ऑस्ट्रेलियातील वणवे आणि आपण...

ऑस्ट्रेलियातील वणवे आणि आपण
ऑस्ट्रेलियातील वणवे आणि आपण

हवामान बदलाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २०२० हे वर्ष ॲग्रोवनने हवामान बदल वर्ष म्हणून जाहिर केले आहे. हवामान बदलांशी संबंधित विविध घटकांचा आढावा व सातत्याने होणारी नवी संशोधने, आपण या सदरात घेणार आहोत. जागतिक पातळीवर हवामान बदलासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे. हरितगृह वायूचा ओझोनच्या थराला धोका, विषूववृत्त्वावरील बर्फाच्या वितळण्याचा वेग वाढला. समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होत आहे, किनाऱ्यावरील काही शहरांनाही मूठमाती मिळण्याचा धोका आहे, अशा एक सलग बातम्या येत असतात. त्याचा संबंध हवामान बदलाशी असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याचे शेतीवर नेमके काय परिणाम होणार आहेत, याविषयी स्पष्टता येताना दिसत नाही. त्यामुळे या साऱ्या आपल्यापासून दूर कोठेतरी घडणाऱ्या घटना असून, त्याचा आपल्याशी काय संबंध, असे शेतकऱ्यांना वाटू शकते. ‘‘आमच्या वेळी असं कदी हुयाचं नाही, पाऊस कसा रेघेत नक्षत्र बघत पडायचा,’’ असं उसासा सोडत गावखेड्यातील एखादा म्हातारबाबा म्हणतो. त्याचाही अर्थ आजच्या तरुण मुलांना कळत नाही. कारण बहुतांश तरुणही नक्षत्रांची भाषाही विसरून गेलेत. मात्र, या वाक्याचा अर्थ त्याला लागतो, तो कधीही येऊन वेडावाकडा झोडपून पिकांचे नुकसान करणाऱ्या पावसांमुळे. आताही डिसेंबर उलटून गेला तरी पावसाचे झोडपणे काही थांबलेले नाही. पूर्वी खरिपाचा शिल्लक ओलावा आणि मिळणाऱ्या एक दोन परतीच्या पावसावर ज्वारीचं उत्पादन व्हायचं. नदी, तलावांचा आधार नसलेली बहुतांश गावे कोरडवाहू. नाही म्हणायला विहीर बागायत असायची. परतीच्या पावसानुसार विहिरीचे पाणी किती पुरेल, याचा अंदाज घेत रब्बी, उन्हाळी पिकांची नियोजने व्हायची. आपला भाग हा मोसमी पावसाचा. या वर्षी एका भागामध्ये दुष्काळी स्थिती, तर एक भागामध्ये पूरस्थिती असे अत्यंत विचित्र हवामान राज्यात अनुभवास आले. भारतामध्ये पावसाचे नियमित दिवस कधीच बाजूला पडले आहेत. पाऊस खंडीत स्वरूपामध्ये विखरून पडत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारतात या वर्षी वणव्यांचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी (२०१८ मध्ये ) भारतीय जंगलातील वणव्यांची संख्या ३७ हजार ५९ इतकी होती. भारतीय वनसर्वेक्षण अहवालानुसार, या वर्षी वणव्यांची संख्या कमी म्हणजे २९ हजार ५४७ इतकी राहिली आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीमध्ये सर्वाधिक वणव्यांच्या घटना घडल्याची नोंद आहे. आपला परतीचा पाऊस हळूहळू खाली ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत जातो. या वर्षी तो खाली जाण्यासाठी उशीर झाल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये अद्यापही उष्ण आणि कोरडे वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये जंगलाला वणवे लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या वर्षी आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील सहा राज्यातील सुमारे १२० लाख हेक्टर क्षेत्र वणव्यांमुळे नष्ट झाले. सध्याही न्यू साउथ वेल्स या राज्यामध्ये आगीने थैमान घातले असून १८ माणसे मृत्युमुखी पडले आहेत. तर ९०० पेक्षा अधिक घरे जळून राख झाली आहे. हजारो माणसांचे स्थलांतर करावे लागले आहे. ऑस्ट्रेलियातील सिडने विद्यापीठातील पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरपासून लागलेल्या वणव्यामुळे सुमारे ४८० दशलक्ष सस्तन प्राणी, पक्षी आणि सरीसृप प्रभावित झाले आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियातील वणव्यांचे प्रमाण वाढण्यामध्ये उष्णतेची लाट आणि कोरडे वातावरण हे मुख्य कारण आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक उष्ण दिवस नोंदवला गेला आणि सोबतच कोरडा वसंत अनुभवास आला. महत्त्वाचे वणवे हे केवळ हवामानातील बदलांमुळे लागतात असे नव्हे, तर अनेक वेळा मानवाद्वारे जाणूनबुजून, अजाणते किंवा निष्काळजीपणामुळेही लागतात. हवामानातील बदलांचा विचार करताना आपण या घटकांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडेही उन्हाळ्यामध्ये अनेक भागात डोंगरांना आगी लावल्या जातात. विशेषतः गायरानामध्ये आगी लावण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामागे पुढील वर्षी अधिक गवत उगवते, असा एक पूर्वग्रह लोकांच्या मनात आहे. मात्र, त्यातून होणारी हानी मोठी आहे. मोठी झाडे, जंगले नष्ट होण्यासोबतच सजीवांना मोठा फटका बसतो. आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये जंगल, राने, शेत येथे आग लागणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com