agriculture stories in Marathi Climate change, Dr. Nagesh Tekale part2 | Agrowon

शिवारामधील हुंदक्यांच्या मुळांपर्यंत जाताना

डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 11 जानेवारी 2021

वातावरण बदल ही समस्या शेतकरी समजतात, तशी तंतुमय मुळासारखी वरवरची नाही. ती आता वटवृक्षासारखी खूप खोल जाऊन रुजलेली आहे.

औद्योगिक क्षेत्र आणि कृषी एकमेकांच्या हातात हात घालून “सध्या उपभोगून घ्या! पुढचे पुढे बघू” असा तात्कालिक विचार करत सहभागी होतात. वातावरण बदल ही समस्या शेतकरी समजतात, तशी तंतुमय मुळासारखी वरवरची नाही. ती आता वटवृक्षासारखी खूप खोल जाऊन रुजलेली आहे.

२०२० साल संपले. संपले म्हणण्यापेक्षा ते जिवावरच उठले होते. कोरोना महामारीमध्ये आपल्या देशाने एकजुटीने, शिस्तबद्ध काम करून अवघ्या जगाला चकित केले. अर्धे जग आजही लॉकडाउनमध्ये घरात बंद असताना आम्ही सर्व काळजी घेऊन बऱ्यापैकी घराबाहेर आहोत. याचे सर्व श्रेय कोरोना योद्ध्यांना दिले पाहिजे. काही ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. मात्र त्याच वेळी दसऱ्याच्या काळात शेतकऱ्यांच्या फुलांचे टेम्पो दादरच्या फुलमार्केटमध्ये रिकामे न होता सरळ धारावीच्या महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये खत बनण्यासाठी रवाना झाले, याचा विसर पडता कामा नये. कष्टाचे मोती व्हावे, ही अपेक्षा असताना त्याचे खत झाल्याची सल माझ्या मनात आजही कायम आहे. शहरी बाबू म्हणतात, ‘‘शेतकरी फार हुशार आहे, त्याला व्यवहार बरोबर कळतो.’’ म्हणूनच वातानुकूलित गाडीमधून फिरणारा कोथिंबिरीच्या १० रु.च्या जुडीसाठी घासाघीस करतो. खरा शेतकरी तुम्हाला दिसतो तसा हुशार आणि व्यवहार चतुर कधीच नव्हता. तो होता आपला सावता माळी. “कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी”. फुलाचे गणित शेतकऱ्यांना कधीच कळाले नाही आणि ते शिकविण्यासाठीच वातावरण बदलाने त्यांना हा धडा दिला होता. झेंडू अवकाळी पावसाने भिजला म्हणून नाकारला गेला. आमचा भोळाभाबडा शेतकरी या प्रसंगातून यापुढे वातावरण बदलास गुरुस्थानी ठेवून, त्याला नमन करेल तो दिवस सोन्याचा ठरावा. सरत्या २०२० वर्षात फक्त फुलांचेच निर्माल्य झाले असे नाही, तर उभ्या कृषी उत्पादनाची चव शेतकऱ्याच्या मुखापर्यंत जाण्याआधी निसर्ग राजाने काढून घेतली. संपलेले वर्ष म्हणजे सर्वत्रच “शेत शिवारामधील हुंदके” होते. कुठे नि:शब्द तर अनेक ठिकाणी अश्रूंचा डोह.
आजही मला १५ ऑक्टोबरची सकाळ आठवते. सोलापूर शहराला खेटून असलेल्या एका खेड्यामधून एका शेतकऱ्याचा फोन आला होता. आवाजात व्याकुळता होती, आर्जव होते. १३ ऑक्टोबरच्या वारावादळास जोडून आलेल्या मुसळधार पावसात त्याचे सर्व सोयाबीनचे शेत रचलेल्या गंजीसह बाजूच्या ओढ्यात डोळ्यासमोर वाहून गेले. आई, वडील, बायको आणि तान्ह्या लेकराला घरात ठेवून तो रात्रभर पीक वाचवण्याचा प्रयत्न करत होता. “माझ्या शेताला पाणी पाजणारा हा ओढा आज असा का रागावला? हे असे विपरीत का घडले?” हाच त्याचा एकमेव प्रश्‍न होता. त्याला दु:खातही बोलके करून धीर देण्याचा मी प्रयत्न केला. तो सांगत होता, की तीन एकराच्या तुकड्यावर म्हातारा- म्हातारीने सुखाने संसार केला. घरात खरीप आणि रब्बीला धान्याच्या दोन कणगी कायम भरलेल्या असत. शेताच्या जिवावरच त्यांनी दोन मुलींची लग्ने आणि मुलाला शिक्षण दिले. बांधालगत वाहणाऱ्या ओढ्याचा त्यांना आशीर्वाद होता. ते त्यांचे मंदिर होते म्हणूनच तर त्यांनी ओढ्यालगतच्या बांधावर १५-२० झाडे लावली होती, त्यातील चारपाच झाडांनी लग्नात त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली होती. पुन्हा बापाने त्यांची जागा भरली होती. मुलगा हाताखाली आला. एवढ्या तीन एकराच्या तुकड्यात कसे भागणार? बांध कोरावयास हवेत, ओढा आपल्या बाजूने रुंद करावयास हवा, या त्याच्या आग्रही मागणीसमोर वृद्ध आईवडील हतबल झाले होते. ओढा रुंद करण्यात सर्व झाडांचा बळी गेला. शेतात पारंपरिक पिकांच्या जागी कापूस, सोयाबीन आले. सुरुवातीस गणित बरोबर जमले. नंतर मात्र बेरीज गुणाकाराऐवजी वजाबाकी आणि भागाकारच होऊ लागला. आपल्या वडिलांचे अनुभवाचे बोल आपण ऐकले नाहीत, हे त्यानं बोलता बोलता मान्य केले. “यापुढे निसर्ग अवकृपेला तोंड देताना मी हताश कधीही होणार नाही.” हे त्याचे उद्‌गार आजही माझ्या लक्षात आहेत. अगदी आठ दिवसापूर्वीच त्याचा पुन्हा फोन आला. ओढ्याच्या बांधावर पूर्वी जेवढी झाडे होती, तेवढी सर्व रोपे मी आज लावली आहेत ती सुद्धा आबांच्या (वडील) हाताने. माझ्या नजरेसमोर मी न पाहिलेले वयोवृद्ध आबा आणि त्यांच्या सुरकुत्यांनी भरलेल्या चेहऱ्यावरील हास्य येथून दिसत होते. वातावरण बदलाच्या समस्येला संकट न समजता हे यापुढे आव्हान असणार आहे, याचा प्रत्यक्ष धडा स्वतःच्याच वावरात घेतलेला हा तरुण शेतकरी माझा खरा विद्यार्थी होता. ज्ञानाच्या शोधात आपण विनाकारण जगभर फिरत असतो, मात्र खरे ज्ञान देणारे गुरू, आपले आईवडील, कुटुंबातील वडिलधारी माणसे जवळच असतात. वातावरण बदलाच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी कुठल्या तज्ज्ञाकडे अथवा विद्यापीठाकडे जाण्याची गरज नाही. अनुभवाचे विद्यापीठ तुमच्या घरीच असते, फक्त आपण त्यांचा आणि त्यांच्या ज्ञानाचा सन्मान करावयास हवा. वातावरण बदलाच्या समस्येचे उत्तर आपल्या घरातच जुन्या माणसाकडे असू शकते याचा विसर पडता कामा नये.

वनस्पती जगतामध्ये सर्वसाधारणपणे जमिनीखालील मुळांचे ‘सोटमूळ’ आणि ‘तुंतुमय मूळ’ या दोन भागांत वर्गीकरण केले जाते. वटवृक्षाची मुळे सोटमुळांच्या अंतर्गत येतात. एक मुख्य मूळ जे जमिनीत खोल जाते आणि मुख्य वृक्षाला आधार देते आणि त्यापासून चारीही अंगाला फुटलेली उपमुख्य मुळे, त्यात पुन्हा लहान, मोठी असा तो पसारा जमिनीचा आत सर्वत्र पसरलेला असतो. जेवढा वृक्षाचा जमिनीवरचा पर्णसंभार तेवढा मुळांचा घेर अपेक्षित असतो. तंतुमय मुळे जमिनीलगत वरच्या बाजूला मर्यादित जागेत पसरलेली असतात. नारळ, सुपारी, तृणधान्ये यात मोडतात. वातावरण बदलाची समस्या ही वटवृक्षाच्या मुळांसारखी आहे आणि त्यात आता पारंब्यांचीही भर पडली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आपणास जमिनीमध्ये खोल सोटमुळाच्या टोकापर्यंत जाऊन सर्व मुळांच्या उगमाचा आणि त्यांच्या पसाऱ्याचा जवळून अभ्यास करावयास हवा. कारण वातावरण बदल हे अनेक समस्यांचे जाळे आहे. याच जाळ्यात आज आपण सर्वजण अडकलो आहोत. म्हणूनच जीव गुदमरण्याआधीच या जाळ्यातून यशस्वीपणे बाहेर पडावयास हवे. वड, पिंपळ, उंबर यांसारखे वृक्ष पूर्वी कोणीही लावत नव्हते. ते आपोआप पक्ष्यांच्या विष्ठेच्या साह्याने उगवून येत. आमच्या मागच्या पिढीने त्यांची काळजी घेतली असे म्हणण्यापेक्षा त्यांचे संरक्षण करून पूजन केले. मागील ५०-६० वर्षांपर्यंत निसर्गाचा आपणावर कायम आशीर्वाद होता. आज जेव्हा महामार्ग निर्मितीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा हजारो वटवृक्षांची कलेवरे पडलेली पाहतो, तेव्हा संवेदनशील मनाला ज्या वेदना होतात. ते समजण्यासाठी मानवी मनही तेवढेच हळूवार नाजूक हवे. एक वटवृक्ष जेव्हा आपण कापतो, तेव्हा त्याच्या आधारावर आणि त्याने दिलेल्या अन्नावर जगणाऱ्या हजारो जिवांना आपण निराधार करत असतो. वातावरण बदलाची समस्या सृष्टीमधील अशा शेकडो लहान घटनांमधूनच प्रतिध्वनित होत असते.

विजापूरच्या गोलघुमटामधील मानवी आवाजांच्या ऐकू येणाऱ्या प्रतिध्वनींचे आपणास मोजमाप करता येत नाही. वातावरण बदलामध्ये सुद्धा जगाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात निसर्गाची हानी आणि त्यावर अत्याचार सुरू असतात. पण त्याचे परिणाम अवघ्या विश्‍वाला भोगावे लागतात. तिथे गरीब श्रीमंत हा भेदभाव मुळीच नसतो. या समस्येला मी वटवृक्षाची मूळसंस्था असे संबोधले आहे. वटवृक्षाच्या विस्तारासाठी निर्माण होणाऱ्या पारंब्या म्हणजे विकासाच्या माध्यमातून सारासार विचार न करता पर्यावरणाचा होणारा नाश. यात औद्योगिक क्षेत्र आणि कृषी एकमेकांच्या हातात हात घालून “सध्या उपभोगून घ्या! पुढचे पुढे बघू” असा तात्कालिक विचार करत सहभागी होतात. वातावरण बदल ही समस्या शेतकरी समजतात, तशी तंतुमय मुळासारखी वरवरची नाही. ती आता वटवृक्षासारखी खूप खोल जाऊन रुजलेली आहे. या वर्षी पाऊस जास्त झाला आणि लांबलासुद्धा. आता पुढच्या वर्षी तो नेहमी सारखा असेल ही आपली भाबडी समजूत आहे. वातावरण बदलाच्या समस्येचा समूळ नाश करण्यासाठी आपणां सर्वांस एकत्र येऊन प्रयत्न करावयास हवेत. प्रत्येकाचा यामध्ये असणारा सहभाग यापुढे बहुमोलाचा असणार आहे. “त्याने झाड तोडले, मग मी तोडल्याने काय फरक पडणार आहे?” “त्याने एक ‘बोअर’ घेतली, त्याला पाणी लागले, आता त्याच्या जवळच माझ्या शिवारात मी दोन ‘बोअर’ घेईन आणि ऊस लावेन.” ही जीवघेणी स्पर्धाच आज काही वर्षांसाठी आलेला वातावरण बदलरूपी पाहुण्याचा मुक्काम वाढविण्यास कारणीभूत ठरते. तंबूत घुसलेल्या या उंटावर वेळीच नियंत्रण ठेवायला हवे, अन्यथा या सुंदर विलोभनीय वसुंधरेचा तंबू नष्ट होण्यास फार वेळ लागणार नाही.


इतर कृषी सल्ला
असे करा कोबीवर्गीय पिकांतील किडींचे...कोबीवर्गीय भाजीपाला पानकोबी व फुलकोबीवर मावा,...
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
शेतकरी नियोजन पीक - ज्वारीज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘...स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
डाळिंब बागांसाठी पाण्याचे व्यवस्थापनजानेवारी अखेरपासून पाण्याची उपलब्धता कमी होत जाते...
सकाळी सौम्य थंडी; दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
शाश्‍वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धतीग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-...
कृषी सल्ला (आंबा, काजू, नारळ, सुपारी,...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून...
शिवारामधील हुंदक्यांच्या मुळांपर्यंत...औद्योगिक क्षेत्र आणि कृषी एकमेकांच्या हातात हात...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
शेतकरी नियोजन ः पीक केळी----------------------- शेतकरी ः प्रेमानंद हरी...
वांग्यामधील शेंडे, फळ पोखरणाऱ्या अळीचे...नुकसानीचा प्रकार :  अळी पानांच्या...
शेतीचे भवितव्य शाश्‍वत करतानामी  १९६०-७० च्या दशकात अनुभवलेली, जगलेली...
कलिंगड, खरबूज काढणीकलिंगड काढणीस तयार झाल्याची लक्षणे  फळांवर...
तापमानात वाढ, थंडीचे प्रमाण कमी होणार...महाराष्ट्राच्या उत्तरेस १०१२, तर दक्षिणेस १०१०...