भविष्यासाठी नद्या जपण्याची गरज

भविष्यासाठी नद्या जपण्याची गरज
भविष्यासाठी नद्या जपण्याची गरज

प्रत्यक्ष जीवनामध्ये हवामानाचे विविध बदल जाणवून येत नसले तरी त्याची तीव्र जाणीव आपत्तीच्या स्थितीमध्ये येते. आपत्ती म्हणजे एकदम टोकाची परिस्थिती होय. ‘पाणी म्हणजेच जीवन’ एवढे म्हणून चालणार नाही, तर ते जपण्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात तयार करावी लागेल.

आपल्या डोळ्यासमोरून वाहणारी नदी जोपर्यंत नेहमीप्रमाणे आपल्या मार्गाने वाहत असते, तोपर्यंत आपल्याला तिची जाणीव होत नाही. ‘संथ वाहते कृष्णामाई’ या ग. दी. माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या गीताप्रमाणेच ‘तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही; नदी नव्हे ही निसर्ग निती आत्मगतीने सदा वाहती’ आपल्या नियमांनी ती वाहत असते. या गीतामध्ये केवळ नदीला तीरावरल्या लोकांच्या सुखदुःखाची जाणीव नाही, हेही तितकेसे खरे नाही. कारण, तीरावरल्या लोकांनाही तिच्यापासून केवळ लाभाचीच अपेक्षा असते. त्यातून मिळणाऱ्या पाण्यावर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अशा चार राज्यांतील शेती पिकांनी फुलून हिरवीगार होते. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये कृष्णेसह पंचगंगेचे मोलाचे योगदान आहे. नदी किंवा निसर्गाकडून मानवाला केवळ घ्यायचे माहीत आहे. काही त्याग करण्याची वेळ आली, की कृतघ्न माणूस त्यापासून नेहमीच पळ काढतो. यावर्षी या नद्यांना आलेल्या पुरामुळे काहीतरी केले पाहिजे, ही जाणीव सर्वसामान्यांमध्येही पसरली. अर्थात, यासाठी शासकीय पातळीवरील प्रयत्न, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याला सर्वांनी लोकसहभागाची जोड दिली पाहिजे.   दर पाच वर्षांनी बदलणाऱ्या सरकारबरोबरच धोरण आणि निती बदलत जाते. निसर्गाला तुमचे सरकार, प्रशासन यांच्याशी काही देणेघेणे नसते. खरेतर निसर्गाला त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या लक्षावधी सजीवाप्रमाणे माणूस हा यत्किंचित सजीव. आपल्या खोडपात्री स्वभावाप्रमाणे त्याच्या उलाढाली कितीही मोठ्या असल्या तरी एकूण निसर्ग त्याला एखाद्या क्षणी तो कस्पटाप्रमाणे असल्याची जाणीव करून देतो. पृथ्वीच्या निर्मितीपासून आतापर्यंत हजारो सजीवांच्या प्रजाती उदयाला आल्या, वाढल्या, उत्क्रांत झाल्या आणि नष्टही होऊन गेल्या. निसर्गाला काही फरक पडणार नाही. मात्र, कोपलेल्या निसर्गामुळे माणसाला नक्कीच फरक पडू शकेल. आपण साऱ्या विश्वाचे वाळवंटीकरण केले तरी वाळवंटातील जीवसृष्टी तेथे तग धरून निसर्ग चालू राहील. माणसाला मात्र पाणी आणि शेतीशिवाय जगता येईल का, हाच विचार सर्वांनी करायला हवा.  नदी जपण्याची भावना रुजवणे आवश्यक आपल्या परिसरातील पाण्याचा प्रत्येक स्रोत जपणे, पाणी कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी मला पुणे जिल्ह्यातील साळुंब्रे (ता. मावळ) येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयाची आठवण येते. ही शाळा आपल्या सर्व विद्यार्थी आणि गावकऱ्यांसह पवना नदीला जपण्याची शपथ दरवर्षी घेते. पवनामाईची आरती करून ओटी भरली जाते. हे गाव नदीमध्ये कोणत्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेते. ही जाणीव त्यांच्यामध्ये शालेय वयापासून रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य या शाळेने केले आहे. या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक व्यंकटराव भताने यांनी अन्य १५ शाळा, गावे यांना सोबत घेत मावळातील इंद्रायणी व अन्य नद्याबाबतही असेच कार्यक्रम सुरू केले. गेल्या २९ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा त्यापुढील मुख्याध्यापकांनीही सुरू ठेवली आहे. नुकतेच २०, २१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापक राजेंद्र लासूरकर, सहकार्यवाह व्यंकटराव भताने यांनी जलदिंडी प्रतिष्ठान, पवना नदी काठावरील ग्रामपंचायती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यासोबत १९०० विद्यार्थ्यांनी नदी जपण्याची शपथ घेतली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com