कपाशी सल्ला

कपाशी पिकात बोंड सड, लष्करी अळी, आकस्मिर मर आणि गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. वेळीच उपाययोजना कराव्यात.
कपाशी सल्ला
कपाशी सल्ला

कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना मागील दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या जाणवत आहे. ही समस्या प्रामुख्याने बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत आढळली. अशी बहुतेक बोंडे बाह्य भागावरून निरोगी दिसतात. ती फोडून बघितल्यानंतर आतील रुई व बिया प्रामुख्याने पिवळसर-गुलाबी ते लाल रंगाचे होऊन सडत असल्याचे दिसते. साधारणतः बोंडातील एक ते दोन कप्पे तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडते. कारणे : पावसाळ्यात होणारा संततधार व रिमझिम पाऊस, सतत ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता इ. घटकांमुळे आंतरिक बोंड सडण रोगाची समस्या आढळते. हा रोग प्रामुख्याने संधिसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणाऱ्या रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात आंतर्वनस्पतीय रोगकारक बुरशीमुळे होतो. उपाय योजना: १. आंतरिक बोंड सडण : पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. अशा वेळी फवारणी प्रति लिटर पाणी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.२ ग्रॅम. २. बाह्य बोंड सडन : बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी पायराक्लोस्ट्रॉबीन (२०% डब्लू.जी.) १ ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १ मिली किंवा ॲझॉक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू/डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% डब्लू/डब्लू एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम किंवा फ्लूक्झापायरोक्झाड (१६७ ग्रॅम/ली) अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन (३३३ ग्रॅम/ली एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) ०.६ ग्रॅम. ३. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. (लेबलक्लेम आहे.) कपाशीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्याशेजारी लागवड असलेल्या कपाशीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. अशा ठिकाणी पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात. १. पानांच्या खालच्या बाजूने असणारे लष्करी अळीचे अंडीपुंज व अंड्यांतून नुकत्याच बाहेर पडलेल्या सुरवातीच्या अवस्थेतील समूहाने राहणाऱ्या अळ्या शोधून त्वरित नष्ट कराव्यात. सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या ह्या फक्त पाने खातात. त्यांचा वेळीच नायनाट केल्यास पुढे फुले व बोंडाना होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. २. यांत्रिक पद्धती : कपाशीचे प्रादुर्भाग्रस्त फुले व बोंडे वेचून अळ्यासहित नष्ट करावेत. अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल. ३. जैविक नियंत्रण : त्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटारायझीम ॲनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा नोमुरिया रिलाई ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सध्या वातावरण जैविक बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्याने किडीचे परिणामकारक नियंत्रण मिळण्यास मदत होईल. ४. रासायनिक पद्धती : प्रादुर्भावग्रस्त कपाशीवर स्पिनेटोरम (११.७ एस सी.) ०.८ मिली अथवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस सी.) ०.३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. (लेबलक्लेम आहे.) छायाचित्र ः PNE20R10659 मक्याशेजारील कपाशी शेतामध्ये लष्‍करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कपाशीतील आकस्मिक मर रोग / पॅराविल्ट कारणे : गेल्या काही दिवसापासून सलग पाऊस पडत आहे. असा सतत पडणारा पाऊस आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या जमिनीत कपाशीची झाडे पिवळी पडल्याचे दिसून येते. पाणी फार काळ साचून राहत असलेल्या शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. -या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. -पॅराविल्ट किंवा आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. अकाली पानगळ तसेच पाते व बोंडगळ सुद्धा होऊ शकते. पानांच्या वाढलेल्या श्वसनामुळे पाने मलूल पडतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगग्रस्त झाडात अँथोसायनिन (जांभळा-लाल) रंगद्रव्याचा विकास झाल्याचे दिसून येऊ शकते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. गुलाबी बोंडअळी गुलाबी बोंडअळी नियंत्रणात राहण्यासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात करावयाच्या उपाययोजना १. पतंगाच्या निरिक्षणासाठी कामगंध सापळे २ प्रति एकरी या प्रमाणे लावावेत. २. पीक फुलोरा अवस्थेत आल्यावर गुलाबी बोंड अळीचे निरीक्षण सुरु करावे. डोमकळ्या तोडून नष्ट कराव्यात. ३. बोंड धरण्याच्या अवस्थेत एकरी २० बोंडे तोडून, त्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव तपासावा. ४. सरासरी आठ नर पतंग प्रति सापळा सलग ३ रात्री आढळल्यास किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंडात जिवंत अळ्या आढळल्यास जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा बॅक्टरी ६० हजार प्रति एकर या प्रमाणे प्रसारण करावे. ५. रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२०% एएफ) २ मिली किंवा थायोडिकार्ब (७५% डब्लूपी) २ ग्रॅम किंवा क्लोरपायरीफास (२०% ईसी) २.५ मिली किंवा प्रोफेनोफोस (५०% ईसी) ३ मिली किंवा इंडोक्साकार्ब (१४.५%) ०.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५% एसजी) ०.५ मिली. ५. आवश्यकतेनुसार कीटकनाशक बदलून दुसरी फवारणी घ्यावी. एकच एक कीटकनाशक व कीटकनाशकांच्या मिश्रणाचा उपयोग टाळावा. (लेबलक्लेम आहे.)

शैलेश गावंडे, ९४०१९९३६८५ (केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com