हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणा

सर्व विज्ञान शाखांनी स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी एकात्मिक पातळीवर संशोधन करण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक ती यंत्रे, उपकरणे यांची माहिती घेऊ.
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणा
हवामान बदल समरस शेतीसाठी हवी यंत्रणा

आज अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले, तरी भविष्यात पाण्याची कमतरता वेगाने जाणवणार आहे. या स्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने सर्व विज्ञान शाखांनी स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी एकात्मिक पातळीवर संशोधन करण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक ती यंत्रे, उपकरणे यांची माहिती घेऊ. वेगवेगळ्या कारणांमुळे हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित झाली आहे. जागतिक व स्थानिक पातळीवर हवामानबदल आणि त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यात विविध पिकांचे उत्पादन घटण्याबरोबरच, त्यातील सकसता, चव आणि पोषक घटक यांचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. २०२०-२१ चा विचार केल्यास महाराष्ट्रात पावसाळ्यात ओला दुष्काळ, हिवाळ्यात अवकाळी पाऊस आल्याने खरीप व रब्बी पिकांचे नुकसान झाले. ऊस पिकाला तुरे आले. द्राक्ष, डाळिंब, आंबा अशा फळबागांचे बहर कोलमडून पडले. केळी पिकाचे वादळामुळे मोठे नुकसान झाले. विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कोरोनामुळे आधीच सामाजिक पातळीवर सर्वांसोबतच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा अक्षरशः पाचोळा झाला. यावर कडी म्हणजे सध्या बर्ड फ्लूचे संकट वाढत आहे. म्हणजेच कृषिपूरक क्षेत्रातून सुरू असलेली थोडीफार आवकही अडचणीत येऊ शकते. हे संकट जैवविविधता जोपासणाऱ्या, कीडनियंत्रणातही मोलाची भूमिका निभावणाऱ्या पक्ष्यांच्या मुळावर उठले आहे. येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये अशा संकटांमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी कृषी विद्यापीठाकडून हवामान बदलाला सामोरे जाण्याची क्षमता असणारे पिकांचे वाण आणि व्यवस्थापन तंत्राची मागणी राजकीय व्यक्ती, अभ्यासक आणि तज्ज्ञ यांच्याकडून केली जात आहे. नव्या संशोधनासाठी आवश्यक घटक ः कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून अपेक्षा केल्या जात असताना कोणत्याही संशोधनासाठी आवश्यक बाबी पुरवण्याच्या दृष्टीने उदासीनता दिसून येते. १) आधुनिक यंत्रे, उपकरणे. २) ही यंत्रे वापरण्यासाठी कुशल, योग्य मनुष्यबळ. ३) प्रयोगशाळा, प्रक्षेत्रांची उपलब्धता इ. हेही खरे आहे, की प्रत्येक विद्याशाखांसाठी वेगवेगळी यंत्रणा उभारण्यासाठी मोठा खर्च येऊ शकतो. या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर संशोधने सुरू झाली, तरी त्यातील ताळमेळ आणि एकात्मिकता जपली जाईलच असे नाही. म्हणून एकल शाखा किंवा स्वतंत्र संशोधनाला एकात्मिक आंतर विज्ञान शाखीय संशोधन प्रकल्पांची जोड दिली पाहिजे. कारण आज केवळ कृषी विद्याशाखेमध्ये संशोधन करतो असे म्हटले, तरी ते एकाच व्यक्तीला शक्य होणार नाही. कारण त्याला एकाच वेळी माहिती-तंत्रज्ञान, दूरस्थ संवेदन, हवामानशास्त्र व कृषी हवामान शास्त्र या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखांतील ज्ञान असण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी एकापेक्षा अधिक आणि वेगवेगळ्या विद्या शाखांतील व्यक्तींनी एकत्र येऊन संशोधन करणे सोईस्कर आणि आर्थिकदृष्ट्याही योग्य ठरणार आहे. हवामान बदल आणि त्याचे शेतीवरील दुष्परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठे आणि एक पशू व मत्स्य विद्यापीठांमध्ये एक स्वतंत्र हवामान बदल विषयक प्रयोगशाळा किंवा केंद्र उभारता येईल. हवामानासह विविध अजैविक व जैविक ताणासाठी सहनशील शेती म्हणजेच हवामान बदल समरस शेती होय. भविष्यामध्ये बदलत्या हवामानामध्ये योग्य ठरतील अशा पीक वाण, शेती व्यवस्थापन तंत्राच्या विकासासाठी असे केंद्र नक्कीच उपयोगी पडेल. या केंद्रामध्ये उपयोगी ठरतील, अशी यंत्रे, उपकरणे ः अ) दूरस्थ संवेदन ः यामुळे हवामान स्थिती, हवामान बदल, हवामान अंदाज, पावसाचा अंदाज मिळण्याबरोबरच अजैविक आणि जैविक ताण याची माहिती मिळण्यास मदत होईल. पिकांवरील रोग व किडींच्या स्थितीचे फोटो मिळतील. पाणी, पीक उत्पादने, रोग व कीड अंदाज काढता येईल. दूरस्थ संवेदन प्रणाली दोन घटकांमध्ये वर्गीकृत झाली आहे. १) कृत्रिम उपग्रह दूरस्थ प्रणाली ः यामध्ये कृत्रिम उपग्रह (उदा. मॅटसॅट) याद्वारे उपलब्ध होणारी माहिती आणि तिचे विवरण करणारी यंत्रणा वापरता येते. २) डॉप्लर यंत्रणा ः याद्वारे वादळाचा, ढगाचा, पर्जन्याचा अचूक अंदाज मिळवता येतो.(फोटो १) ३) ड्रोन (मानवविरहित चलित वाहन) ः याचा उपयोग शेती व्यवस्थापन, हलक्‍या मालाची वाहतूक, जमीन, पीक-पाणी मोजणी करण्यासाठी, हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी होतो. (फोटो २(अ) ते २(ड) ब) जमिनीवरून वापरायची दूरस्थ प्रणाली या प्रणालीमुळे सूक्ष्म हवामान, पिकांच्या क्षेत्रातील हवामान, जमिनीतील (मृद्‍) बाष्प, झाडातील पाण्याचे प्रमाण, हरितद्रव्याचे प्रमाण, झाडाकडून सूर्यकिरणांचे होणारे परावर्तन, अन्ननिर्मितीचा दर आदी घटकांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष माहिती मिळते. यावरून अप्रत्यक्ष पीक उत्पादन, त्याचा दर्जा, रोग व कीड आणि सिंचन वेळ यांचे अनुमानही काढता येते. याकरिता पुढील यंत्रणा, उपकरणे लागतात. १) स्वयंचलित हवामान केंद्र २) फोटोसिंथेसिस सिस्टिम ३) हायपर स्पेक्‍ट्ररल रेडिओमीटर ४) स्पेक्‍टो रेडिओमीटर ५) इन्फ्रारेड थर्मामीटर आणि अन्य. बदलत्या हवामानाचा परिणाम काढण्यासाठी - बदलते हवामानाची शेतीवरील परिणाम जाणून घ्यावे लागणार आहेत. त्याचे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी संशोधनासाठी खालील प्रकारची सुविधा असाव्यात. यात प्रामुख्याने विशिष्ट प्रकारची काचघरे (ग्लास हाउस), हरितगृहे, शेडनेट हाउस यांची निर्मिती करावी लागते. अ) रेनआउट शेल्टर ः पावसातील खंड, दुष्काळ, मुसळधार पाऊस (ओला दुष्काळ) यांचा सामना करणारी, अशा हवामान स्थितीस ताण सहनशील पिकांचे वाण आणि पीक ताण व्यवस्थापन तंत्र विकसित करण्यासाठी याचा उपयोग होतो. हवामान आधारित पीकविमा निश्‍चितीसाठी याचा फायदा होतो. 

ब) ओपन टॉप चेंबर (ओटीसी) ः यामध्ये विविध प्रमाणांत कार्बन डायऑक्‍साइड देऊन वाढ, विकास आणि उत्पादन हे पिकांचे घटक तपासले जातात. वेगवेगळ्या वायूंच्या प्रमाणामध्ये रोग व किडींची वाढ, विकास व प्रमाण तपासता येते. यामुळे पीक उत्पादन, अंदाज, रोग व किडी अनुमान काढता येऊ शकते. क) फेस (FACE) : यास ‘फ्री एअर कार्बन एनरिचमेंट’ असे म्हटले जाते. याचा वरीलप्रमाणे (ओटीसी प्रमाणे) उपयोग तर होतो. मात्र हवामान पीकविमा ठरविण्यासाठी अधिक प्रमाणात उपयुक्त ठरू शकते.  ड) टीजीटी किंवा फेट ः यास ‘टेम्परेचर ग्रॅडिएन्ट टनेल’ किंवा ‘फ्री एअर टेंपरेचर टनेल’ असे म्हणतात.

 पिकाचे अथवा रोग व किडींच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांतील आणि एकूण जीवनचक्रासाठी लागणारी तापमान पातळी (कार्डिनल टेंपरेचर) काढता येते. यामुळे तापमानास (कमी अथवा अधिक) सहनशील पीक वाण आणि पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उपयोग होतो. वरील प्रकारची सुविधा आणि त्यास वापरणारे योग्य मनुष्यबळ कृषी विद्यापीठांमध्ये दिल्यास वातावरण बदल समरस शेतीकरिता संशोधनाला चालना मिळेल. डॉ. प्रल्हाद जायभाये, ०७९८०६८४१८९ (कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com