झुकिनी लागवड तंत्रज्ञान

झुकिनी लागवड तंत्रज्ञान
झुकिनी लागवड तंत्रज्ञान

झुकिनी या परदेशी भाजीचे उगमस्थान अमेरिका असले, तरी इसवी सन १५००च्या सुमारास इटालियन लोकांनी या भाजीच्या लागवडीत अधिक सुधारणा करून त्यास झुकिनी असे संबोधले. झुकिनी हे इटालियन नाव आहे. इटलीतून या भाजीचा प्रसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मेक्‍सिको, फ्रान्स, तुर्कस्थान, ब्राझील, चीन, जर्मनी आणि भारत आदी देशांत झाला. झुकिनी हे समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश या नावाने ओळखले जाते. त्याची शास्त्रीय नावे अनुक्रमे कुकुरबिटा मॅझिमा आणि कुकुरबिटा पेपो अशी आहेत. दोन्ही प्रकारातील झाडे बुटकी, झुडूप वजा असतात. झुकिनीच्या झुडूपवजा झाडांवर नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुले असतात. नर फुलांचा आकार मादी फुलांच्या आकारापेक्षा लहान असून, दोन्ही फुलांचा रंग पिवळा असतो. इतर देशांमध्ये या फुलांचा उपयोग खाण्यासाठी किंवा पदार्थ सजविण्यासाठी करतात. काकडी आणि दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच आकाराने दिसणारे या पिकाचे फळ गर्द हिरवे, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येते.

लागवड :

  • झुकिनी पिकाचा कालावधी फारच कमी असतो. तो जातीपरत्वे हंगामाप्रमाणे बदलतो. सर्वसाधारण कालावधी थंड हवामानात १० ते १५ दिवसांनी लांबतो. लागवड वर्षभर करता येत असली, तरी पावसाळ्यातील (जून-जुलै) लागवड उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर ठरते.
  • हिवाळ्यात लागवड केल्यास वाढीचा कालावधी लांबल्यामुळे उत्पादन नेहमीपेक्षा १०-१५ दिवसांनी पुढे जाते. उन्हाळ्यातील लागवड हिवाळी हंगामापेक्षा नक्कीच किफायतशीर ठरते. मात्र, पाण्याचा ताण पिकास मानवत नाही. हरितगृहातील नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेमध्ये लागवड केल्यास वर्षभर लागवड करणे शक्‍य होऊन फळांची प्रत व उत्पादनामध्ये वाढ होते.
  • झुकिनीचे झुडपासारखे झाड साधारपणे ९० ते १०० सेंमीपर्यंत उंच होते. झाडाची पाने हंगामाप्रमाणे ४५ ते ६० सेंमी घेराची असून, फुले (मादी) व फळे खोडावर लागतात. त्यामुळे फळांची काढणी अतिशय सोपी जाते.
  • खुल्या शेतीसाठी हंगामाप्रमाणे (हिवाळी, पावसाळी व उन्हाळी) जातींची निवड करावी. भारतीय व परदेशी कंपन्यांनी प्रसारित केलेल्या संकरित जातीचे बियाणे महाराष्ट्रात उपलब्ध आहे.
  • पोषक द्रव्ये :  झुकिनी या भाजीत भरपूर प्रमाणात पोषक द्रव्ये (जीवनसत्त्वे, खनिजे, तंतूमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ) उपलब्ध असतात. फळाच्या सालीत तंतूमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. हृदयाचे ठोके नियंत्रित करणे तसेच पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी झुकिनी फळ महत्त्वाचे आहे. 

    खाण्याची पद्धत :  झुकिनी निरनिराळ्या पद्धतीने शिजवून खाण्याची इतर देशांत पद्धत आहे. उदा. पाण्यात किंवा रसात मंदपणे शिजवून खाणे, मांसाहारी खाद्य तयार करण्यासाठी झुकिनीचे तुकडे करून त्यात मिसळणे, टोमॅटो, ढोबळी, मिरची, वांगी, गाजर आदींमध्ये मिसळून ऑलिव्ह तेलामध्ये गरम करणे अशा विविध पद्धती वापरून झुकिनीचे आहारात सेवन करतात. भारतात झुकिनीचे बारीक तुकडे तयार करून ‘सॅलड’ म्हणून खाण्यासाठी वापरतात. फळाच्या गोल चकल्या करून त्यास मीठ लावून कच्च्या स्वरूपात खाल्या जातात. भारतात मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समधून झुकिनीला मागणी असते. 

    महाराष्ट्रातील परिस्थिती :  महाराष्ट्रातील शेतकरी लहान क्षेत्रात झुकिनीचे उत्पादन घेतो. फळांची उत्तम प्रत, उत्पादन, खते, किडी-रोग नियंत्रण याबाबतच्या तांत्रिक माहितीचा मात्र अभाव आहे. 

    लागवड तंत्रज्ञान : 

  • हवामान : उष्ण व समशितोष्ण हवामानात लागवड यशस्वीपणे करता येते. सूर्यप्रकाश, कमी आर्द्रता (४०-४५ टक्के) आणि रात्रीचे तापमान १८ अंश से. तर दिवसाचे तापमान ३० अंश से. अशा हवामानात झुकिनीचे उत्पादन व फळांची प्रत चांगली मिळते. हरितगृहात वर्षभर लागवड करण्यासाठी तापमान १० ते ३० अंश से. आणि सापेक्षा आर्द्रता ४० ते ४५ टक्के नियंत्रित असावी. पंचतारांकित हॉटेल्समध्ये दर्जेदार झुकिनी फळांना मागणी वर्षभर असल्याने हरितगृहात लागवड किफायतशीर ठरते.
  • जमीन : हे पीक हलक्‍या व मध्यम भारी जमिनीत चांगले येऊ शकते. परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उत्तम मानवते. जमीन लागवडीआधी उभी-आडवी नांगरट करून टिलरच्या साहाय्याने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करणे आवश्‍यक आहे. जमीन तयार करताना शेवटच्या कुळवाच्या वेळी एकरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. जमिनीचा सामू (पी. एच.) ६.५ ते ७ पर्यंत असावा. लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे आवश्‍यक आहे. पारंपरिक लागवड पद्धतीत जमिनीची पूर्व तयारी झाल्यानंतर ६० सेंमी रुंद व ३० सेंमी उंच आणि सोयीप्रमाणे लांब आकाराचे गादीवाफे तयार करून घ्यावेत. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ६० सेंमी ठेवावे. म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये ४० मीटर लांबीचे ८३ वाफे तयार होतात.
  • लागवडी पश्‍चात व्यवस्थापन : लागवड तयार केलेल्या गादीवाफ्यांवर ९० सेंमी अंतरावर वाफ्याच्या मध्यावर सरळ रेषेत करावी. लागवड दोन प्रकारे करता येते. 

    प्रत्यक्ष बी टोकून ठराविक अंतरावर लागवड करणे :  या पद्धतीत टोकलेले बियाणे मुंग्या खाऊन टाकतात व नांगे पडण्याची शक्‍यता असते. एकरी चार किलो फोरेट गादीवाफ्यांतील मातीत बी टोकण्यापूर्वी मिसळून द्यावे. या पद्धतीने एकरी ३७२५ रोपांची लागवड होते.

    प्लॅस्टिक ट्रेमध्ये बी टोकून रोपे तयार करणे :  या पद्धतीत रोपांची वाढ जोमदार होते. रोपे एकसारख्या उंचीची तयार होतात. लागवड केल्यानंतर उत्पादन १०-१५ दिवस आधी सुरू होते. ट्रेमध्ये माध्यम तयार करण्यासाठी निर्जंतूक कोकोपीटचा उपयोग करावा. 

    ट्रेमध्ये बी पेरणे व व्यवस्थापन :   

  • बी पेरण्यासाठी (टोकण्यासाठी) प्रत्येक कोकोपीट भरलेल्या कपाच्या मध्यभागी हाताच्या बोटाने अंदाजे ०.५ सेंमी खोलीची खूण करून घ्यावी.
  • खूणा केलेल्या प्रत्येक कपामध्ये झुकिनीचे एक बियाणे टोकून बी झाकून घ्यावे.
  • बी पेरून झाल्यानंतर १० ट्रे एकावर एक याप्रमाणे ३ ते ४ दिवस ठेवावेत. ते प्लॅस्टिक पेपरने झाकून टाकावेत. 
  • अंकूर दिसू लागताच प्लॅस्टिक पेपर काढून टाकावेत. सर्व ट्रे शेडनेट हाऊसमध्ये रोपांची योग्य वाढ होण्यासाठी गादीवाफ्यावर पसरून ठेवावेत.
  • तापमानाप्रमाणे प्रत्येक ट्रेमधील रोपांना झारीने हलके पाणी द्यावे.
  • रोपांचे मुळकूज रोगापासून संरक्षण होण्यासाठी मॅंकोझेब एक ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन ड्रेंचिंग करावे.
  • रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी आठ आणि १२ दिवसांनी १९:१९:१९ विद्राव्य खत दीड ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारावे. किडींचा प्रादुर्भाव होऊ नये शिफारस केलेल्या कीडनाशकांची योग्य वेळेत, योग्य डोसमध्ये फवारणी करावी.  
  • रोपे पुनर्लागवडीसाठी १५ दिवसांनी तयार होतात. लागवड करण्यापूर्वी हार्डनिंग होण्यासाठी रोपांना पाणी न देता ती ३-४ दिवस शेडनेट हाऊसमधून बाहेर काढावीत व रोपांवरील सावलीचे प्रमाण कमी करावे.
  • तयार झालेली रोपे कोकोपीटसह ट्रेमधून बाहेर काढल्यानंतर लेखात वर नमूद केल्याप्रमाणे गादीवाफ्यांवर ९० सेंमी अंतराने पुनर्लागवड करावी. रोपांना हलके पाणी द्यावे. लागवड दुपारनंतर करावी. 
  • हरितगृहातील लागवड :

  • निर्जंतुकीकरण : हरितगृहात तयार केलेल्या माध्यमातून येणारे रोग-कीड नियंत्रित करण्यासाठी माध्यमाचे निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. निर्जंतुकीकरण सूर्यप्रकाशाद्वारे तसेच रासायनिक पद्धतीने करता येते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांचा वापर करावा. 
  • आच्छादनाचा वापर : लागवडीआधी गादीवाफ्यांवर काळ्या पॉलिथिन पेपरचे आच्छादन करावे. आच्छादन केल्यामुळे वाफ्यातील मातीचे तापमान नियंत्रित राहून पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. तणाचे नियंत्रण होऊन मजुरीचा खर्च वाचतो. फळांचा जमिनीला स्पर्श न होता त्यांची प्रत चांगली मिळते.
  • लागवड व्यवस्थापन : खुल्या शेतात गादीवाफ्यावर मध्यावर सरळ रेषेत ९० सेंमी अंतरावर बी टोकून अथवा रोपे लावून लागवड केली जाते. एकरी ३७२५ एवढी झाडांची संख्या ठेवता येते. बियाणे एकरी ७०० ते ८०० ग्रॅम लागते. बाजारात झुकिनीच्या गर्द हिरव्या फळांना जास्त मागणी असून, पिवळ्या रंगाच्या झुकिनी फळांना साधारण मागणी असते. बी टोकल्यांतर किंवा रोपांची लागवड झाल्यानंतर लगेच पाणी देण्याची व्यवस्था करावी.

    हरितगृहातील लागवड :  चार हजार चौरस मीटर हरितगृहात निर्जंतुकीकरण आणि वाफे तयार झाल्यानंतर व मल्चिंग पेपर वाफ्यांवर टाकल्यानंतर लागवड वर नमूद केल्याप्रमाणे ९० सेंमी अंतरावर बी टोकून अथवा रोपे लावून करावी. लागवड पूर्ण झाल्यानंतर ठिबकच्या साहाय्याने पाणी द्यावे. बी टोकून लागवड केल्यावर ५ ते ६ दिवसांत बियांची उगवण होते. बियाणे उगविण्यासाठी हरितगृहामध्ये १९ ते ३० सें. ग्रे. तापमान आणि सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के नियंत्रित करावी.

  • पाणी व्यवस्थापन : जोमदार वाढीसाठी आणि उत्तम प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे अतिशय आवश्‍यक आहे. ठिबकद्वारे पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांच्या मात्राही देता येतात. पिकाला दररोज किती लिटर पाण्याची संभाव्य गरज (लिटर) आहे हे प्रथम निश्‍चित करून दररोज पाणी देण्याचा कार्यक्रम निश्‍चित करावा. पिकाच्या वाढीच्या काळात कोरडी हवा पडली असल्यास किंवा पाण्याची कमतरता पडण्यास पिकावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. विशेषत: बी उगवताना, पिकाची जोमदार वाढ होताना आणि फळधारण होऊन फळे पोसतांना पाण्याचा तुटवडा पडू देऊ नये.
  • खत व्यवस्थापन : झुकिनीच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी खतांचा योग्य प्रमाणात आणि योग्यवेळी वापर महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवशी खतांच्या मात्रा ठिबकमधून देण्यासाठी त्यांचा तक्ता तयार करून घ्यावा. एक एकर क्षेत्रासाठी एकूण नत्र ५० किलो, स्फुरद २६ किलो आणि पालाश ५५ किलो इतक्‍या अन्नद्रव्यांची गरज आहे. पाण्याचा सामू व विद्युतधारकता योग्य असल्याची निश्‍चिती करावी.
  • आंतरमशागत : तणांचा बंदोबस्त करणे, नांगे भरणे, रोपांना मातीची भर देणे, दोन रोपांतील मोकळ्या जागेत आच्छादन करणे आदी कामे करणे आवश्‍यक असते.  
  • पीक संरक्षण : कीड नियंत्रण : तांबडे  भुंगे :  लक्षणे - ही कीड पानांचा हिरवा भाग खाते. मुळे, खोड आणि जमिनीजवळची पाने अळी खाते. हरितद्रव्याच्या अभावामुळे झाडाची वाढ खुंटते. उत्पादनावर परिणाम होतो. फळमाशी :  लक्षणे - या किडीची माशी लहान फळांच्या सालीखाली अंडी घालते. अंड्यांमधून अळ्या बाहेर पडल्यावर फळातील गर खातात. फळे विक्रीसाठी अयोग्य ठरतात. मावा आणि तुडतुडे :  लक्षणे - या किडी पानांच्या खालच्या भागावर राहून पानातील हरितद्रव्ये शोषतात. त्यामुळे पाने पिवळी व निस्तेज होतात. सूत्रकृमी :  लक्षणे - सूत्रकृमी अतिशय बारीक आकाराचे असून, रोपांच्या मुळांमध्ये शिरून अन्नरस शोषून घेतात. मुळांवर गाठी होऊन मुळे जमिनीतील पाण्यातून अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाहीत. रोग नियंत्रण : भुरी : लक्षणे -  पानांच्या दोन्ही बाजूंनी पांढरी भुकटी टाकल्याप्रमाणे दिसते. फळांवरही पांढरी भुकटी आढळून येते. या रोगांमुळे फळांची प्रत खराब होऊन झाडाची वाढ खुंटते. रोगाचा प्रादुर्भाव तीव्र असल्यास पाने वाळून जातात. हा रोग हमखास झुकिनी पिकावर येतो. 

    पीक काढणी :  बी उगवून आल्यानंतर किंवा पुनर्लागवडीनंतर सुमारे ३० ते ३५ दिवसांनी पहिले फळ काढणीस तयार होते. फळे काढावयास सुरवात झाली की पुढे २५ ते ३० दिवस काढणी सुरू राहते. काढणी दररोज करावी. ४ ते ५ सेंमी व्यास असलेल्या, १४ ते १६ सेंमी लांबीच्या (अंदाजे वजन १९० ते २०० ग्रॅम) फळांची काढणी करावी. एक दिवस जरी फळांची काढणी लांबली, तरी फळांची दुसऱ्या दिवशी दुपटीने वाढ होऊन बाजारात पाठविण्यालायक राहत नाहीत. कोवळी व लहान आकाराची फळे काढू नयेत. कारण बाजारात पाठवितानाच फळे सुकू लागतात. झाडावरून फळ काढताना ते देठासहित काढावे. याकरिता धारदार चाकूचा वापर करावा. तुटलेली, वेडीवाकडी, निमुळती फुगीर फळे वेगळी निवडून घ्यावीत. ती बाजारात पाठवू नयेत. फळे हाताळताना सालीला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

    पॅकिंग : काढणी झाल्यावर पॅकिंग हाऊसमध्ये फळांच्या लांबीप्रमाणे लहान, मध्यम आणि मोठी याप्रमाणे काळजीपूर्वक प्रतवारी करावी. प्रत्येक फळ टिश्‍यू पेपरमध्ये गुंडाळून घेऊन कोरूगेटेड बॉक्‍समध्ये एकावर एक थर देऊन पॅकिंग करावे. प्रतिबॉक्‍समध्ये पाच किलो वजनापर्यंत पॅकिंग करावे.

    उत्पादन :  पावसाळी हंगामात प्रतिझाड सरासरी तीन किलो म्हणजे एकरी ११ टनांपर्यंत उत्पादन मिळते. अन्य हंगामात प्रतिझाड २ ते २.५ किलो उत्पादन मिळते. हरितगृहात उत्तम प्रतीचे उत्पादन प्रतिझाड चार किलोपर्यंत मिळते. म्हणजेच एकरी १४ ते साडे १४ टन उत्पादन मिळते. फळे पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बडोदा, बंगळूर, गोवा आदी ठिकाणी पाठविली जातात.

    साठवण :  प्रतवारी झाल्यावर त्वरित फळांतील उष्णता निघून जाण्यासाठी फळे पूर्व शीतकरण (प्री कूलिंग) करून शीतगृहांत पाच ते १० अंश सें. तापमान व ९५ टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये एक ते दोन आठवड्यापर्यंत चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात. फळांना वॅक्‍स कोटिंग किंवा तेल लावल्यास शीतगृहात साठवलेल्या फळांची प्रत उत्तम राहते. ज्याठिकाणी अशी सुविधा नसेल तेथे फळांची प्रतवारी, पॅकिंग झाल्यानंतर हा माल सायंकाळनंतर विक्रीसाठी पाठवावा. कमी कालावधीत चांगला आर्थिक फायदा देणारे झुकिनी पीक आहे.

    संपर्क : डॉ. अरूण नाफडे, ९८२२२६११३२. (लेखक पुणेस्थित उद्यानविद्या तज्ज्ञ आहेत)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com