सदाने सांगितले, ‘‘कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी त्यातील केवळ फायद्याकडे बघून चालत नाही, तर धोक्याचाही विचार करावा लागतो. गावातल्या डेअरीच्या सचिवाला जाऊन भेट. तसेच आपल्या वाडीतील ज्ञानबाने गेल्या वर्षी पोल्ट्री टाकली. त्यालाही जाऊन भेट. त्यातील फायदे-तोटे, अडचणी सगळे जाणून घे.’’ राहुल थोडा हिरमुसला. त्याला वाटले होते की लगेच उत्तर मिळेल. त्याचा विचार जाणून सदा म्हणाला, मी उत्तर देण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये जे व्यवसाय करताहेत, त्यांच्याकडून खरे अनुभव तुला मिळतील. त्यांचे सारे ऐकून घे. त्यावर विचार कर. आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्यालाच मिळवावी लागतात.’’ राहुलच्या मनात खरेतर भांडवलाचीही अडचण होती. त्याविषयी आधीच विचारण्याआधी सदा म्हणतो तसे व्यवसायाविषयी जाणून तर घेऊ, असा विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलने डेअरी गाठली. दुधाचे संकलन सुरू होते. सुभानरावाने ‘या मास्तर’ असे म्हणत स्वागत केले. त्याची गडबड सुरू होती. ती पाहत राहुल बसला. गावातील एकेकजण दूध घेऊन येत होता. गाईचे, म्हशीचे दूध वेगळे जमा होत होते. प्रत्येक दुधाचा नमुना घेऊन त्याची यंत्राद्वारे तपासणी केल्यानंतर एक चिठ्ठी प्रत्येकास देत होते. सर्व व्यवहार यंत्राद्वारे होत असल्याने बऱ्यापैकी पारदर्शकता दिसत होती, तरी अनेक प्रश्नही पडले. दुधाचे संकलन संपताच सुभानरावाशी बोलणे सुरू केले. गावातील गाई व म्हशींची संख्या, दूध संकलन, दुधाचा भाव, दुधाच्या फॅटचे प्रमाण, पैसे देण्याची पद्धत अशा प्रश्नावरून गाडी ‘दूध सोसायटीचे सभासद किती? सभासद कोणास होता येते? सभासदाशिवाय इतरांचे दूध घेता का? दुधाची भेसळ कशी ओळखता? अशी वळली. शेवटी सर्वांत महत्त्वाची माहिती सुभानराव यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘राहुल, हे बघ आपली सहकारी सोसायटी नुसते दूध गोळा करते असे नाही, तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. सोसायटीशी तीन पशुवैद्यकीय व्यावसायिक जोडलेले आहेत. अगदी जनावरे खरेदी करण्यापासून मार्गदर्शन देतात. गाई घेण्यासाठी सोसायटी किंवा बॅंकेतर्फे कर्ज मिळवून देण्यात सगळी मदत करतो. त्यासाठी बँकेला आवश्यक ती हमीही देतो.’’ दूध व्यवसायाविषयी बरीचशी माहिती समजली होती. त्याच्या डोक्यामध्ये गणिते सुरू झाली. केवळ दूध व्यवसायातून गावामध्ये किती पैसा फिरतो, याचा त्याला अंदाज आला. त्यातील अडचणी सगळ्या कळल्या नसल्या तरी थोड्याफार जाणवल्या होत्या. या विषयावर अधिक चर्चा करण्याचे ठरवत त्याने सुभानरावाचा निरोप घेतला. ज्याच्या दुधाचे फॅट कमी भरत होते, त्यांच्या पट्ट्या कमी किमतीच्या निघत होत्या. ज्यांचे फॅट चांगले होते, त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. दरवर्षी नियमित चांगले दूध घालणाऱ्यांच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास दिसत होता. ते पशुखाद्याविषयी बोलत होते, जनावरांच्या आरोग्याविषयी बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून दुधाच्या ताज्या पैशाचे कौतुक जाणवून येत होते. मात्र, जे केवळ जनावरे पाळायची म्हणून पाळत होते, येईल तेवढे दूध घालत होते. त्यांच्या बोलण्यामध्ये हा व्यवसाय परवडत नसल्याचे मत येत होते. म्हणजे कोणताही व्यवसाय हा त्यातील व्यवस्थापनावर अवलंबून असल्याचे राहुलचा स्पष्टपणे जाणवले. कोणत्याही व्यवसायात व्यवस्थापन काटेकोर असल्यास तो फायद्यातच जायला हवा, हे त्याला जाणवत होते. त्याच्या चेहऱ्यावर समाधान असले, तरी बॅंकेचा विषय आला, तसे त्याला आपल्या भांडवलाच्या अडचणीची तीव्रतेने जाणीव झाली. त्याविषयी कोणा अनुभवी माणसांशी बोलायलाच हवे, असा विचार करत राहुलने घराची वाट धरली. अनिल महादार, ८८०६००२०२२ निवृत्त, सहाय्यक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com