कीटकांमधील बदलाचाही अभ्यास आवश्यक

कीटकांमधील बदलाचाही अभ्यास आवश्यक
कीटकांमधील बदलाचाही अभ्यास आवश्यक

हवामानातील विविध घटकांमध्ये होणाऱ्या बदलांचे प्रमाण कीटकांवर होणार असून, त्यांच्या प्रादुर्भावाची तीव्रता वाढणार आहे. याबाबत काही शेतकऱ्यांचे अनुभव प्रातिनिधिक ठरू शकतात. यावर अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. हवामान बदलामुळे येणारी चक्रीवादळे, पावसातील अनियमितता, बदलत असलेले ऋतू चक्र यावर सातत्याने बोलले जाते. मात्र, त्या अनुषंगाने आलेले अनुभव, निरीक्षणे यांच्या नोंदी ठेवण्याकडे आपले दुर्लक्ष असते, अशा नोंदी व त्याचे विश्लेषण पुढील संशोधनाला दिशा देऊ शकतात. दोन वर्षांपूर्वी हुमणी या किडीने ऊस पिकाचे मोठे नुकसान केले. त्याचप्रमाणे यावर्षी लष्करी अळीने मका पिकाचे नुकसान केले. जागतिक एकूण कीटकनाशक वापरांपैकी ७० टक्के कीटकनाशकांचा वापर केवळ कापूस आणि भात या दोन पिकावर केला जातो. पूर्वी वांग्यावर चार पाच फवारण्या पुरेशा ठरत. आज त्यांचे प्रमाण २०-२५ पर्यंत पोचले आहे. गेल्या वर्षभरामध्ये अभ्यासानिमित्त अनेक शेतकऱ्यांशी चर्चा झाली. त्यातील दोन शेतकऱ्यांची निरीक्षणे महत्त्वाची आहेत. एका शेतकऱ्याच्या शेतावर वाळवीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झाला होता. आंबा बाग, ज्वारी, पिकाखाली नसणाऱ्या जमिनीमध्ये असा सर्वत्र वाळवीचा वावर जाणवत होता. त्याच्या मतानुसार, दोन तीन वर्षांपूर्वी शेतामध्ये वाळवीचा वावर अल्प प्रमाणात दिसे. मात्र, अलीकडे साधी कडब्याची पेंढी तीन चार दिवस जमिनीवर पडून राहिली तरी त्या खाली वाळव्या जमा होतात. त्याच्या या अनुभवावरून वाळवीच्या अनुषंगाने उपलब्ध असणारे संशोधन वाचण्यात आले. त्यातून हवामानबदल आणि वाळवीचा प्रादुर्भाव याचा परस्पर संबंध लक्षात आला. जगभरामध्ये वाळवीच्या सुमारे २ हजार प्रजाती असून, त्यातील भारतामध्ये २२० प्रजाती आढळतात. वाळवीच्या खाद्यामध्ये गवत, पालापाचोळा, लाकूड, जमिनीतील कुजलेले खत, वनस्पतीची मुळे अशी विविधता असते. त्यानुसार त्यांचे कोरडे लाकूड खाणाऱ्या (Drywood termites), कुजलेले लाकूड खाणाऱ्या (Dampwood termites), भूमिगत वाळवी (Subterranean termites), किंवा फॉर्मोसॅन वाळवी (Formosan termites) असे अनेक प्रकार आहेत. यातील अनेक वाळव्या या पिकांसाठी त्रासदायक ठरतात. वाळवीच्या वारुळापासून सुमारे २३ किलोमीटर परिसरामध्ये वाळवीचा वावर राहतो. तिची प्रजनन क्षमता अफाट असल्यामुळे एखादे वारूळसुद्धा त्या परिसरातील शेतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. तापमान हे वाळवीच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी महत्त्वाचा घटक आहे. वाढणारे तापमान वाळवीचा खाण्याचा वेग व तिच्या प्रजननाचा वेगही वाढविते. जर तापमान २-३ अंश सेल्सिअसने वाढले तर वाळवीची संख्या दीडपटीपेक्षा जास्तीने वाढू शकते. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतामध्ये पूर्वी वाळवीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव होता. मात्र, तापमानातील वाढीसोबत तो तिथे वाढत गेला. वातावरणातील आर्द्रता आणि जमिनीमध्ये असणारी सातत्याची ओल याचा आणि वाळवीच्या संख्येचा परस्पर असा संबंध आहे. म्हणजे ओल असेल तर तिच्या खाण्याचा वेग वाढतो. बदलत्या पीक पद्धतीमुळे जमिनीमध्ये ओल आणि जमिनीवरचा जैवभार वर्षभर उपलब्ध असणे हे दोन्ही घटक वाळवीची संख्या वाढण्यास कारण ठरतात. त्या संशोधनामध्ये पुढे असा दावा केला आहे की, वाळवीमुळे मिथेन वायू उत्सर्जनात वाढ होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. पुन्हा मिथेन वायू जागतिक तापमानवाढीसाठी महत्त्वाचे कारण ठरू शकतो. दुसरा अनुभव, कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचा आहे. तो शेतकरी मागील दहा वर्षांपासून कांदा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो. अलीकडच्या दोन तीन वर्षांमध्ये त्याच्या बीज उत्पादनामध्ये घट येत आहे. पीक नेहमीसारखेच जोमदार येते. फुलेही ही तेवढ्याच संख्येने लागतात. मात्र, त्यात बी तयार होत नसल्याचा त्याचा अनुभव होता. कांद्यामध्ये परपरागीभवनाने बीजनिर्मिती होते. परपरागीभवन घडवून आणणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे मधमाशी. त्याची संख्या कमी झाल्यामुळे कांद्यामध्ये बीजनिर्मिती कमी होत असावी. मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागे कीडनाशकांच्या वाढलेला वापर, जैव विविधतेत घट, पीक विविधतेचा होणारा ऱ्हास अशी अनेक कारणे असल्याचे मानले जाते. त्याला आणखी एक जोड द्यावी लागेल, ती म्हणजे हवामान बदल. मुळात मधमाशी ही बदलत्या वातावरणातही तग धरून राहणारा कीटक आहे. वास्तविक जगाच्या कानाकोपऱ्यात म्हणजेच वाळवंटी प्रदेश ते थंड प्रदेश असा मधमाश्यांचा वावर आढळतो. बदलत्या वातावरणामुळे मधमाश्यांमध्ये सॅक ब्रुड डिसीस (SBV), अमेरिकन फौल ब्रुड हे रोग आणि मेणावरील पतंग, कोळी अशा कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या वसाहती वेगाने कमी होत आहेत. शेतकऱ्यांच्या नोंदी महत्त्वाच्या... हवामानबदल या संकटाचे अनेक पैलू आपल्याला अद्यापी अज्ञात आहेत. कोणत्याही शास्त्रज्ञापेक्षा शेतकरी हा अधिक काळ शेतामध्ये असतो. त्याला त्याच्या परिसरातील माहिती, पारंपरिक समजही अधिक असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनुभव, नोंदी लक्षात घेऊन त्यांचे विश्लेषण करावे लागेल. त्यातील महत्त्वाची गृहीतके अधोरेखित करून त्यावर संशोधन करावे लागेल. आज कोणत्याही गोष्टीला हवामान बदलाशी जोडण्याची मानसिकता होत आहे. त्यालाही आळा घालण्यासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. - डॉ. सतीश करंडे, ८८०५२९२०१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com