केळीच्या पिल बागेतील सिगाटोका रोगाचे व्यवस्थापन

पिल बागेतील सिगाटोका रोगाचे व्यवस्थापन
पिल बागेतील सिगाटोका रोगाचे व्यवस्थापन

केळी पिकावर दरवर्षी पिवळा करपा म्हणजेच ‘सिगाटोका’ या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. पोषक हवामान मिळाल्यास या रोगाची तीव्रता जलद गतीने वाढते. रोगाने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर रोग नियंत्रणात आणणे अतिशय जिकिरीचे ठरते. सध्या या रोगाच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. हवेतील आर्द्रता फार वेळ टिकून रहाणे, दवबिंदू पडणे यामुळे पानांवरील पृष्ठभाग कायम ओला राहतो. या अवस्थेत पानावरील बिजाणू पटकन रूजून त्यांची भरमसाठ वाढ होते. अशा वेळी २७ अंश सेल्सिअस तापमान व मधून मधून पाऊस पडत असल्यास या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. सध्या जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर या तालुक्यांत अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, चिनावल, सावखेडा, कुंभारखेडा व निंबोरा या गावातील पिल बागेत ५ - १० टक्क्यांपर्यंत करपा रोगाची तीव्रता आढळून आली आहे. या रोगाचे वेळीच नियंत्रण न केल्यास त्याचा फैलाव जून - जुलै महिन्यात लागवड केलेल्या नवीन बागेवर निश्चित होणार आहे. रोगाचा अधिक प्रसार होण्याआधीच सार्वजनिकरीत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. रोगाची लक्षणे या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम झाडांच्या खालच्या पानांवर आढळून येतो. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर, पानांच्या शिरेस समांतर बारीक पिवळसर लांबट गोल ठिपके दिसून येतात आणि कालांतराने ठिपके वाढून वाळून जातात. त्यांचा रंग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो. या ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाची वलये निर्माण होतात. करपा रोगाचे ठिपके सर्वसाधारणपणे पानांच्या कडावर आणि शेंड्यावर विशेषतः आढळून येतात. रोगास अनुकूल हवामान दीर्घकाळ टिकून राहिल्यास ठिपके एकमेकात मिसळून पाने टोकाकडून करपतात. जास्त प्रमाणात तीव्रता असल्यास संपूर्ण पान सुकते, एकूण कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. याचा विपरीत परिणाम केळी उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होतो. करपा रोगाचा प्रसार

  • या रोगाचे बिजाणू पिल बागेतील इतस्ततः पडलेली खोडे, पानाचे अवशेष व कोवळी पिले यावर तग धरतात.
  • पोषक तापमान आणि जास्त प्रमाणात आर्द्रता असे पर्यंत हे बिजाणू रोग निर्मितीचे कार्य करत असतात. हे बिजाणू पावसाचे पाणी, जोराचा वारा यामुळे लांब अंतरावर वाहून नेले जातात, त्यामुळे रोगाचा फैलाव जलद गतीने होतो.
  • करपा रोगामुळे होणोरे नुकसान करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील हरित द्रव्याचा ऱ्हास होऊन पाने करपतात. परिणामी झाडांवरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. अन्न निर्मितीच्या प्रकियेत बाधा निर्माण होऊन पोषणाअभावी फळांची योग्य वाढ होत नाही. फळे आकाराने लहान राहतात, फळात गर भरत नाही. अर्थातच फळांचे वजन आणि दर्जा खालावतो. रोगाची तीव्रता वाढल्यास घडांवर परिणाम होऊन घडातील फळे अकाली पिकू लागतात. अशा फळांना बाजारात मागणी नसते. याचा एकूण उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान संभवते. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात २० ते ५० टक्के नुकसान होते. करपा रोगाच्या प्रसारास अनुकूल बाबी

  • शिफारसीपेक्षा कमी अंतरावर रोपांची लागवड करणे.
  • पाण्याचा अयोग्य निचरा असलेल्या जमिनीत केळीची लागवड करणे.
  • बागेत तणांचा प्रादुर्भाव होणे आणि सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव.
  • पाण्याचा अतिरिक्त वापर. अगदी ठिबक सिंचनाद्वारेही शेतकरी अधिक वेळ पाणी देतात.
  • मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमित न काढता त्याकडे दुर्लक्ष राहणे.
  • पिकांची फेरपालट न करता सतत केळीचे पीक (एकच एक पीक) घेणे.
  • संपूर्ण वर्षभर केळी पिकाची केव्हाही लागवड करणे.
  • पिल बागेचे अयोग्य व्यवथापन तसेच प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करणे.
  • करपा रोगाचे नियंत्रण

  • गाव पातळीवर एकात्मिक पद्धतीने करपा रोगाचे सामूहिक नियंत्रण करणे गरजेचे आहे.
  • करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच, पानाचा रोगग्रस्त भाग काढून टाकावा. पानाचा ३० टक्के भाग करपल्यास ते पान काढून जाळून नष्ट करावे.
  • शिफारस केलेल्या अंतरावरच (१.५ मी. बाय १.५ मी. किंवा १.८ मी. बाय १.८ मी.) लागवड करावी.
  • बागेत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होईल, याकडे लक्ष द्यावे. बाग कायम वाफसा स्थितीत ठेवावी.
  • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचा प्रकार, हंगाम तसेच पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेऊन शिफारसी प्रमाणे बागेला पाणी द्यावे. बागेत अतिरिक्त आर्द्रता निर्माण होऊ देऊ नये.
  • बाग आणि बांध नेहमी तण मुक्त आणि स्वच्छ ठेवावेत.
  • मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत.
  • शिफारस केलेल्या अन्नद्रव्याची मात्रा (२०० ग्रॅम नत्र ः ६० ग्रॅम स्फुरद ः २०० ग्रॅम पालाश प्रती झाड) वेळापत्रकानुसार द्यावी. नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा.
  • बागेत पिकाचे कोणतेही अवशेष न ठेवता नष्ट करावेत.
  • केळी हे एक पीक न घेता पिकाची फेर पालट करावी.
  • रासायनिक नियंत्रण : १) रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी क्लोरथॅलोनील २ मि.ली. किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा काॅपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम. २)रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मिली. या बुरशीनाशकांची स्टिकर मिसळून फवारणी करावी. गरज भासल्यास पुढील फवारणी करताना बुरशीनाशक बदलावे. ३) परिणामकारक फवारणीसाठी गटूर पंपासारखा फवारणी पंपाचा वापर करावा. ४) फवारणी शक्यतो सकाळी करावी. पानांचा वरचा व खालचा पृष्ठभाग द्रावणाने पूर्णपणे भिजेल, याची काळजी घ्यावी. संपर्क ः ०२५७/२२५०९८६ (अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com