लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस राहिला. डिसेंबरमध्ये हिवाळ्याची चाहूल लागते न लागते तोच पुन्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा दमदार हजेरी नोंदवली. हा पाऊस संत्रा-मोसंबी बागेतील मृग बहराच्या पिकासाठी पोषक असला, तरी आंबे बहरासाठी ताणावर सोडलेल्या बागांमध्ये ताणांच्या प्रक्रियेत व्यत्यय आणणारा ठरणार आहे. 

  • आंबे बहराची तोड बहुतांश बागेमध्ये पूर्ण झाली आहे. काही बागेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये क्लोरमेक्वाट क्लोराईड (सीसीसी) फवारणी झाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत पावसाने हजेरी लावल्याने या वर्षी हिवाळा लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत ज्या बागेमध्ये  मागील ८-१० दिवसांत सीसीसीची फवारणी झाल्यानंतर पाऊस आला असेल, अशा सर्व संत्रा, मोसंबी उत्पादकांनी क्लोरमेक्वाट क्लोराईड (सीसीसी) २ मिलि (हलक्या जमिनीत १.५ मिलि) प्रतिलिटर पाणी या प्रमाणात पुन्हा फवारणी करावी. 
  • आंबे बहराची तोड अजूनही प्रलंबित असलेल्या बागांमध्ये पॅक्लोब्युट्राझॉल ६ मिलि प्रतिझाड (२०-२५ टक्के तीव्रतेचे असल्यास ३०-२५ मिलि प्रति झाड) या प्रमाणात पाच लिटर पाण्यात मिसळून आळ्यातील मातीमध्ये द्यावे. 
  • काही बागेमध्ये किंवा काही झाडांवर हलका मृग असेल, आणि आंबे बहर घ्यावयाचा असेल, तर सीसीसीची फवारणी घ्यावी.
  • १५ जानेवारीनंतर बागेला पाणी द्यावे.  
  • निचऱ्याची समस्या आणि मूळकुज विदर्भ-मराठवाड्यात संत्रा-मोसंबीची लागवड प्रामुख्याने भारी, चिकणमातीच्या जमिनीत केली जाते. पावसाळ्यात अशा जमिनींतून पाण्याचा निचरा पुरेसा होत नाही. म्हणूनच नवीन लागवड पद्धतीनुसार उंच गादीवाफ्यांवर लागवडीची शिफारस केली आहे. सपाट जमिनींवर लागवड केलेल्या बागेमध्ये पावसाळा सुरू होण्याआधी बागेमध्ये उताराच्या दिशेने ३-४ फूट खोल व तितकेच रुंद चर खोदावेत. बागेतील सखल जागेमधून उताराच्या विरुद्ध दिशेने १.५ ते २ फुटांचे आडवे चर (नाल्या) खोदावेत. अशी व्यवस्था केल्यास जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत पाण्याचा निचरा चांगला होईल. यामुळे झाडाच्या मुळांना पाऊस थांबल्यानंतर वाफसा अवस्था मिळू शकेल. 

  • लिंबूवर्गीय फळझाडांची प्राणवायूची गरज ही अन्य वृक्षांपेक्षा जास्त आहे. पावसाळ्यातील पाण्याचा निचरा लवकर झाल्यास मूळकुज होणार नाही. अन्यथा बागेमध्ये मूळकुज व पाने पिवळी पडण्याच्या समस्या उद्भवू शकते. अशा समस्या बागेमध्ये नोव्हेंबरमध्ये दिसून येतात. अशा झाडांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतो. परिणामी अशा झाडांच्या उपचार-व्यवस्थापनासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा नंतर केलेल्या उपाययोजनांना बऱ्याच वेळा झाडाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून ‘उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला’ ही गोष्ट मनात पक्की रुजवली पाहीजे. अशी स्थिती बागेमध्ये दिसत असल्यास खालील उपाययोजना कराव्यात. 
  •  पिवळ्या पडत असलेल्या झाडांच्या आळ्यातील ६-८ इंच माती कुदळीने उकरुन मोकळी भसभुशीत करून घ्यावी. 
  •  वाळलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात. 
  •  मेटॅलॅक्झिल (४ टक्के) अधिक  मॅन्कोझेब (६४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम  किंवा मेटॅलॅक्झिल एम (४ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम या पैकी एकासोबत कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे तयार केलेले द्रावण ५ लिटर प्रतिझाड या प्रमाणात प्रभावित झाडांच्या मुळाच्या परिसरात आळवणी  करणे. याच बुरशीनाशकांची फवारणीदेखील करणे. झाडांना शिफारीत खतांच्या मात्रा देणे.
  •  : डॉ. अंबादास हुच्चे, ७५८८००६११८  (प्रमुख शास्त्रज्ञ (उद्यान विद्या),  आयसीएआर - केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com